1.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - चौथा दिवस (मालवण - आचरा - कुणकेश्वर - मालवण)

०८ जून २०१०, सकाळी मस्त आरामात १०च्या दरम्यान आम्ही उठलो. बराच वेळ आरामात इकडे-तिकडे रेंगाळत होतो. कालच्या थकव्या मुळे सर्वच जरा सुस्तावलो होतो. जरा आरामात टंगळ-मंगळ करत आमचा चहा नाश्ता असे चालले होते. १२च्या दरम्यान मग मी सर्वांना चला आता भटकंती करायला असे म्हणत सर्वांचे सूत्र हलवायला लागलो. मला दुसरा काही पर्यायच नव्हता, आज सगळेच आरामात काम करत होते. काल देवगड नंतर अंधार पडल्या मुळे, देवगड ते मालवणच्या दरम्यानची मधली सर्व स्थळे पहायची सोडली होती. आज काही करून ती राहिलेली स्थळे आम्हाला पहायची होतीच. सर्वांचे आवरून आम्ही १.३० च्या दरम्यान मालवण हून परत मागच्या बाजूला आचऱ्याच्या दिशेने निघालो. आचरे हे प्रशांत व हेमंत आचरेकर यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या ग्रामदेवाला जायचे होते आणि त्याच रस्त्यावर भगवंतगड व भरतगड पण आहे. आम्हाला भगवंतगड व भरतगड पाहून पुढे कुणकेश्वरला पण जायचे होते. आज आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायच्या होत्या आणि ते ही अर्ध्या दिवसात. आजचा अर्धा दिवस आम्ही वाया घालवलेला होतो. यामुळे आज जरा माझी चीड-चीड आणि पळ-पळ चालू होती. मी आज सर्वांवर थोडासा रागावलो होतो.

याच रागाच्या भरात आम्ही २ च्या दरम्यान मालवण सोडले आणि लागलो आचऱ्याच्या रस्त्याला. मालवण शहरातून २-३ किलोमीटरच गेलो असू आणि डाव्या बाजुला समुद्राच्या निळ्या भोर पाण्याने आम्हाला दर्शन दिले आणि माझा संपूर्ण राग या निसर्गाच्या रंगात विलीन होऊन मी शांत झालो. आता मी परत मस्त निसर्गाचा, बाईक चालवण्याचा आणि फोटोग्राफीचा आनंद लुटायला लागलो होतो. मी हे निसर्ग रम्य दृश्य मनभरून पाहायला थांबलो. एक-दोन फोटो पण काढून घेतले आणि निघालो पुढे. मस्त आरामात आनंद लुटत आम्ही आचऱ्यात आलो. सर्वप्रथम सर्वांना फार भूख लागली होती. नाश्ता पण तसा काय पोठ भरून केला नव्हता. जरासा चहा-बिस्कीट वगैरे असाच होता. जास्त उशिरा कोकणात जेवण मिळत नाही हा आमच्या कालचा अनुभव होता. अजून पुढे जास्त उशीर झाला तर मग जेवण मिळण्याची शक्यता कमी होणार. या विचाराने आम्ही सर्वांत पहिले जे हॉटेल दिसले त्या हॉटेल मध्ये घुसायचे असे ठरले. लगेच पुढे एक हॉटेल दिसले, हॉटेल कसले ते रस्त्याला लागून एक छोटेसे खोकटेच होते. पण माश्याचा जेवणाचा मस्त बाहेर रस्त्या पर्येंत वास येत होता. किंबहुना याच माश्याच्या वासाने आम्ही या हॉटेलच्या जवळ थांबलो.

आम्ही बाईक हॉटेलच्या बाहेर लावल्या पण हॉटेल मध्ये आधी पासून एक फॅमिली बसलेली होती आणि त्यांचे आवरण्याची वाट पाहत बाहेरच बाईक जवळ बसलो. त्यांचे उरकायलाच आले होते. त्यांचे आवरले आणि मग आम्ही घुसलो. पटा-पट जेवण्याच्या ऑर्डर सुरु झाल्या. माझे ठरल्या प्रमाणे मासे थाळी. कोणी मटण तर कोंबडी अश्या ऑर्डर झाल्या. अक्षता, हेमंत व प्रशांत शाकाहारी थाळी. हेमंत आणि प्रशांतला ग्रामदेवाला जायचे होते म्हणून त्यांचा आज शाकाहारीचा बेत केला. जेवण येई पर्येंत आम्ही थंडा मागवला. आज जरा जास्तच उकडत होते. घामाच्या नुसत्या धारा वाहत होत्या आणि गरमा पण सहन होत नव्हता. त्यातून आज हवा पण पडली होती. हॉटेलच्या खोकट्यात तर फारच जास्त गरम होत होते. म्हणून जेवण येई पर्येंत मी, राव व राजू हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर थंडा पीत उभे राहिलो.

जेवण आले आणि सर्व तुटून पडलो, फारच भुकेलेलो होतो आणि त्यातून जेवण पण यायला बराच वेळ लागला होता. मी आज सुरमई वर ताव मारत होतो. सुरमई, मटण, कोंबडी याची एक-मेकान मध्ये देवाण-घेवाण करत आम्ही जेवण उरकले. जेवणा नंतर मस्त एक-एक ग्लास थंड सोळकडी पण झाली आणि निघालो आचरेकरांच्या ग्रामदेवळात जायला.

देऊळ हॉटेल च्या जवळच १ एक किलोमीटर वर होते. देवळाच्या बाहेर बाईक लावल्या आणि देवळाच्या आवारात शिरलो. देऊळ फारच मस्त होते जुन्या काळातले लाकडी खांबांचे सभामंडप आणि प्रशस्त आवार. आम्ही देवळाच्या सभामंडपाच्या बाहेर चपला काढायला लागलो. तेवढ्यात हेमंतने आम्हाला मौसाहार घेतला आहेत म्हणून तुम्ही देवळात नाही येऊ शकत असे सांगितले. मी हेमंतला बोललो की मला चालते, मी मासे खाऊन देवळात जातो. मला हे सर्व चालते. मी असा विचार नाही करत. पण हेमंत मला बोलला की त्यांना आणि त्यांच्या देवाला असे चालत नाही. मग आता मी काय बोलणार या विषयावर, हा प्रत्येकाच्या भावनांचा भाग आहे. मी हेमंत व प्रशांतला बोललो अरे मासे खायच्या आधी तरी सांगायचे होते ना मग मौसाहार घेतला नसता. एवढा काय मी माश्यांसाठी वेडा तर नक्कीच नाही आहे. मग काय त्या गावच्या रूदीच्या आणि त्या गावच्या माणसांच्या भावनेचा आम्ही मान राखून मौसाहार घेतलेली सर्व माणसे मंदिराच्या आवारातच एका बाजूला उभे राहिलो. बाहेरूनच मंदिराच्या सौंदर्य पाहून घेतले. वास्तविक मी अश्या कुठल्याही गोष्टींवर जराही विश्वास ठेवत नाही मला देवाच्या दर्शनाची जर इच्छा झाली, तर मग मी कुठल्याही असस्थेत असो मी दर्शन घेतो. मी या पुर्वी पण कैकदा मौसाहार करून किंवा अंघोळ सुद्धा न करून देवळात देवाचे दर्शन घेतले आहे आणि ते पण अष्टविनायक, मार्लेश्वर सारख्या प्रसिद्ध देवस्थानाला. माझ्या कुठलाही प्रवासात किंवा भटकंतीत अशी प्रसिद्ध देवस्थाने रस्त्यात लागली तर आवर्जून मी भेट देतो. पण या वेळेला मी हेमंतशी जास्त हुज्जत न घालता मुकाट्याने गप्प बसलो. कारण मला आपल्या मित्राच्या आणि त्यांच्या परिवारच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. अश्या बाबतीत माझे मत जरा जास्तच कठोर असते, हे मला परिपूर्ण ठाऊक आहे आणि या मुळे मला वाद उठवायचा नव्हता.म्हणूनच मी या विषया वर माझे कठोर मत मांडले नाही.

असो, प्रशांत व हेमंत देवाचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्हा सर्वांना प्रसाद वाटला. प्रसाद फस्त करून निघालो भगवंतगडाच्या दिशेने. मंदिराच्या बाहेरच काही लोकां कडून भगवंतगड व भरतगडा कडे कसे जायचे आणि या गडा बद्दलची अजून काही जास्त माहिती करून घेतली. यातूनच कळाले की भरतगड आता काही पाहण्या लायक राहिला नाही आहे. एक तर हा गड म्हणजे आता फक्त एकाच बुरूज राहिला आहे आणि बाकी सर्व ढासळलेले आहे. या गावकऱ्यांच्या सूचनेचा आदर राखून आम्ही भरतगड नाही पाहायचा असा चर्चांती निर्णय घेतला. दोने दिवसान पूर्वीच आम्हाला आंबोळगडचा परी-पूर्ण अनुभव आला होताच. मग आता आमची स्वारी निघाली भगवंतगडा कडे. आचऱ्यातून डोंगरा कडे जाणार्‍या रस्त्याला लागलो आणि प्रत्येक चौकात भगवंतगडा कडे रस्ता विचारत गेलो. भगवंतगड गावात गेलो आणि गडाकडे जाणारा रस्ता विचारला. हा गड सागरी किनाऱ्या जवळ नाही आहे, डोंगरावर आहे. हा गड आचरा खाडी वर निघा राखण्यासाठी डोंगरावर बांधला आहे. गड पाहण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागणार होता. गावकऱ्यांनी रस्त्यला बाईक लावा आणि शाळेच्या  मागच्या बाजूने एक पाय वाट गडा कडे जाते असे सांगितले. गावकऱ्यांच्या सांगण्या प्रमाणे आम्ही केले. रस्त्याला बाईक लावल्या आणि शाळेच्या आवारात जरा मस्ती करत होतो. सर्व मिळून मस्त रावची टेर खेचत होतो. शाळेच्या भिंतीन वर सुविचार लिहिले होते त्यावरून सर्व रावची टेर खेचत होतो. शाळेच्या मागच्या बाजूने ट्रेक करायला लागलो. १५-२० मिनिटांचा छोटासा ट्रेक केला आणि गडाच्या मोडलेल्या दरवाज्या जवळ आलो. एवद्या गर्मीत, या छोट्याश्या ट्रेक ने सर्वांचा घामटा काढला. काढणार नाहीतर काय एक तर मे महिन्यातली कोकणातली गर्मी आणि त्यातून सर्वांची धावपळीची सवयच मोडली आहे सध्या. त्यातून दुपारची वेळ.

गडाच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिर आहे. आजूबाजूला भली मोठी झाडी आहे. मंदिराच्या समोरच एक भरपूर मोठे झाड होते. त्या झडाच्या सावलीत आम्ही बराच वेळ आराम करून घेतला आणि गप्पा टप्पा टाकत बसलो. जस-जसे ज्याचा आराम होत-होता तस-तसे तो उठून फोटोग्राफी करून घेत होतो. मी पण माझी गडा वरची आणि गडा वरुन दिसणार्‍या आचरा खाडी च्या निसर्गाची फोटोग्राफी करून घेतली. या ठिकाणी मला प्रशांत आणि रावने नवीन नाव ठेवले "इच्छा धारी नाग". मी बाईक वर उनाचा आणि धुळीचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर आणि तोंडावर फडका लावायचो. तो फडका मी या ट्रेक वरून ते आराम करे पर्येंत काढलाच नव्हता. सर्वांनी माझी पोट भरून चेष्टा करून घेतली. किंबहूना माझे फोटो पण काढून घेतले, माझी आठवण म्हणून सर्वांनी.




सर्व आवरून गड उतरायला लागलो. पटा-पट जास्त मस्ती न करता गड उतरलो. पण शाळेकडे आल्यावर मात्र पुन्हा मस्ती सुरु झाली. आता सर्वांचा मस्तीचा मूड तयार झाला होता. विशेष करून प्रशांत, मी आणि हेमंत शाळे बाहेरचे सुविचार वाचून रावची टेर खेचत होतो. शाळे कडून पण खाली उतरलो आणि बाईक काढून परत आचऱ्यात येउन कुणकेश्वराच्या रस्त्याला लागलो. ५-५.३० च्या दरम्यान आम्ही मिटबावच्या चौकात होतो. तिकडे चौकातच कुणकेश्वरचा रस्ता विचारून घेतला आणि त्या रस्त्याने गेलो. कुणकेश्वर हे तळ कोकणातले बर्‍यापैकी मोठे देवस्थान आहे. मंदिराच्या बाहेर बरेच मोठे मैदान गाड्या उभ्या करायला आहे. रस्त्याच्या दुषी कडे हॉटेल व दुकाने आहेत. सर्वांना चहा पीहायची तलप आली होती. म्हणून मंदिरात जायच्या आधी चहा व थंड एका हॉटेल मध्ये बसून पिऊन घेतली. चहा उरकला आणि मंदिराच्या आवारात आलो. पण तिकडे पाहतो तर फारच गर्दी होती. प्रशांत व हेमंतने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बाकी आम्ही सर्व बाहेरच मंदिराच्या कठवड्यावर बसून संध्याकाळची सूर्याची किरणे पडणाऱ्या कुणकेश्वराच्या मंदिराचे सौंदर्य न्याहाळत बसलो. मंदिराला लागूनच मस्त लांब लचक बीच आहे आणि बरीच माणसे तिकडे पण होती. कुणकेश्वराचे मंदिराचा आकार बराच उंच आहे आणि निराळ्या घडणीचे हे मंदिर आहे. प्रशांत व हेमंत कुणकेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि मग आम्ही सर्व मिळून बीच वर गेलो.




बीच भलताच लांब-लचक आहे. आम्ही गर्दी पासून बर्‍या पैकी लांब पर्येंत गप्पा-टप्पा मस्त मज्जा-मस्ती  करत चालू लागलो. चालत चालत आम्ही मंदिरा पासून बरेच लांब आलो आहे असे जाणवले, म्हणून मग परत मागे फिरलो. बरेच चालून झाले होते म्हणून आता थकलो होतो. हळू हळू चालत आम्ही मंदिराच्या जवळ येऊन बीच वरची फोटोग्राफी करू लागलो. अक्षाताला समुद्राच्या पाण्यात जाऊन भिजायचे होते, मस्ती करायची होती आणि खेळायचे पण होते. पण मला जरा ही समुद्राच्या पाण्यात भिजायला आवडत नाही. किंबहूना मला समुद्र, बीच, त्यावरची वाळू तसे काय फार आवडत नाही आणि समुद्राचे पाणी तर अजिबातच नाही. जरासे पाण्यात पाय भिजवण्या पर्येंत कधी तरी मूड असेल तर जातो. मग मी अक्षाताच्या आग्रहास्तव तिच्या इच्छे खातर तिच्या बरोबर थोडावेळ पाण्यात पाय भिजवले. नंतर तिला तू एकटी खेळत रहा पाण्यात असे सांगून मी पाण्याच्या बाहेर येऊन बसलो. मग राव, राजू, हेमंत आणि प्रशांत पण येऊन बसले. बिचारी अक्षता एकटीच पाण्यात खेळात होती. थोड्या वेळाने तिचे मन भरले किंवा एकटीला पाण्यात खेळायला कंटाळा आला असेल म्हणून म्हणाना ती पाण्याच्या बाहेर आली आणि आमच्यात येऊन बसली. आता तिचे मन भरले की ती एकटी पाण्यात खेळून कंटाळली हे तीलाच ठाऊक. नक्कीच ती एकटी कंटाळली असणार असे मला वाटते.

बराच वेळ बीचवर बसून सूर्याला निरोप दिला आणि निघालो बीच वरून. परत त्याच हॉटेल जवळ आलो आणि प्रशांताला आता भजी खायचा मूड आला. याने सर्वांना भजी खाण्यासाठी प्रवृत केले. मग काय घुसलो सर्व परत त्याच हॉटेल मध्ये. कांदा भाजी ऑर्डर केल्या. ऑर्डर येई पर्येंत प्रशांत बसल्या बसल्या फोटोग्राफी करू लागला. आता सर्वांचा मस्त मूड होता, सर्वच फार आनंदी होते. गरम-गरम कांदा भजी वर तुटून पडलो. थोडा वेळ तिकडे मस्ती करत चहा मारला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. आता अंधार पडायला आला होता. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेच सुटलो. मध्ये कुठेही न थांबता एक-दीड तासांनी आम्ही मालवणात होतो. आरामात अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन घेतले आणि ९-९.३०च्या दरम्यान जेवायला परत समोरच्या हॉटेल अतिथी बांबू मध्येच गेलो. आता मी कोलंबी थाळी मागवली आणि बाकी सर्वांनी आप-आपल्या ऑर्डर केल्या. आज सकाळच्या ऐवजी आम्ही दुपारी निघून सुद्धा पटा-पट सर्व उरकल्या मुळे जरा थकलो होतो. जेवण उरकून प्रशंतच्या घरी आलो आणि गप्पा टाकत बसलो. गप्पा कसल्या आमच्या चर्चा चालू झाल्या होत्या. मी आणि राव जरा चर्चातून वादाच्या मूड मध्ये घुसलो. हे पाहून अक्षताने लगेच पळ काढला आणि ती झोपी गेली. आज सकाळच्या आरामात व रेंगाळत झालेल्या आमच्या कामा मुळे मी जरा वैतागलो होतो. त्यामुळे राव व माझ्यात बराच वाद झाला. त्याचे आणि माझे मत आप-आपल्या जागेवर बरोबर होते. माझे मत होते की सर्वांनी अगदी लवकर नाही उठले तरी चालेल पण जरा ठरलेल्या वेळेत उठायला पाहिजे आणि जेवढे लवकर होईल तेवडे लवकर बाहेर पडले पाहिजे. तेणे करून मग आरामात फिरता येते आणि संध्याकाळी मज्जा आराम पण करता येतो. रावच्या मते सर्वांना जास्त धावपळ, दग-दग आता जमात नाही आणि ती कशाला करायची. या सर्व विषयावर आमची रात्री ३ वाजे पर्येंत चर्चा वजा वाद चालू होता आणि मग शेवटी शांत गप्पा झाल्या. शेवट पर्येंत मी आणि रावच जागे होतो, एक-एक करून सर्व झोपी गेले आणि मग आम्ही पण. 

1 comment: