1.1.14

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग दुसरा - उगम आणि पूर्व तयारी.

आमच्या पहिल्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप नंतर रावने त्याच्या पायाचे ऑपरेशन करून घेतले. तो २ एक वर्षाने बाईक ट्रिपसाठी तयार झाला. छोट्या मोठ्या बाईक ट्रिप पण करायला लागला. बरेचदा राजू मला व रावला अधून मधून सारखे सांगायचा की "चलो ना यार बची हुई बाईक ट्रिप करते है". पण या मधल्या कालावधीत आमच्या सर्वनच्या आयुष्यात बराच फरक पडला होता. आम्ही सर्व नोकरीला लागलो होतो. राजू त्याचे म्यूज़िक शो करायला लागला होता. म्हणून आमच्या सर्वांची वेळ एकत्र कधीच जमतच नव्हती. आमच्या पहिल्या बाईक ट्रिप नंतर मी अष्टविनायक आणि लेह बाईक ट्रिप केल्या होत्या. रावने पण बरे झाल्यावर माथेरान आणि बर्‍याच ठिकाणी बाईक ट्रिप केल्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे माझे लग्न झाले होते. ऑफिसच्या कामासाठी सौदी अरेबियाला जावे लागले होते ६ महिन्यानसाठी. हे सर्व २००५ ते २०१० च्या दरम्यान झाले.

२००९-२०१० मध्ये मी सौदीला असताना राजू मला ऑनलाइन भेटला होता. बऱ्याच गप्पान मध्ये राजू ने मला विचारले की केव्हा येणार आहेस? जमले तर तू आल्यावर आपण आपली राहिलेली कोकण बाईक ट्रिप पूर्ण करूया का?. मी जवळ-जवळ ६ महिने बाहेर होतो, म्हणून मला काही तरी करायचे होते आणि नक्की सुट्टी हि मिळाली असती हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी लगेच राजूला होकार दिला. या नंतर मी लगेच राव, सुजय, राजू आणि माझी बायको अक्षताला कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग दोन बद्दल ई-मेल पाठवला. या ई-मेल मधे तारखा आणि कुठून कसे कसे जायचे याचा प्लान मी सर्व नमूद केला होता. सर्वांचा या ट्रीपला होकार आला. कधी नव्हे तर सर्वांची वेळ एकत्र जमली. तारीख ठरली ६ जून २०१० कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप भाग दोन साठी.

मी मे २०१० मध्ये ऑफिसचे काम संपवून मुंबईला आलो. ऑफिस मध्ये गेल्या-गेल्या सर्वप्रथम सुट्टी टाकून पास करून घेतली आणि मग पुढच्या कामाला लागलो. मी आणि रावने बाईक सर्वीस करून घेतल्या आणि सुजयला पण त्याची बाईक सर्विस करून घ्याला सांगितले. कारण यावेळेला ट्रीपसाठी आम्ही ५ जण होतो. सुजय, राजू, राव, मी आणि अक्षता. ३ बाईकची गरज होती. जस-जसे दिवस जवळ यायला लागले तसे आम्ही आमची तयारी जोरात करायला लागलो. यातच कळले कि रावचा सोलापूरचा भाऊ उन्मेश पण या ट्रीपवर येणार आहे. पण सुजय मात्र गळणार याची लक्षणे दिसायला लागली होती.

शेवटी बाईक ट्रीपच्या काही दिवस आधी सुजय येणार नाही हे नक्की झाले. मी, राजू व राव सर्वांनी त्याला मस्का लावायचा प्रयेत्न केला. पण सुजय तो कसला ऐकणार का. असो! सर्वांना त्याने त्याची हेल्त बोम्बली आहे असे कारण सांगितले, मग आम्ही तरी काय बोलणार त्याला. मला ट्रीप झाल्यावर कळले कि अक्षता या ट्रीप वर येणार होती म्हणून तो नाही आला. कारण माझ्या बायको बरोबर तो कंफर्टबल नव्हता. अक्षता मुळे त्याला पाहिजे तशी मस्ती नाही करता येणार. मला या कारणास्तव सुजय ट्रिपवर नाही आलो असे कळाले त्यामुळे फार वाईट वाटले होते. वास्तविक मी, राजू, राव आणि सुजय हे कोकण बाईक ट्रिपचे मूळ  मेंबर आहोत. कोकण सागरी बाईक ट्रिपवर सर्वप्रथम आम्हा चौघांचा हक्क राखीव आहे, मग उन्मेश व अक्षता यांचा नंबर लागतो. मला जर सुजायचे हे कारण ट्रीपच्या आधी कळाले असते तर मी अक्षताला या ट्रीपसाठी तयार नसते केले. पुढे सुजय ट्रिपवर न येण्याचे कारण हे पण नाही आहे असे ही कळाले. मुळात सुजयला त्यावेळेला बाईक ट्रीप करायची अजिबात इच्छा नव्हती.

या सर्व रामायणातून आम्ही सर्व बाईक ट्रीपची तयारी केली आणि सज्ज झालो कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप भाग दुसऱ्यासाठी. राव पुण्याला राहायला गेल्यामुळे आमच्या ट्रीपच्या एक दिवस आधी यायला सांगितले. उन्मेश सोलापूर वरून निघून आम्हाला देवरूखला भेटणार होता.

४ जून २०१० ला संध्याकाळी मी ऑफीस वरुन घरी आलो आणि सर्व शेवटची बांधा-बांध करून घेतली. राव पुण्यावरून सकाळी लवकर निघून मुंबईला आला होता त्याची अवेंजर घेऊन. मी पण लेह बाईक ट्रीपसाठी अवेंजरच घेतली होती. या कोकण बाईक ट्रीप भाग दोन साठी आमच्या २ अवेंजर होत्या आणि उन्मेश उर्फ उन्नुची युनिकॉर्न अश्या ३ बाईक ठरल्या होत्या. रात्री राव माझ्या कांदिवलीच्या घरी आला आणि थोड्या वेळाने राजू पण. मी त्यांच्या साठी जेवायला थांबलो होतो. आम्ही सर्वांनी मस्त आईनी केले कोंबडीच्या मटणाचे जेवण हांडले. रावला व राजूला आमच्या घरचे कोकणातल्या गोडा मसाल्या (भाजलेला कांदा व सुके खोबरे वाटलेल्या) चे जेवण फार आवडते. ट्रीप चालू व्हायच्या आधी आईने कोकणी जेवणाच्या मार्फत आमची कोकणपरिसरासाठी मानसिक तयारी करून घेतली.  उद्याची सर्व तयारी करून लगेच झोपली गेलो. सकाळी आम्ही लवकर घर सोडणार होतो, कारण आमचा पहिल्या दिवसाचा पल्ला सरळ मुंबई ते देवरुख असा होता.