17.4.10

लेह बाईक ट्रीप - सातवा दिवस (लेह ते पेंगॉँग लेक आणि परत लेह)

१४ ऑगस्ट २००९, आज आम्हाला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उच्च रस्ता करून पुढे पेंगॉँग लेक कडे जायचे होते. नबी आणि त्याच्या बायकोने आम्हाला कालच सांगितले होते कि, तुम्हाला पेंगॉँग लेक पाहायची असेल तर लवकर निघावे लागेल. ११ च्या आत तुम्हाला "शौतन नाला" पार करावा लागेल. म्हणून आम्ही ४-४.३० ला उठायचे आणि ५ ला सर्वानी हॉटेल सोडायचे असे ठरले. ठरल्या प्रमाणे आम्ही उठून सर्व नाष्ट्याला आलो. चहा , कॉफी , ब्रेंड , बटरचा सकाळी ५ वाजता नाष्टा केला आणि सर्व ५.४५ च्या दरम्यान हॉटेल रेनबो वरून निघालो. पुन्हा मनालीच्या रस्ता पकडला आणि शे, थिकसे कडून आम्ही पुढे निघून "कारू"ला पोहोचलो. कारू चेक पोस्ट वर आम्हा बाईक स्वारांना कोणीही अडवले नाही म्हणून आम्ही इकडन निसटलो. मधेच आर्मीचे जवान पी.टी. साठी चाललेले आम्हाला दिसले. सर्व जवानांना सलाम करत आम्ही पुढे निघालो. अमेय म्हात्रे-पूनम सर्वात पुढे , मग रोहन-शमिका आणि मी-दिपाली. मागाहून थोड्या अंतराने अभी-मानली आणि आदित्य-एश्वर्या असे चालले होतो. तेवढ्यात दीपालीला अभिने फोन केला. परमिट साठी आम्ह्ची गाडी थांबवली होती. माझ्या पुढे रोहन होता. माझी बाईक वरती संकेतिक हॉर्न वाजवण्याची पद्धत आहे , जी मी पहिल्या पासून वापरत होतो. मला पुढे असलेल्या बाईकला थांबवायचे असेल तर मी "पिप... पिप.... पिपि पीप....." अश्या प्रकारे हॉर्न देतो. हि पद्धत मी आणि अभिजीत रावने आमच्या सागरी किल्ले बाईक ट्रीपच्या वेळेला ताळ-मेळा साठी वापरायला सुरवात केली होती. इकडे पण अशाच पद्धतीने मी जोरात रोहनला हॉर्न द्याला लागलो. रोहनला समझले कि मी काय तरी सांगतोय आणि थांबला , पण अमेय म्हात्रे मात्र काही थांबला नाही सुसाट पुढे निघून गेला. परमिट अभी कडे होते म्हणून त्याने फक्त आमच्या बाईकचे नंबर घेतले आणि तो परत मागे गाडी कडे गेला. तो पर्यंत आम्ही तिकडेच थांबलो होतो. तेवढ्यात मला वाघ डरकाळ्या फोडतोय असे जाणवायला लागले. पण वाघ मारायला आडोसा कुठेच नव्हता. आमची हि सुद्धा काही बाबतीत संकेतिक भाषा आहे. समजून घ्या. मग मी जवळच एक टेकाड चढून वाघ मारला. च्यामारी एवढस टेकाड चढलो तर धापा लागल्या होत्या , कशाला वाघ मारायला आलो असे वाटायला लागले होते. मी वाघ मारून खाली येई पर्येंत अमेय म्हात्रे जो पुढे गेला होता तो ५-६ किलोमीटर वरून परत मागे आला होता. मग आम्ही सर्व बाकीचांची वाट पाहत बसलो. तेव्हा मला समोरच एक गुम्पा दिसली. तेव्हा हा काढलेला फोटो. थोड्या वेळाने मागाहून सर्व आले. या सर्वात ७ वाजत आले होते. आता पुढे कसे काय हे सर्व विचार मनात ठेऊन आम्ही सर्व पुढे निघालो. रस्ता जरा चांगला होता म्हणून आम्ही जरा वेग पकडला होता. लगेचच आम्ही "शक्ती" येथे येऊन पोहोचलो , अमेय म्हात्रे इकडनच कुठून तर परत आला होता. शक्ती ची उंची सुमारे १३५०० फुट आहे. न थांबता आम्ही पुढे निघालो. आम्हाला जराही वेळ दवडायचा नव्हता. आता आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा "चांग-ला"चा रस्ता चढायला लागलो होतो."ला" म्हणजे लढाकी भाषेत पास. रस्ता जरा चांगलाच होता. सरळ चढण मग यु टर्न , २-३ किलोमीटर परत सरळ चढण मग परत यु टर्न. मग परत चढण आणि परत यु टर्न. चढण-यु टर्न , चढण-यु टर्न असे करत आम्ही चांग-ला चढत होतो. अधून-मधून मी फोटो काढत होतो. मधेच आम्हाला रस्त्यात वाहता नाला पण लागला. दीपालीला खाली उतरवून मी बाईक सिंगल सीटच काढली. सर्वच अडचणींवर मात करत आम्ही पुढे चाललो होतो. एक शेवटच चढण घेतले आणि दोन डोंगराच्या मध्ये चांग-ला आर्मी चेक पोस्ट ला पोहोचलो. चांग-ला ची उंची सुमारे १७५०० फुट आहे. फोटू-ला नंतर आम्ही गाठलेली सर्वोतच जास्त उंची होती. आर्मीची २ सिख लाइट इंफंट्रीचे ची पोस्टिंग आहे तिकडे. १७५०० फुटावर पर्यटकांना काही त्रास होऊ नये म्हणून आर्मीने बऱ्याच सोई करून ठेवल्या आहेत. त्यापैकी मला लक्षात आहे त्या या "मेडिकल एड , गरम चहा , पाणि , शौचालय " आणि सर्वात मुख्य म्हणजे अशा सर्व परिसरात रस्ता. खरोखर आर्मीचे आपल्यावर फार उपकार आहेत. आर्मीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. अति बर्फ पडून सुद्धा BRO रस्ता दुरुस्त करत असत आणि हे सुद्धा पहाना १७५०० फुटाच्या थंडीत आपल्याला थंडी लागू नये म्हणून गरम-गरम चहा. पोस्टच्या आत मध्ये पेंगॉँग लेकच्या फोटो छापलेले टी-शर्ट , मग , ग्लासेस अश्या बऱ्याच गोष्टी विकायला होत्या. मी पण टी-शर्ट आणि मग घेतला. पण हे सर्व पेंगॉँग लेक पर्येंत कशाला बरोबर घायचे आम्ही परत याच मार्गाने येणार होतो. मी त्या जवानाला विचारले "ये अगर में आपके पास इधर हि रख दुंगा और फिर आते समय में लेकर जाऊ तो चलेगा क्या". त्याने " चलेगा" असे उत्तर दिले. मग काय पाहिजे तसे झाले. मी चहा घेऊन बाहेर आलो. दादा(आशिष) आणि उमेश बाहेरच फोटोग्राफी करत होते. त्याच्या बरोबर मी पण फोटोग्राफी करायला लागलो. तेवढ्यात आम्हाला पाहून एक मराठी काका लाडू आणि करंज्यांचा डबा घेऊन आमच्या कढे आले. लाडू आणि करंज्या खायला देत गप्पा मारयला लागले. मस्त २ करंज्या मी हाणल्या होत्या. वास्तविक त्यांनी आम्हाला एक-एकच दिली होती , पण गप्पा मारता-मारता पहिली संपली म्हणून मी काकान कडून "काका अजून एक मिळेल का" असे निर्लज्जा सारखी दुसरी ही मागून घेतली होती. माझ पहिल्या पासून हे धोरण आहे " निर्लज्ज साधा सुखम्". मग उमेश आम्हाला १७५०० फुटावर लाडू आणि करंज्या खायला मिळाले त्याचा फुटेज घ्याला लागला. पण तो अनुभव मला फार वेगळा होता. मुंबई पासून कईक हजार किलोमीटर दूर आणि ते हि तिसऱ्या क्रमांकाचा उच्च रस्ता (१७५०० फुटावर) आम्हाला प्रेमाने लाडू व करंज्या खायला घालून अपरिचित काकांनी तोंड गोड केले होते. मग आहे अनुभव वेगळा असणारच कि नाही.

परत याच मार्गाने येणार होतो म्हणून सर्वाना "फिर मिलेंगे" करत आम्ही निघालो. आता आमचे लक्ष होते चांग-ला दुसऱ्या बाजूला उतरून "पेंगॉँग-त्सो". " त्सो" म्हणजे लढाकी भाषेत सरोवर. आता ९.३० वाजले होते. चंग-ला वरून सुटलो आणि चंग-लाची दुसरी बाजू उतरायला लागलो. जास्त वेळ न लावता आम्ही " त्सोलटोक" पोस्टला पोहचलो. काही केल्या आम्हाला ११ च्या आत शैतान नाला पार करायचा होता. सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि पुढे ४० किलोमीटर वर असलेली " तांगत्से " च्या दिशेने निघालो. "त्से" म्हणजे लढाकी भाषेत गाव. अधून-मधून काही वळण सोडली तर संपूर्ण रस्ता मस्तच होता. ६०-७० च्या वेगाने आम्ही बाईकस पळवत होतो.
काही वळण तर फारच छान होती. या परिसरात मला फोटोग्राफी करायला फार मजा आली. निसर्गच नीर-निराळ रूप पाहून माझे मन हरपून गेले होते. पुढे आणखीन बरीच निसर्गाची किमया पाहायला मिळणार या आशेवर मी बाईक चालवत होतो. १०.४५ च्या सुमारे आम्ही " तांगत्से " च्या पोस्टला पोहचलो . इकडे एक दुसर्या बाईक ग्रुपचा मुलगा उभा होता. तो त्याच्या सर्व बाईकसची नोंदणी आर्मीच्या जवानाला करून देत होता. आम्हाला पाहून आर्मीच्या जवानाने त्याला विचारले "ये आपके साथ हे". आम्हीच बोललो "नही". आमच्या मागाहून त्यांची सर्व मंडळी आली. मग आम्ही पण आपली नोंदणी केली आणि सर्व " पेंगॉँग लेक " च्या दिशेने निघालो. आता तर रस्ता सरळच होता. ४-५ किलोमीटर मधेच आम्हाला "मेजर शैतानसिंह" फायरिंग रेंज आणि त्यांचे बटालीयन लागले. या सर्व परिसराला " चुशूल घाटी " म्हणतात. तेवढ्यात मागाहून सुसाट काही बाईकस आम्हाला ऑवर टेक करून गेल्या. MH-12 च्या नंबर प्लेट पाहून पुण्याचे असल्याचे कळाले. नंतर हे हि कळाले कि, हि तीच लोक आहे जी आम्हाला काल पेट्रोल पंप वर भेटली होती. त्यातली काही लोक रोहन, कुलदीप आणि अमेय म्हात्रेच्या ओळखीची होती. मध्ये जास्त फोटो न काढता आम्ही पुढे सरकत होतो.
११.३० च्या दरम्यान आम्ही "शैतान नाला" च्या जवळ पोहोचलो. सर्व मोठ्या गाड्या एका बाजूला लागल्या होत्या. सकाळ पासून "शैतान नाला" जे काय पुराण चालले आहे, ते प्रकरण तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे. तेवढ्यातच भयानक ते प्रकरण आहे. चुशूल ग्लेशिअर वितळून जे पाणी खाली वाहत येते आणि तो प्रवाह निर्माण होतो त्याला "शैतान नाला" असे तिकडचे लोक म्हणतात. आता याला "शैतान नाला" का म्हणतात हे हि तुम्हाला सांगायला पाहिजे. "मेजर शैतानसिंह" यांनी १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी या परिसरात शैतानी पराक्रम करत देशासाठी शहीद झाले आणि सरकारने यांना परमवीर चक्राने सन्मानित केले. म्हणूनच या नाल्याला "शैतान नाला" असे म्हणतात आणि दुसरे कारण असे कि, जसे-जसे ऊन वर यायला लागते तस-तसे ग्लेशिअरचे पाणी वितळून नाल्याचा प्रवाह पण वाढायला लागतो. खरोखरच शैताना सारखच ते वाटत होत आणि म्हणूनच नाबिच्या बायकोने आम्हाला सांगितले "११ बजे के पहिले शैतान नाला पार करना". जे काय आम्ही केले नाही, आता ११.३० होऊन गेले होते. रोहन, अभी आणि मी आपल्या परीने बाईक नाल्यात घालण्याचा प्रयेत्न केला. पण प्रवाह फार भयानक होता, नाला खरोखरच शैतान होता. शेवटी नाईलाजास्तव आम्ही बाईकस मागे लावल्या आणि पुढची वाट काय याचा विचार करत परत नाल्या जवळ आलो. पुण्याचे बाईकरस कसे-बसे बाईक पलीकडे टाकत होते. वास्तविक आम्ही पण बाईक्स पलीकडे कसे-बसे नेहु शकलो असतो. पण परत येताना काय अजून २-३ फुट पाणी वाढले असते, म्हणून आम्ही काही फार प्रयेत्न केले नाही. पुण्याची मंडळी लेक जवळ रात्र काढणार होती, पण आम्हाला मात्र परत लेहला जायचे होते. तेवढ्यात आर्मीच्या ट्रकने प्रत्येकी १०० रुपये घेऊन आम्हाला पलीकडे नेहतो असे सांगितले. चला आमचा प्रश्न मिटला. पटा-पट आम्ही सर्व ट्रक मध्ये चढलो. हा डांबराचा ट्रक होता, त्यामुळे खाली बुड टेकून बसूहि शकत नाही आणि दगडातून ट्रक उडणार म्हणून उभेही राहू शकत नही अशी अवस्था झाली होती. मग काय बुड न टेकवता ट्रकची कडा पकडून उकिडवे बसलो. ट्रक चालू झाला आणि आम्ही "गणपती बाप्पा मोरया"च्या जय-जयकार सुरु केला.

कसला तो ट्रकचा प्रवास होता, ४ किलोमिटरच पण आयुष्यात कधीच न विसरणारा. ट्रक मधून पेंगॉँग लेकच्या काठावर उतरलो आणि मनात २ गोष्टी चालू होत्या. पाहिलं म्हणजे काय ते सरोवराच अप्रतिम सौंदर्य आणि दुसरा ट्रकचा अविस्मरणीय प्रवास. ट्रक आमच्या साठी १५-२० मीनटच थांबणार होता. मी तर नुसते पटा-पट फोटो काढत सुटलो होतो. पाण्यात एकदा पाय टाकण्याचा प्रयेंत केला पण ५ सेकंदा पेक्षा जास्त उभाच राहू शकलो नाही . बुडाला पाय लावून पळत बाहेर आलो. कसले थंड पाणी होते ते. सर्वांचीच कमी-अधिक फरकाने माझ्या सारखीच अवस्था होत होती. अप्रतिम सौंदर्य मी फार काय बोलूच शकत नाही. पहा काही फोटो.....
" पेंगॉँग लेक " हा १५००० फुटचा खऱ्या पाण्याचा सरोवर आहे. काय निसर्गाची अदभूत किमया आहे पहाना. हा लेक ६० टक्के चीन मध्ये आहे आणि ४० टक्के भारता कडे आहे. हिवाळ्यात हा लेक संपूर्ण पणे गोठून जातो. सर्वांनी पाण्यात उभे राहून फोटो काढून घेतले, पण माझी काय बाबा हिंमत होत नव्हती. शेवटी दीपालीच्या आग्रहा वरून मी ही पाण्यात उभा राहून फोटो काढून घेतला. बाकी सर्व मस्त पाण्यात खेळत होते आणि आप-आपली फोटोग्राफी करत होते. पण सर्वात मानले पाहिजे ते शोबित आणि दीपालीला, सुरवाती पासून पाण्यातच होते. मी जर इतका वेळ त्या थंड पाण्यात उभा राहिलो असतो तर पाय सुन्नच झाले असते. ट्रकवाल्याच चलो-चलो चालू झाले होतेच. मी इकडे काढलेले काही फोटो....



सर्वांचा एकत्र फोटो काढला आणि आम्ही परत ट्रक मध्ये बसलो. यावेळेला आमच्या बरोबर ३-४ फिरंग पण होते. सर्वानी आप-आपल्या जागा परत तश्याच प्रकारे पकडल्या. पण शोबित मात्र जरा निराळी पकडली. त्या फिरंग लोकांना आपला पार्श्व भाग दाखवत ओडवा उभा होता. फिरंग सहित आम्हा सर्वाना हे जाणवले आणि सर्वच हसायला लागलो. तेवढ्यात ट्रक सुटला आणि आम्ही परत "गणपती बाप्पा मोरया" असा जय-जयकर सुरु केला. मागे वळून लेक कडे पहिले तेव्हा असे वाटले कि फार कमी वेळ मिळाला आम्हाला इकडे. पण पुन्हा एकदा मी इकडे येईन आणि नुसत येईन नाही १ दिवस राहीन. असे मी माझ्या मनाशी बोललो आणि अजूनही मला तसेच वाटते. परत आता आम्ही शैतान नाल्या कडे आलो. तासा भरात पाण्याची पातळी वाढली होती. बाईक्स नाही घेऊन आलो ते बरे झाले ना. नाला पार केला आणि बाईक्स घेऊन परत लेहच्या दिशेने निघालो.


मजबूत भूख लागली होती. लागणारच २ वाजत आले होते. सकाळच्या नाष्ट्या नंतर काहीच खालले नव्हते. "शैतान नाला" पार करायचा म्हणून नुसती पळा-पळ. ७ - ८ किलोमीटर वरच आम्हाला एक तंबू स्वरुपात असलेले होटेल दिसले. इकडे फक्त म्यागी खायला आहे हे कळाले. मग काय परत " उदर भरणं " तर करायचे होते, दे जे असेल ते असे त्याला सांगितले. दिवस भर धावपळ करून जरा सर्वेच थकले होते. खायला येई प्रयेंत काही जण खुर्चीत तर काही जमिनीवरच आराम करत बसलो. जेवण झाल्यावर साधना आणि उमेशने आमच्या काही जणांच्या लेह ट्रीप बद्दलच्या प्रतिक्रिया स्वरुपात फुटेज घेतला. आता आम्ही निघायची तयारी करतच होतो, इतक्यात आम्हाला २०-२५ फुटावर असलेल्या एक बिळातून एक प्राणी बाहेर आलेला दिसला. मला त्या प्राण्याचे नाव माहित नाही. पण आम्ही सर्वच सावकाश पणे त्याचे फोटो काढायला लागलो. तसेच दुसऱ्या बाजूला एक परदेशी स्थलांतरित पक्षी पण आम्हाला पाहायला मिळाला. त्याचे पण फोटो काढले आणि ३ च्या दरम्यान लेहच्या दिशेने निघालो.


परत तीच सर्व गाव पार करत आम्ही चांग-ला च्या दिशेने चालत होतो. पण फरक मात्र एवढाच होता कि, आता आम्ही आरामात चललो होतो बाईक्स पळवत नव्हतो. मी तर क्षणा-क्षणाला फोटो साठी बाईक थांबवत होतो. पण या परिसरातला निसर्ग पण तसाच निराळा आणि सुरेख होता. सकाळी जे फोटो काढायचे होते पण काढले नव्हते ते मी आता काढत होतो. नजर फिरते न फिरते तेवढ्यात डोंगरांचे रंग बदलत होते. फोटोग्राफी शिवाय मध्ये कुठेहि न थांबता आम्ही चांग-ला ला पोहोचलो. परत गरम-गरम चहा घेतला आणि आता हरप्रीत सिंग शी निवांत गप्पा मारत होतो. थोड्याशा वैयक्तिक गप्पा पण झाल्या. त्यावरूनच आम्हाला कळाले कि तो २ वर्षान पासून आपल्या घरी गेला नाही आहे. इकडेच पोस्टिंग वर आहे, पण आता काही दिवसांनी एक-दीड महिन्याच्या सुट्टीवर जाणार आहे. मानले पाहिजे या जवानांना यार...... दोन-तीन वर्ष आपल्या घरी जात नाही आणि वरून अशा तणाव पूर्ण परिस्थितीत काम करावे लागते. यांच्या बरोबर आम्ही फोटो काढले आणि लेहच्या दिशेने चांग-ला उतरायला लागलो.


६ वाजले होतो, मी जरा आता निवांतच बाईक चालवत होते. माझी आणि दीपालीची आता गट्टी झाली होतो. मस्त गप्पा मारत लेहच्या दिशेने पारायण करत शक्ती-कारू पार केले आणि लेह-मनाली रस्त्यावर आलो. आता मी सर्वात मागे होतो आणि सर्व पुढे निघून गेले होते. अंधार हि पडला होता. बाईक मधले पेट्रोल संपायला आले आहे असे मला जाणवले. मध्येच एक पेट्रोल पंप लागला, मी बाईक मध्ये पेट्रोल भरून घेतले. इकडेच मी माझ्या हेल्मेटची काच धुऊन घेतली. कारण दिवस भर बाईक चालवून फार धूळ बसली होती आणि रात्री काळोखात बाईक चालवायची म्हणजे हेल्मेटची काच साफ पाहिजे. तसे काय आम्ही लेह पासून फार लांब नव्हतो, ३०-३५ किलोमीटरच होते. मी आणि दिपाली मस्त गप्पा मारत निघालो आणि कधी लेह चौकात आलो ते कळलेच नाही. ८.३० च्या दरम्यान आम्ही हॉटेल रेनबो वर होतो. लगेच फ्रेश होऊन आम्ही जेवण साठी परत एकत्र भेटलो.

आज तसे खाण्याचे जरा हालच झाले होते. म्हणून पुन्हा एकदा हॉटेल ड्रीमलैंडलाच जायचे ठरले. मस्त बटर चिकन, बटर नाना, जीरा राइस हाणल आणि जेवण उरकून ११ वाजता परत हॉटेल रेनबो वर आलो. अभिने मीटिंग घेतली आणि सर्वांनाच जरा झापले , कारण सकाळी झालेल्या ४५ मिनट उशिरा मुळे आज आम्हाला लेक वर जास्त वेळ देता आला नव्हता. १५-२० मिनटान करता जवळ-जवळ ३०० किलोमीटरची रगड पट्टी झाली असे वाटत होते. पण पुढे असे होऊ नये म्हणून अभिचे झापणे गरजेचे होते. १२ वाजले तेव्हा सर्वानी एक-मेकांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्या दिल्या आणि सकाळी लवकर उठून लेह पोलो ग्राउंड वर परेड पाहायला जायचे असे ठरवून झोपी गेलो. पडल्या-पडल्या झोप लागली....काय सांगू तुम्हाला......

13.4.10

लेह बाईक ट्रीप - सहावा दिवस (लेह अणि जवळ पास)

१३ ऑगस्ट २००९, आज तसा आमच्या आरामाचा  दिवस होता. सकाळी लवकर उठून कुठे ही जायचे नव्हते, मी तर अलार्म पण लावला नव्हता. ८ च्या  दरम्यान  दिपालीला माझ्या  day bags मध्ये  तीच काही समान होते ते तिला हवे होते म्हणून आली आणि तिच्या  स्टाइल मध्ये  ओरडली "मेल्यानो उठा". पटकन आंघोळ  वगैरे करून आम्ही टेबलवर नाष्ट्यासाठी जमलो. नाष्ट्याला मस्त लडाखी ब्रेड, बटर, जॅम, ऑमलेट आणि चहा-कॉफी मांडले होते, ज्यांना जे हवे ते त्यांनी घ्यावे. आज बरेच दिवसांनी निवांत नाष्टा चालला होता. नाहीतर दररोज गिळा आणि पळा. आम्ही सर्व एकत्र म्हटले कि बडबड तर आलीच. इकड-तिकडच्या  चर्चा , गप्पा-गोष्टी, बडबड, मस्ती आणि आता पर्यंत आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण चाली होती. एवढ्यात ऐश्वर्या बोलली, चीज असते तर किती बरे झाले असते. मी बोललो आहेना, तिनेच मला चीज आणायला सांगितले होते बहुदा विसरली असावी. चीज आहे असे कळताच आदित्य आणि ऐश्वर्याला जो आनंद झाला, जसे कि वाळवंटात पाणी मिळाले. नाष्टा एकदम आरामातच चालला होता. लेहचे वातावरण फारच छान होते, किमान हॉटेलच्या परिसरात तरी तसे वाटत होते. मस्त बागेच्या बाजूला सावलीत टेबल मांडले होते आणि हवेत जरासा थंडावा पण होता. सावली सोडली तर ऊन होते. या सर्व वातावरणात नबीची बायको आम्हाला प्रेमाने आग्रह करून वाढत होती. कसल सुंदर होते ते, मस्त आम्ही रेंगाळत बसलो होतो. प्रत्येकाने आप-आपल्या घरी फोन लावून घेतले. काल लेहला पोहोचायला उशीर झाला म्हणून घरी कोणीच फोन लावले नव्हते. मी पण आईला फोन लावला, जरा आई बरोबर गप्पा मारलाय, तेव्हा आई म्हणाली काय बरा आहेस ना धापा का लागत आहेत. लेहला हवेत ऑक्सिजनचे कमी प्रमाण असते म्हणून जोरात बोललो तरी थोडी धाप लागते असे सांगितले. नाष्ट्या नंतर सर्व जण आप-आपल्या कामाला लागले. बरेच दिवस ऐश्वर्याची तब्बेत वर खाली होत होती म्हणून तिला डॉक्टर कडे घेऊन जायचे होते. पूनमला हि जबाबदारी सोपवली होती. आम्हाला बाईकस मेकॅनिक कडे घेऊन जायच्या होत्या म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. साधना आणि उमेशला १५ ऑगस्टच्या शो साठी फुटेज श्रीनगरला पाठवायचे होते, म्हणून ते हे काम करत रूम वर बसले. बाकी सर्व काहीना काही  तरी करत  होते. नाही तर आराम करत होते. नाबीचा मुलगा "असीम" त्या बरोबर पण मस्ती चालू होतीच. मी बाईक घेऊन जाण्यासाठी बाकीच्यांची वाट पाहत असताना, रेनबो हॉटेलच्या आवारात काढलेले फुलांचे हे काही फोटो.

पूनम आणि ऐश्वर्याला हॉटेल जवळच सरकारी हॉस्पिटल मध्ये सोडले आणि मग मी, अभी, रोहन, आदित्य, कुलदीप व अमेय म्हात्रे बाईकस घेऊन मेकॅनिक शोधायला निघालो. आमचे हॉटेल लेहच्या एका टोकाला होते. बाजारातून शोधत-शोधत मुख्य चौका पर्येंत आलो. इकडेच डाव्या हाताला लेह्चा एकमेव पेट्रोल पंप आहे. कारगील सोडले तर लेह शिवाय कुठेही पेट्रोल पंप नाही. म्हणजे जवळ-जवळ ३०० किलो मीटर मध्ये कुठेही पेट्रोल मिळत नाही आणि मनाली कडून येत असाल तर केलोंग सोडले तर लेह शिवाय मध्ये कुठेही पेट्रोल मिळत नाही, म्हणजे जवळ-जवळ ३६५ किलो मीटर. चौकातूनच सरळ जरा पुढे विमानतळाच्या रस्त्यावरच  मेकॅनिक आहे असे कळेल. मग एकदाचा तो मेकॅनिक भेटला. तो तर काय फारच बिझी होता, कसे-बसे त्याला  पटवून आमच्या बाईक पाहायला सांगितल्या. माझ्या आणि रोहनच्या बाईकचे तसे काही मेजर काम नव्हते. जरा फक्त ओईल वगैरे टाकून डाग-डूगी करायची होती. अभिच्या पण बाईकचे तसे काही काम नव्हते, पण  त्याच्या  बाईकच्या साइड stand ची  स्प्रिंग पडली होती. ती लावायची होती आणि आमच्या सारखी डाग-डूगी करायची होती.पण ती स्प्रिंग काही केल्या मिळाली नाही. मग तो काय करणार, पाहिजे तेव्हा stand   सोडायचा  आणि चालवताना बांधून ठेवायचा. मुख्य काम होते ते कुलदीप आणि आदित्यच्या बाईकचे. त्यांच्या बाईकने काल आम्हला बराच बाबा त्रास दिला. मेकॅनिकला काय होते ते सांगितले आणि तो काही न बोलता कामाला लागला. बघतोतर त्याने कॅर्बोरेटर काढला. मला यात सर्वात जास्त रस आहे, म्हणून तो काय करतोय ते पाहत बसलो. त्याने इलेक्टिक वायर घेतली आणि तिच्यातली एक बारीक तार काढली. हि तार त्याने कॅर्बोरेटरच्या जेट मध्ये घातली आणि कॅर्बोरेटर साफ करून परत लावला. एवढ्या सर्व कामात तो एकाही शब्द  बोलला  नव्हता. आता मात्र तो बोलला "अब टेन्शन मत लो, बाईक मस्त चलेगी". त्याने हे का केले ते माझ्या लक्षात आले. लेहच्या हवेत कमी ऑक्सिजन आहे आणि बाईकच्या जेट मधून जास्त पेट्रोल पडत असते. कमी ऑक्सिजन आणि जास्त पेट्रोल मुळे, लागणारी पॉवर जनरेट होत नाही. म्हणून जेट मध्ये तार टाकून आता पेट्रोल पण कमी पडणार. आता हवा व पेट्रोल प्रमाणात असल्या कारणास्तव व्यवस्थित पॉवर जनरेट होणार. खरोखर आणि पुढे तसेच झाले, या दोन्ही बाईकने काय मुंबई पर्यंत त्रास दिला नाही. बाईकचे सर्व काम आवरले आणि हॉटेलवर परत आलो.
इकडे कळले कि ऐश्वर्याला दुसर्या सरकारी हॉस्पिटल मध्ये घेउन जायचे आहे, कारण जिथे सोडले होते तिकडे काही होणार नव्हते. अभी आणि रोहनला हॉटेलवर काहीतरी काम होते. म्हणून मी, आदित्य, अमेय म्हात्रे, पूनम आणि ऐश्वर्या असे मोठ्या सरकारी हॉस्पिटलला गेलो. हे हॉस्पिटल मुख्य चौकाच्या जवळच होते, पेट्रोल पंपाच्या एकदम समोर. च्यामारी परत तीत पर्यंतच आलो होतो. केस-पेपर काढला आणि डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर मस्त जेवायला गेला होता, हे ऐकून मला पण भूख लागली आणि खरोखरच लागलीच होती १२.३० होऊन गेले होते. डॉक्टर येई पर्येंत आमचे टवाळ काम चालू होते. थोड्या वेळाने डॉक्टर आला आणि ऐश्वर्याला तपासून गोळ्या दिल्या. हॉस्पिटलच सर्व आवरून आम्ही परत हॉटेलवर आलो. आम्ही येई पर्येंत जेवणाची सर्व सोय रोहनने करून ठेवली होती आणि ते काय रोहनला सांगायची गरज नाही, हुशार आहे तो यात......मग फ्रेश होऊन परत कामाला लागलो, म्हणजे "खादडायला" लागलो. आज आम्हाला हेच तर काम होते. इकड-तिकडचे थोडेसे काम आणि फिरण सोडले तर खाण्या शिवाय दुसरे काय काम होते. मस्त निवांत जेवण झाले होते. जेवण  आवरले आणि इकड-तिकडची थोडीशी आवरा-आवर करत बसलो. एवढ सर्व सुरळीत चालले होते, असे आमच्या बरोबर कधी होईल का?. मुंबई वरून त्याच मन्सूर एजंट कडून लेह युनियनच्या ज्या माणसा कडून गाडी बुक केली होती त्याला अभिने फोन लावला. त्याच्या कडून कळले कि मन्सूरने बुकिंग साठी काही सांगितलेच नव्हते. हरामखोर मन्सूर आता मजबूत डोक्यात गेला होता आणि त्याला फोन लावला तर तो फोनही उचलत नव्हता. सर्वंनी ठरवले कि मारा त्याला फाट्यावर आता, मुंबईला गेल्यावर बघू कसे त्याच्या   कडून पैसे वसूल करायचे ते. कारण पुन्हा त्याच्याशी हुज्जत घालून वेळ वाया घालवायचा नव्हता. मग हे सर्व नाबिला सांगितले आणि त्याने त्याच्या मेहुण्याची गाडी देतो असे सांगितले. मन्सूरच्या गाडीवर काय भरवसा ठेवण्यात आता काय अर्थ नव्हता, कारण येतो म्हणून कधी वेळेवर नाही आला तर आम्ही बोंबललो. पण नवीन गाडी करायची म्हणजे पैश्यांची तडजोड करावी लागणार होती. मग सर्व मताने तेल लावत गेला मन्सूर असे म्हणून आम्ही नाबिला होकार दिला. नाबीचा ड्रायवर ३ वाजे पर्येंत येईल असे सांगितले. 
ठरल्या प्रमाणे आम्ही ३ वाजता लेहच्या जवळ पास असलेली काही स्थळे पाहायाचे ठरवले होते. गाडीचा  ड्रायवर लोकल असल्या मुळे तो आम्हाला आता फिरवणार होता, म्हणून गाडी सर्वात पुढे आणि मागे आम्ही सर्व बाईक स्वार असे निघालो. मुख्य चौकातून बाईक मध्ये पेट्रोल घातले आणि मनालीचा रस्ता पकडला. नेहमी प्रमाणे मी आणि दिपाली एकत्रच होतो आणि मी अधून-मधून फोटोसाठी थांबत पण होतो. पण सकाळी जसे मस्त प्लेझंट वातावण होते तसे आता नव्हते, ज्याम चटके लागत होते. जेमतेम १८ किलो मिटरच अंतर होते, म्हणून लगेचच आम्ही "थिकसे गुम्पा" च्या फाट्या वर पोहचलो. फाट्यावरून डावीकडे वळलो आणि रस्त्या वरूनच थिकसेच दर्शन झाले. मी थांबून फोटो काढला आणि पुढे निघालो. पार्किंग मध्ये बाईकस लावल्या आणि थिकसे गुम्पाच्या  पायऱ्या  चढायला लागलो. पहिल्या टप्याच्या  पायऱ्या चढतोन-चढतो तर आम्हाला धापा लागल्या. जरा मजला भर पायऱ्या चढलो तर मजबूत धापा लागत होत्या. अजून आम्ही अक्लेमेटाइज झालो नव्हतो. काही कठड्यावर बसले तर काही पायर्यावरच बसेल, तेव्हा काढलेला हा फोटो.......
जरा दम  खालला आणि परत पायर्या चढायला  लागलो. पण आता पायर्यांच्या बाजूला असलेल्या भिंती मध्ये लाकडाचे फिरते ठोकळे (छोट्या फिरत्या घंटा ) होते. या सर्व हाताने फिरवत आम्ही पायर्या चढू लागलो. गुम्पाच्या गेट वर एक लामा बसला होता. तसा तर तो पारंपारिक लढाकी वेशातच होता, पण डोळ्यावर स्टायलिश ग्लेयर्स, पायात sport शूज आणि एमपी3 प्लेयर वर गाणी ऐकत होता. त्याच्या  कडे  पाहिले आणि गेट मधून आत निघालो. तेवढ्यात त्याने  आम्हाला अडवले आणि बोलला "तिकीट". थिकसे गुम्पा पहायची असेल तर ३० रुपये प्रत्येकी तिकीट आहे. आम्ही तिकीट काढले आणि गुम्पाच्या आत शिरलो. 
आत शिरल्या-शिरल्या बरच मोठ अंगण आहे आणि अंगणाच्या भिंतींवर चित्र काढलेली आहेत. गुम्पा मध्ये एकदम शांतता होती. गुम्पा एवढी सुंदर होती कि हे पाहू कि ते पाहू, हा फोटो काढू कि तो फोटो काढू. असे माझे आणि बहुतेकांचे होत होते. एक १०-१२ पायऱ्या  चढलो आणि त्याच्या  प्रार्थना स्थळात शिरलो. अंधुक प्रकाशात १५ एक लामा मध्य भागी बसून, बुद्ध धर्माच्या ग्रंथाचे एका सुरात पारायण करत होते. कसले प्रसन्न वाटत होते तिकडे. आम्ही आवाज न करता आत शिरलो. इतक्यात त्यांची  ती प्रार्थना संपली. आम्ही त्या लामाशी बोलायचा प्रयत्न हि केला पण कोणीही आमच्याशी  बोलायला तयारच नव्हते. आमच्याशी एकही शब्द न बोलता ते लामा बाहेर निघून गेले. आतमध्ये खांबांवर , भिंतींवर, छतावर सुंदर  चित्रे  आणि   नक्षी काढली होती. खांबांवर काही मुखवटे पण अडकवले होते. थोडे आत गेलो, एका खोलीत गौतम बुद्ध आणि काही देवतांचे पुतळे व तसबिरी काचेच्या आत मांडल्या होत्या. जमिनिसाहित सर्व बांधकाम लाकडी होते. फोटो काढले आणि मी बाहेर आलो. आणि बाजूलाच असलेल्या एका खोलीच्या गच्चीवर चढलो. काय तो परिसर दिसत होता. अर्ध्या भागात रेती, अर्ध्या भागात हिरवळ आणि सभवताली  डोंगर. मी पानारोनिक फोटो काढला आणि गुम्पाचा दुसरा भाग पहायला गेलो.



इकडे पण १०-१५ पायर्या होत्या. पायर्या चढलो आणि दरवाजातूनच मला फक्त गौतम  बुद्धांचा  १५ एक फुट नुसता चेहराच दिसला. कसली रेखीव मूर्ती होती ती. मी दरवाजातूनच पहिला एक फोटो काढला. जरा पुढे गेलो आणि बघतोतर जवळ-जवळ २० एक फुट खाली मांडी घालून बसलेली गौतम बुद्धांची हि मूर्ती होती. हि भली मोठी मूर्ती पाहून आम्ही थक्कच  झालो होतो. वास्तविक आम्ही होतो वरच्या मजल्यावर. वरून मूर्ती पाहावी लागते आणि आपण मूर्तीच्या चेहर्याला प्रदक्षिणा घालू शकतो अशीही सोय आहे. मग आम्ही पण प्रदक्षिणा घातली आणि मूर्तीला  न्याहाळून पाहून घेतले. मी तर मूर्तीच्या डोळ्यात बराच वेळ पाहतच उभा राहिलो, काय सुरेख डोळे उघडले  होते. अप्रतिम शिवाय माझ्या कडे दुसरा शब्दच नाही. मनोसोक्त मूर्तीला पाहून फोटोग्राफी केली आणि बाहेर आलो. गुम्पा सुंदरच होती. उमेश आणि साधनाला इकडे फुटेज हवे होते, पण बरेच रिटेक घेऊन सुद्धा हवा होता तो शॉट मिळत नव्हता. एकदाचा काय तो शॉट मिळाला आणि आम्ही सर्व थिकसे वरून परत लेहच्या दिशेने सुटलो.

आम्ह्च आता दुसर पाहायाचे ठिकाण होते "शे पॅलेस ". १० एक किलोमीटर मध्येच आम्ही "शे पॅलेस"ला पोहोचलो. दारात बाईक लावल्या आणि चढायला लागलो. तसे फार काय वरती चढायचे नव्हते पण धापा मात्र लागत होत्या. आत शिरलो, पण मला पॅलेस  सारख असे विशेष काही वाटले नाही. जवळ-जवळ बांधलेली घर  आणि ती हि ओबड-धोबड अवस्थेत. जरा पुढे गेलो तोच तिकड रोहन, शमिका, उमेश आणि मला एकावर-एक  असे रचलेले गोटे दिसले. आपण लगोरी साठी रचतो ना तसे. ते पाहून रोहन-शमिका लागले तसेच रचायला लागले. मी पण थोडासा प्रयत्न केला पण माझ्या मध्ये काय त्याच्या एवढा संयम नव्हता. मी २-४ वेळा हात मारला, पण शेवटी वैतागलो आणि मरू दे बोलून पुढचा भाग पाहायला निघालो. बर्याच छोट्या-मोठ्या खोल्या होत्या, पण अर्ध्य हून हि अधिक बंद होत्या. त्यामुळे तसे काही पाहायला मिळाले नाही आणि पाहण्या सारखे हि तसे काही नव्हते. बाहेरूनच सर्व पाहत पॅलेसचा फेर-फटका मारला. बांधकाम जरा निराळ आणि जुन्या पद्धतीचे होते, पण सुंदर असे काही नव्हते. सर्व साधारण खोल्या वाटत होत्या. पण थोडे काही तरी निराळे होते म्हणून मी काही फोटो काढले. 

 
 शे पॅलेस मध्ये हि एक छोटीशी गुम्पा आहे. मग आम्ही ती पाहायला घेतली. हि थिकसे एवढी काही सुरेख नव्हती, पण ठीक-ठाक होती. इकडे पण थिकसे सारखीच गौतम बुद्धांची अर्धी खाली आणि अर्धी वरती अशी मूर्ती होती. थिकसेच्या मूर्ती एवढी हि मूर्ती  काही सुरेख नव्हती पण छान होती. थिकसेच्या मूर्तीची तर "काय बात हि और थी". आम्ही मूर्ती न्याहाळून पाहून घेतली आणि काही फोटो काढले. इकडे एक हौशी फिरंग मुलगी कोपर्यात बसून वॉंटर कलरने चित्र काढत होती. जवळ जाऊन पहिले काय काढते ती, तर गौतम बुद्धांचा चेहरा काढत होती. मी तिला विचारून तिचा एक फोटो काढला आणि बाहेर आलो. तिचेही चित्र काढून झाले होते. आमच्या मागोमाग ती पण बाहेर आली. चित्र तसे ठीक-ठाकच होते, पण उगाचच प्रशंसा करायची म्हणून मी तिला  बोललो  "nice painting!! was it water color". थोडी चर्चा केली आणि आम्ही आप-आपल्या मार्गाला लागलो. मग काय विचारतात दिपाली, अमेय, कुलदीप आणि पूनम मला चिडवायला लागले. ते बोलले "चालू झाली तुझी वासुगिरी, फिरंग दिसली कि". दिपाली बोलली "मेल्या लग्न ठरल आहेना तुझ, जरा शर्म कर". मग मी बोललो "जिसने किये शर्म उसके फुटे करम". आमची  थोडी मस्ती चालू झाली,  तेवढ्यात  रोहन आणि अभी बोलले ५ वाजत आले आहेत, चला निघा आता पुढे अजून २ ठिकाण पाहायची आहेत. मग काय निर्लाज आम्ही, खिडर्त-खिडर्त निघालो.

इकडन जे निघालो ते  २-३ किलोमीटरवर असलेल्या "सिंधूघाट" येथे. सिंधू नदी वर बांधलेले एक छोटासा आणि साधा-सुधा घाट आहे. या पेक्षा कैक सुंदर असे घाट हरिद्वारला पहायला मिळतात आणि इकडच्या पेक्षा फार छान सिंधू नदीचे दर्शन आम्ही गेल्या काही दिवसात घेतले होते. मला तर काहीच आवडले नव्हते इकडे.एखाद-दुसरा फोटो  काढला  आणि ड्रायवरला मनातल्या-मनात शिव्या घातल्या "कशाला आणलेस इकडे, उगाचच वेळ वाया घालवला". बाकी काही जन मात्र मस्त पाण्यात पाय घालून मध्येच हाताने पाणी उडवत निवांत आराम करत बसले होते. मला तर पाण्याला पाय लावावासा पण वाटत नव्हता,  म्हणून मी सावलीत जवळील कठड्यावर बसून सर्वांची वाट पहात होते. थोड्या वेळेने सर्वच निघालो. बाहेर आलो आणि काही मराठी माणस भेटली, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो.

आता आमचे पुढचे ठिकाण होते "शांतीस्तूप", जे लेह शहराच्याच बाजूला एका टेकडीवर होते. मधेच रस्त्यात मला रेतीच्या डोंगरावर मावळती सूर्य किरण पडलेली आवडली म्हणून मी हा काढलेला फोटो.

सिंधूघाट वरून जे निघालो ते थेट मुख्य चौकात आणि चौकातून शांतीस्तूपा कडे. वरती पोहचलो तेव्हा बाईक  लावायला पण जागा नव्हती. एक छोटासा रस्ता आणि भरपूर गाड्या होत्या. ड्रायवरला बोललो लाव तुला जागा मिळेल तिकडे. आम्ही बाईक रस्त्याच्या बाजूला सरळ उभ्या केल्या आणि वर स्तूपा कडे गेलो. सुरवातीलाच आम्हाला काही लोक चहा-नाष्टा करताना दिसली. आम्ही पण तिकडेच वळलो. जागा पकडून आप-आपली ऑर्डर करायला सुरवात केली आणि आता आम्ही काय वरती येत नाही, इकडनच स्तूप फार छान दिसतोय असे हि बोलून मोकळे झाले. पण मी आणि आशिष बोललो आम्हाला पहायचं आहे, आम्ही चाललो वर आल्यावर चहा घेऊ. उमेश आणि साधनाला क्लोजर फुटेज हवा होता म्हणून ते हि आमच्या बरोबर निघाले. फार तसे काही चढायचे नव्हते, पण २ एक मजले तर नक्कीच होते. स्तूपाच्या पायथ्यशी मजबूत मोठे अंगण होते. ते पाहून माझ्या मनात एक किडा येऊन गेला. मस्त "बॉक्स क्रिकेट खेळता येईल" आणि लगेच दुसर्या क्षणाला मनात आले कि "जर बॉल खाली गेला तर.....". मनाला पुढे वाव न देता, जाऊ दे म्हणत मी आणि उमेश स्तूप पहायला लागलो. स्तूप ३ भागांचा आहे, पायर्या चढून पहिला मजल्यावर गेलो. इकडे प्रदक्षिणा मारायला जागा आहे. आम्ही पण एक प्रदक्षिणा मारली.भिंतींवर गौतम बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुर्त्या कोरल्या आहेत. दुसर्या मजल्यावर पण सर्व तसेच. पण शेवटचा भाग असल्या कारणास्तव इकडे मोठी गौतम बुद्धांची मूर्ती कोरली आहे. पायर्या उतरून खाली आलो तर, पहिल्या काही पायर्यांवर बसून एक फिरंग गिटार वाजवत होता. मस्त "जाझ" संगीताचे स्वर  छेडले होते त्याने आणि सूर्यास्ताला समर्पक होते ते संगीत. मला फार आवडले होते ते. तसे मला कुठलेही संगीत आवडते आणि मी आधी बरेचदा "जाझ कौनसर्ट"ला गेलो असल्या कारणास्तव मला ते नवीन वाटले नाही. पण त्या वातावरणाला काय समर्पक संगीत होते ते, बहुदा म्हणूनच त्याने ते वाजवायला घेतले असावेत. मी त्याचे काही फोटो काढले आणि उमेशने शूट केले. इकडे हि आम्हाला काही मराठी मंडळी भेटली. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि प्रसन्न मनाने आम्ही  सर्व जन खाली आलो. मी चहा ऑर्डर केली, मनाली बोलली चहा पेक्षा कॉफी मस्त आहे. मग चहा  रद्द करून कॉफी सांगितली. आमच्या समोर काही तरुण पोरींचा ग्रुप बसला होता. मी, अमेय म्हात्रे,  कुलदीप जरा वासूगिरी करायला लागलो. दिपाली आणि मनाली पण आम्हाला यात थोड्या फार प्रमाणात साथ देत होत्या. मग जरा जास्तच व्हायला लागे म्हणून दिपाली आणि मनाली मला  बोलल्या  "अमेय बस आता लग्न ठरलाय तुझ". इकडन लेह शहर आणि मागच्या डोंगरावर सूर्याचे सोनेरी किरण सुरेख वाट होते. मी काही फोटो काढले, पण सर्व मला चिडवायला लागले. माहिती आहे कि तू चांगला फोटोग्राफर आहेस, उगाचच  पोरींना  इम्प्रेस करू नकोस आणि वरून पुढे परत "तुझ लग्न ठरल आहे ठाऊक आहे ना". असे त्या पोरींना ऐकू जाईल अशा आवाजात बोलले. तेवढ्यात माझी कॉफी आली, पटकन घेतली आणि आम्ही सर्व हॉटेल कडे निघालो.
बाईक मध्ये पेट्रोल भरले, इकडे आम्हाला पुण्याचे पण काही लोक बाईक वर आले होते ते भेटले. यातले काही लोक रोहन, अमेय म्हात्रे आणि कुलदीपच्या ओळखीचे होते. यांच्याशी पण थोड्याश्य गप्पा मारल्या आणि आम्ही हॉटेलवर गेलो. दुपारी नाबिच्या बायकोने आम्हाला विचारले होते "रात को खाना इधर  खाओगे  कि बाहेर, मुझे मालूम है  कि आपको हमारा खाना पसंद नाही आयेगा". आम्ही बोललो "हा बाहर खायेंगे". मग तिनेच आम्हाला "ड्रिमलँड हॉटेल" ला जा असे सांगितले होते. काही जणांना रोहन ने हॉटेल शोधायला सांगितले आणि आम्हाला तयार होण्यास सांगितले. हॉटेल मिळाले आणि आम्ही सर्व जेवायला गेलो. मस्त आपल्याला मुंबईत मिळते ना तसे जेवण मिळाले. नाबीची बायको बरोबर बोलली होती. आमच्या कडून भरमसाट जेवणाची ऑर्डर झाली. जरा उशिरा का होईना पण जेवण आले. मस्त तव मारला. जेवण झाल्यावर आम्ही बाईक वरून रेनबो हॉटेल कडे आलो. बाकी सर्वांना चालत हॉटेल पर्येंत यायचे होते. सर्वे हॉटेल वर आल्यावर अभिने मीटिंग घेऊन उद्या बद्दल सर्व माहिती सांगितली. उद्या साठी सज्ज होऊन आम्ही सर्व झोपी गेलो.

या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पहायचे असल्यास टिचकी मारा: सहाव्या दिवसाचे सर्व फोटो