29.12.11

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - पहिला दिवस (मुंबई ते मुरुड)


१८ मे २००५, बाईक ट्रीपचा दिवस उजाडला आणि ठरल्या प्रमाणे ६ वाजवता रुईया नाक्यावर भेटलो. सर्वच फार उत्साही होतो. नाक्यावर सुजयला पाहिले तर त्याच्या पाठीवर भलीमोठी बॅग. एका बाईकवर २ माणसे आणि त्या २ माणसांचे सामान एका बॅगेत असे करायला लागणार होते. मग काय ४ जणांचे सामान मी आणि रावने २ मोठ्या बॅगेत भरले. लगेच हाताळण्यासाठी लागणारे सामान आम्ही छोट्या बॅगेत भरून घेतले. ७ वाजता आम्ही नाक्यावर विष्णू चाहावाल्याच्या साक्षीने नारळ फोडून आमची कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीपची सुरवात केली. 

रुईया नाक्या वरून आम्ही ४ जण वेडात निघलो. मनात सर्वांच्या उदंड उत्साह होता. सर्वांच्या आयुष्यातली पहिली सर्वात मोठी आणि स्वबळावर प्लान केलेली हि ट्रीप होती. आम्ही वडाळा – शिवडीच्या ४ रस्त्यावरून माझगाव डॉक जवळचा भाऊचा धक्का गाठला. डॉकवर भली मोठी लाईन होती, सुजय आणि राजूला रेवसचे तिकीट काढायला सांगितले. तो पर्येंत मी आणि राव बाईक रेवस लॉंच मध्ये चढवायच्या कामाला लागलो. बाईक लॉंच मध्ये चढवल्या आणि मस्त लॉंचच्या वरच्या बाजूला बाईक धरून बसलो. बाईक त्या लॉंच वाल्यांनी लॉंचच्या रेलींगला बांधली होती. मला आणि रावला तर मानता फारच धक-धक होत होती. जर रेलिंग तुटली आणि बाईक समुद्रात पडली तर? असे विचित्र विचार पण आमच्या मनाला चाटून गेले. अशा थोड्याश्या चांगल्या-वाईट आणि भरपूर आनंद दायक विचारांनी आम्ही मुंबईचा भाऊचा धक्का सोडून भर समुद्रात झेप घेतली.


सकाळचे ९.०० चे कोवळे ऊन जाऊन आता डोके तापायला लगले होते. दीड एक तासाचा ऊनातून चटके खात समुद्र प्रवासा नंतर आम्ही रेवासला पोहोचलो. रेवस धक्याला लॉंच लागताच बाईक उतरवल्या आणि बाहेर निघलो. बाहेर बरेचशे छोटे हॉटेल दिसले. सकाळ पासून राजूच्या घरचा चहा सोडला तर पोटात काहीही पडले नव्हते. हॉटेल पाहताच पुढचं प्रवास गेला तेल लावत आम्ही घुसलो हॉटेल मध्ये. सर्वांनी मिसळ पाव ऑर्डर केला, मी आणि रावने दही मिसळ ऑर्डर केली. चौघात  मिळून १५-१७ पाव मिसळी बरोबर हंडले आणि चहा घेऊन पुढे निघलो अलिबागच्या दिशेने. मांडवा फाटा, किहीम पार करून आम्ही अलिबाग शहरात शिरलो. एक-दीड तासात रेवस ते अलिबाग ३४ किलोमीटरचे अंतर मस्त आरामात एखाद-दुसरा ब्रेक घेत गाठले. मध्ये जाताना रावने काढलेला हा फोटो.

अलिबागचा कुलाबा किल्ला हा आमच्या लिस्ट मधला पहिला किल्ला होता म्हणून वळलो लोकांना विचारून किल्याच्या दिशेने. बाईक लावल्या आणि किल्याच्या दिशेने चालत निघालो तर कळाले कि भरती मुळे कुलाबा किल्ल्यात आम्ही जाऊ शकत नाही. मग काय थोडा वेळ बीच वर मस्ती केली आणि डोक्यावर ऊन रण-रणायला लागले म्हणून आम्ही परतलो बाईक कडे. ऊनाने तापल्या मुळे बाईकच्या बाजूला झाडाखाली गोळेवाल्या कडे आपली पथारी पसरवली. प्रत्येकाने एक-एक गोळा घेऊन आप-आपल्या जीभा रंगवल्या आणि जीव गार करून घेतला. राव फोटोग्राफी मध्ये घुसला होता तो पर्येंत आम्ही मस्ती करत बसून राहिलो. बराचवेळ झाडा खाली बसून रिलॅक्स होऊन घेतले आणि निघलो पुढे मुरूडच्या दिशेने. 

आम्ही फार पळा-पळ न करता आरामात चाललो होतो. २.३० च्या दरम्यान आम्ही रेवदंडा गाठले. सुजयला बिर्यानी खायचा मूड झाला. त्याने तिकडे लोकल माणसाला विचारून, रेवदंडा मध्ये चांगली बिर्यानी कुठे मिळते ते विचारून घेतले. मग काय सुजयला नाही बोलायचं, आमच्या पैकी कोणतही हिम्मत नव्हती. घुसलो आम्ही हॉटेल मध्ये सुजयच्या मागो-माग. वास्तविक घराच्या अंगणातच बनवलेले ते छोटेसे हॉटेल होते. ४ प्लेट बिर्यानी ऑर्डर झाल्या. बरीयानी यायला बराच वेळ लागला, तो पर्येंत आम्ही पथारी पसरायला लागलो. राजूने ट्रीप गिटार घेतली होती, सर्व शांत झाले म्हणून राजूने काढली गिटार आणि लागला सौम्य स्वरात तारा छेडायला. फार छान वाटत होते. एवढ्यात बिर्यानी आली. मस्त मुस्लीम घरी बनवलेली बिर्यानी साफ केली. सुजयने तर अजून एक प्लेट मागवली. मग थोडीशी हीमत जमा करून आम्ही सुजयच्या प्लेट मध्ये पण हात मारून घेतला.

एक तर दुपारची वेळ आणि आता आमचे पोट पण मजबूत भरले होते. मला तर खुर्चीतून उठावेसे पण वाटत नव्हते. हीच परिस्थिती पाहायला गेलो तर सर्वांची झाली होती. खुर्चीत बसल्या-बसल्याच सर्व लोळू लागले. परत राजूने गिटारचे स्वर छेडले. या वेळेला अभिजीत रावने त्याला पिंक फ्लोईड च्या गाण्याला साथ दिली. मग माझ्या आणि सुजयच्या फर्माईशी सुरु झाल्या. अर्थातच हिंदी, हे इंग्लिश गाणे आम्हाला काय फार कळत नाही. बरेच इकड तिकडची गाणी गाऊन आमच्या मैफिलीचा शेवट झाला, तो "डुबा-डुबा" या गाण्याने. वाह! काय मज्जा आली या कोरसला. सर्वांनी ते गाणे एन्जोय केले असे जाणवत होते. किंबहुना त्या हॉटेल मालकाने पण एन्जोय केल्याचे जाणवत होते. म्हणूनच त्याने आम्हाला इतका वेळ बसायला दिले असेल.


३.३० च्या दरम्यान, बराच झाला आराम असे म्हणत आम्ही पुढे मुरूडच्या दिशेने निघालो. आरामात रमत गमत आम्ही पुढे निघालो. मध्ये काही फोटो काढावेसे वाटले कि थांबायचो. मनाला पाहिजे तसा फोटो काढून घ्यायचो. जरा हि वेळेचा विचार न करता आरामात चालले होते आमचे. तसे पाहायला गेले तर काहीही घाई नव्हती. मध्ये एक दोन फोटो काढून आम्ही काशीद बीच जवळ थांबलो. आम्ही ४ जण सोडले तर बीच वर एकही चीट पाखरू सुद्धा नव्हते. एवढा शांत बीच लाभला म्हणून आम्ही बराच वेळ घालवला टंगळ-मंगळ करत. मी आणि अभिजीत राव या ट्रीप वर भरपूर फोटोग्राफी करायच्या उद्दीष्टाने होतो. मी ब्लॅक आंड व्हाईट आणि रावने कलर रोल घेऊन ठेवले होते. गरजेनुसार कलर, ब्लॅक आंड व्हाईट फोटोग्राफी करायचे असे ठरले होते. काशीद बीच वर पण रावने फोटो काढून घेतले आणि आम्ही बाईक हाकल्या मुरूडच्या दिशेने.

५.३० च्या दरम्यान आम्ही मुरुड गाठले. राहण्याची सोय नंतर पाहू, आता पहिला जंजिरा  किल्ला सर करूया असे म्हणत आम्ही सरळ मुरुड जेट्टी गाठली. मुरुड जेट्टी कडे जाताना रस्त्या वरून काढलेला हा जंजिरा किल्ल्याचा फोटो.


बाईक लावल्या आणि शिरलो नावेत. आता सर्वाना जरा थकल्या सारखे वाटले होते, जास्त करून सुजय आणि राजूला. त्याहुनी जास्त राजूला, बाईक चालवायला येत नाही म्हणून संपूर्ण वेळ बॅग उचलायला लागली होती त्याला. पण कितीही थकलो तरी मजा करायाची या मताचे आम्ही असल्या मुळे नावेत बसून सुद्धा मस्ती करतच होतो. त्या वेळी रावने काढलेला हा फोटो.


जंजिरा हा संपूर्ण पणे समुद्रात वसलेला किल्ला आहे. नावेने किल्ल्याच्या जवळ पोहोचलो तरी किल्ल्याचा दरवाजा काही दिसेच ना आणि अचानक एका बुरुजाच्या पाठून दरवाज्याने दर्शन दिले. नावेतून उतरलो आणि किल्याचा फेर-फटका मारायला लागलो. संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर चालत असतानाचा जंजिरा किल्ल्याची  महानता जाणवायला लागली होते, कारण ९०० वर्ष हा किल्ला समुद्रात उभा राहून सुद्धा अजूनही दौलत होता. बहुदा यामुळेच हा किल्ला मराठ्यांना सिद्दी जोहर कडून एकदाही काबीज करता आला नाही. या अजिंक्य किल्ल्याला तटबंदि वरून प्रदक्षिणा मारली, नावाबचा वाडा पाहिला, तलाव पाहून आणि २३ फुटी तोफ कलालबंगाडी पाहून किल्ल्याच्या दरवाजाकडे आलो. जंजिरा  किल्ल्याच्या  सर्व बाजूने  समुद्राचे  खरे  पाणी  असून  सुद्धा  किल्ल्यातील  दोन्ही  तलाव  हि  गोड्या  पाण्याची  आहेत . काय  ती  निसर्गाची  किमया .


किल्ल्याचा फेर-फटका मारताना मी आणि रावने काढलेले काही फोटो.










परत नावेतून तीरावर आलो आणि बाईक घेऊन मुरुड गाव कडे निघालो. अंधार पडायला हि लागला होता, आमचे आता पुढे काम होते ते रात्र काढायची जागा शोधायची. बरेच फेऱ्या मारून आम्हाला शाळा, देऊळ, किंवा कोणाचे अंगण मिळायची काहीच चिन्हे दिसत नव्हती. ८ वाजत आले होते, भूख लागली म्हणून  पहिले जेऊन घेऊया आणि मग शोधूया असे ठरले. मस्त आरामात जेवून घेतले आणि सगळे सामना सहित कशाला शोधायच्या मोहिमेला निघायचे म्हणून राजू आणि सुजयला सामना सहित बसवले हॉटेल वर आणि मी व राव निघलो. मधेच एक इसम भेटला आणि आम्हाला त्याचा घराचे अंगण झोपायला द्यायला  तयार झाला. पण त्याची एक अट होती कि आमच्या बरोबर बायडी (मुलगी) नसली पाहिजे आणि जी आमच्या  बरोबर नव्हती. तरी पण खात्री करायला म्हणून आमच्या बरोबर तो इसम आला. हॉटेलच्या बाहेरूनच आम्ही त्याला पाठमोरा बसलेला सुजय आणि राजू दाखवला. "बघा आमच्या मध्ये बायडी नाही आहे". सुजायचे खाद्य  पर्येंत वाढलेले केस आणि अंगयष्टी पाठमोरी पाहून तो इसम "ती, पहा बायडी! ती, पहा बायडी! तुमच्यात आहे"  असे जोर-जोराने ओरडायला लागला. आम्ही त्याची बरीच समजूत काढण्याचा पर्येंत करू लागलो. अरे आमच्यात बायडी नाही आहे रे तो आमचा मित्र मुलगा आहे. पण काही हि तो ऐकायला तयारच नव्हता. तो आपला फक्त तुमच्यात बायडी आहे असेच बोलत होता. मग सुजायला बोलावून घेतले आणि दाखवले त्याला. बघ हि मुलगी नाही मुलगा आहे. सुजायला पाहून तर तो जास्तच खवळल आणि आम्हाला तसेच रस्त्यावर टाकून निघून गेला. 


त्या प्रकारावरून रावने सुजायला मजबूत शिव्या घातल्या, कारण रावने त्याला आधीच सांगितले होते कि केस कापून ये. पर प्रदेशात जाताना असा विचित्र अवतार नसता असे बजावले होते. पण सुजय कसला ऐकणार आणि त्याचा परिणाम सर्वांना भोगायला लागला. मग आता परत मी आणि राव निघालो एस.टी.स्टॅंडच्या दिशेने झोपायची जागा शोधायच्या मोहिमेला. मध्ये कुठे कोणाचे अंगण, शाळा किंवा देऊळ पाहत एस.टी स्टॅंड पर्येंत पोहोचलो. स्टॅंड मध्ये एका बाजूला बाईक लावून मग आम्ही स्टॅंडच्या आत झोपू शकतो असे रोने सांगितले. स्टॅंड तसे काय फार स्वच्छ नव्हते. पण काय करणार, आमच्या कडे दुसरा काही पर्याय नव्हता. नाहीलाजास्तव स्टॅंड वर झोपू असे ठरवले आणि आम्ही परतलो सुजय-राजूला बोलवायला परत निघालो तोच स्टॅंडच्या जवळ गतिरोधक लागला म्हणून मी बाईक हळू केली. गतिरोधक ओलांडतो न ओलांडतो तेवढ्यात रस्त्याच्या कडे एक कुत्रा जोरात धावत माझ्या बाईकच्या मध्ये आला आणि मी काही प्रयेत्न करण्याच्या आताच आम्ही तिघे हि (मी, राव आणि बाईक) रस्त्यावर लोळलो होतो, मात्र कुत्रा सुखरूप पणे कुई-कुई करत रस्त्याच्या दुसरी कडून अदृश झाला होतो. आम्ही रस्त्यावर माखलेले पाहून बाजूलाच असलेल्या दुकानातून पटा-पट ४-५ माणसे समस्त श्वान प्रजातीला शिव्या घालत आम्हाला उचलायला आली. काही वेळा करता आम्ही जरासे सुन्न झालो होतो. पहिले मला दुकानाजवळ घेऊन आले. मागे पाहिले तर एक जण बाईक उचलत होता तर बाकी अभिजीत रावला घेऊन येत होते. पण रावला मात्र चालायला जमतच नव्हते हे मला आता जाणवले. अभिजीत येई पर्येंत पाणी आणा, अशा आरोळ्या ऐकू आल्या. मग पाणी आले. मला आणि रावला पाणी पाजले आणि अम्हीची विचारपूस करू लागले. मी सर्व प्रथम अभिजीतची विचारपूस किली. तो मला बोलला गुढग्याला मार लागला आहे आणि चालायला अजिबात जमत नाही आहे. त्याला गुढगा दुमडायला पण जमतच नव्हता. मग गावकऱ्यांनी मला बाजूला केला आणि रावची गुढग्याचे परीक्षण करायला लागले. या बरोबर पुन्हा एकदा त्यांनी समस्त श्वान प्रजातीला मनोसक्त शिव्या घालून घेतल्या. ते मला बोलले कि त्या कुत्र्यांनी बरेचदा असे बाईक वाल्यांना पाडले आहे आणि पुन्हा शिव्या घातल्या. थोडा वेळ आराम करून मी बाईकच्या जखमांच्या परीक्षणाला निघालो. माझ्या बरोबर एक-दोन गावकरी पण आले. बाईकला आणि मला तसे काही विशेष लागले नव्हते, मात्र अभिजीतच्या गुढग्याला मजबूत मार लागला आहे या विचाराने मी जरा चिंता ग्रस्त झालो.

कसे-बसे गावकऱ्यांच्या मदतीने अभिजीतला बाईकवर बसवले आणि त्या सर्व प्रेमळ गावकऱ्यांचे आम्ही मना पासून आभार मानून निघालो. हॉटेलच्या दारात आलो आणि सुजय-राजूला हाक मारून बोलावले आणि अभिजीतला बाईक वरून उतरवले. मी बाईक लावली आणि घडलेली सर्व हकीकत राजू-सुजायला सांगितली. सुजय आणि राजू आम्हा तिघांची फार विचार पूस करू लागले, विशेष करून रावची. त्या दोघांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत आम्ही थोडा वेळ आराम करून घेतला आणि आता पुढे राहायचे कुठे यावर चर्चा करून लागलो. मला, सुजायला आणि राजूला रावची परिस्थिती फारच गंभीर वाटत होती. मग एकमत करून त्याच होटेल मध्ये राहायचे असे ठरले.

रावच्या परिस्थितीवर आता आमच्या ट्रीपचे पुढे भवितव्य होते. हॉटेलच्या लोकांकडून डॉक्टरचा पत्ता घेतला आणि, मी रावला डॉक्टरन कडे घेऊन गेलो. आमच्या पराक्रमाची सारी हकीकत सांगितली आणि पुढे करायला जाणाऱ्या पराक्रमाची सुद्धा. त्यांनी प्रिस्क्रिप्षन लिहून औषध व मला दिले आणि उद्या सकाळी या, पाहू काय ते? असे बोलून आमची पाठवणी केली. आम्ही डॉक्टरांचा निरोप घेऊन हॉटेल वर परतलो तो पर्येंत सुजय आणि राजूने हॉटेल मध्ये रूम बुक करून सर्व समान ठेवून दिले होते. तसे पाहायला गेले तर आज फार थकायला झाले होते. ट्रिपचा पहिला दिवस, त्याच्या आधी बरेच दिवस परीक्षा आणि आता बाईक वरून पडलो. आता रस्त्यावर राहण्याची आमच्यात ताकद नव्हती आणि रावला अश्या परीस्तीतीद रस्त्यावर झोपवणे बरे नव्हते. रावला बेड  वर झोपवला आणि आम्ही रूम वर मस्त आराम करत आता पुढे काय? या वर चर्चा करत बसलो. ऐवढ्यात  राजू ने गिटारीचे स्वर छेडले. याच स्वर मय वातावरणात आमच्या चर्चा चालू होत्या.

राजू आणि सुजय चे तर ठाम मत होते, परत मुंबईला चला, रावचे मत नाही पुढे जायचे. दोघे हि टोकाच्या आणि  दुषी कडच्या मताचे होते. मी मात्र मध्यम भूमिकेत होते. कारण पाहायला गेले तर राजू आणि सुजायचे बरोबर  होते. रावला धड चालायला हि होत नव्हते. बाईक ट्रिपचा पहिला दिवस आणि अजून पुढे बरेच दिवस जायचे होते. एवढा ९०० किलो मीटरचा प्रवास, बाईक वर बसने, चालवणे आणि चढ-उतर त्याला कसे जमणार. एवढे सारे प्रश्न आमच्या मनात घोळत होते. रावला आणि मला हि ट्रीप फार वर्षान पासून करायची होतीच. मी या दुविधा मनस्थितीत होते. राव काही केल्या ऐकेच ना, त्याचे मात्र एकाच मत होते ट्रीप पुढचे करायची. आम्ही रावला सांगितले कि उद्या डॉक्टरांचे काय मत आहे ते पाहू आणि मग पुढचे ठरवू. तरी पण राव, सुजय आणि राजू आप-आपल्या टोकाच्या भूमिकेलाच होते आणि या वेळेला मी मात्र डॉक्टरांच्या मतावर पुढचे ठरवायचे या वर ठाम होतो. याच चर्चेत १२ च्या दरम्यान आम्ही  झोपी गेलो. 

11.4.11

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - ट्रिपचा उगम आणि पूर्वतयारी.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मी मुंबई विद्यापीठाची कोकण कोस्टल साइकलिंग एक्षपीड़िशन केले होते. या मार्गाहून जाताना मला कोकण किनार पट्टीवरचे बरेच सागरी किल्ले आहेत असे कळाले. पण साइकलिंग ट्रीप मुळे एकही किल्ला पाहायला मिळाला नव्हता आणि त्याच वेळी मी हे सर्व किल्ले पाहणार असे ठरवले होते. या साइकलिंग ट्रीपच्या वेळी आमच्या बरोबर एक बाईक पण होती. मला बाईक चालवायला येत नसल्या कारणास्तव काकाने कधी सपोर्ट म्हणून मला बाईक चालवायला फार दिली नाही. त्या साइकलिंग ट्रीपच्या दरम्यानच मी ठरवले होते कि कोकणातील सर्व सागरी किल्ले पाहायचे आणि ते ही बाईक वरून. हाच खऱ्या अर्थाने आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिपचा उगम होता. याचा कालावधी मध्ये माझी अभिजित राव बरोबर मैत्री व्हायला लागली होती. आम्हा दोघांना बाईक वर फिरल्या फार आवडायचे, असे हि कळाले. मी बरेचदा रावला या ट्रीप बद्दल बोलून दाखवले होते. आम्ही दोघांनी मिळून बऱ्याच १-२ दिवसांच्या बाईक ट्रीप पण करायला लागलो होतो. शेवटी आमच्या एम.एस.सी पार्ट-१ च्या सुट्टीत काही करून आपण कोकणातील सागरी किल्ले करायचे असे माझे आणि रावचे ठरले.

आता एकदा ठरले कि मग आम्हाला कसला धीर राहतोय. आम्ही दोघे लागलो कामाला. मी या मार्गावर अगोदर साइकलिंग केल्यामुळे रत्नागिरी पर्येंतचा रूट प्लान करून घेतला. रत्नागिरी ते गोवा पर्येंतचा रूट मी आणि रावने मिळून प्लान केला. कॉलेज मध्ये असल्या कारणास्तव कमी पैश्यात ट्रीप करायची होती, म्हणून रात्री राहायचे तर देऊळ, शाळा, एस.टी स्टॅंड किंवा कोणाचे तरी मिळाले तर अंगण असे ठरले. मी आणि रावने दिवसा किती प्रवास करायचा, रस्त्यात लागणारे किती किल्ले पाहायचे आणि रात्री कुठे राहायचे सर्व कागदोपत्री प्लान करून घेतला. याच कालावधीत आमची एम.एस.सी पार्ट-१ ची परीक्षा पण होती. अभ्यासाबरोबर आम्ही या बाईक ट्रीप बद्दल पण बऱ्याच चर्चा पण करायचो.

जस-जसे बाईक ट्रीपचे दिवस जवळ यायला लागले होत तस-तसे आमची उत्सुकता वाढायला लागली होती. माझे तर अभ्यासात जरा हि मन लागत नव्हते. या बाईक ट्रीपचे ऐकून आमचे कॉलेजचे मित्र सुजय आणि राजू पण या ट्रीप वर यायला उत्सुक आहेत असे मला रावने सांगितले. किंबहुना रावने त्यांना होकार पण दिल्याचे सांगितले. वास्तविक माझी तशी काहीच हरकत नव्हती, पण राजू आणि सुजय यांनी आयुष्यात कधी खडतर प्रयोग केलेले नव्हते. सुजय ने मुंबई बाहेर बाईक चालवली नव्हती आणि मुंबई तो बाईक कसा चालवतो याची आम्हा सर्वाना पुरे-पूर जण होती. सुजय म्हणजे रावडी बाईक चालवणारा आणि राजूला तर बाईक चालवायला पण येत नव्हती. या सर्व कारणास्तव मी थोडा चिंतेत होतो. माझे आणि रावचे या विषयावर बऱ्याच चर्चा झाल्या. चार्चांती रावने मला फार काळजी करू नकोस असे सांगून खिशात टाकून घेतले.

आता आम्ही ४ जण कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप साठी सज्ज झालो होतो. आम्ही सर्वांनी बाईकस सर्विसिंग करून घेतल्या आणि आमचे एम.एस.सी पार्ट-१ चे पेपर संपायची वाट पाहात राहिलो. त्या वेळेला मी दादरला राहत होतो म्हणून कॉलेज मध्ये परीक्षेचा अभ्यास आणि बाईक ट्रीपची पूर्वतयारी करायला मिळत होते. राव पण सांताक्रुझला यूनिवर्सिटी मध्ये राहत होता. राजू आमच्या रुईया कॉलेज च्या बाजूलाच राहत होता तर सुजय बांद्रा मध्ये. सर्व रुईया नाक्या पासून जवळ राहत होते म्हणून आम्हाला पटा-पट सर्व तयारी करायला मिळत होती. खरे पाहायला गेले तर आमचे कोणाचे अभ्यासा मध्ये जास्त लक्ष नव्हतेच. तसे पाहायला गेलेतर आमचा काय फार परीक्षेसाठी जास्त अभ्यास पण झाला नव्हता.

शेवटी १८ मे २००६ हा बाईक ट्रीपचा दिवस ठरला. कसे-बसे परीक्षा द्याची आणि लगेच दुसऱ्या दिवशी बाईक ट्रीप साठी पाळायचे असे ठरले.

परीक्षेचा शेवटचा दिवस आला. आम्ही सर्वांनी पटा-पट पेपर संपवला आणि दुपारी नाक्यावर भेटलो. औषधे आणि बाकी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टीची आम्ही खरेदी करून घेतली. राजू आणि सुजयला काही माहिती नसल्या कारणास्तव लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन यायला सांगितले. शेवटी माझी टीव्हीएस विक्टर आणि रावची यामाहा एंटायसार घेऊन जायचे ठरले. २ बाईक आणि चार जण कोकण सागरी ट्रीप साठी सज्ज झाले. उद्या सकाळी ६ वाजता रुईया नाक्या वर भेटायचे ठरवून आम्ही आप-आपल्या घरी गेलो.

10.4.11

लेह बाईक ट्रीप - IBN लोकमत शो दुसरा

 या शोच शूटिंग, एडिटिंग आणि प्रक्षेपण IBN लोकमत ने केले होते. या शोच सर्व श्रेय IBN लोकमतच आहे. आम्ही मात्र यातले छोटेसे सहभागी आहोत हाच आनंद.






9.4.11

लेह बाईक ट्रीप - IBN लोकमत शो पहिला

या शोच शूटिंग, एडिटिंग आणि प्रक्षेपण IBN लोकमत ने केले होते. या शोच सर्व श्रेय IBN लोकमतच आहे. आम्ही मात्र यातले छोटेसे सहभागी आहोत हाच आनंद.






19.3.11

लेह बाईक ट्रीप - दीपालीची आठवण, दीपालीच्या हस्ते.

रोहन आणि अभिजीत या दोन वेड्यांमुळे मला बरच काही बघायला मिळालाय, अनुभवायला मिळालय आणि भविष्यात मिळेल सुद्धा आयुष्यात कधीही ट्रेकला न गेलेली मी पहिल्यांदा ट्रेक केला तो थेट हिमालयात (सारपास) ते शक्य झाल या दोघांमुळेच आतापर्यंत सगळ्यात मोठा बाईक प्रवास केलाय तो ठाणे ते अंधेरी आणि मी तयार झाले होते लडाखच्या बाईक ट्रीपसाठी अर्थातच रोहन आणि अभिजीत वर असणाऱ्या विश्वासामुळेच. पण घरच्यांसाठी मी support vehicle मधूनच फिरणार होते. ( लग्न झालंय आणि नवरा बरोबर नसताना फिरायला जातो मित्र मैत्रिणीबरोबर हाच आधी सगळ्यात मोठा गुन्हा त्यात बाईक वर फिरणार असे म्हटले असते तर माझ्या प्लानचे तीन तेरा वाजले असते. )

पहिल्याच मीटिंग मध्ये क्लियर करण्यात आलेल कि हि काही साधी पिकनिक नाहीए. प्रत्येकाने mentally & physically fit असायला हवं. High altitude वर जाणार म्हणजे श्वासाचे प्रॉब्लेम, बाईकवर बसायचे तेही इतके दिवस continuous म्हणजे physical fitness आणि इतके दिवस सगळ्यांनी एकत्र राहायचंय तर मिळून मिसळून राहण. साध माथेरानला गेल, माथेरान सोडाच officeच्या ACत सुद्धा शिंका येऊन नाक गळायला लागत असली शेंबडी मी. तिकडे थंडीत आपला कसा निभाव लागणार. तस अभिजीत ने breathing exercise सांगितले होते मिटींगला.

झाल मग २-३ महिने आधी झालेली आमची मिटींग आणि आता एक महिना झाला तरी fitness साठी काहीही पावलं उचलली गेलेली नाहीत. रोज नव्याने gym लावायचा संकल्प मात्र सोडला शेवटचा १ महिना राहिलेला तेव्हा महात्प्रयत्नाने सकाळी लवकर उठून walkला जाऊन आले ( फक्त एकच दिवस ) माझे हे ( आमचे हे :) ) ने मात्र अभिजीतला सांगितले हे असले मेंबर म्हणजे Risk आहे.

आता मात्र बरोबर मिरच्या झोंबल्या माझ्या नाकाला सकाळी लवकर उठून कपालभाती - प्राणायाम सुरु झाल. रोज उठून शिंकणारी मी आता शिंका कमी झाल्या, माझ्या great manager सासूबाईंनी सामान गोळा करायची जबाबदारी स्वत:वर घेतली आणि जायच्या आठवडाभर आधीच मी बॅग भरून तयार ऑफिस मध्ये सुद्धा सगळ्यांना सांगून झालेलं लडाखला जाणार म्हणून आणि सगळ्यांच्या कौतुक मिश्रित नजरांनी स्वतःला great समजून घेत होते.

जायच्या रात्री झोप काही येत नव्हती. अभी, मनाली, साधना गँग ट्रेन ने पुढे गेलेली. मी,शोभित, अमेय साळवी, दादा ( आशिष चौधरी ) असे पहिल्यांदाच विमानाने जाणारे चौघे सकाळी विमानतळावर भेटलो. सगळेच जण आप-आपल्या सामानाच्या वजनाबाबत साशंक. मला तर वाटत होत माझ्या सामानाच वजन जास्त होणार आणि माझे अर्धे कपडे हे लोक ( airport staff ) बाहेर फेकणार ( पहिल्यांदा जाण्याची अनाठायी भीती ) मी आपली उगाचच अमोलला बाहेर थांब हा! सामान कमी करायची वेळ आली तर...... अमोल ने आपली बायको किती बावळट अशा नजरे ने फक्त बघितले आणि मी विनोद पण कळत नाही याला अशा नजरेचे उत्तर दिले. पण आमच्या अमेय साळवी ( उर्फ फाटका माणूस ) आणि दादा यांनी आम्हाला व्यवस्थित जम्मूला आणलं. आणि आल्यावर लगेचचं आमच्या पुढच्या प्रवासाची कल्पना आली. आम्हाला न्यायला येणारी गाडी न्यायला आलीचं नाही आणि कडकडीत उन्हात आम्ही गाडीची व्यवस्था होतेय का याची वाट बघत बसलो. शेवटी हॉटेलवर पोहचून जेवून बिऊन मस्त ताणून दिल. संध्याकाळी बाकीची टीम सुद्धा आली. सगळे एकत्र आल्यावर आता जरा ट्रिपचा feel यायला लागला. रात्रीच्या जेवणानंतर उद्याच्या planची मीटिंग झाली तेव्हा तर एकदम Pro-bikers वाटलो. आम्ही आता थोडी थोडी ओळख होऊ लागली होती. मी घरी सांगितलेलं कि बाईक वर बसणार नाही, गाडीतूनच प्रवास करणार म्हणून दुसऱ्या दिवशी अभिने विचारल कि गाडीत कोण कोण बसणार तर मी लगेच हात वर केला आणि घरच्यांना दिलेल्या वचनाची पूर्ती केली याचं समाधान वाटल. पण गाडीत बसून काही मजा येत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आजारी पडल्यामुळे माझी अमेय साळवीचा pillion म्हणून नेमणूक झाली. आधी एक दोन ट्रेकला आमची ओळख होती पण बाईकवर काय अखंड वेळ एकत्र आणि त्यातून आम्ही दोघे हि बडबडे मग काही बघायलाच नको अखंड बडबड. अमेयला फोटोग्राफीची आवड आणि मी त्याची assistant लेन्स पकडायला, कॅमेराची बॅग सांभाळायला. लग्न, कॉलेज, नाती गोती, आई-बाबा, गाणी, मित्र-मैत्रिणी, स्वभाव.....आम्हाला कधी म्हणून विषयाची कमतरता जाणवली नाही. लधाक ट्रीपने ज्या काही देणग्या दिल्यात त्यातली हि एक, दुसरी देणगी म्हणजे माझा नवीन दादा (रोहनचा मोठा भाऊ). मी त्याला Mr. Perfect म्हणते. त्यच्या इतका व्यवस्थीत-नीटनेटका माणूस मी आजगायत बघितला नाही.


कोठेही गेल्यावर कोणाचं काय खाणे-पिणे झाले. बिल किती झालय. बिल व्यवस्थीत दिलाय ना? सकाळी सगळ्यात वेळेवर हजर राहाण. पाण्याच्या बाटल्या भरून, गाडीची हवा बिवा सगळे बघून, सांगितलेल्या वेळेवर आमचा दादा तयार आणि आम्ही सगळ्यात उशीर करून सुद्धा निघे पर्येंत....अरे माझे पाणी राहील, माझे हेल्मेट कुठे आहे, मी गाडीत कि मी बाईक वर असेच चालू असायचं.

किती-किती म्हणून आठवणी आहेत लधाकच्या. सकाळी उठलाय पासून रात्री झोपे पर्येंतरोज एका गडबडीच्या लयीत सर्व चालू होत. गडबडीच्या लयीत अश्या साठी आम्ही रोज काही तरी प्लान करायचो आणि रोज काहीतरी गडबड व्हायची. पण आमचा उत्साह मात्र दाणगा होता. एकदा तर मी, अभी, मनाली रात्री १२ वाजल्या पासून २.३० वाजे पर्येंत त्यांच्या रूम वर गप्पा मारत बसलो होतो. त्या दिवशी कारगील-लेह प्रवस करून सर्वच फार थकले होते. परंतु आम्ही मात्र गप्पा टाकत बसलो होतो. आता सगळ आठवले कि इतक छान वाटत. किती सुंदर क्षण आहेत हे.  I feel lucky for myself, मला इतके छान मित्र मैत्रिणी मिळाल्यात.

- दिपाली.

22.2.11

लेह बाईक ट्रीप – एक आठवण

लेह बाईक ट्रीपला आता जवळ-जवळ दिड वर्ष होऊन गेले. तरी हि मला या बाईक ट्रीपच्या आठवणी अजून ताज्या आहेत. याच ताज्या आठवणी मुळे इतक्या उशिरा का होईना पण मला हा ब्लोग पूर्ण करायला मिळाला. आज हि माझ्यात लेह बाईक ट्रीपच्या आठवणी जिवंत आहेत. कुठेही आयुष्यात या संदर्भात गोष्टी चालू झाल्या कि मी लगेच लेहच्या आठवणीत पोहोचतो. खरो-खर माझ्या साठी हि अजून पर्येंतची सर्वोत्तम ट्रीप होती. आम्ही सर्वांनी फार मज्जा केली.

मला या ट्रीप वर नुसती मज्जा करायला मिळाली असे नव्हे तर फार चांगले मित्र हि मिळाले. अभी, रोहन, मनाली, शमिका, पूनम आणि ऐश्वर्या फार पूर्वीपासून आम्ही एकत्र ट्रेकिंग करत होतोच. दीपाली आणि आदित्य बरोबर एखाद-दुसरा ट्रेक केला होता. पण आशिष, अमेय म्हात्रे, कुलदीप, शोबित, साधना आणि उमेश यांची तर या ट्रीप वर पहिल्यांदाच माझी ओळख झाली. पण या सर्वात, योगा-योगाने झालेली दीपाली बरोबरची मैत्री जास्त लागून राहिली. दिपाली आणि मी या ट्रीप वर केलेली मस्ती-मज्जा हि सर्वात मोठी आठवण राहून गेली. या आठवणी बरेचदा मला शब्दात मांडता पण येत नाही. याच आठवणीच्या पाठो-पाठ बर्याच आणखीन काही चांगल्या-वाईट आठवणी पण जागा करून राहिल्या आहेत. सुरवात करायची झाली तर, ट्रीप साठी निघताना मुंबई विमातळावर झालेली आमची फजेती. जम्मू पार्सल ऑफिस मधला नाट्यमय किस्सा. दल झील पाहून झालेली निराशा. श्रीनगरच्या गाडीचा किस्सा, बाईक पंचर झालेली, सोनमर्गची रात्र आणि पहाट. द्रासच्या अलीकडे पडलेला पूल आणि  तेव्हाचे किस्से. द्रास मेमोरीअलची भेट. कारगिलचा भेटलेला मराठी आर्मी ऑफिसर. दीपालीने मला, बाईकला आणि स्व:ताला दरीत पडताना वाचवलेला किस्सा. लेह्तील नबिच्या घरचा रहिवास. नबिचा मुलगा असीम. लेह आणि आजू-बाजूचा परिसर. सिंधू घाट पाहून झालेली निराशा. गिटार वाजताना फिरंग. चांग-ला पोस्ट मधला आर्मीचा जवान आणि मग तो झालेला मित्र. पेंगॉँग लेक आणि त्या पर्येंत पोहचण्याचा प्रवास. चांग-ला वरून लेह कडे परत येत असतानाचा माझा आणि दीपालीचा संगीत मय प्रवास. लेह मध्ये १५ ऑगस्ट साजरा केलेला. लेह परिसरातील १००० वर्ष जुनी गुंफा आणि परत लेह कडे येताना मी व उमेश बाईक वरून पडता-पडता वाचलो होतो ते. याचा रात्री अभीचे लेह मधील ग्रूप वर रागावणे. जगातील सर्वाच्च रस्ता (खारदुंग-ला). सिंधू नदीचे पाहायला मिळालेले रुद्र रूप. हिमालयातील वाळवंट (नुम्ब्रा वॅली). न पाहायला मिळालेले २ खुंट असलेले उंट. त्सो-मोरिरीला जाताना मध्ये आर्मी पोस्ट वर खाल्लेल्या शिव्या आणि मग काजू.बदाम, पिस्त्यांचे आदरतिथ्य. त्सो-मोरिरीला बिना जॅकेट बाईक चालवताना लागलेली थंडी. त्सो-मोरिरीला पाहायला मिळालेला सोनेरी ढग. त्सो-मोरिरीची आमची पार्टी. त्सो-मोरिरीची पहाट. पांगला जाताना तेनसिंगचा अति शहाणपणा. तेनसिंगने मला फसवलेले किस्सा. पांग पर्येंतची माझी झोप आणि आराम. माझ्या आरामा मुळे बाईक वरून पडलेला उमेश. पांगला सर्वानी मला घातलेल्या शिव्या. सरचूची रात्र आणि पहाट. रोहतांग अलीकडचा आणि  रोहतांगचा चिखल. मनालीतला आराम. भरतपूरची मारा-मारी. चंदिगड पूर्वीचा अभिचा झोपाळू प्रवास आणि त्या वेळी माझी व दीपालीची मस्ती. चंदिगड मधले कुणालचे चंदिगडी आदरतिथ्य. चंदिगड-अंबाला सुसाट बाईक पळवलेली. अंबालाचा महागडा नाष्टा. लोणीमय पराठा आणि दीपाली व मनालीचे वाकडे चेहेरे. दिल्लीतले वादळाने केलेले स्वागत आणि त्यामुळे झालेला ट्राफिक जाम. ट्राफिक जाम मुळे झालेले नुकसान (इंडिया गेटला न झालेला ट्रिपचा शेवट). दिल्ली रेल्वे स्टेशन वर बाईक लोड करताना झालेला त्रास. दिल्ली मेट्रो, दिल्ली युथ होस्टेल. दीपालीच्या शापा मुळे न झालेली शर्वरीची भेट. शर्वरीला फोन वरून घातलेली समजूत. दिल्ली ते मुंबई प्रवासातील मस्ती. मुंबई विमानतळावर परत भेटू असे म्हणत करणारा टाटा. 

आणखीन  काही फोटो स्वरूपातल्या आठवणी....






























हि बाईक ट्रीप आम्हा सर्वाना किती जवळची झाली असेल हे आता पर्येंत जाणवतच असेलच. तरीही माझ्या लग्नाचे निमित्त सोडले आणि एकदा-दोनदा मी, अभी-मानली सोडले तर कोणालाही बाईक ट्रीप नंतर भेटलेलो नाही आहे. या ट्रीप वर दीपाली आणि माझी एवढी गट्टी होऊन सुद्धा गेल्या दिड वर्षात आम्ही एकदाही भेटलो नाही. आमची फक्त १५ दिवसांचीच गहन मैत्री आणि अविस्मरणीय बाईक ट्रीपच्या आठवणी बऱ्याचश्या तुमच्या पुढे मांडून, मी लेह बाईक ट्रीपच्या लिखाणाचा प्रवास सुद्धा संपवत आहे.

21.2.11

लेह बाईक ट्रीप - पंधरावा दिवस (दिल्ली ते मुंबई)

२२ ऑगस्ट २००९, तास भर झोप काढून पहाटे ३.३० च्या दरम्यान मला अमेय म्हात्रे ने हलवून उठवले, चल ऊठ टॅक्सी आल्या आहेत खाली. पटा-पट उठलो आणि तयारीला लागलो. ४ वाजता आम्ही सर्व खाली युथ हॉस्टेल च्या अंगणात आलो. टॅक्सी बाहेर लागल्याच होत्या, सर्वांचे सामान टॅक्सी मध्ये भरून घेतले. निघण्यापूर्वी साधनाने सर्वांचे या बाईक ट्रीप बद्दलच्या प्रतिक्रिया शूट करून घेतल्या. मला तर बाईक ट्रीप संपल्याचे जाणवायला लागले होते आणि फारच वाईट वाटत होते. साधना-उमेशचे फ्लाइट काही तासा नंतर होते आणि रोहन-शमिका दिल्लीत त्यांच्या नातेवाईकां कडे जाऊन मग येणार होते. या चौघांचा निरोप घेऊन आम्ही सर्व जड अंतकरणाने टॅक्सीत बसलो आणि एअरपोर्टच्या दिशेने निघालो. इतके दिवस आम्ही सर्व एकत्र मज्जा करत होतो आणि आता काही वेळा नंतर सर्व आप-आपल्या मार्गाला लागणार या भावने ने मला फार भरून आले होते.


दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आणि हा मी या ट्रीप वरचा जड अंतकरणाने काढलेला फोटो. आम्ही ११ जण एकत्र म्हटले तर मस्त-धमाल आलीच. टॅक्सी तून उतरल्या पासून मस्ती सुरु झाली ते चेक इन च्या लाइन मध्ये सुद्धा करतच होतो. आजू-बाजूचे बर्याच लोकांना आमच्या धतिंगगिरी मुळे त्रास होत-होता असे हि जाणवले. चेक इन करून निघालो तर सिक्युरिटी चेक मध्ये अभीने बाईकचे टूलकिट कॅबिन बॅग मध्ये ठेवले आहे असे कळले. मग काय पळत-पळत अभीने जाऊन परत टूलकिट चेक इन बॅग मध्ये ठेवले आणि शिरलो विमानात. विमानात तर आम्ही कुठे गप्प बसलो. तिकड़े हि आमची मस्ती सुरु होतीच. विमान उडल्यावर थोडा वेळे पर्येंत आम्ह्ची मस्ती चालू होतीच, मात्र थोड्या वेळाने मी गेलो झोपी. मुंबई आल्या वर दिपलीने मला उठवले.


मुंबई एअरपोर्ट वर बाहेर आल्यावर अभीने काढलेला हा फोटो. मला आता फोटो काढण्याची जराही इच्छा नव्हती. फारच वाईट वाटत होते, इतके दिवस आम्ही सर्व एकत्र होतो आणि आता पासून पुढे सर्व आप-आपल्या मार्गाला. सर्वांनी आप-आपल्या मार्गाच्या टॅक्सी बुक केल्या होत्याच. सर्व एकमेकांशी या ट्रीप वरचा शेवटचा निरोप घ्यायला लागलो. पुन्हा भेटू आणि घरी पोहोचल्या वर एस. एम. एस. करा असे म्हणत आम्ही टॅक्सीत बसलो. मी आणि शोबित एक मार्गावर होतो म्हणून लागलो आमच्या मार्गाला. शोबित त्याच्या इष्टस्थळी उतरला आणि मी बाईक ट्रीपच्या आठवणी माझ्या बरोबर घेऊन घरी पोहोचलो.

20.2.11

लेह बाईक ट्रीप - चौदावा दिवस (चंदिगड ते दिल्ली)

२१ ऑगस्ट २००९, काल एवढे थकलो होतो कि अंथरुणात पडल्या-पडल्या झोप लागली. सकाळी ८.३० ला मला दीपालीने कमरेत लाथ घालून उठवले, “मेल्या उठ, सगळे आंघोळ करून सामान आवरायला लागले आणि तू अजून झोपला आहेस”. अरे मला कोणी उठवलेच नाही असे बोलत मी उठलो आणि सामान आवरून आंघोळीला शिरलो. कालचा थकवा तसा जाणवतच होता. आंघोळ होताच सामान आवरले आणि बाहेर गाडीकडे घेऊन आलो. गाडीत सर्वांचे सामान ठेवून झाले होते मीच बाकी होतो. कुणाल आम्हाला सोडायला हॉटेल वर आलाच होता, त्याचा पाहुणचार अगदी अप्रतिम होता. वास्तविक त्याच्या मते आम्ही चंदीगडला आलो आहोत तर रॉक गार्डन तर कमीत कमीत पाहून जायला पाहिजे होते, पण काय करणार वेळेची आमच्या कडे बोम्बाबोम होती आणि दिल्लीत वेळेत पोहचून बाईकस ट्रेन मध्ये लोड करायच्या होत्या. गाडीच्या ड्रायवर मी चंदिगड ते दिल्लीचे अंतर विचारले आणि किती वेळ लागेल असे हि विचारले. त्याने हे अंतर २४० किलोमीटर आणि अंदाजे "७-७.३० घंटा बाईक को" असे सांगितले. आज पण मी आणि दीपाली एकत्र आता यात काय नविन नव्हते. आज आमच्या ट्रीपचा बाईक वर शेवटचा दिवस होता, मग दुसरया कोणाला हि संधी दीपालीने दिलीच नसती. कुणालने प्रेमाने केलेल्या पाहुणचाराबद्दल सर्वांनी त्याचे आभार मानून ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल सोडले. मला चंदिगड शहर फार आवडले. मस्त स्वच्छ आणि सुनियोजित. त्यातून हवामान पण छान आहे आणि तिकडच्या माणसांची तर बातच काही और. याचा अनुभव काल घेतलाच होता आणि पुढे जाणवेल असे वाटले. हॉटेलवरून निघाल्या वर पुढे दिल्ली हायवे चा रस्ता मी मधेच एका माणसाला विचारला तर त्याने मला उजवीकडून न जाता सरळ जा असे सांगितले, कारण “राईट लेकर जाओगे तो देखो ट्राफिक हे, आप सीधे जाओ” असे सांगितले. मी आणि दीपालीने उजवीकडे पाहीले आणि धक्काच लागला. त्या इसमाला धन्यवाद म्हणत, त्याने सांगितलेल्या सरळ रस्त्याने निघालो. आता धक्का लागण्याचे कारण सांगितले पाहिजे, आपल्याकडे मुंबईत शनिवार-रविवारी जेवढे  ट्राफिक असते तेवढे होते आणि त्याला चंदिगडची लोक फार ट्राफिक म्हणतात. या विषयवर मी आणि दीपाली थट्टा करताना कधी दिल्ली  हायवेला लागलो ते समजले देखिल नाहीं. हा चंदिगड-दिल्ली हायवे काय मस्त आहे असेच उद्दगार माझ्याकडून निघाले. खरोखरच मस्त रस्ता होता, डिवाइडेड हायवे. बाईक व्यवस्थित पळवायला मिळत होती आणि आम्ही सर्व पळवत हि होतो. बाईक पळवण्यात मी आज सर्वनपेक्षा पुढे होतो. बाईक पळवण्यापाठी माझी दोन करणे होती. एक असे कि मला माझ्या नवीन अवेंजर १०० च्या हाय स्पीड वर चालवून पहायची होती आणि दुसरे कारण असे कि आम्ही कोणीच सकाळी नाष्टा साधा चहा पण घेतला नव्हता. आमचे अंबाला ला नाष्टा करण्याचे ठरले होते, पण मला फार भूक लागल्या मुळे मी रोहनच्या पाठी लागलो  होतो कि मधेच कुठे तरी चांगले हॉटेल पाहून नाष्टा करूया. कारण चंदिगड ते अंबाला हे अंतर ४० किलोमीटर  आहे. मग मी आमच्या गाडीच्या पाठो-पाठ १०० च्या स्पीडला बाईक पळवू लागलो आणि सारखे रोहनला भूक लागली म्हणून हाताने खुणवत होतो. तरी हि रोहन पण अंबालालाच नाष्टा करायचा यावर ठाम होता. शेवटी माझे निष्फळ पर्येत्न सोडले आणि चल आता पटकन अंबाल्याला असे स्व:ताशी म्हणून गाडी बरोबर बाईक पळवायला लागलो. आज मी बाईक पळवण्याचा आनंद लुटत होतो. एकदा-दोनदा मी गाडीला पण  ऑवर टेक करून ११० चा स्पीड गाठून मनाला आवरले. या सर्व पळापळी मध्ये आज माझ्या व दीपालीमध्ये एकदा ही गप्पांना सुरवात झाली नव्हती. दीपाली मागे गपचूप बसून राहिली होती. आता शिस्तीत गाडीच्या पाठी राहून ८०-९० ला बाईक पळवत अंबाला गाठले. आमच्या गाडीच्या ड्रायवरनेच हायवेला लागून सागररत्न हॉटेलजवळ थांबवले. पाठोपाठ मी हि थांबलो, लगेच मागाहून बाकी सर्व बाईक्स पण आल्या. याचा अर्थ आज सर्व बाईक्स सुसाट पळत होते. या हॉटेलमध्ये  साऊथ इंडियन पदार्थ मिळतात असे कळताच, एका मागोमाग एक ऑर्डर सुरु झाल्या. आज ट्रिपचा शेवटचा दिवस असल्या कारणास्तव सर्वच जास्तीत-जास्त मस्ती करत होतो. आरामात तासा भरात नाश्ता आवरला. आज आमचे नास्त्याचे बिल जवळ-जवळ ३५०० रुपये झाले होते. या वरून आपण अंदाज मांडू शकतो, कि  आम्ही काय नाष्टा हाणला असेल. 


नाश्ता करून हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा आमचे स्वागत एका फायटर जेट विमानाने केले. काय आवाज होता तो भिनभिनणारा, आमच्या डोक्यावरून पास झाल्यामुळे. मस्त अनुभव होता तो. थोडा वेळ बाहेर मस्ती करत आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो. आता माझे पोट भरल्या मुळे मी काय फार बाईक पळवत नव्हतो. बाकी सर्व बाईक्स आता पण सुसाट पळवत पुढे निघून गेले होते. मी आणि अभी मात्र मस्त आरामात मागाहून चाललो होतो. आता जसे-जसे दिल्लीच्या जवळ चाललो होतो तस-तसे आमची बाईक ट्रीप समाप्तीला येत आहे याची जाणीव होत होती. थोडेसे निराशादायक मूड मध्ये आम्ही शिरकाव करत होतो असे जाणवले. बाईक जास्त जोरात न पळवण्याचे कारण मूड तर होता, मला तर दिल्ली गाठूच नये असे वाटत होते. पण बाईक जास्त न पळवण्याचे मुख्य कारण असे होते कि, अंबाला पार करून जसे हरयाणा मध्ये घुसलो तेव्हा रस्त्या मध्ये सारखे “Speed Limit 70 km/Hr. You Are Under Vigilance. Haryana Police” असे बोर्ड दिसायला लागले होते. काल रात्रीच्या प्रसंगामुळे आता मी, अभी, मनाली आणि दीपाली एक ग्रुप झालो होतो. मस्त हळू-हळू गप्पा मारत कुरुकक्षेत्र पार केले. हळू-हळू म्हटले तरी ६०-७० च्या स्पीडने चाललो होतो. मस्त सरळ आणि चांगला रस्ता असल्यामुळे सलग  एक लय मिळत होती बाईक चालवायला.पुढे एका पेट्रोल पंप वर थांबलो. अभीच्या आणि माझ्या बाईकला थोडेसे पेट्रोल पाजून घेतले आणि पेट्रोल पंपाच्या दारातच एका झाडाखाली असलेल्या टपरी वर चहा ओर्डर केला. चहा बने पर्येंत टपरीच्या बाजूला असलेल्या खाटे वर चौघे हि निवांत आडवे पडून राहिलो. इकडेच गप्पा मारत असता सर्वाना आज ट्रिपचा शेवटचा दिवस आहे म्हणून फार वाईट वाटत होते हे जाणवले. 


चहा घेता घेता अभिने रोहन बरोबर फोन करून गाडी कुठे पोहोचल्याचे जाणून घेतले. ज्याने मुंबई वरून आमच्या बाईक लोड केल्या होत्या त्याला अभीने फोन लावून, दिल्लीच्या एका लोडचा फोन नंबर घेतला. अभीची फोना-फोनि चालू असे पर्येंत मी पण माझी दिल्लीची मैत्रीण शर्वरीला फोन लावून घेतला. तिने तर मला दिल्लीला आल्यावर आज भेटच असा आग्रह धरला आणि तिचा आग्रह मी  तोडू शकलो नाही. पाहू दिल्लीत पोहोचल्या वर कसे काय जमते ते, असे बोलुन मी तिचे मन राखले. आता मला दिल्लीला जायचे  काही तरी कारण मिळाले होते, नाहीतर मगास पर्येंत का चाललोय दिल्लीला असेच वाटत होते. चहा, फोना-फोनी आणि थोडावेळ निवांत आराम करून आम्ही पुढे निघालो. आता मला दिल्लीला लवकरात लवकर जायचे आहे हे जेव्हा दीपालीला कळाले तेव्हा, एक सारखी ती मला चिडवा-चिडवी करून त्रास देऊ लागली होती. आता गप्पा-मस्ती परत चालू झाली आणि मूड थोडा चांगला झाला होता. अशा गप्पान मध्ये एकदा-दोनदा रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी ब्रेक घ्यायचो आणि सटा-सट रस्ता कपात कर्नाल पार करून पानिपत गाठले.
बरेच अंतर पार केले म्हणून एक ब्रेक घेऊया आणि परत जरा भूक लागली म्हणून धाब्याजवळ थांबलो. वास्तविक तो फॅमिली हॉटेल सारखा मोठा ढाबा होता. फॅमिली ढाबा म्हंटला तर, ६०-७०  एक टेबल मांडले असतील. फार खपाटीला पोट लागले अशी भूक नव्हती लागली, म्हणून आम्ही एक-एक आलू परोठा  मागितला. जेवण येई पर्येंत फ्रेश होऊन घेतले आणि गप्पा मारत बसलो. अभी ने परत एकदा फोन करून  घेतला. मस्त गरम-गरम परोठा घेऊन आला, तेव्हा आमचे सर्वांचे डोळे भिर-भिरले. दीपाली आणि मनाली  जोरातच ओरडल्या “ एवढा मोठा परोठा”. मस्त परोठ्या वर २ चमचे लोणी घातले होते. मी तर मस्त  एन्जोय करत परोठा खाल्ला, पण दीपाली मात्र जास्त लोण्यामुळे तोंड वाकडे करून खात होती. कसे-बसे परोठे संपवले आणि मस्त दुधाची चहा पिऊन दिल्लीच्या दिशेने निघलो. दिल्ली अजून ७० एक किलोमीटर  वर होते. जसे पानिपत सोडले आणि दिल्लीच्या जवळ जायला लागलो तसे निसर्गाचे रूप पालटायला  लागले होते. कडक उन जाऊन ढगाळ वातावरण झाले होते आणि जोरात वाराही सुटला होता. मजबूत धुरळा पण उडत होता हवे मध्ये, वादळी वाऱ्यामुळे. वादळी वाऱ्यातून आणि धुरळ्यातून आम्ही पुढे निघालो. दिल्ली पासून ३० एक किलोमीटर वर पावसाने आम्हाला गाठले. लगेच आम्ही बाईक बाजूला घेऊन रेनकोट घालून घेतले. मला तर स्व:ता पेक्षा कॅमेऱ्याची जास्त काळजी होती.जस-जसे आमची दिल्लीच्या आत शिरत होतो तसे आम्हाला ट्राफिक लागले. आम्ही दिल्लीत प्रवेश करे पर्येंत बराच पाउस पडून गेला होता आणि त्यामुळे हे सर्व ट्राफिक जाम झाले होते. आमच्या बाईक ट्रीपचा शेवट इंडिया गेट जवळ करायचा असे ठरले होते. साधना आणि उमेशला पण ट्रिपचा क्लोजर फुटेज घ्यायचा होता. पण पावसाने संपूर्ण वाट लावली होती दिल्ली शहरात. मग अभीने इंडिया गेटचा बेत रद्द करून, रोहनला गाडीतले सर्व सामान दिल्लीच्या यूथ हॉस्टेल मध्ये आमचे बुकिंग होते तिकडे सोडायला सांगितले आणि बाकी सर्व बाईकसला कुठे हि न जाता सरळ दिल्ली रेल्वे स्टेशनला भेटायला सांगितले. मजबूत ट्राफिक जाम मध्ये आम्ही अडकलो होतो. कसे-बसे ट्राफिक जाम मधून पार होत ५ च्या दरम्यान आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि अभीने पहिला लोडरला फोन लावला. त्याने आम्हाला पार्सल ऑफिस जवळ यायला सांगितले.

लोडरच्या सुचने प्रमाणे आम्ही सर्व पार्सल ऑफिस जवळ त्याची वाट पाहात राहिलो. आता फावल्या वेळे मध्ये आम्ही काय गप्प बसतो. चालू झाली आमची मस्ती. आता जास्त करून सर्वच मस्ती मध्ये शामिल झाली होते. पूनम, ऐश्वर्या, आदित्य, अमेय म्हात्रे, कुलदीप, आशिष, दीपाली, मनाली आणि मी जास्त करून मस्ती करत होतो. अभी मात्र संपूर्ण पणे बाईक लवकरात-लवकर लोड करायच्या म्हणून फोना-फोनी मध्ये घुसला होता. अधून- मधून मी ही त्याला मदत करत होतो. थोडा वेळ मस्ती आणि मधेच गरज लागली कि अभिला मदत. लोडर बरोबर झालेल्या शेवटच्या फोना-फोनी तून कळाले कि आम्ही चुकीच्या पार्सल ऑफिस जवळ आहोत. दिल्ली रेल्वे स्टेशनला ४ पार्सल ऑफिस आहेत.
मग सर्वांना कुठे हि जाऊ नका, इकडेच थांबा असे सांगून अभी,मी आणि अमेय म्हात्रे त्या लोडरला शोधायला गेलो. या सर्वात बराच वेळ निघून गेला. कसे बसे त्या लोडरला गाठले आणि पुढच्या प्रक्रियेला लागलो. दिल्लीतून मुंबईला ट्रेनने बाईक पाठवायचे सरसकट ३००० रुपये त्याने सांगितले. दिल्ली मध्ये प्रचंड बाबूगिरी चालते एक रुपया हि त्याने कमी केला नाही. या लोडरला शोधत असताना एक किस्सा घडला, तो म्हणजे पार्सल ऑफिस २ शोधत असताना एक इसमाला विचारले. त्याने रीतसर पार्सल ऑफिस दाखवले आणि लोडर कुठे असतात ते ही दाखवले. त्याला धन्यवाद म्हणताच तो आमच्या पाठी लागला आणि १०० रुपये प्रत्येक बाईक पाठी मागे. कशा बद्दल विचारले तर "आपको पार्सल ऑफिस दिखाया और लोडर से मिलवा दिया, उसका कमिशन". माझे आणि अमेय म्हात्रेचे तर टाळकेच सरकले हे ऐकून. चल भग...असे म्हणत त्याला पळवले आणि लागलो आपल्या कामाला. लोडर करून सर्व माहिती घेऊन परत बाईक कडे आलो. आता काळोख पडायला लागला होता आणि भूक पण लागली होती. बाईक कडे आलो आणि पाहतो तर सर्वांनी आपल्या कडे असलेले खाणे व ड्रायफूड  हाणायला सुरवात केली होती. मग आम्ही पण त्यात शामिल झालो. लोडरने सांगितल्या प्रमाणे बाईकच्या पेपरची जमवा-जमवी करून घेतली आणि त्या लोडरला सर्व पेपर व पैसे दिले. लगेच त्याने त्याची माणसे पाठवली आमच्या बरोबर बाईक प्याकिंग करायला. आमचे बरेचसे सामान बाईक वरच होते. पटा-पट सामान काढले आणि बाईक त्यांच्या ताब्यात दिल्या. या सर्व कामात ८.३० वाजून गेले होते. 

आता आम्ही थोडे रिलॅक्स झालो होतो. बाईक लोड करणे फारच महत्वाचे होते. या बाईक लोडिंगच्या कामामध्ये बराच वेळ निघून गेला आणि भूक पण लागली होती. आता आमचे पुढे लक्ष होते ते जेवण आणि मग चाणक्यपुरी मधल्या युथ हॉस्टेल वर जायचे. आमच्या पैकी दिल्लीची कोणालाही काहीच  माहिती नव्हती. मग मी शर्वरीला फोन लावून विचारून घेतले. चाणक्यपुरी युथ हॉस्टेल वर कसे जायचे आणि हॉस्टेल वर जायच्या आधी दिल्लीतले चम-चामित जेवण कुठे मिळेल हे हि विचारून घेतले. शर्वरीने दिल्ली मेट्रोने चाणक्यपुरीला जा आणि त्याच लाईने वर मध्ये राजीव चौकला उतरून कोनट प्लेस मध्ये जेवून घ्या असे सांगितले, पण जे काय करायचे आहे ते ११च्या आत. कारण ११ नंतर दिल्ली मेट्रो बंद होतात असे हि सांगितले. आता ९ च वाजले आहे आणि जेवण जेवून मग युथ हॉस्टेल वर जायचे सोडले तर दुसरे  आमच्या कडे काहीच काम नव्हते असे बोलून आम्ही १० जन शर्वरीने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागलो. दिल्ली रेल्वे स्टेशन वरून मेट्रो पकडली आणि राजीव चौक मेट्रो स्टेशन वर उतरलो. राजीव चौक वरून कोनट प्लेस हे फार लांब नसल्या मुळे पायीच गेलो. मस्त चालत मस्ती करत आणि दिल्ली शहराचे नीर-निराळे रूप पाहात आम्ही कोनट प्लेस मध्ये एक हॉटेल शोधून काढले. हॉटेल मध्ये बरीच गर्दी होती म्हणून  बाहेरच मस्ती करत आमचा नंबर यायची वाट पाहात होतो. नंबर येई पर्येंत सर्वांनी आप-आपली फोना-फोनी करून घेतली. नंबर आल्यावर हॉटेल मध्ये शिरलो आणि पटा-पट  जेवण ओर्डर करायला घेतले. पण आता मात्र सकाळच्या नाष्ट्या प्रमाणे अभी ने प्रत्येकाला स्वतंत्र ओर्डर करून नाही दिली. अभिने सर्वांच्या सहमतीने सामुहिक आणि सर्वांना पुरेल अशी व्यवस्थित ओर्डर केली. लगेचच जेवण आले आणि आम्ही पण लगेच हाणायला लागलो. सर्व फारच भुकेले होते. मस्त जेवून १० च्या दरम्यान आम्ही परत राजीव चौक मेट्रो स्टेशन वर होतो. आमचे आता पोट भरले होते म्हणून म्हणा ना किंवा मेट्रो स्टेशन वर गर्दी पण कमी होती म्हणून आम्ही जरा मस्तीच्या मूड मध्ये होतो. आम्ही सर्वच मेट्रो चा प्रवास पहिल्यांदा करत होतो म्हणून फार कुतूहल होते. कुतूहल दायक मेट्रोचा प्रवास करत आम्ही चाणक्यपुरी स्टेशन वर उतरलो आणि ऑटो रिक्षा पकडली युथ हॉस्टेल साठी. युथ हॉस्टेल वर रोहन आणि टीमने सर्वांचे गाडीतले सामान रूम वर ठेवून घेतले होते.



दिल्ली युथ हॉस्टेल खरो-खरच हॉस्टेल सारखे आहे, डबल बेडचे. प्रत्येकाला एक-एक बेड अलॉट करून रोहन ने ते आमचे बेड आधीच ताब्यात घेऊन ठेवले होते. आमच्या बरोबर हॉस्टेल मध्ये बाकी प्रवासी पण होते. आम्ही सर्व लगेच सामानाची आवरा-आवर करायला लागलो. आमच्या आवरा-आवरी मुळे बाकी सर्वाना फार त्रास होत होता. इतके दिवस आम्ही सर्व एकत्र होतो म्हणून आमच्या पैकी कोणा-कोणाचे तरी सामान इकडे-तिकडे कोणा ना कोणा कडे तरी होतेच. सामानाच्या आवरा-आवरीच्या आवाज मुळे बाकी सर्वांची चीर-चीर चालू झाली होती. पटा-पट आम्ही सामान आवरून घेतली. विमानात खाली टाकायच्या आणि वरती आपल्या बरोबर घायच्या बॅग्स वेगळ्या करून ठेवल्या. सामान आवरून सर्व झोपी गेले, फक्त रोहन, अभी आणि मी मात्र जागे होतो. वास्तविक बाईक ट्रीप संपली होती म्हणून ट्रीप संदर्भात कुठल्याही कामा साठी आम्ही जागे नव्हतो. रोहन आणि अभी, रोहनच्या विमानाचे तिकीटची वेळ बदलण्यासाठी लागले होते कॉल सेंटरच्या फोन वर आणि मी लागलो होतो शार्वारीशी फोन वर. मी तिला दिल्लीत आल्यावर नक्की भेटेन असे प्रॉमिस केले होते. किंबहुना शर्वरीच्या आईने मी घरी जाणार म्हणून स्वयंपाक पण केला होता. काही कर आणि तू ये असे तिचे मत होते. कितीही उशीर झाला तरी आमचे भेटायचे असे ठरले. मला दिल्लीतले काहीही माहित नाही म्हणून, शर्वरीने मेरू टॅक्सीचे नंबर देवून ठेवले होते. पण या बाईक लोड करण्याच्या कामात फारच उशीर झाला आणि मग सामानाची आवरा-आवर यात १२ वाजले. मी तिला आता भेटू शकत नाही म्हणून मी तिची समजूत घालायला लागलो. बराच वेळ तिची समजूत घालत आणि मग इकड-तिकडच्या गप्पा मारत २.३० वाजले ते कळलेच नाही. शेवटी शर्वरीचे समाधान करून तिचा निरोप घेतला आणि तसाच झोपली गेलो.