13.2.10

लेह बाईक ट्रीप - दुसरा दिवस (जम्मू ते श्रीनगर)

जसे रात्री मीटिंग मध्ये ठरले तसे सर्व सकाळी लवकर उठून तयार झाले. सामान घेऊन सर्व बाहेर आलो. मग आम्ही बाईक्स चालू करून ठेवल्या. अभिने गाडीवाल्याला फोन लावला. गाडी निघालिच होती. कालच्या नाटकावरून गाडी बद्दल थोड टेन्शनच होते.... वेळेत येते कि नाही येत. गाडीची वाट पाहत आम्ही अंगणातच उभे होतो. तेवढ्यात उमेशने फोटोसाठी सर्व बाईक्स एका बाजूला एक उभ्या करायला सांगितल्या. तेव्हा काढलेला हा फोटो.मग मुलींना पण फोटो काढायची लहर आली. त्यांची हि इच्छा पूर्ण केली. तो हा फोटो ............
तेवढ्यात गाडी आली. दिवस भर लागणार सामान आम्ही बाईक्स वर ठेवले आणि बाकी सर्व गाडीत टाकले. फक्त तीनच जण गाडीत बसणार होते म्हणून आम्ही मागे आणि वरती सामान टाकले. उमेशला सुरवात शूट करायची होती म्हणून आम्ही हॉटेलच्या गेट बाहेर थांबलो. अभी-मनाली , मी-ऐश्वर्या , अमेय म्हात्रे-कुलदीप , आदित्य-साधना , आशिष-उमेश असे बाईक वर आणि दिपाली , पूनम व शोबित असे गाडीत. ठरल्या प्रमाणे बरोबर सातच्या दरम्यान आम्ही निघालो.
आमचा आजचा प्रवास जम्मू ते श्रीनगर २८० किलो मीटरचा राष्ट्रीय महामार्ग १ ने होणार होता. जम्मू शहराची हद्द सोडली आणि उमेशला परत एक फुटेज हवे होते. फुटेज घेऊन आम्ही पुढे निघालो. पहिला दिवसच होता म्हणून कि काय कोण जाणे , आम्ही सर्व शिस्तीत ताळ-मेळाने हळू-हळू रस्ता कापत होतो. किंवा रस्त्याला थोडी रहदारी पण होती म्हणून म्हणाना.


पण बिना मजबूत सरावाचे सुद्धा आमच्या मध्ये चांगलाच ताळ-मेळ होता. उमेशला शूटिंग करायचे होते म्हणून आशिष उमेशच्या सांगण्यावरून बाईक चालवायचा. थोडस पुढे गेल्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तेव्हा ऐश्वर्याला कळाले कि माझ्या कॅमेरा लेन्सची कॅप रस्त्यात पडली आहे. पण आशिष आणि उमेशने ती पडताना पहिली होती. ते आमच्या मागेच होते म्हणून त्यांनी उचलून आणली. मजबूत दाबून नाश्ता केला. भूक पण तशीच लागली होती आणि आम्ही नाश्ता दाबून करायचा ठरवलेच होते. कारण पुढे कधी आणि कसे खायला मिळेल माहित नव्हते. आमच एक बाकी नक्की होत , कुठेही थांबलो कि मस्ती चालू. याप्रमाणे इकडे हि चालू झाली , बहुतेकदा ऐश्वर्या आणि पूनम टार्गेट असायचे पण कधी कधी हि लाट माझ्यावर पण यायची. मी घरी आईला फोन केला म्हणून मला हि चिडवायला लागले "बायकोला फोन केलास का रे ? मग काय म्हणाली ?" आणि वगैरे वगैरे. दीपालीने तर तेथे सासूबाईनी दिलेलं मिल्क शेक बनवल आणि त्या बरोबर बिस्कीट खायला सुरवात केली. तिथून निघताना उमेशने माझ्या पाया जवळचा एक फुटेज घेतला. मला त्या वेळेला हे सर्व थोडस विचित्र वाटल पण जेव्हा शो टेलि का स्ट झाला तेव्हा उमेशच्या करामतीचे महत्त्व कळल. अधून मधून फोटोग्राफी साठी आम्ही थांबतच होते. मधेच हा दिसलेला धबधबा , मंदिर , किल्ला आणि निसर्ग रम्य परिसर. तेव्हा काढले ली काही छायाचित्र............






पण आम्हाला अजून २५१ किलो मीटर जायचे होते. वास्तविक हे दिलेले किलो मीटर्स आणि अस्तित्वात असलेले किलो मीटर्स मध्ये जाम फरक होता. पण एक आधार म्हणून चालू शकतो आणि आम्ही ही तेच करत होतो. भरपूर रस्ता कापत आम्ही पटनी टॉपला पोहचलो. पटनी टॉप सुमारे ६५०० फुटावर आहे. त्यामुळे वातावरण आता बदलायला लागले होते आणि छान झाडांच्या थंड सावलीत आम्ही ब्रेक घेतला. २ दिवसात पहिल्यांदा गार वाटले. ब्रेक म्हटले कि आमचे खाणे आणि बागडणे आलेच. आम्ही तिथे चहा आणि कणसे घेतली. माझे पुढचे ३ दात खोटे आहेत आणि कॉलेजला असताना नाक्यावर एकदा कणीस खाताना माझी कॅप तुटली होती , म्हणून मी काही हिम्मत केली नाही. मला पूनम , दिपाली , साधना आणि ऐश्वर्या कणसाचे दाणे काढून देत होते आणि मी मात्र आरामात खात होतो. पटनी टॉपला येण्या आधी आशिष आणि उमेश बरेच पुढे निघाले होते , कारण त्याला शूट करायच होत. एका सुंदर वळणावर तो सेट होऊन बसला आणि एका पाठून एक असे आम्ही येत होतो , त्याने तो क्षण फारच छान टिपलाय व ते फुटेज शो मध्ये पण वापरले आहे. मग दीपालीच्या भाषेत सुसू वगैरे करून आम्ही पुढे निघालो. " अधून मधून आम्ही ब्रेक घेतच होतो. कारण बाईक्सचा वेग आणि गाडीचा वेग हे समीकरण काही जुळत नव्हते , ते कधी जुळणार हि नव्हते आणि जुळणार हि नाही. गाडी पुढे जाऊन आमच्या करता थांबायची. तेव्हा घेतलेला हा फोटो......... आणि बघतोय तर काय , समोरून एक बाई डोक्यावर घमेल घेऊन येत होती. मी तिचा फोटो काढायला सज्ज झालो , पण तेवढ्यात तिने मला फोटो काढताना बघितले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदले. हा तो फोटो.......... पण मला हा भाव बदलेला फोटो जास्त आवडला , कारण मला तिच्या चेहऱ्यावर आपला फोटो काढतोय म्हणून मिश्कील हास्य दिसत आहे. ते मिश्कील हास्य आपलाही कोणीतरी फोटो काढतोय म्हणून साफ भावना झळकत होत्या. तिचा कॅमेरा कडे झालेला आय कॉंटॅक्ट , छान मिश्कील हास्य , हे मला खूप आवडले. वास्तविक मला जसा फोटो काढायचा असतो , तसा नाही मिळाला तर मी बहुतेकदा वैतागतो. हा फोटो पाहून तसे काही झालेही. थोडीशी सुरवात झाली होती तिने भाव बदलला म्हणून , मग फोटो बघितल्यावर शांत झालो. असेच अधून मधून फोटोग्राफीसाठी किवा ब्रेक म्हणून थांबत थांबत आम्ही चाललो होतो. एकदा मी फोटोग्राफीसाठी थांबलो असताना , मी बाईक लावली आणि रस्त्याच्या त्या बाजूला फोटो काढण्यात गुंग झालो. इतक्यात ऐश्वर्याचा आवाज आला "पडली पडली" मला वाटल ऐश्वर्या पडली , बघतोतर काय बाईक पडली होती आणि ऐश्वर्या बाईक उचलण्याचा प्रयत्न करीत होती. मी जाऊन बाईक उचलली तर ऐश्वर्या म्हणते "उचलायचा प्रयत्न केला , पण फार जड आहे". मग आम्ही पुढे निघालो , आता डोक्यावर ऊन रण-रणायला लागले होते आणि पोटातही रण-रणत होते.
पुढे एक धाबा पाहून आम्ही थांबलो , खायला फक्त "राजमा आणि चावल" असे कळले. मग काय पर्याय नाही म्हणून हाणायला सुरवात केली. तो आणत होता आम्ही हापसत होतो. त्याने आम्हाला बाल्कनीत बसायला दिले. तिथून एन. एच. पी. सी. (नॅशनल हाइड्रो एलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) च धरण फार छान दिसत होते. पेट पूजा करून आम्ही पुढे निघालो. रोहन-शमिका विमानाने श्रीनगरला पोहचल्याच कळले.


पुढे आम्हाला हि पाटी दिसली.......




आणि हे ते निसर्ग रम्य काश्मिरच पहिले दर्शन......... आम्ही इकडे ब्रेक घेतला आणि नेहमी प्रमाणे मस्ती चालू झाली. मस्ती मस्ती मध्ये कुलदीपच कठड्यावर ठेवलेले हेल्मेट खाली पडले. मग २० - ३० फुट खाली जाऊन त्याने ते आणले.

" पुढे मधेच एक मोठा सुमारे २.५ ते ३ किलो मीटरचा बोगदा (जवाहर टनेल) लागला. बोगदा पाहून मी ग्लेयर्स काढले आणि चष्मा घातला. तेवढ्यात मला एका आर्मी जवानाने "गाडी रोकना नही , आगे चलो" म्हणून आवाज दिला. तिथून निसटलो आणि बराच वेळ गाडी चालवून झाली म्हणून चहाचा ब्रेक घेतला.
इथे एका ट्रक मधून इसम उतरला आणि चहा पीता-पीता विचारू लागला "किधर से हो आणि वगैरे वगैरे"..... मग विचारल "हिंदू हो ?", मी "हो आहे" उत्तर दिल्यावर म्हणाला "श्रीनगर में हिन्दू हॉटेल में ही खाना खाना , पता नहीं क्या खिला देंगे". मला थोडस विचित्र वाटले आणि दादर मधल्या पूर्वीच्या "हिंदू हॉटेल" ची आठवण आली. तेच हिंदू हॉटेल जाऊन , गुजराती आणि मारवाड्यान मुळे ते आता "प्यूर वेज रेस्टोरेंट" झाले.
पुढे २ तासभर बाईक चालवून श्रीनगर जवळ चललो होतो. छान रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे पाहून , थोडा ब्रेक घेऊन चहा आणि बिस्कीट खाल्ली . आता अंधार पडायला लागला होता , पण रस्ता पुढे सरळ होता असे कळाले . कारण सकाळी नाश्ता केल्या पासून आत्ता पर्यंत नुसता घाट आणि वळण. रोहन आणि अभीच अधून-मधून फोना-फोनी चालूच होती. शेवटचा पल्ला पार करून आम्ही ९च्या दरम्यान श्रीनगरला पोहचलो. रोहन-शमिका आमची वाटच पाहत होते. मला वाटले कि बिचारे दिवसभर वाट पाहून कंटाळ ले असतील. पण ते मस्त श्रीनगर फिरून आले होते. मग सर्वाना आप-आपल्या रूम दिल्या आणि कालच्या प्रमाणे मी , शोबित व दादा एकत्र. आशिषला संपूर्ण १५ दिवसात मी जे पाहिलं नाव तोंडात येईल त्या नावाने संबोधिले आहे . मग फ्रेश होऊन जेवणासाठी गार्डन मध्ये आलो.
सर्व फारच थकले म्हणून अभिने जेवतानाच मिटिंग घेतली आणि थोडा वेळ चर्चा केली. उद्याची पण चर्चा केली आणि सर्व तयारी करून आम्ही झोपी गेलो. 

10.2.10

लेह बाईक ट्रीप - पहिला दिवस (मुंबई ते जम्मू)

८ ऑगस्ट २००९, ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आला. मी आणि शोबित एकत्र विमानतळावर पोहोचलो, थोड्या वेळाने आशिष आणि दिपाली पण आले. आम्ही त्यांची बाहेरच वाट पाहत होतो, अमोल त्यांना सोडायला आला होता. अमोलचा निरोप घेऊन आम्ही आत शिरलो. आयुष्यात चौघेहि पहिल्यांदा विमानाने प्रवास करत होतो, त्याप्रमाणे आम्ही एक किस्सा हि केलाच. सर्व चेकिंग आणि बोर्डिंग पासच काम झाल्यावर आम्ही पुढे निघालो. तेथील एका कर्मचार्याने आम्हाला अडवले. "साहेब ट्रॉली ह्याच्या पुढे नाही" असे सांगितले, म्हणून आम्ही आप-आपल सामान पाठीवर लावायला लागलो. आम्ह्च्या मोठ्या सॅक्स पाहून तो म्हणाला, "ह्या कॅबीन बॅगा आहेत का?" आम्ही म्हणालो नाही "या, तर चेकीन बॅगा आहेत. आमच्या मोठ्या सॅक्स पाहून त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि आम्ही मात्र वेद लागल्या सारख हसत होतो. या आमच्या प्रसंग वरून मला पु.लं. च्या "प्रवास" या कथाकथनाची आठवण आली. मग पुन्हा कुठे त्या एकदाच्या बॅगा दिल्या आणि विमानात बसून जम्मूस निघालो. शेवटी एकदाचे जम्मुला पोहचलो.


 अभिजीत, मनाली, ऐश्वर्या, आदित्य, साधना अणि उमेश हे ७ ऑगस्ट २००९ ला मुंबई वरून ट्रेनने निघाले होते, त्यांची ट्रेन दुपारी ३ वाजेपर्यंत येणार होती. अमेय म्हात्रे, कुलदीप अणि पूनम हे पण ७ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून विमानाने जम्मुला आले होते पण ते वैष्णव देवी करू भेटणार होते. अमेय म्हात्रेशी फोन वर बोलन झाल आणि कळाल कि ते जम्मूला परत येत होते. अभिशी फोन वर बोलून हॉटेल आणि गाड़ी बद्दल सर्व माहिती घेतली. आम्ही ५ बाईकर्स व त्यांच्या पाठी ५ जण आणि उरलेल्या ५ जणानकरिता गाडी केली होती. या गाडीचा सपोर्ट वेहिकल म्हणून वापर करता येईल असे आमचे ठरले होते पण ती गाडी कधी सपोर्ट म्हणून लेह पर्येंत कामाला आलीच नाही. आता हे हि सांगायलाच पाहिजे कि लेह पर्येंत का, जम्मू-श्रीनगर, लेह आणि मनाली अशा ३ युनियन आहेत. जम्मूची गाडी लेह पर्यंतच सोडू शकते, तसेच लेह्ची मनाली पर्येंत. हा तिकडच्या युनियनचा विचित्र फंडा आहे आणि यातील एका फंडया नुसार जम्मू शहरातील गाडी विमानतळावर घेण्यास येऊ शकत नाही, असे मला त्या गाडीवाल्याने सांगितले. वरून "तुम टॅक्सी लेकर हॉटेल पर जाओ" असे सांगितले. मग काय पर्याय नाही म्हणून आम्ही टॅक्सी पकडून हॉटेल वर गेलो. त्यात प्रचंड भूक लागली होती. छान काश्मिरी जेवण जेऊन आम्ही रूम वर आराम करीत बसलो होतो तरीही हाताला हळदीचा वास येत होता. जेवण फारच छान होत. तेवढ्यात अमेय म्हात्रे, कुलदीप आणि पूनम आले, ते तर फारच थकले होते कारण एका दिवसात मुंबई ते जम्मू मग बाईक घेऊन वैष्णव देवी करून परत जम्मूला आले. माझ्या मताने वैष्णव देवी आता करायला नको हवी होती, कारण पुढे १५दिवस खडतर होते. थोडा आराम करून आम्ही रेल्वे स्टेशन वर गेलो, अमेय ने आदित्यची पल्सर आणि कुलदीपची एफझी घेतलीच होती. त्याच बाईक घेऊन ते वैष्णव देवीला गेले होते, माझी एवेंजर व रोहनची युनिकोन घेतली. पण पार्सल ऑफिसर फारच सज्जन आणि इमानदार होता, काही केल्या अभिची डिस्कवर देईना. तो म्हणाला "रिसीट लाओ और बाईक लेके जाओ" आणि हे वाक्य त्याने शेवट पर्येंत सोडलच नाही. त्याला आम्ही भरपूर पट्टी पडवायचा प्रयेत्न केला तरी पण भाडखाव काही केल्या तयारच होईना. त्याला आम्ही पैसे पण देण्याचा प्रयेत्न केला, तरी पण तेच "रिसीट लाओ और बाईक लेके जाओ". शेवटी हतबल होऊन आम्ही त्याच्या हाताखालच्या माणसाला पकडला. पण त्याला हि त्याने बजावले "पैसा लेके कम करेगा तो नौकरी से निकाल दूंगा". अभिजीतला कधी मी, कधी अमेय म्हात्रे, कधी आशिष फोन करून सारखे कुठे आहेस - कुठे आहेस? असे चालले होते. ट्रेन ४-५ किलो मिटर वर जम्मू स्टेशन पासून लांब होती पण सिग्नल नाही म्हणून जवळ जवळ तास भर तिकडेच थांबली होती. पार्सल ऑफिस चा पुढचा भाग बंद करून ऑफिसर एक एक दरवाजांना सील ठोकायला लागला. आता मात्र आमची फाटली, आम्ही पण सारखे रट लावून त्याच्या पाठीमागेच होतो "साहाबजी जरा रुकोना १५ -२० मिनिट" पण तो काही केल्या ऐकेना. फक्त त्याची रट बदली होती "अब कल आओ सुबह ९ बजे" आणि तो वळकटी लावुन निघाला. आम्ही त्याच्या पाठीच होतो, या सर्वात अभिला प्रत्येक मिनटाला कोणी ना कोणी आमच्या पैकी फोन करून सांगत होतो. शेवटी अभिने ट्रेन सोडली आणि रेल्वे लाइन वरून पळत सुटला. इकडे आम्ही पार्सल ऑफिसरला तेच सांगितल कि "अब वो दौड़ के आ रहा है, आप ५ मिनिट रुकोना", त्याने मागील दरवाज्याच्या बाहेर जाऊन एक सिगरेट शिलगावली आणि म्हणाला "देखो किधर है वो". आम्ही बोललो "रेल्वे लाइन से दौड़ के आ रहा है" आणि मग "जाओ बाईक लेके आओ अंदर से" असे म्हणाला हे ऐकून आमच्या जीवात जीव आला, पण त्याने मला बाईक दरवाज्याच्या बाहेर नाही काढून दिली. मग तो परत बोलला "किधर हे आप का दोस्त, के मै सील लगावू". वास्तविक तो आमची मस्ती पाहत होता त्याने बाईक द्यायचे ठरवले होतेच. शेवटी लावलेला अभिला फोन तो समोर दिसे पर्येंत चालूच होता. मला त्याच्या धापा ऐकू येत होत्या आणि तो एकदाचा दिसला. आम्ही सगळे ओरडलो "वो आ गया" त्या कडून रिसीट घेऊन ऑफिसरला देऊन गाडी बाहेर काढली आणि अभिला पाणी देऊन बसवले. 
गाडी २ दिवस पार्सल ऑफिस मध्ये उभी केली म्हणून २० रुपये भरायचे होते, पण सर्वान कडे ५० चीच नोट होती. तो बोलला "खुला पैसा दो" मी म्हणालो "रहने दो साहाबजी", तो नाही नाही म्हणत होता पण मी त्याच्या खिशात नोट कोंबली आणि म्हणालो "रहने दो सिगरेट केलीये" त्यावर हि तो बोला "काय समजा हम को?" मी फक्त हसलो आणि धन्यवाद बोलून कल्टी मारली. सर्व बाइक्स बाहेर आल्या. बघितल तर प्रत्येकाच्या बाईकला कुठे ना कुठे तरी लागल होत. तेवढ्यात ट्रेन आली आणि सर्व जम्मू तावी स्टेशनच्या बाहेर भेटलो.
आता दुसरी अडचण, गाडी येणार नव्हती. मग आम्ही लोड फेरी करून सामान आणि माणसे हॉटेल वर पोहचवली. थोडा आराम करून ५ जण पेट्रोल भरायला आणि बाईकस चेक करायला घेऊन गेलो, आदित्यच्या बाईकच्या चैनचा आवाज येत होता म्हणून चैन-स्पोकेट दोन्ही बदलले. बाकीच्या सर्व बाईक्सची छोटी मोठी डाग डुगी करून आम्ही हॉटेल वर परत आलो. फार भूख लागली होती आणि थकलो हि होतो, फ्रेश होऊन जेवायला गेलो.
जेवता जेवता थोडीसी मस्ती चालली होती. वेज, नॉन-वेज भाग झाला. मी नॉन वेज घेणाऱ्यांमध्ये होतो पण ते आणायला फार उशीर लावला. मला प्रचंड भूख लागली होती म्हणून मी पूनम बरोबर सुरवात केली आणि मग नॉन वेज पण खाल्लं. जेवण झाल्यावर अभिने बाहेरच मीटिंग घेतली. उद्याची सर्व माहिती अभिने दिली आणि सर्व तयारी करून आम्ही झोपी गेलो.

8.2.10

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - शेवटची मोर्चे बांधणी

आता शेवटचे काही आठवडेच राहिले होते. मला माझ्या बाईकचे पहिले १००० किलो मीटर पूर्ण  करायचे  होते म्हणून आणि बाईक ट्रीपचा सराव म्हणून मी सारखा पाठी लागलो होतो. पण ते काही शक्य झाले नाही. मी, अभिजीत आणि रोहन तयार होतो सराव ट्रीपसाठी, पण नेहमी प्रमाणे सर्वांना जमेनास झाल. शेवटी मी वाडयाला जायचं ठरवल कारण मला बाईकच रनिंग पूर्ण करायचं होत. पण मला अभिजीत बोलला कि आपण ठाण्याला गडकरी जवळ भेटूया, कारण अभिजीतला आमच्याशी ट्रीप संदर्भात भरपूर गप्पा मारायच्या होत्या. येत्या रविवार पाहून अभिजीत-मानली, रोहन-शमिका, शोबित, मी आणि शेवटी उशिरा ऐश्वर्या गडकरीला भेटलो. गरम-गरम भजी, वडा-उसळ आणि चहा बरोबर आम्ही भरपूर चर्चा केल्या. वास्तविक आम्ही सर्व भरपूर मस्ती करत होतो, अभिजीत-मानली, रोहन-शमिका आणि ऐश्वर्या माझी टेर खेचत होते कारण मधल्या कालावधीत माझ  लग्न  ठरल होत. या सर्वात एक किस्सा सांगायचा राहिला, माझा लग्न १२ डिसेंबरला ठरल आणि दुसर्याच दिवशी मी अभिजीतला संध्याकाळी नाक्यावरून फोन केला, कि मला काही या ट्रीपला येता येणार नाही. कारण ऑगस्ट मध्ये लेह ट्रीपसाठी १५ दिवस सुट्टी आणि डिसेंबर मध्ये पुन्हा १५ दिवस मला ऑफिस मधून सुट्टी मिळणार नाही. पाहिलतर अभिजीत माझ्या लग्नाच ऐकून तीन ताड उडाला, मग तू ऑफिस मध्ये बोलून आणि वगैरे वगैरे पर्याय चालू झाले कारण अभिजीतला विमानाच तिकीट आणि वगैरे बरीच कामे करावी लागणार होती. त्याने सर्वांसाठी बरेचदा हे केले होत. पण मी त्याला सांगितल कि २ दिवस थांब. थोड्या वेळानी मला ऐश्वर्याचा फोन आला, ती तर वेडीच झाली होती आणि मग ती नेहमी प्रमाणे जशी लाडात येऊन, मला समजावत हट्ट करू लागली.शेवटी तिनेच मला एक छानसा पर्याय दिला, कि मी लग्नाबद्दल ऑफिस मध्ये सांगू नको आणि ट्रीप नंतर  सांग कि माझ लग्न आता ठरला, मग त्यांना तुला सुट्टी द्यावीच लागेल रे. "एच. आर." मध्ये काम करत असल्याचा फायदा आणि तिला हे सर्व फार छान जमत. शेवटी हा पर्याय फार छान वाटला आणि मी लेह ट्रीपसाठी सज्ज झालो. अभिजीतला सांगितल कि काही करु नकोस मी येत आहे.

गडकरी वरून मी घोडबंदर मार्गे घरी गेलो आणि मग त्या आठवड्यात मुदामून दादरला जा, इकडे जा चालूच होत. अशा  प्रकारे मी बाईकची पहिली सर्विसिंग करून सिद्धेश बरोबर वाड्याला पण जाऊन आलो, कारण बाईक ट्रेन मध्ये लोड करायच्या आत मला दूसरी पण सर्विसिंग करायची होती. त्याच आठवड्यात मी अभिजीत राव कडून कॅमेराच लागणार समान, सिद्धेश कडून लागणार समान घेऊन आलो. थोड्याफार गोष्टी मला विकत आणायच्या होत्या ते मी सर्वच याच आठवड्यात केल. दरम्यान अभिजीतने मला बांद्रा टर्मिनला जाऊन बाईक्स लोड करण्याबद्दल सर्व माहिती काढण्यास सांगितली होती. बरेच दिवस मला बांद्रा टर्मिनला जायला जमत नव्हत. एके दिवशी मी ऑफिस वरून बांद्रा टर्मिनला जाऊन बाईक्स लोड करण्याबद्दल सर्व माहिती काढून आणली. या कालावधीत आम्हा सर्वांच जवळ जवळ दररोज फोन किंवा ई-मेल वरून बोलन  होत होते. बांद्रा टर्मिनलच्या लोडर कडून मिळालेल्या माहिती नुसार आम्हाला बाईक्स २ ऑगस्टला द्यायच्या होत्या. आता शेवटचा आठवडा राहिला होता बाईक लोड करायला. अजून पर्येंत आम्ही सर्व पूर्ण टीम भेटलो नव्हतो आणि आता सर्वाना बरोबर सराव शक्य होईल असे काही वाटत नव्हते. अभिजीतने तर आशाच सोडली होती, तो तर फार निराश झाला होता सर्वांच्या पाठी लागून लागून. पण अभिजीतला ट्रीपला जाण्यापूर्वी सर्वांशी बरच काही बोलायच होत, सर्वांची तिकीट आणि डॉक्युमेंट्स द्यायचे होते. माझे अभिजीतशी या दरम्यान दिवसातून एकदा तरी बोलन होत होते. मग येत्या रविवारी (ट्रीपला जाण्याआधीचा एक रविवार) आम्ही सर्वांनी भेटायच ठरवल, माझ्या मते सेन्ट्रल व वेस्टन दोघांसाठी  म्हणून मी दादर सुचवल आणि अभिजीत ठाणे म्हणत होता. पण दोन्ही ठिकाणी बसून बोलण्यसारखी जागा नाही मिळाली म्हणून, ऐश्वर्याच्या सुचवण्यावरून आम्ही बदलापूरला त्यांच्या शाळेत भेटायच ठरल (तिला हि तेच हव होत कारण सुट्टीच्या दिवशी फार लांब यायची इच्छा नव्हती). त्याच दिवशी आम्हाला बाईक्स पण बांद्रा टर्मिनल येथे लोडर कडे सोडायच्या होत्या म्हणून सर्व बाईक्स तयार करण्यास  सांगितल्या आणि रविवारी बदलापूरला भेटण्याचे ठरले.

माझ्या बाईकचे, दुसऱ्या सर्विसिंगचे किलो मीटर पूर्ण झालेही नव्हते. पण काय करणार इंगीन फ्री होण्यासाठी आणि ट्रीपसाठी व्यवस्थित बाईक हवी म्हणून, मी विनंती करून बाईक सर्विसिंग करून घेतली. रविवारी आम्ही पहिले सर्वांनी ठाण्याला भेटून, बाईक्स स्टेशन जवळ उभ्या करून मग ट्रेनने बदलापूरला जायचे ठरले. कारण अजूनही काही लोक अनोळखी होते एकमेकांसाठी म्हणून ट्रेन मध्ये ओळख आणि चर्चा व्हावी हा अभिजीतचे उद्देश होता. मी, अमेय म्हात्रे, कुलदीप आणि शोबित सोडल्यास सर्व सेन्ट्रलचे होते. शोबितने माझ्या बरोबर येण्याच काही धाडस दाखवल नाही, कारण मी त्याला एकदा बरोबर यायच म्हणून स्टेशन वर ३ तास उभा करून घरी झोपून राहिलो होतो. यावेळेला त्याने मात्र काही हिंमत केली नाही आणि ट्रेनने ठाण्यला गेला. अमेय म्हात्रे आणि कुलदीपची मला घोडबंदरच्या टोल नाक्याजवळ भेटून पुढे आम्ही एकत्र ठाण्याला पोहचलो. स्टेशनला बाईक्स लावून आम्ही ट्रेनने बदलापूरला गेलो. ट्रेन मध्ये बऱ्याच गप्पा, चर्चा आणि ओळख झाली. मी साधना आणि दादाला "आशिष" (रोहनचा मोठा भाऊ) यांना पहिल्यांदाच भेटलो. शाळेत पोहचल्यावर कळाले कि अजून ऐश्वर्याच (नेहमी प्रमाणे आळशी) आली नाही आहे. पण आमची फार छान सोय केली होती. बऱ्याच वेळाने ऐश्वर्या आली मग अभिजीतने सर्वांना लागणारे डॉक्युमेंट्स दिले आणि भरपूर चर्चा केल्या. ऐश्वर्याच्या ओळखीचे एक गृहस्त जे लेहला बाईकने जाऊन आले होते  त्यांना हि तिने बोलावले होते. त्यांनी त्यांचे काही अनुभव आणि लेह्ची छायाचित्रे दाखविली. त्यांनी आम्हाला भरपूर टिप्स पण दिल्या,  उदाहरणार्थ ड्रायफ्रुट्स घेऊन जाणे वगैरे वगैरे. ऐश्वर्याच्या आईने आमच्या करिता छान जेवणाची सोय केली होती, मस्त पंगतीत बसून जेवण केले. जेवता जेवता आम्ही  ऐश्वर्याला मजबूत पिडत होते आणि मस्ती चालली होती. सर्व जण ट्रेनने पुन्हा ठाण्याला गेले, मला आणि अमेय म्हात्रेला मात्र आदित्य (ऐश्वर्याचा भाऊ) पुण्याला असल्यामुळे त्याची बाईक घेऊन जायच होत. पूनम, मी, अमेय म्हात्रे आणि ऐश्वर्या तिच्या गाडीने अंबरनाथला गेलो. गाडी मध्ये आमची फार मस्ती चालली  होती, पूनमने एकाला "शिकरण पोळी" ची उपमा दिलेली मला अजूनही आठवते. पूनमला सोडायला घराकडे गेलो तर तिने चहाचा फार आग्रह केला, घरी गेल्यावर तिच्या बाबांनी आमची वरातच काढली. पूनम, अमेय म्हात्रे आणि कुलदीप ट्रीपच्या एक दिवस आधी जम्मूला जाऊन वैष्णव देवीला जाणार होते, हे तिने बाबांना घरी काही सविस्तर सांगितले नव्हते आणि आम्ही दोघे त्यांच्या तावडी मस्त सापडलो होतो. अभिजीतने सर्वांना सर्वाची सविस्तर माहिती आणि डॉक्युमेंट्स दिले होते म्हणून पूनमच्या बाबांना आम्ही सांभाळू   शकलो, ते तर अक्षरश: कागद आणि पेन घेऊनच आमच्या पुढे बसले होते. मग ऐश्वर्याच्या घरून बाईक आणि बाईकचे कागदपत्र घेऊन मी आणि अमेय म्हात्रे ठाण्याला निघालो.

या सर्वामध्ये बराच वेळ गेला, सर्व जण  आमची वाट पाहत होते. आप-आपल्या बाईक घेऊन आम्ही सर्व  ठाण्याहून बांद्रा टर्मिनला जाण्यास निघालो. मला रस्ता माहित होता म्हणून अभिजीतने मला पुढे राहण्यास सांगितले, आरशातून मागे पाहिल्यावर एका मागून एक ओळीने सर्व बाईक दिसत होत्या, मी उजवी किंवा  डावीकडचा सिग्नल दिला कि आरशात सर्व चमकणारे सिग्नल पाहून लेहचा आभास होत होता. वास्तविक  आमचा मजबूत सराव नसून सुद्धा हा ताळमेळ पाहून फार बर वाटल. फार छान ताळमेळाने आम्ही बांद्रा टर्मिनला पोहचलो. अभिने ठाण्याहून निघताना लोडरला फोन केला होता. पोहचताच लोडरने सर्व बाईक्सचे कागद पत्र आणि पैसे घेतले व तो पार्सल ऑफिस मध्ये गेला. त्याच्या पंटरने फटा-फट आरशे काढले आणि बाईक्स पार्सल ऑफिस जवळ ने हून आम्हाला पेट्रोल काढण्यास सांगितले. पेट्रोल काढून झाल्यावर त्यांनी  बाईक्स पुठ्ठे आणि गोणपाटाने बांधायला सुरवात केली. थोड्या वेळानी लोडर सर्व रिसीट्स घेऊन आला आणि प्रत्येक बाईकचे अजून ८०० रुपये दिले तर सर्व बाईक्स वेळेत जम्मूला पोहचतील. नाही तर रेल्वे पोलीस आणि पार्सल ऑफिसर "बाईक मे पेट्रोल अभी भी है" आणि "ये बराबर नही है वो बराबर नही" करून बाईक्स बाजूला काढतील आणि ट्रेन मध्ये बाईक्स लोड करून देणार नाहीत असे सांगू लागला. आम्हाला २ बाईक्स ७ ऑगस्टला आणि उरलेल्या ३ बाईक्स ८ ऑगस्टला कुठल्याहि परीस्थीतीत जम्मूला पाहिजे होत्या,  इतक्यात एक रेल्वे पोलीसवाला तेथे आला आणि "बाईक्स मे का सारा पेट्रोल निकालो और बाईक्स इधर नही पॅकिंग करना" वगैरे वगैरे बोलू लागला. आणि लोडर पण "देखा देखा कैसे तकलीफ देते हे ये लोग" असे बोलू लागला. रेल्वे पोलीस, पार्सल ऑफिस आणि लोडर यांची मिली भगत असून पैसे खाण्याचे हे काम आहे हे आम्हाला कळले. पैसे देण्यापलीकडे आम्हाला काही गत्यंतर नव्हते आणि पैसे देताच लोडरने काढलेले पेट्रोल "डाल दो अभी बाईक मे, अब आपका बाईक कोई भी नही रोकेगा" असे सांगितले. त्या रेल्वे पोलीसवाल्याच्या पुढ्यातच आम्ही एक-एक लिटर पेट्रोल बाईक्स मध्ये परत टाकले, वरून तो पोलीसवाला म्हणाला "करो अभी पॅकिंग करो इधर". अशा प्रकारे आम्ही बाईक्स लोडर कडे देऊन, बांद्रा टर्मिनलच्या कॅन्टीन मध्येच खाउन आप-आपल्या घरी गेलो.

नंतर २ दिवसातच आमच्या ५ हि बाईक्स ट्रेन मध्ये लोड केल्या म्हणून लोडरने सांगितले. आता शेवटचे काही दिवसच राहिले होते, बाईक्स तर गेल्या मुख्य जबाबदारी संपली होती. सर्व जण आता आप-आपले समान बांधणीसाठी सज्ज झाले होतो. मी, अभि आणि सर्व फोन किंवा मेल द्वारे एक-मेकांच्या संपर्कात होतोच. शेवटची सर्व तयारी करता-करता ट्रीप आधीचा दिवस कसा आला हे मला कळलच नाही. ऑफिस मधून घरी आल्यावर मी सर्व समान बांधून सज्ज झालो आणि आराम करीत बसलो असता लेहच्या उत्साहात मी गुंगून गेलो, माझ ५-६ वर्षान पूर्वीच स्वप्न पूर्ण होणार होत. मग मी दिपाली आणि शोबितला फोन करून सर्व चर्चा केल्या. त्यापूर्वी अभिजीतने मला फोन करून सांगितल होते कि वेळेत ऊठ नाही तर फ्लाईट जाईल. दीपालीने पण मला हेच सांगितल होत, वेळेत ऊठ रे बाबा. कारण या सर्वांना माझ्या झोपेचा किस्सा माहित होता. मी लेह ट्रीपच्या आनंदात  झोपी  गेलो.