25.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - बारावा, तेरावा, चौदावा, पंधरावा आणि सोळावा दिवस (देवरुख मधेच आराम व वर्षभराची कामे)

२९ मे २००५ - ३० मे २००५, मे महिन्याच्या गरम्याच्या दिवसात बरेच दिवस बाईक भ्रमंती करून मी फारच थकलो होतो आणि माझी आई पण मस्त ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन देवरुखला येणार होती. म्हणून मी फार काही न करता मस्त २ दिवस आराम करत घरीच बसून राहिलो. सकाळी किंवा दुपारी जेव्हा केव्हा जाग येईल तेव्हा उठायचे आणि उठल्या बरोबरचे सर्व विधी उरकून नाष्टा किंवा सरळ जेवायला जायचे असे करायचो. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण एवढ्या पुर्तीच घराबाहेर पडायचे आणि अधून-मधून आमच्या बाजूच्या खोलीत भाड्याने राहणारे एन.एच.पी.सी. चे इंजिनियर हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारायच्या हीच माझी दिनचर्या होती.

३१ मे २००५, दोन दिवस नुसते घरात बसून आराम करून आता मला कंटाळा आला होतो म्हणून मी मार्लेश्वरला जायचे ठरवले. ११ च्या दरम्यान मला जाग आली तेव्हा उठलो. सर्व विधी उरकून तयार होऊन निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. देवरुख सह्याद्री नगरच्या नाक्यावर मी मिसळ-पावचा नाष्टा केला व आरामात चहा घेत बसलो आणि थोड्या वेळाने निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. मस्त आरामात एक तास भराची बाईक चालवून १७ किलोमीटरचे अंतर पार करून मार्लेश्वरचा पायथा गाठला. बाईक सावलीत लावली आणि लागलो मार्लेश्वराचे चढण चढायला. आरामात अर्ध्या तासात मी मार्लेश्वराच्या गुहे कडे होतो. चढण चढल्या मुळे थोडासा दम लागला म्हणून थोडावेळ बाहेरच आराम करत बसलो. बरेच दिवस आंघोळ केली नव्हती म्हणून खाली मार्लेश्वरच्या धब-धब्ब्या कडे गेलो. मस्त थंड गार पाण्याच्या धब-धब्ब्या खाली आंघोळ करून घेतली आणि कपडे बदलून परत वरती मार्लेश्वराच्या गुहारूपी मंदिरा कडे आलो. गुहेत जाऊन मार्लेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले आणि थोडावेळ गुहेतच एका बाजूला बसून देवाचे नाव घेत मार्लेश्वराच्या रूपाकडे पाहत बसलो. मार्लेश्वराच्या गुहेत विजेचे दिवे नाही आहेत म्हणून सर्वत्र अंधार असतो फक्त गुहेच्या छोट्याश्या प्रवेश दारातून येणारा उजेड आणि मार्लेश्वराच्या पिंडी भवती लावलेल्या समयांचा प्रकाश असतो. त्या अंधुक प्रकाशात बराच वेळ बसून मनोसोक्त मार्लेश्वराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेरून लांबवर असलेला मार्लेश्वराचा १२ ही महिने वाहणारा धब-धब्बा पाहिला आणि परमेश्वराची व निसर्गाची काय किमया आहे याची जाणीव झाली. हा निसर्गाचा वारसा मला शांतपणे एक तास भर उपभोगता आला या बद्दल परमेश्वराचे मी आभार मानले. एवढ्या मे महिन्याच्या गर्मीत सर्वत्र नदी, नाले सुकतात. विहिरींतले हि पाणी आटते. पण हा धब-धब्बा मात्र १२ ही महिने चालू असतो. मे महिन्यात पाणी बारीक असते तरीही धब-धब्बा मात्र चालु असतो आणि पाणी पण थंडगार. हीच तर निसर्गाची निराळी आणि चमत्कारीक किमया आहे.

निसर्गाचे आणि परमेश्वराचे या दिलेल्या देणगीचे मी आभार मानून पुन्हा एकदा मार्लेश्वराला दंडवत केले आणि डोंगर उतरायला लागलो. खाली उतरलो तर ४ वाजून गेले होते आता मला फार भूक पण लागली होती. मस्त मार्लेश्वराच्या पायथ्याशी गरम-गरम भजी व मिसळ पाव खाल्ला आणि निघालो घरी देवरुखच्या दिशेने. आता थोडा सूर्याचा मारा पण कमी झाला व मस्त वारा पण सुटला होता. परत देवरुखच्या सह्याद्री नगरच्या नाक्यावर आलो आणि आरामात चहा मारत बसलो. अंधार पडे पर्येंत तिकडेच बसून २-४ चहा मारल्या आणि मग घरी गेलो. घरी येऊन बराच वेळ आराम केला मग जेवायला गेलो. जेवण उरकून हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारुन झोपी गेलो.

१ जुन २००५, आज आई मुंबई वरुन देवरुखसाठी पहाटेच्या मलकापूर गाडीने निघाली. महाड जवळ आल्यावर मला आईने फोन ही केला होतो आणि तिला देवरुख एस.टी. स्टॅंडला घेण्यास येण्यासाठी पण सांगितले. तत्पूर्वी आई येणार म्हणून मी टॅंकरचे पाणी पण मागवले आणि घरच्या आजुबाजूचा परिसर झाडून घेतला. दुपारचे जेवण जेवुन मी आईच्या फोनची वाट पाहत बसलो. ठरलेल्या वेळेत आईची एस.टी. आली आणि मी आईला देवरुख एस.टी. स्टॅंड वरुन घरी घेऊन आलो. प्रवासातून आई थकून आल्यामुळे तिने आराम केला आणि मग संध्याकाळी सर्व इकड-तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. आईने घरीच जेवण बनवले आणि रात्री झोपी गेलो.

२ जुन २००५, आई कोकणात आल्यावर घरातली कामे आणि घरा संबंधातली बाहेरची कामे यातच वेळ जातो. आज ही आईचा यातच वेळ जाणार होता आणि मी आईला या सर्व कामा साठी वेळ देणे आवश्यक होते.

मी आईला घेऊन ग्रामपंचायतीच्या ऑफीस मधे गेलो आणि मग महावितरणाच्या पण. वर्षभराची सर्व बिले आई एकत्रच भरते, हि सर्व कामे करायची होती. दुपार पर्येंत सर्व कामे उरकून घरी दोघेही आराम करत बसलो. संध्याकाळी आई शेजारपाजारच्या लोकांकडे जाऊन उरलेली सर्व कामे व त्यांच्या बरोबर भेटीगाठी करून आली. काळोख व्हायच्या आधी आम्ही आईच्या सख्या मामांच्या घरी कोसुंबला, देवरुखहून ७-८ किलोमीटर वर गेलो. आईच्या २ सख्या माम्या तिकडे राहत होत्या, फार प्रेमळ होत्या त्या. मस्त रात्री जेवणाचा बेत होता त्यांच्या कडे. आईच्या माम्या सुगरण होत्या. जेवण उरकून मस्त माम्या, भाची आणि नातवा मध्ये गप्पा रंगल्या व नंतर झोपी गेलो. 

No comments:

Post a Comment