31.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - बाविसावा दिवस (महाड ते मुंबई)

८  जून २००५, ठरल्याप्रमाणे सर्व सकाळी लवकर उठलो आणि प्रातविधी उरकून सर्व नाश्त्याला आलो. नाश्ता तयारच होता, सुजयचे आई-बाबां तर नाष्टा करून आमचीच वाट पाहत होते. आम्ही पटा-पट नाश्ता उरकला आणि लागलो निघायच्या तयारीला. आम्ही सर्व सामान खाली घेऊन आलो. सुजयचे आई-बाबा तर तयारच होते. ८ च्या दरम्यान आम्ही सर्वांनी घर सोडले. सुजयचे आई-बाबा गाडीत आणि सुजय व मी बाइक वर.

आज सुजयला माझी बाइक चालवायची हुक्की आली. माझ्यात सुजयला नाही बोलण्याची हिमंत नव्हती. पण सुजय मात्र फार नालायक आहे...रावची एण्टाईसर होती त्या वेळेला त्याला माझी विकटर नाही आवडत होती. पण आता त्याला माझी विकटररच चालवायची होती. तरी पण मी त्याच्या बरोबर थोडीशी हुज्ज्त घातलीच. आमच्यात हे असे चालतच असते. आम्हा सर्वांना सुजयच्या या स्वभावाची परिपूर्ण जाणीव आहे. सुजय बाइक चालवत होता आणि मी पाठी बॅग घेऊन मस्त आरामात बसलो होतो. वास्तविक बरेच दिवस बाइक चालवून मी जरा थकलो होतो आणि सुजयच्या या हट्टामुळे मला आज जरा आराम मिळत होता. सुजयच्या बाबांची गाडी आमच्या मगेच होती. थोडा वेळ ते आमच्या मागोमाग होते आणि मग महाड पार करून पुढे गेल्यावर ते आम्हाला बाइक सावकाश चालवा असे बोलून निघाले पुढे.

आता सुजय जरा रिलॅक्स झाला. आई-बाबा मगेच होते म्हणून सुजयचे जास्त लक्ष त्यांच्या कडे होते. मस्त आरामात बर्‍याच ठिकाणी आम्ही थांबत होतो. महाड वरुन सुटलो ते माणगावला थांबलो. मग नागोठण्याला कामत कडे. पुढे वडखळ आणि कर्नाळ्यात थांबून आराम करत. कर्नाळ्या वरुन सुटलो ते मधे कुठे ही ना थांबता थेट रुईया नाक्यावर आलो. दुपारी २ च्या दरम्यान आम्ही नाक्यावर होतो आणि अशा तऱ्हेने आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिपच्या पहिल्या भागाचा शेवट झाला. आम्ही एवढे थकलो होतो तरी संध्याकाळ पर्येंत नाक्यावर बाकी सर्व मित्रान बरोबर टाइमपास करत होतो आणि मग आपआपल्या घरी गेलो.  

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - एकविसावा दिवस (रायगड आणि परिसर)

७ जून २००५, सकाळी ८ च्या दरम्यान सुजयच्या आईने आम्हाला उठवले आणि तयार होऊन नाश्त्याला बोलावले. पटा-पट आम्ही दोघे तयार होऊन नाश्त्याला खाली आलो. नाश्ता तयार होतच. सुजयच्या आईने मला झोप नीट लागली या बद्दल चौकशी केली आणि आम्हाला नाश्ता वाढला. मस्त गरम-गरम घरचा नाश्ता बरेच दिवसांनी मिळाल्या बद्दल लगेच उरकला आणि बसलो टंगळ-मंगळ करत. सुजयचे बाबा ऑफिसला गेले होते. त्यांनी आमच्या करता त्यांची ऑपट्रा गाडी परत पाठवली होती आणि आज आम्ही बाईक कुठेही फिरवायची नाही असे बजावले होते. मग काय आम्हाला त्यांची मर्जी मोडायला जमणार होती काय.


सुजयच्या आईने सुजयला आमच्या आजच्या भटकंती साठी पैसे दिले आणि ड्राइवरला सांगितले की आम्हाला सर्वत्र फिरवायला. आज आमच्या ट्रिपचा सर्वात आरामाचा दिवस होता. मस्त आलिशान गाडीतून आमची भटकंती होणार होती. सुजयच्या बंगल्यातून निघालो आणि बिरवाडी मार्गे भोरघाटाच्या रस्त्याला लागलो. भोरघाट चालू व्हायच्या थोडाच अलीकडे शिवथळ घळ आहे. शिवथळ घळच्या पायथ्याशी ड्राइवरने गाडी थांबवली आणि आम्ही घाळ चढायला लागलो. शिवथळ घळ फार उंचावर नाही आहे, १० मिनटात चढलो.  शिवथळ घळ ही एक फार मोठी गुहा आहे आणि या गुहेच्या बाजूने धब-धबा आहे. आता उन्हाळ्यात मात्र हा धब-धबा सुकलेला असतो पण पावसाळ्यात मात्र मजबूत जोरात पडत असतो. शिवथळ घळाचे प्रामुख्याने महत्त्व दासबोधामुळे आहे. रामदास स्वामींचे बरेच वास्तव्य या गुहेत होते आणि त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ दासबोध याच गुहेत लिहिला. आता शिवथळ घळाचे मठात रुपांतर झाले आहे. आम्ही रामदास स्वामींचे दर्शन घेतले.

आम्ही खाली उतरून आलो आणि निघालो पर्तीच्या दिशेने. आता आमचे पुढेचे ठिकाण होते झुलता पूल. सुजय आधी या ठिकाणी गेला होता. ड्राइवर आणि सुजय हे दोघे पण मला या जागे बद्दल काही सांगायला तयार नव्हते. मला ते फक्त "तू तिकडे गेल्यावर कळेल काय जागा आहे ती" असेच बोलत होते. मी  शिवथळ घळला आधी भेट दिली होती, पण हा झुलता पूल काय आहे ते मला माहीत नव्हते.  म्हणूनच मला फार कुतूहल लागून राहीले होते या जागे बद्दल.
झुलता पुलाकडे जाताना ड्राइवरने आम्हाला रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी फुलात गणपतीचे स्वरूप दिसत आहे असे सांगलीतले. येताना तो आम्हाला तेही दाखवणार होता. ३-४ किलो मीटर पुढे गेलो आणि झुलता पूल लांबून दिसला. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि आम्हाला चप्पल पुलाच्या याच बाजूला काढायला सांगितले. चांगल्या ऊनाने तापलेल्या जमिनीवर पाय ठेवत पण नव्हते आणि आम्हाला तर लोखंडी पूल पार करायचा होता. मी आणि सुजय जे गाडीतून बाहेर पडलो ते सरळ पाळायला लागलो. पूल सुसाट पार केला आणि देवळाच्या सावलीत जाऊन उभे राहिलो. हा झुळता पूल नदीच्या डोहा वर आहे. या डोहात बरेच मासे आहेत आणि डोहाच्या तीरावर देवीचे मंदिर आहे. या परिसरातले लोक डोहातल्या माश्यांना देवीचे माशे बोलता असे मला सुजयच्या ड्राइवर कडुन कळाले. म्हणूनच या ठिकाणी मासेमारी होत नाही. नाहीतर कसले मोठे मासे आहेत या डोहात ते राहिले तरी असते का? देवाच्या करणामुळे राहिले होते आणि नाही तर एवढे सर्व मासे आजू-बाजूच्या गावकर्यांच्या पोटात असते. असो !  

आता बराच वेळ झाला म्हणून आम्ही निघालो परत घराकडे. ठरल्याप्रमाणे ड्राइवरने स्वयंभू गणपतीच्या ठिकाणी गाडी थांबवली. पटा-पट आम्ही फुलात फुललेला गणपती पाहून घेतला आणि निघालो. बऱ्या पैकी उशीर झाला होता, म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता घराकडे पळालो. काकूंनी जेवणाची तयारी करून ठेवलीच होती. आम्ही फ्रेश होऊन येई पर्येंत जेवण वाढण्यात आले. गरम-गरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम करत बसलो. मस्त आराम केला आणि थोडेसे ऊन सरले म्हणून रायगडच्या दिशेने निघालो.  

४ च्या दरम्यान रायगड रोप वे जावळ होतो. तिकीट काढले आणि बसलो रोप वे मध्ये. जस-जसी रोप वे वर जायला लागली तस-तसा सुजय कडक व्हायला लागला. बराच वेळ मला हे जाणवलेच नाही, पण मी जेव्हा सुजयला सांगितले की जरा या बाजूला हो मला एक फोटो काढायचा आहे. तेव्हा तो मला बोलला की जरा गप बस भाड्या, केबल कार बघ किती हलते आहे ते. याच्या पहिले मला माहीत नव्हते की सुजयला उंचीची भीती आहे. आता मला जाणवले मग मी कसला सुजयला सोडतोय. पहिल्यांदा सुजयला पिडायची संधी मिळाली होती, मी काय त्याला सोडणार होतो. सारखे त्याला मी जरा अस होना आणि तसा होना, असे माझे चालू होते. सुजय मात्र मला जरा गप्प बस ना रे तू. तो एवढेच फक्त माझ्याशी बोलत होता. 

रोप वे तून रायगडचा परिसर फारच छान दिसत होता. १५ मिनटात आम्ही रायगडच्या माथ्यावर आलो. केबल कार थांबली आणि सुजयने श्वास सोडला. केबल कारच्या बाहेर येउन तो मला शिव्या घालायला लागला. आता पुढे रायगड किल्ला पायीच फिरायचा होता आणि आम्हाला अंधार व्हायच्या आत परत पायथा गाठायचा होता.  पटा-पट आम्ही रायगडचा बराचसा भाग पाहायचा ठरवले आणि सुटलो. होळी माळ, बाजारपेठ, टकमक टोक, रान्यांचा महल्, मंत्रांचा महल, मंदिर, तलाव करत आम्ही मस्त फिरत-फिरत परत रोप वे कडे आलो. आता परत सुजयला मी पिडायला लागलो आणि सुजय मला शिव्या घालायला लागला. रोपवेत बसलो आणि सुजय परत कडक झाला. रोप वे तून उतरून आम्ही पर्तीच्या रस्त्याला लागलो आणि घराकडे निघालो. घरी पोहोचे पर्येंत सुजयचे बाबा ऑफीस मधून घरी परतले होते. आजचा दिवस फार मस्त गेला.  सुजयच्या आई-बाबानी आम्हाला फारच फिरवले. आम्ही फ्रेश होऊन जेवायला खाली आलो. मस्त शानदार सुजयच्या आई-बाबान बरोबर आरामात जेवण चलले होते. आता मात्र सुजयच्या आई-बाबानी गोड शब्दात आमची कान उघडणी करायला सुरवात केली. मुद्दे होते एम.एस.सी. त्यानंतर पुढे काय? बाईक ट्रिप व अशी भटकंती कशाला आणि वगैरे-वगैरे…… 

जेवण उरकून आम्ही सर्व गार्डन मधे मस्त आराम करत बसलो होतो आणि आता मात्र सुजयचे आई-बाबा आम्हाला आमच्या भल्याच सांगायला लागले. विशेष करून सुजयला कारण त्यांच्या मते सुजय कोणाचेच काही ऐकत नाही. आता सर्व चर्चा सुजयच्या वागणुकी बद्दल चालू होती. त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल. बराच वेळ या सर्व विषयावर चर्चा करून शेवटी सुजयचे आई-बाबा हतबल होऊन, मी सुजयला काही तरी समजवावे असे त्यांचे मत होते. उद्या सकाळी आम्हा सर्वांना लवकर मुंबईला निघायचे होते म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला पाठवले. आम्ही कसले झोपतोय, रूम वर गेल्यावर परत या गोष्टीन वर चर्चा करायला लागलो. किंबहुना मी बराच वेळ सुजयचे डोके खात होतो.  त्याने त्याच्या आई-बाबांचे सांगणे नीट ऐकायला हवे आणि वगैरे-वगैरे. बराच वेळ मी सुजयचे मजबूत डोके खाल्ले आणि यातच आम्ही झोपी गेलो.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - विसावा दिवस (देवरुख ते महाड)

६ जून २००५, अलार्म वाजल्या बरोबर ५.३० वाजता मी उठलो. प्रातविधी आवरले आणि निघण्याच्या शेवटच्या तयारीला लागलो. आईच्या सुचनेचे सर्व पालन करत घरच्या खिडक्या दरवाजे नीट लावून ६ च्या दरम्यान मी देवरुख सोडले. पांगेरी मार्गे जाणारा रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो. सकाळी बाईक चालवायला मस्त वाटत होते. पाऊण एक तासात बाव नदीच्या फाट्यावर आलो. मला भूख लागली होती पण एवढ्या सकाळी कुठली टपरी उघडली असणार. कसा बसा एक माणूस रस्त्याने जाताना दिसला त्याला मी जयगडला जाणारा रस्ता विचारून घेतला. आम्ही सर्व गणपतीपुळ्याला जाताना जयगड किल्ला पाहायचा राहून गेला होता म्हणून मी महाडला जायच्या आधी जयगड पाहून घेऊ असे मी ठरवले होते.

जाकादेवी मार्गे मी दीड एक तासात जयगड बंदराला पोहोचलो. जाकादेवी वरुन जयगडला येताना मस्त वाटत होते. सकाळच्या वेळी या परिसरात मस्त गार वाटत होते. जयगड बंदरावर एक-दोन माणसे सोडली तर फार कोणी नव्हते. काहीही उघडले नव्हते आणि रहदारी पण चालू झाली नव्हती. बंदरावर तसे काही पाहण्यासारखे दिसले नाही, म्हणून मी तिकडच्या त्या एका-दोन माणसांना गडाकडे जायचा रस्ता विचारून घेतला. जयगड किल्ला बंदराला लागूनच असलेल्या टेकडावर आहे. लगेच त्या दिशेने मी बाईक फिरवली आणि ते टेकाड चढून किल्ल्याच्या दिशेने गेलो. किल्ल्याच्या बाहेर बाईक लावली आणि शिरलो आत. किल्ल्यात शिरलो आणि पाहोतोतर किल्ल्याची फक्त तटबंदीच दिसून आली बाकी किल्ल्याचे सर्व अवशेष ढासळून गेले होते. मध्यभागी फक्त माळ रान होते, पण चारी बाजूची तटबंदी मजबूत भक्कम राहिली होती.

मी तटबंदी वरुन आरामात एक फेर-फटका मारला. थोडा वेळ माळावर फिरत राहिलो आणि आलो किल्ल्याच्या बाहेर. या सर्व फेर-फटक्यात आता ऊन डोक्यावर आले होते. बाईक काढली आणि निघालो पर्तीच्या दिशेने. जयगड वरून भातगावचा ब्रिज घेतला आणि सावर्ड्याच्या दिशेने निघालो. भातगाव ते सवार्डा हा रस्ता मला पण नवीन होता. मधेच गाव लागले कि सावर्ड्याला जातो याची खात्री करून घ्यायचो आणि मग पुढे निघायचो. आता ऊन फारच रण-रणायला लागले होते. सुमारे एक-दीड तासाने मी सावर्ड्याला पोहोचलो. फारच ऊन होते म्हणून आणि बाईक चालवून थोडा ब्रेक घ्यावा या कारणास्तव चहाचा ब्रेक घेतला.

चहा घेत थोडा आराम केला व सुजयला पण फोन लावून घेतला. सुजयला सांगितले की संध्याकाळ पर्येंत मी महाडला पोहोचतो. छोट्याश्या ब्रेक मुळे जर बरे वाटले आणि निघालो पुढे. आता माझा पुढचा सर्व प्रवास राष्ट्रीय महामार्ग १७ वरुन होता. रस्त्याला रहदारी पण फार होती, म्हणून बाईक जरा लक्षपूर्वक चालवावी लागत होती. आरामात सावर्डा ते चिपळूण हे अंतर एका तासात पार केले. आता मला मजबूत भूक लागली होती. चिपळूण मधे हॉटेल अभिषेक जवळ थांबलो. मस्त माश्याची थाळी ऑर्डर केली. फ्रेश होऊन जेवण यायची वाट पाहत बसलो. जेवण आले आणि मी तुटून पडलो. जेवण आवरले आणि हॉटेलच्या बाहेरच असलेल्या पानवल्या कडे पान खाल्ले. त्या पानवाल्याला पाहून मला पान खायची काय इच्छा झाली काय माहित. बाहेरच थोडा वेळ रेंगाळत बसलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

चिपळूण वरुन निघालो आणि आरामात बाईक चालवत परशुराम घाट चढायला लागलो. परशुराम घाटात परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. मी फिरलो मंदिराच्या दिशेने. मंदिर फारच प्राचीन आहे. मंदिराच्या बाजूने फेर-फटका मारला व परशुरामाचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या दिशेने. हळू-हळू बाईक चालवत लोटे करत भरणा नाका, नातूनगर पाठी टाकत निघालो आणि कशेडी घाटाच्या पायथ्याशी आलो. बाईक चालवून कंटाळा आला, म्हणून एक छोटा ब्रेक घेतला. आता पुढे घाटात बाईक चालवायची होती, त्यामुळे मी जर तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन घेतले आणि लागलो घाट चढायला. कशेडी घाट हा कोकणातील सर्वात मोठा आणि फार वळणा-वळनांचा घाट आहे. आरामात हळू-हळू एका पाठो-पाठ एक वळण पाठी टाकत मी घाट चढत होतो. अर्ध्या तासात मी घाट चढून कशेडीच्या माथ्यावर होतो. आता मात्र माझे बुड दुखायला लागले म्हणून मी जर थांबलो. बाईक लावली आणि तिकडच्या टपरीवर चहा घेतला. तिकडेच उभा राहून बुडाला थोडा वेळ आराम दिला आणि निघालो घाट उतरायला.

घाट उतरताना फार ऊनाचा त्रास होत नव्हता. कशेडी घाटाच्या गोव्या कडून मुंबई कडे जाताना घाटाच्या या बाजूच्या बर्‍यापैकी झाडी आहे. त्यामुळे बाईक चालवायला जर बरे वाटत होते. आरामात घाट उतरून च्या दरम्यान मी पोलादपूरला आलो. इकडे पण एक-दोन मिनिटे पाय मोकळे करायला ब्रेक घेतला. सुजयला फोन लावून त्याच्या घराकडे कसे यायचे हे विचारून घेतले. फोन ठेवून लगेच निघालो महाडच्या दिशेने. अर्ध्या एक तासात मी महाच्या अलीकडे बिरवाडीच्या फाट्यावर पोहोचलो. फाट्यावरून उजवीकडे महाड-बिरवाडी एम.आई.डी.सी त घुसलो. सुजयला तिथून त्याच्या घराकडे कसे यायचे हे विचारले. सुजयने मला व्यवस्थित मार्ग सांगितला आणि मी नोवार्तीस कॉलनी मधे घुसलो. सुजयचे बाबा नोवार्तीस महाड प्लाँटचे जी.एम. आहेत. या कॉलनीच्या मध्यभागी त्यांच्या एकट्याचाच बंगला आहे. बंगल्याच्या बाहेरच सुजय माझी वाट पाहत होता. बंगल्याच्या आत ग्यारेज मध्ये एका बाजूला बाईक लावली आणि मी माळकटलेल्या अवस्थेत त्यांच्या बंगल्यात शिरलो.

सुजयच्या आई-बाबान बरोबर माझी फार वर्षां पासूनची ओळख होती. तरी पण त्या बंगल्यात आणि माझ्या या अवतारामुळे मला न्यूनगंड वाटत होता. त्यांनी माझी इकड-तिकडची विचार पूस करून, फ्रेश व्हायला पाठवले. सुजय मला त्याच्या रूम मध्ये वरती घेऊन गेला आणि फ्रेश व्हायला दिले. फ्रेश होऊन आम्ही परत खाली आलो. सुजयच्या बाबांनी रायगड रोड वर बरीच जमीन घेतली होती. तिकडे ते बऱ्याच प्रकारची फळ बागायत करत होते. आम्हाला ते सर्व दाखवायला घेऊन गेले. शेतवर गेलो आणि सुजयच्या बाबांनी कहरच केला. शेतावर गेल्या-गेल्या शर्ट काढले व कुदळ घेऊन बागेत काम करायला लागले. मी हे पाहून स्तब्धच झालो. पण ते मात्र या कामाचा फार आनंद लूटत होते, हे मला जाणवले. मग आम्ही पण घुसलो त्यांच्या बरोबर शेतातले काम करायला. थोडा वेळ बागेत घाम गाळून शेतातल्या समान ठेवण्याच्या घराच्या ओटीवर येऊन बसलो. पाणी पिऊन आराम केला आणि आम्ही परत शेतात फेर-फटका मारायला लागलो. आता सूर्य मावळायला लागला आणि आम्ही घराकडे परतलो. घरी आलो, फ्रेश होऊन बराच वेळ सुजयचे आई-बाबा आमच्या बरोबर गप्पा मारत होते. ते आम्हाला इकड-तिकडचे प्रश्ना विचारात होते, विशेष करून मला. मुळात सर्वात जास्त प्रश्नांवर जोर होता तो आम्ही "बाईक ने एवढ्या लांब कशाला फिरायच आणि वगैरे-वगैरे". बराच वेळ आमच्यात गप्पा चलल्या होत्या. आता मात्र सुजयच्या आई-बाबांनी मला त्या वातावरणात थोडेशे कंफर्टबल करून घेतले होते.

सुजयच्या या घरात खानसमा पण आहे, त्यानी सर्व जेवण तयार करून ठेवले होते. सुजयच्या बाबांचे मित्र महाडचे डी.वाय.एस.पी आज सुजयच्या घरी परिवारासाहित जेवायला येणार होते. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. ठरलेल्या वेळे प्रमाणे ते आले आणि आम्ही सर्व त्यांचे स्वागत करायला गेटकडे गेलो. ते स्वतः त्यांची लाल दिव्याची गाडी चालवत आले होते. गाडीच्या बाहेर पडले आणि मी त्यांची ती पर्सनॅलिटी पाहून परत एकदा माझा न्यूनगंड उभारला. वयाने ते सुजयच्या बाबा पेक्षा बरेच लहान असावेत पण कसली कडक पर्सनॅलिटी होती. सुजयच्या बाबांनी सर्वान बरोबर माझी सुजयचा मित्र म्हणून ओळख करून दिली. सर्व बंगल्यात जाऊन बराच वेळ गप्पा मारू लागलो. वास्तविक सुजयचे आई-बाबा आणि त्यांचे मित्र व परिवारा मध्येच चर्चा चालू होती. आम्ही दोघे मात्र शांत पणे त्यांच्या चर्चा ऐकत होते. अधून-मधून एखाद-दुसरा प्रश्न विचारला तर थोडक्यात उत्तर द्यायचो. आता परत एकदा सगळ्यांनी मला थोडेसे कंफर्टबल करून घेतले. सर्व आता जेवणाच्या टेबल वर जमलो आणि जेवता-जेवता गप्पा करायला लागले.

जेवण अवरले आणि पाहुणे मंडळींचा निरोप घ्यायला बाहेर अलो. पाहुण्यांना टा-टा बाय-बाय करताना सुजयच्या बाबांनी मस्ती म्हणून त्यांना सांगितले कि "कधी तरी आम्हाला पण लाल दिव्याची गाडी चालवायला द्या". मग त्यांचे मित्र म्हणाले "तुमच्या साठी कधी पण". दोन मोठ्या माणसांमध्ये आमच्या सारखीच मस्ती चालली हे पाहून जरा निराळे वाटेल. पाहुण्यांचा निरोप घेऊन सर्व परत गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने, मी आज बाईक चालवून फार थकलो असेन म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला पाठवले. आम्ही दोघे रूम मध्ये गेलो आणि थोडा वेळ टंगळ-मंगळ करत झोपी गेलो. 

28.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - अठरावा आणि एकोणिसावा दिवस (देवारुखातच)

४ जून २००५, कालच्या १७० किलोमीटरच्या बाईक ट्रीपने आई फारच थकली होती. मी तसा ही फार उशिरा उठतो, जो पर्येंत कोणी मला उठवत नाही तो पर्येंत मी उठतच नाही. थकल्यामुळे आई पण उशिराने उठली. सर्व आवरून नाश्ता केला आणि आम्ही बाहेर आमच्या कामाला गेलो.

दुपारी सर्व कामे आवरून आम्ही परत घरी आलो. जेवण उरकून घेतले आणि आराम करून जरा झोपून पण घेतले. आईचे उद्याचे मुंबईला जाण्याचे पर्तीचे एस.टी. चे तिकीट होते. आईने घरात वापरायला लागणारे सर्व सामान बाहेर काढले होते. आता त्या सर्व सामानाची बांधा-बांध करायला लागली. सर्व काम आवरून आई आमच्या देवरुखच्या घरच्या शेजार-पाजार्यांकडे कडे भेटायला गेली.शेजार्यान बरोबर गप्पा-टप्पा उरकून आई घरी आली आणि जेवणाची सोय करायला लागली.

संध्याकाळी लवकरच जेवण उरकून आई ने तिची बॅग भरून उद्या सकाळी निघायची तयारी करून घेतली आणि मला बऱ्याच सूचना द्यायला लागली. येताना सर्व दरवाजे-खिडक्या नीट लावून ये, बाईक आरामात चालव, एका दिवसात देवरुख ते मुंबई प्रवास करून नकोस, गरज लागली तर महाड मधे आईच्या ऑफीस चे (एम. आई. डी. सी) चे विश्रामगृह आहे तिकडे राहा आणि वगैरे-वगैरे बऱ्याच सूचना होत्या.

सर्व सूचनांना मी हो...हो असे म्हणत आम्ही बराच वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत बसलो आणि थोड्या वेळाने झोपी गेलो.

५ जून २००५, सकाळची आईची मुंबईला परतीच्या गाडी मुळे आईने मला उठवले. आई तर आधीच उठली होती. तिची सर्व तयारी करून तिने माझ्यासाठी नाश्ता आणि जेवण पण तयार करून ठेवले होते. वास्तविक ती एवढी थकली होती आणि आता परत ८-९ तासांचा एस.टी. चा प्रवास होतच. तरी पण एवढ्या सकाळी सर्व करून ठेवले होते. यालाच तर आईची माया म्हणावी असे मला वाटते. आम्ही दोघांनी नाश्ता उरकून घेतला आणि निघायची तयारी केली.

९ च्या दरम्यान आईची एस.टी. होती. मी आईला देवरुख एस.टी. स्टॅंडला घेऊन गेलो. बाईक एका बाजूला लावुन आईला एस.टी. मध्ये बसवून दिले. आईची एस.टी. सुटली आणि मी परत घरी येउन पुन्हा झोपी गेलो. तसे मला करायला काय काम नव्हते. मस्त दुपार पर्येंत झोप काढून घेतली. फ्रेश होऊन आईने केलेले जेवण जेवुन घेतले.  उद्याच्या माझ्या निघण्याच्या तयारीला लागलो. मस्त आरामात काम आवरून मी आत्ता पर्येंत झालेल्या बाईक ट्रिपचा विचार करत बसलो. एवढ्यात मला सुजयचा फोन आला, की तो महाडला आलेला आहे. सुजय मी आता कुठे आहे याची विचारपूस करायला लागला. सुजयचे बाबा महाड नॉवरटिसच्या प्लँटचे जि.एम. आहेत आणि त्याचे बरेचदा मुंबई-महाड येणे जाणे होत असते. त्यांच्या बरोबर सुजय परत महाडला आला होता. कारण मी परत मुंबईला येताना सुजय माझ्या बरोबर बाईकने येणार होता.

मी त्याला माझा उद्याच प्लान सांगितला त्याप्रमाणे उद्या संध्याकाळ पर्येंत महाडला पोहोचतो असे सांगितले. उद्याची निघायची सर्व तयारी करत मी बराच वेळ रेंगाळत बसलो होतो. बरेच दिवस खडतर बाईक ट्रिपचे आणि आरामाचे दिवस आता संपले हा विचार करत कधी संध्याकाळ झाली ते कळलेच नाही. मला आईचा मुंबईला पोहोचल्याचा फोन आला. दोघांनी एकमेकांची विचार पूस करून घेतली आणि मी माझी उद्याची शेवटची बांधा-बांध करायला लागलो. सकाळीच आईने दोन्ही वेळेला पुरणारे जेवण बनवले होते. सर्व काम आवरून मी ते जेवण जेवून घेतले. जेवण झाल्यावर सर्व आवरले आणि स्लीपिंग बॅग पसरवून घेतली. उद्या सकाळी लवकर उठायचे होते म्हणून अलार्म लावून झोपी गेलो. 

27.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - सतरावा दिवस (आईचे रत्नागिरी जिल्ह्यातले १७० किलोमीटर)

३ जून २००५, मी ठरवल्याप्रमाणे आईला तिच्या सर्व देवरुख जवळच्या नातेवाईकांन कडे घेऊन जाणार होतो. याची सुरवात तर कालच कोसुंब मधे येऊन केली. सकाळी उजडायच्या आता आम्ही उठलो. सर्व तयारी करून चहा नाष्टा उरकून आईच्या मामींचा म्हणजे माझ्या आजींचा निरोप घेतला आणि निघालो पुढे. कोसुंब वरून आम्ही निघालो ते संगमेश्वर मार्गे कारभाटल्यात गेलो.

कारभाटल्यात जाण्यासाठी नदीच्या काठेने जावे लागते. मस्त निसर्गरम्य परिसर आहे. कारभाटल्यात आईचे मामा आजोबा राहतात म्हणजे माझ्या आजोबांचे सख्खे मामा. त्यांचे वय ९७ होते तरी पण ते तसे काटक होते. एस.टी. ने एकटे प्रवास करायचे. त्यांच्या कडे एक विशिष्ट प्रकारचे आंब्याचे झाड आहे. आंबा चुपायचा आहे पण त्याच्या रस दह्या सारखा लागत होता, म्हणून त्या जातीच्या आंब्याला तिकडचे लोक दही आंबा बोलायचे. थोडा वेळ त्यांच्याकडे आराम करून मी बरेचशे दही आंबे हाडले आणि तो पर्येंत आई आपल्या सर्व नातेवाईकांशी गप्पा मारत बसली. त्यांच्या गप्पा मारुन आणि माझे आंबे हाणून झाल्यावर आम्ही निघालो, पुढे रत्नागिरीच्या दिशेने. परत संगमेश्वर पार करून मुंबई गोवा महामार्गाने आम्ही हातखांब्याच्या फाट्यावर आलो. आता ऊन डोक्यावर यायला लागले होते आणि एक तास भर बाईक वर बसून आईला थोडा त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही थांबलो आणि मला पण बाईक मधे पेट्रोल घालायचे होते. बाईकला पेट्रोल पाजून आम्ही पुढे निघालो आमच्या गावी टेंब्यला जायला.

रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन सोडून कुवारबाव पार करताच साळवी स्टॉपच्या फाट्यावर डावीकडे वळलो आणि काझर घाटीच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याला लगताच्या आईला तिचे चुलत काका, मधु काकांचे घर याच रस्त्याला आहे असे जाणवले. मग काय माझी सवारी या दिशेने गेली. मधु काकांचे घर रस्त्याला लागूनच आहे....वास्तविक माझे हे आजोबा, पण मी लहानपणा पासूनच आई तिच्या मामा-काकांना ज्या नावाने संबोधीतते त्याच नावाने मी त्यांना संबोधित असतो. पण हे मात्र त्यांच्या कुठे उल्लेख करीत असें तर. मात्र त्यांच्या पुढया आजोबा-आजीच म्हणत असतो.

मधु आजोबांकडे कधीही आणि कुठल्या ही वेळी गेलो तर काही ना काही तरी खाल्ल्या शिवाय ते पाठावतच नाहीत. या आजी-आजोबांचा आग्रह फारच असतो. मग काय त्यांच्या आग्रह आम्हाला मोडवे ना आणि त्याचा कडे नाष्टा करत गप्पा मारत बसलो. थोडा वेळ गप्पा आणि आराम करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. काझर घाटी पार करून आम्ही टेंबे गाव गाठले. काझर घाटी हा परिसर फरच छान आहे सह्याद्री कडून वाहत ऐणारी नदी रत्नागिरीच्या समुद्रात विलीन होणारी आणि आम्ही तिच्या कडेने गती ने चललो होतो. टेंब्याच्या आमच्या साळव्यांच्या ग्राम देवाच्या देवळाकडे आम्ही वळलो.

देवळापाशी बाईक लावली आणि शिरलो देवळात. कोकणातील ग्राम देवतेची देवळे हि वाड्यापासून बरीच लांब असतात. देवळाच्या आजुबाजूला तशी फारशी वस्ती नसते. त्यामुळे देवळात फारच शांतता होती. मला तर अश्या शांत देवळात फारच बरे वाटते. आई नेहमी ग्राम देवतेच्या देवळात येताना आपली सर्व तयारी करून येते. नारळ, खण, तूपाचे दिवे, तांदूळ, अगरबत्ती, हळद-कुंकू, काहीतरी देवाला गोड आणि वगैरे-वगैरे पूजेचे लागणारे सर्व साहित्य. माझा वास्तविक देवाला या सर्व गोष्टी द्याव्या यावर फारसा विश्वास नाही. मी मात्र देवला भेटण्यासाठी नक्की जात असतो. मी गाभार्यातील सर्व देवांच्या पाया पडून देवळाच्या सभा मंडपात आराम करत व शांततेचा आनंद लुटत बसलो. आई मात्र तिने आणलेले सर्व पूजेचे सहित्त्य काढण्यात गुंग होती आणि मी लुटत असलेल्या शांततेच्या आनंदात विरजण घालत होती. ती मला सारखा आग्रह करत होती कि माझ्या हस्ते आणलेले सर्व देवाचे साहित्य देवाला अर्पण करावे. शेवटी कंटाळून का होईना मी तिची ती इच्छा पटा-पट पूर्ण केली व परत शांततेचा आनंद लुटायला लागलो. आता ऊन चांगलेच रण-रणायला लागले होते, म्हणून आम्ही बराच वेळ देवळाच्या सभा मंडपात आराम करत बसलो. देवाशी बराच संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला.

टेंबे हे आमचे मूळ गाव आणि बर्‍याच वर्षां पुर्वी आमचे पूर्वज टेंबे सोडून टेंब्या पासून २५ एक किलो मीटर वर असलेल्या पुनस या गावी स्थायीक झाले आणि तिकडची खोतगिरी करायला लागले. माझ्या बाबांचे चुलत काकांची घरे तिकडे आहेत. आमचे एकही नातेवाईक टेंब्यात नाही आहे म्हणुन नुसते देवळ्यातूनच आम्ही पुढे पुनसला निघालो. पुनसला पण जाताना बराचसा रस्ता नदी काठून आहे. मस्त निसर्गाचा आनंद लुटत आम्ही अर्ध्या तासात पुनस गाठले. पण या अर्ध्या तासात ऊनाच्या आणि गरम्याचा फरच त्रास झाला होता. विशेष करून आईला आणि साहजिक आहे. पुनसेत रस्त्याला लागूनच बाबांचे सुरेश काका यांचे घर आहे. सर्व त्यांना सुरेश तात्या असे संबोधितात. नेहमी आम्ही पुनसेत गेलो की सुरेश तात्यांकडे वस्ती करायचो. म्हणून पहिल त्यांच्या कडे थांबलो. सुरेश तात्या आणि त्याची फॅमिली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कडे निवडणुकीच्या तयारी ची गडबड होती. पण गडबडी तून सुद्धा त्यांनी आमचे आदरतिथ्य करायचे काही सोडले नाही. पण आम्हीच त्यांना खाण्याचा फार काही घाट घालू नका असे सांगितले. आमचे पोट तसे बऱ्या पैकी भरले होते. फक्त आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेतला. मी बाईक वरून एवढ्या लांब आलो या बद्दल त्यांना फारच कौतुक वाटत होते. असो!

सुरेश तात्यांचा मोठ्या मुलाने आम्हाला त्या गडबडीतून सुद्धा वेळ काढून पुनसेच्या ग्राम देवतेच्या देवळात घेऊन गेले आणि मग आमचे मूळ घर दत्ताराम तात्यांन कडे घेऊन गेला. पण त्यांच्या घरात कोणीच नव्हते म्हणून मग मनोहर तात्यांच्या घरा कढे सोडले. मनोहर तात्यांनी घर नवीनचे बांधेल होते. बराच वेळ मनोहर तात्यांच्या घरी आम्ही गप्पा मारत बसलो. यांच्याकडे आम्हाला जेवणाचा फारच आग्रह होऊ लागला आणि तो मोडता आला हि नाही. बराच वेळ ऊनात फिरून आईला पण त्रास झाला होता, म्हणून आम्ही जेवण उरकून आराम करत गप्पा टाकत होतो. बराच वेळ आराम झाला त्यात आईला पण जरा बरे वाटले. थोडासा ऊनाचा मारा पण कमी होईल म्हणून आम्ही सर्वांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचे एकच ठिकाण राहीले होते, कोरले. आईच्या सख्या काकांकडे, आप्पा आजोबांकडे. पुनस सोडले आणि देवढे मार्गे कोर्ल्याच्या रस्त्याला लागलो. अंदाजे २०-२५ किलोमीटरचे हे अंतर आम्ही एका तासात पार केले. मी आधीच काही दिवसान पूर्वी कोर्ल्यात आप्पा आजोबांच्या कडे येऊन गेलो होतो, म्हणून घरा कडचा रस्ता मला माहिती होता. आम्ही सरळ घरीच गेलो. आप्पा आजोबा आणि आजींना त्यांची पुतणी आल्या बद्दल फारच आनंद झाला. बराच वेळ त्यांचात गप्पा चालल्या होत्या. चहा आणि संध्याकाळचा नाष्टा घेऊन परत सर्व गप्पान मध्ये रंगले. थोड्या वेळाने मात्र मी आईला बोललो अंधार पडायच्या आत आपण देवरुखला पोहोचलो पाहिजे. या वेळी पण आप्पा आजोबा आणि आजींने आम्हाला राहायचा आग्रह फारच चालू होता. मात्र आईनेच उद्या देवरुखात काम आहे म्हणून त्यांचा आग्रह मोडला. वास्तविक त्यांचा हा प्रेमाचा आग्रह आम्हाला मोडवत नव्हता. पण काय करणार कामे होतीच ना आणि शिवाय मी काही दिवसान पूर्वीच कोर्ल्यात राहून गेलो होतोच की....

निघताना आज पण आप्पा आजोबांनी गोणी भरून आंबे बाहेर काढले. आता एवढे आंबे आम्हाला बाईक वर न्हायला कसे जमणार? तरी पण आप्पा आजोबा सर्व आंबे घेऊन जा असे आग्रह करत होते. त्यांचा मान राखायला म्हणून आईने पिशवी भरून आंबे घेतले आणि निघालो देवरुखच्या दिशेने. आता हळू-हळू बाईक  चालवत आम्ही चाललो होतो. साखरपा ते देवरुख हा रस्ता फार वळणा-वळणांचा आहे आणि आता अंधार पडायची वेळ पण झाली होती. आज दिवस भराची बाईक भटकंती करून आम्ही बरोबर अंधार पडताना देवरुखला आमच्या घरी पोहोचलो.

आज दिवस भराच्या जवळ-जवळ १७० किलोमीटरचा बाईक प्रवसामुळे आई फारच थकली होती, पण ते सहाजिकच होते. वयाच्या 55नव्या वर्षी बाईक वर फिरणे हे तर फार मोठे धाडसाचे काम आहेच. पण हा दिवस भराचा कठीण बाईक प्रवास आई ने फार जिद्दीने पार पाडला. आता मात्र ती फारच थकली होती. मी तिला काही जेवल्या करून नकोस असे सांगितले आणि बाहेरून जेवायला घेऊन आलो. जेवण उरकून आम्ही झोपी गेलो.

25.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - बारावा, तेरावा, चौदावा, पंधरावा आणि सोळावा दिवस (देवरुख मधेच आराम व वर्षभराची कामे)

२९ मे २००५ - ३० मे २००५, मे महिन्याच्या गरम्याच्या दिवसात बरेच दिवस बाईक भ्रमंती करून मी फारच थकलो होतो आणि माझी आई पण मस्त ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन देवरुखला येणार होती. म्हणून मी फार काही न करता मस्त २ दिवस आराम करत घरीच बसून राहिलो. सकाळी किंवा दुपारी जेव्हा केव्हा जाग येईल तेव्हा उठायचे आणि उठल्या बरोबरचे सर्व विधी उरकून नाष्टा किंवा सरळ जेवायला जायचे असे करायचो. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण एवढ्या पुर्तीच घराबाहेर पडायचे आणि अधून-मधून आमच्या बाजूच्या खोलीत भाड्याने राहणारे एन.एच.पी.सी. चे इंजिनियर हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारायच्या हीच माझी दिनचर्या होती.

३१ मे २००५, दोन दिवस नुसते घरात बसून आराम करून आता मला कंटाळा आला होतो म्हणून मी मार्लेश्वरला जायचे ठरवले. ११ च्या दरम्यान मला जाग आली तेव्हा उठलो. सर्व विधी उरकून तयार होऊन निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. देवरुख सह्याद्री नगरच्या नाक्यावर मी मिसळ-पावचा नाष्टा केला व आरामात चहा घेत बसलो आणि थोड्या वेळाने निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. मस्त आरामात एक तास भराची बाईक चालवून १७ किलोमीटरचे अंतर पार करून मार्लेश्वरचा पायथा गाठला. बाईक सावलीत लावली आणि लागलो मार्लेश्वराचे चढण चढायला. आरामात अर्ध्या तासात मी मार्लेश्वराच्या गुहे कडे होतो. चढण चढल्या मुळे थोडासा दम लागला म्हणून थोडावेळ बाहेरच आराम करत बसलो. बरेच दिवस आंघोळ केली नव्हती म्हणून खाली मार्लेश्वरच्या धब-धब्ब्या कडे गेलो. मस्त थंड गार पाण्याच्या धब-धब्ब्या खाली आंघोळ करून घेतली आणि कपडे बदलून परत वरती मार्लेश्वराच्या गुहारूपी मंदिरा कडे आलो. गुहेत जाऊन मार्लेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले आणि थोडावेळ गुहेतच एका बाजूला बसून देवाचे नाव घेत मार्लेश्वराच्या रूपाकडे पाहत बसलो. मार्लेश्वराच्या गुहेत विजेचे दिवे नाही आहेत म्हणून सर्वत्र अंधार असतो फक्त गुहेच्या छोट्याश्या प्रवेश दारातून येणारा उजेड आणि मार्लेश्वराच्या पिंडी भवती लावलेल्या समयांचा प्रकाश असतो. त्या अंधुक प्रकाशात बराच वेळ बसून मनोसोक्त मार्लेश्वराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेरून लांबवर असलेला मार्लेश्वराचा १२ ही महिने वाहणारा धब-धब्बा पाहिला आणि परमेश्वराची व निसर्गाची काय किमया आहे याची जाणीव झाली. हा निसर्गाचा वारसा मला शांतपणे एक तास भर उपभोगता आला या बद्दल परमेश्वराचे मी आभार मानले. एवढ्या मे महिन्याच्या गर्मीत सर्वत्र नदी, नाले सुकतात. विहिरींतले हि पाणी आटते. पण हा धब-धब्बा मात्र १२ ही महिने चालू असतो. मे महिन्यात पाणी बारीक असते तरीही धब-धब्बा मात्र चालु असतो आणि पाणी पण थंडगार. हीच तर निसर्गाची निराळी आणि चमत्कारीक किमया आहे.

निसर्गाचे आणि परमेश्वराचे या दिलेल्या देणगीचे मी आभार मानून पुन्हा एकदा मार्लेश्वराला दंडवत केले आणि डोंगर उतरायला लागलो. खाली उतरलो तर ४ वाजून गेले होते आता मला फार भूक पण लागली होती. मस्त मार्लेश्वराच्या पायथ्याशी गरम-गरम भजी व मिसळ पाव खाल्ला आणि निघालो घरी देवरुखच्या दिशेने. आता थोडा सूर्याचा मारा पण कमी झाला व मस्त वारा पण सुटला होता. परत देवरुखच्या सह्याद्री नगरच्या नाक्यावर आलो आणि आरामात चहा मारत बसलो. अंधार पडे पर्येंत तिकडेच बसून २-४ चहा मारल्या आणि मग घरी गेलो. घरी येऊन बराच वेळ आराम केला मग जेवायला गेलो. जेवण उरकून हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारुन झोपी गेलो.

१ जुन २००५, आज आई मुंबई वरुन देवरुखसाठी पहाटेच्या मलकापूर गाडीने निघाली. महाड जवळ आल्यावर मला आईने फोन ही केला होतो आणि तिला देवरुख एस.टी. स्टॅंडला घेण्यास येण्यासाठी पण सांगितले. तत्पूर्वी आई येणार म्हणून मी टॅंकरचे पाणी पण मागवले आणि घरच्या आजुबाजूचा परिसर झाडून घेतला. दुपारचे जेवण जेवुन मी आईच्या फोनची वाट पाहत बसलो. ठरलेल्या वेळेत आईची एस.टी. आली आणि मी आईला देवरुख एस.टी. स्टॅंड वरुन घरी घेऊन आलो. प्रवासातून आई थकून आल्यामुळे तिने आराम केला आणि मग संध्याकाळी सर्व इकड-तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. आईने घरीच जेवण बनवले आणि रात्री झोपी गेलो.

२ जुन २००५, आई कोकणात आल्यावर घरातली कामे आणि घरा संबंधातली बाहेरची कामे यातच वेळ जातो. आज ही आईचा यातच वेळ जाणार होता आणि मी आईला या सर्व कामा साठी वेळ देणे आवश्यक होते.

मी आईला घेऊन ग्रामपंचायतीच्या ऑफीस मधे गेलो आणि मग महावितरणाच्या पण. वर्षभराची सर्व बिले आई एकत्रच भरते, हि सर्व कामे करायची होती. दुपार पर्येंत सर्व कामे उरकून घरी दोघेही आराम करत बसलो. संध्याकाळी आई शेजारपाजारच्या लोकांकडे जाऊन उरलेली सर्व कामे व त्यांच्या बरोबर भेटीगाठी करून आली. काळोख व्हायच्या आधी आम्ही आईच्या सख्या मामांच्या घरी कोसुंबला, देवरुखहून ७-८ किलोमीटर वर गेलो. आईच्या २ सख्या माम्या तिकडे राहत होत्या, फार प्रेमळ होत्या त्या. मस्त रात्री जेवणाचा बेत होता त्यांच्या कडे. आईच्या माम्या सुगरण होत्या. जेवण उरकून मस्त माम्या, भाची आणि नातवा मध्ये गप्पा रंगल्या व नंतर झोपी गेलो. 

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - अकरावा दिवस (कोरले ते देवरुख)


२८ मे २००५, जशी सकाळी जाग आली तेव्हा मी उठलो. तसे पाहिला गेले तर फार उशिराच जाग आली होती. पण आजीने नाष्ट्याला केले पोहे उशिरा का होई ना मी खाल्ले आणि चहा घेऊन आरामात माझे सर्व व्यवहार चालले होते. वास्तविक आंघोळ आणि बाकीचे इकड-तिकडचे करत करत जेवणाची वेळ झाली हे कळले पण नाही. कालच्या शाकाहारी जेवणा नंतर आज बेत होता मांसाहाराचा. आप्पा आजोबांनी मी उठायच्या आधीच कोंबडी आणवली होती. आज पण चिकन मध्ये मस्त ओले काजू...माझी तर काय मस्त मेजवानीच होती आणि या बरोबर मला आवडतात म्हणून आंबे....

मस्त जेवणावर ताव मारला आणि आप्पा आजोबांकडे निघण्याची परवानगी मागायला लागलो. मला त्यांनी अजुन काही दिवस राहा असा आग्रह धरला होता, पण मी त्यांचा फार जास्त मन नाही राखू शकलो. मला देवरुखात काही कामे आहे असे बोलून निघण्याची तयारी करायला लागलो. वास्तविक मला तसे काही फार काम नव्हते पण २ दिवसात आईला देवरुखला बोलावून घेऊन आमची घराची राहिलेली काही कामे होती ती उरकून घ्यायची होती. आई येई पर्येंत मी मस्त निवांत घरात राहून आराम करून घेणार होतो. आठ-दहा दिवसांच्या बाईक ट्रीप मुळे फार थकलो होतो. तस पाहिलं गेल तर आप्पा आजोबांकडे पण आराम करता आला असता पण कशाला आजी-आजोबांना उगाच त्रास द्यायचा अशा विचाराने मी देवरुखला जायचा निर्णय घेतला.

सर्व सामान आवरून आजी-आजोबांचा निरोप घेण्यास निघालोच तर आप्पा आजोबांनी माझ्यासाठी एक गोण  भरून हापूस आंबे बाईक जवळ काढून ठेवले. हे एवढे आंबे मी बाईक वरून कसे नेणार आणि मी एवढे आंबे एकटा तरी कधी खाणार असे बोलायला लागलो. मात्र या वेळेला आप्पा आजोबांनी मला गप्प करून सांगितले आई येणार आहे ना मग दे तिला. आता पण आणि काही नाही, बाईक वर कसे न्यायचे ते मी बघतो असे बोलत सुतळ कोठून तरी आले आणि बाईक वर आंब्याची गोण बांधायला घेतली. पण गोण एवढी मोठी होती की बाईक वर बांधणे फार कठीण जात होते.  म्हणून मी गोणीतले बरेच से आंबे मी माझ्या बॅगेत टाकून घेतले आणि मग उरलेले बाईक वर गोणी सहित बांधले.

आजी-आजोबांचा निरोप घेतला आणि निघालो कोरल्या वरुन देवरुखच्या दिशेने. सर्व आवरून निघे पर्येंत ३.३० - ४ वाजले होते. मस्त आरामात कोकणातला वळणा-वळणांचा रस्ता तुडवत तास-दीड तासात साखरपा गाठले. साखरपा एस.टी. स्टॅंडच्या समोरच्या हॉटेल मध्ये मिसळची भूख् लागली म्हणून आणि थोडा वेळ आराम होईल म्हणून मिसळ खायला घुसलो. मस्त झण-झणित मिसळ खाल्ली आणि गरम-गरम चहा मारून निघालो, देवरुखच्या दिशेने. साखरपा ते देवरुख हा रस्ता तर संपूर्ण छोट्या-मोठ्या घाटींचा मस्त वळणा-वळणांचा आहे. रस्ता तुडवत मी देवरुखला अंधार व्हायच्या जरा आधी पोहोचलो. सर्व सामान बाईक वरुन काढून घरात घुसलो. फ्रेश होऊन घेतले आणि थोडा वेळ आराम करत बसलो.

आज दुपारच्या मस्त चिकन आणि संध्याकाळच्या मिसळ मुळे आता मला रात्री जेवायचे मनच नव्हते. आप्पा आजोबांनी दिलेले आंबे खाऊन घेतले आणि थोडा वेळ पडून राहिलो आणि मग तसाच झोपी गेलो.

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - दहावा दिवस (कोल्हापूर ते कोरले)


२७ मे २००५, सकाळी आरामात उठलो आणि प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. आज आमच्या या बाईक ट्रीपचा पहिला भाग खऱ्या अर्थाने संपला असे म्हणत आम्ही दुशिकडच्या दिशेने जायला सज्ज झालो. राव वा राजू आज पुण्यात जाऊन मग थोडा आराम करून उद्या मुंबई गाठणार होते आणि मी देवरुखात राहून आईची राहिलेली कामे करणार होतो. आईला पण मुंबई वरुन एस.टी. ने देवरुखात बोलावले होते.

नाष्टा करून रावच्या प्रेमळ परिवारचा निरोप घेतला आणि पुन्हा भेटू असे बोलत आम्ही आप-आपल्या मार्गाला लागलो. उन्हाचा तडका लागत होताच. मी कोल्हापूरची पंचगंगा नदी ओलांडून गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो. बाइक मधे पेट्रोल थोडे कमी होते म्हणून कोल्हापूरची हद्द सोडली आणि पहिला मोठ्या पेट्रोल पंपावर बाईकला पण नाष्टा करवला. गगनबावड्याच्या रस्ता हाच आहे याची खात्री करून निघालो गगनबावड्याच्या दिशेने. कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर अंदाजे ६० किलो मीटर आहे.  मस्त आरामात कोल्हापुरचा परिसर पाहत मी सुमारे २ - २.३० तासाने गगनबावड्याच्या चौकात पोहोचलो. गगनबावड्यातून कोकणात उतरायला २ घाट आहे, चौकातून डावीकडच्या रस्त्याने घाट उतरून वैभववाडीला जातो आणि उजवीकडच्या रस्त्याने घाट उतरून खारेपाटणला जातो. मी चौकातच गगनगड कडे जायचा रस्ता विचारून घेतला आणि गड पाहायला गेलो. गडाच्या जवळ पर्येंत बाईक नेऊन लावली आणि पायी गड फिरायला लागलो.

गड तसा काही फार मोठा नव्हता. गडावर गगनगिरी महाराजांचे मठ आहे. चारी बाजूने गडला फेर-फटका मारुन मी मठ पाहायला लागलो. उंनहाचा फार तडका लागायला लागला म्हणून मी थोडा वेळ मठात बसून आराम करून घेतला. गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला. गडा वरुन बाईक उतरवली आणि लागलो रस्त्याला. आता मला तर्ली घाट उतरायचा होता. तर्ली घाटाचा रस्ता फारच अरुंद आणि कच्चा होता. रस्ता एवढा अरुंद होता की समोरून गाडी आली तर मला थोडे हळू व्हावे लागत होते. कसे बसे त्या गर्मिचे चटके खात मी घाट उतरलो आणि पुढे राजापूर-पाचल कडे कसे जायचे हे विचारू लागलो. पुढच्या रस्त्याची विचारपूस करून निघालो.



मी मस्त आरामात बाइक चालवत होतो, फार काय पळ-पळ नव्हती माझी. माधेच एके ठिकाणी भल्या मोठ्या विहिरीवर गावकरी लोक पाणी भारत होते. ते पाहून मी त्यांना पाचलचा रस्ता विचारला आणि पोट भरून पाणी पिऊन घेतले व भरून पण घेतले.थोडा वेळ इकडेच मस्त सावलीत आराम करून मी निघालो पुढे. पाचल येई पर्येंत दुपार उलटली आणि आता मला भूक पण लागली होती. पाचल एस.टी. स्टॅंड जवळच मस्त मिसळ पाव - वडा पावचे हॉटेल पाहिले आणि घुसलो जेवायला. मस्त गरम-गरम आणि झन-झणित मिसळ हाणली आणि थोडा वेळ चहा पीत आराम करत बसलो. बराच वेळ निवांत घेऊन पुढे साखरप्याला किंवा देवरुखला कसे जायच याची विचार-पूस करयला लागलो. सर्व माहिती घेतली आणि निघालो आरामात साखरप्याच्या दिशेने.

मस्त आरामात आजूबाजूच उन्हाळ्यातला राकट निसर्ग पाहत मी पुढे चाललो होतो. १ तासाभराची बाईक दवडल्यावर पुढे येईल त्या गावा कडे किंवा मस्त छान पैकी सावली मिळेल तिकडे थांबेन या विचारात होतोच आणि लगेचच मला एक गाव लागले. निवांत कुठे बसता येईल का? हे पाहता पाहता कळले की हे गाव लांजा तालुक्यातील कोरले हे गाव आहे. कोर्ल्यात माझ्या आईचे सख्या काकांचे घर आणि भली मोठी आमराई आहे हे मला माहिती होते. कोल्हपुरला मी जया मामाकडे गेलो होतो त्यांचे हे वडील आणि माझे "आप्पा" आजोबा. कोल्हापुरात जया मामाकडे गेलो होतो तेव्हा कळाले होते की आप्पा आजोबा सध्या कोर्ल्यातच आहेत. आता नकळत फिरत फिरत त्यांच्या एवढ्या जवळ पर्येंत येऊन पोहोचलो होतो आणि त्यांना न भेटता तसेच सरळ पुढे जायचे मला काय जमले नाही. वास्तविक आपल्या जिवाळ्यच्या माणसांच्या एवढ्या जवळ आल्यावर त्यांना किमान थोडा वेळ तरी भेटावे असे मला नेहमीच वाटते. याच माझ्या स्वभावाला निरसून मी वागलो. चला पाहूया आप्पा आजोबांचे घर भेटते का? याचा प्रयेत्न तरी करून पाहु असे मी माझ्याशी बोलून एका पानवल्याच्या टपरी जवळ असलेल्या काही माणसांना विचारले की कदमांचे घर कुठे आहेत. मग कुठले कदम आणि वैगेरे-वैगेरे अशी बरीच प्रश्नावली माझ्यावर आली. मी बोललो भातगावचे कदम आणि कोल्हापुरात राहतात ते आणि त्यांची बरीच मोठी आंब्यांची बाग आहे ते. मग लगेच मला त्या माणसांच्या पैकी एकाने लांजाकडे जाणार्‍या रस्त्याने जरासे पुढे जा आणि एक छोट्याश्या मोरी जवळच त्यांची बाग आहे असे सांगितले.

त्या गावकरी मंडळींना धन्यवाद म्हणत मी लांजाच्या रस्त्याला लागलो. अर्धा किलोमीटर भर पुढे गेलो आणि मोरीच्या अलीकडेच डाव्या हाताला मला आप्पा आजोबांची बाग लागली.गेटातून मी आत शिरलो. माझ्या बाईकचा आवाज ऐकून आप्पा आजोबाच बाहेर आले आणि माझ्याकडे आश्चर्य मुद्राने पाहू लागले. बहुदा हा कोण मूर्ख बाईक स्वार आमच्या बागेत आला हा त्यांच्या मनात विचार चालला असावा. मी हेल्मेट काढले आणि त्यांना प्रश्न केला "ओळखले का आप्पा आजोबा मला". पण एवढात त्यांनी मला ओळखले होते आणि ये ये रे एवढ्या लांब बाईकने कसा आलास आणि वैगेरे-वैगेरे बरेच प्रश्न विचारात घरात घेऊन गेले. आत आजींना आजोबांनी मी आलेल्याचे कळवून माझ्यासाठी पाणी घेऊन आले. दोघा आजी-आजोबांनी मिळून मला बरेच प्रश्न विचारून पुरे-पूर करून सोडले. वास्तविक मी बाईकने एवढ्या लांब फिरत फिरत आलो यामुळे त्यांचे फार प्रश्न नव्हते, ते दोघेहि मला ओरडत होते. त्यांचा  माझ्यावर एवढा हक्क आहे. मी आपला कसे-बसे, असे नाही तसे आणि इकडे तिकडे फिरवा फिरवीची उत्तरं देऊन त्यांना शांत करायचा प्रयेत्न करत होतो. बराच वेळाने सर्व शांत झाले आणि मला फ्रेश होण्यास सांगितले.

संध्याकाळ झाली होती मस्त फ्रेश होऊन मला आप्पा आजोबा त्यांची आमराई दाखवायला घेऊन गेले. उन्हाळ्यात सूर्य मावळण्याच्या वेळी मस्त वारा सुटला होता आणि यातून  नातू-आजोबा मस्त गप्पा मारत आमराईत फिरत होतो. आप्पा आजोबांनी मला आंब्याची, काजू, फणस, नारळ, फोफळी, गांडूळ खात प्रकल्प आणि वैगेरे-वैगेरे अशा बऱ्याच गोष्टी दाखवत मस्त एक-दीड तसांची बाग भटकंती करवली. मुळात मला पण या गोष्टींची फार आवड आहे म्हणून मी पण यात मज्जा लुटून घेतली.जेवणाचा बेत आम्ही बाग फिरायला जायच्या आधीच आप्पा आजोबांनी आजीला सांगून ठेवला होता. मस्त ओल्या काजू आणि बटाट्याची भाजी, तांदळाची गरम-गरम भाकरी आणि वरण-भात. या वरुन मला सर्वात जास्त आवडणारे म्हणजे आंबे…. आप्पा आजोबांच्या बागेत मस्त रसाल आणि चवदार तरतरीत आंबे मी हक्काने मनभरून हान्डले. नक्कीच ६-७ आंबे तर मी उडवले असतीलच. पोट भरून जेवून सर्व आवरा-आवर करून मी आप्पा आजोबा आणि आजींन बरोबर गप्पा मारत बसलो आणि निवांत झोपी गेलो.

24.3.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - नववा दिवस (कोल्हापुरात)

२६ मे २००५, सकाळी आरामात उठलो. प्लान प्रमाणेच सकाळी लवकर उठून अभिजीत राव, त्याचे आई-बाबा, विवेक-रश्मी, त्याचे काका-काकी आणि चुलत भावंडे सर्व कर्नाटकात त्यांच्या कुलदैवत यललंमा, सौंदतीला  गेले होते. आज मला पण कोल्हापुरात माझ्या आईचे सख्ये काका आणि सर्व चुलत भावंडे राहतात त्यांच्या पैकी एकाकडे जायचे होते. मी माझ्या जया मामला फोन लावून कधी आणि कसे यायचे हे विचारून घेतले. पण आज राजूचा ताप फारच वाढला होता. रावच्या मामांच्या घरातल्यांनी राजूची फारच छान सुश्रूषा केली. राजूची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली आणि मी ११ च्या दरम्यान तयार होऊन जया मामाच्या घरी जायला निघालो.

पिट्ट्याने मला जया मामाच्या घराकडे कसे जायचे थोडे फार समजवले होते पण तरी हि मला सारखे मधे थांबून विचारावे लागत होते. मधेच एकदा मी एका ट्रॅफिक पोलिसाला विचारले की या ठिकाणी कसे जायचे. तो मला बोलला रस्ता सांगतो नंतर पहिले मला लाइसेन्स दाखव आणि मुंबईची गाडी कोल्हापूर पर्येंत कशी आली. मी बोललो चालवत आली....एवड्यात तो थोडासा खवसला आणि मला बोलला, हो का! मग आता गाडीचे सर्व पेपर दाखव. मी बाईकचे सर्व पेपर दाखवून त्याचे समाधान केले आणि पुढे परत तो आश्चर्य मुद्रा करून बोलला मुंबई वरुन कोल्हापूर पर्येंत बाईक चालवत आलात? मी त्यांना बोललो हा पण हळू-हळू आरामात फिरत-फिरत कोकणातून ८ दिवसात आलो आहोत. मग त्याचे अजून थोडे समाधान झाले आणि त्यांनी मला पत्ता सांगितला.

जया मामाच्या घरी मी जरा उशीराच पोहोचलो, सर्व माझी वाट पाहत होते. जया मामा काही कामासाठी बाहेर गेला होता पण सुधा मामी आणि तिचे बाबा होते. थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारल्या आणि मग सुधा मामीने जेवणाची पाने वाढली. गप्पा मारत आमचे जेवण चालले होते. गप्पा जास्त करून मी बाईकने का एवढा लांब आलो आणि काय गरज होती वगैरे-वगैरे याच होत्या. सुधा मामीने माझ्यासाठी जेवणाचा बराच थट मांडला होता.  मस्त पोट भरून जेवलो आणि लागलो परत सुधा मामींच्या वडिलान बरोबर गप्पा मारायला. एवढ्यात जया मामाचा पण फोन आला त्याला उशीर होणार होता आणि म्हणून तो माझ्याशी फोन वर चर्चा करायला लागला. त्याने तर मला बाईक घाडगे पाटील ने परत मुंबईला पाठवून देतो आणि मला मस्त कोंडुसकरच्या   ए.सी. बस मध्ये बसवून देतो इथ पर्येंत पर्याय दिला. मी त्या सर्वांना सारखे समजावत होतो की मी बाईकने कोकणात आणि जवळ पासचा परिसर फिरायच्या पराक्रमावर निघालो आहे. तरी काही केल्या ते एकेनाच. तत्पूर्वी जया मामाने माझ्या आईला पण फोन लावून हे सर्व सांगितले होते.माझ्या आईने पण जया मामाला  सांगितले की अमेय काय ऐकणार नाही तो माझे पण ऐकत नाही. शेवटी जया मामाने पण प्रयेत्न थकले आणि मी, माझे म्हणणेच खरे केले. मला थोडे जाणवले होते की मी सुधा मामीचे बाबा आणि जया मामा यांना जरा नाराज केले आणि ते माझ्यावर थोडेसे रागवले होते. पण काय करणार मला बाइक ट्रीप तर पूर्ण करायची होतीच ना.

सर्वांचा निरोप घेऊन मी कोल्हापुरचे राजा शाहू महाराज यांचा न्यू पॅलेस पाहायला गेलो. शोधत शोधत मी  राजवाड्याकडे पोहोचलो आणि बाईक लावून महल पाहायला लागलो. संध्याकाळ होई पर्येंत मी महल पाहिला आणि सर्व उरकून परत रावच्या मामांच्या घरी गेलो. दिवसभराचा आराम आणि रावच्या मामांच्या घरातल्यांच्या संगोपणाने राजू आता मस्त बरा झाला होता. रावच्या मामीने आमच्या साठी मस्त तांबड्या रस्याचे आणि पांढऱ्या रस्याचे मटणाचे जेवण केले होते. थोडा वेळा गप्पा टप्पा मारत बसलो आणि जेवायला वाढले. मी या तांबड्या आणि पांढऱ्या रस्या बद्दल बरेचदा ऐकले होते पण आज काय ते चाखायला मिळणार होते. मनोसोक्त रस्सा हांडला आणि पुन्हा गप्पा टाकत बसलो. बराच वेळेच्या गप्पान नंतर सर्वच झोपी गेलो. 

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - आठवा दिवस (पन्हाळा ते कोल्हापूर)

२५ मे २००५, कालच्या धांगड-धिंगाण्यामुळे बराच उशीर झोपायला झाला होता आणि त्यामुळे सकाळी उठायला पण. सर्व घरची मंडळी उठून तयार झाली तरी आम्ही लोळतच पडलो होतो. रावच्या मामांने कोल्हापूरी खाक्याने जो जोरात आवाज मारला आणि सर्व खडबडून जागे झालो. पटा-पट सर्वानी प्रातविधी उरकून निघण्याच्या तयारीला लागलो. रावच्या मामाने नाष्ट्याची पण सोय केली होती. पटा-पट नाष्टा गिळून आम्ही निघालो कोल्हापुरच्या दिशेने. आज माझ्या बरोबर बाईक वर रश्मी होती. राव बंधू एका बाइक वर तर रावच्या मामे भाऊ पिट्ट्या बरोबर राजू आणि बाकी सर्व गाडीत पन्हाळा ते कोल्हापूर हे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. पण हा एक-दीड तासाचा प्रवास काय सुरेख होता. पन्हाळा सोडल्या पासून ते रावच्या मामाच्या घरा पर्यत  नॉन-स्टॉप रश्मी मराठी गाणी गात होती. मला एकही गाण्याची फर्माइशीची गरजच नव्हती. एका-पाठोपाट एक तीच मराठी गाणी गात सुटली. बाइक चालवताना पाठून मस्त मधुर मंजुळ गाणी ऐकायला मिळत होती. तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही आणि रश्मी फार सुंदर गाते यात काय वादच नाही.

तास-दीड तासाच्या सुरेल प्रवासाने आम्ही रावच्या मामाच्या घरी पोहोचलो.  थोडा वेळ आराम करून जेवण केले आणि पुन्हा आराम करायला लागलो. मस्त दुपारची झोप काढली आणि ऊन थोडे सरल्या वर ४ च्या दरम्यान तयार होऊन मी, विवेक, रश्मी, राजू, अभिजित, पिट्ट्या आणि योगेश सर्व निघालो कोल्हापूर सहाराच्या फेरफटका मारायला. सर्व प्रथम महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच असलेल्या तुळजा भवानीच्या मंदिरात पण गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघालो रंकाळ्याच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने कोल्हापुरकरांचा पाहुणचार काय असतो तो पाहिला. अभिजित रावच्या मामा आणि परिवाराने केलेल्या पाहुणचाराला नक्कीच दाद दिली पाहिजे. काल पासून त्यांनी आम्हाला कुठे आणि कसलीही कमी पडून दिली नाही. किंबहुना बर्‍याच ठिकाणी त्यांनी आम्हाला पैसे पण खर्च करायला देत नव्हते. कोल्हापूर कडे असे बोलतात "काय यार आम्हाला जरा सुद्धा पाहुणचार करायला देत नाहीत". वास्तविक भरपूर पाहुणचार करूनच मग हे कोल्हापूर कडची मंडळी असे बोलत असतात आणि यांनी आमचा केलेला पाहुणचार काय जरा नव्हता भरमसाठ होता आणि अजून बराच बाकी होता.

रंकाळ्या जवळ आलो आणि तलावाच्या बाजूलाच बराच वेळ टंगळ-मंगळ करत फिरत होतो. अंधार पडला आणि पिट्ट्या आम्हाला रंकाळ्याची प्रसिद्ध भेळ खायला घेऊन गेला. आपल्या मुंबई चौपाटीला कशी भेळ खायची पद्धत आहे तशीच आम्ही कोल्हापुरात रंकाळ्याच्या काठावर झण-झणीत कोल्हापुरी भेळ खाल्ली. इकडे पण आम्हाला पिट्ट्यानी पैसे देऊ दिले नाही. भेळ खाऊन अजून थोडा वेळ रंकाळा फिरून कोल्हापुरात फेरफटका मारत आम्हाला पिट्ट्याने एका आईस्क्रीम, फालुदा आणि ज्युस सेंटर मध्ये घेऊन गेला. जबरदस्तीने फालुदा खायला भाग पाडले. हा फालुदा ही कोल्हापुरतला जग प्रसिद्ध आहे. पिट्ट्याने आम्हाला फार आग्रह करून का होईना पण प्रेमाने कोल्हापूर दर्शन करावले होते. कसला मावळ आहे पिट्ट्या वास्तविक आम्ही त्याचे कोण, तरी पण भावंडासारखे त्याने आमच्या वर प्रेम लावले होते.

रात्री परत घरी आलो तर आमच्या साठी निराळ्या मेजवानीचा प्लान होता. पण आजच्या एकंदर खादाडी मुळे आम्ही आता फार काही खायला नको असे सांगितले. म्हणून आजचा मेजवानीचा प्लान उद्यावर गेला आणि राजूची पण तब्बेत बरी नव्हती, त्याला आता ताप आला होता. राजुला गोळ्या देऊन झोपावले आणि आम्ही सर्व थोडा वेळ गप्पा-गोष्टी करून झोपी गेलो.