26.6.10

लेह बाईक ट्रीप - दहावा दिवस (लेह ते त्सो-मोरिरी)

१७ ऑगस्ट २००९, आज आमचा लेह मधला शेवटचा दिवस. मस्त ४ दिवस लेह मध्ये मज्जा केली, ती जागा आता  सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो.  काल जरा थकायला झाले होते, म्हणून सकाळी ७ वाजता सर्व उठलो आणि सर्व आवरून आप-आपले सामान घेऊन बाहेर आलो. मस्त नाश्ता चालला होता, एवढ्यात ऐश्वर्या बोलली चीझचा  डबा  कुठे गेला. आमची इकडे तिकडे शोधा-शोध चाललेली पाहून नबीची बायको बोलली “क्या  धुंड रहे हो तुम”. मी तिला हाताने चौकोनी असे दाखवत होतो आणि तोंडाने  त्रिकोनी डबा  असे बोलत होतो, वास्तविक तो  डबा चौकोनीच होता. सर्व माझ्या वर हसायला लागले आणि रोहन बोलला याला "अल्टीटूड सिकनेस”चा त्रास झाला वाटते. छान ४ दिवस लेह मध्ये राहून काही नाही झाल आणि आता लेह सोडताना त्रास झाला असे वाटते. बहुदा लेह सोडतोय म्हणून माझे मन भरून आले होते आणि बहुदा म्हणून असे झाले असावे कोण जाने. नाश्ता उरकून बाईक लोड  केल्या. आज रोहन, शमिका, पूनम, साधना आणि शोबित असे गाडीत होते. गाडी आज उशिरा येणार होती.कारण जरा गाडी मध्ये काम होते आणि आम्ही जे लेह ट्रीपचे टी-शर्ट करायला दिले होतो ते हि उशिरानेच मिळणार होत. पण आम्ही बाईक स्वार मात्र लवकर निघणार होतो. निघताना नाबिच्या परिवारा बरोबर आम्ही एक फोटो काढला.  ज्यांनी  आम्हाला घरा पासून एवढ्या लांब एकदम घरा सारखे प्रेमाने राहायला दिले,  त्यांना आणि लेहच्या सौंदर्याला सोडून आम्ही चललो होतो म्हणून  आम्हच्या  सर्वांचे मन भरून आले होते.

गाडीत ठेवायचं समान रोहनच्या ताब्यात दिले आणि आम्ही बाईक वर स्वार झालो. ८.३० च्या  दरम्यान आम्ही जड अंतकरणाने लेह सोडले. पेट्रोल भरून परत लेहच्या चौकातून मनाली कडचा रस्ता पकडला. शे, थिकसे पार करत आम्ही करुला पोहोचलो. नबी कडे तसा विशेष काय दाबून नाश्ता केला नव्हता, कारण सारखे तेच-तेच खाऊन कंटाळा आला होता. करुला आम्हाला एक छोटीसी टपरी  उघडताना  दिसली. चहा घ्यायच्या उधिष्टाने आम्ही आत शिरलो आणि मस्त गरम-गरम आलू पराठे खायला लागलो. पराठे हानले आणि चहा घेत बसलो होतो इतक्यात मी जिकडे बाईक लावली होती तिकडेच जरा पुढे एक मारुती ओम्नी लावली होती. त्याने  रिवरस घेताना माझ्या बाइकला ठोकले. इतक्यात सर्वच ओरडलो  “अरे काय कर रहे हो” आणि मी जाऊन बाईक पकडली. मी त्याला शिव्या घालणार तेवढ्यात तो बोलला “सॉरी, साहेब आपका बाईक दिखा नही”. अशा  वेळी मला मजबूत राग येतो आणि भरमसाट शिव्या घालाव्याशा वाटतात, पण समोरून सॉरी बोलल्या बरोबर सर्व राग शांत झाला. बाकी सर्वांचा नाश्ता होई पर्येंत मी एक-दोन फोटो काढून घेतले. मस्त पोट भरले होते. आता परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे निघालो. मध्ये कुठे हि न थांबता आम्ही थेट १५ किलो मीटर  पार  करून उपशीला पोहोचलो. उपशीला आर्मीच चेक  पोस्ट  आहे. बाईक लावल्या आणि अभी परवानगी व सर्व बाईकच्या माहिती द्यायला  गेला,  तो पर्यंत  मी परत फोटो काढायला लागलो. 


उपशी वरून २ रस्ते फुटतात, एक तांगलांग-ला करून मनाली कड़े जातो आणि दूसरा रस्ता सुमधो करून त्सो-मोरिरी कड़े जातो. आम्ही याच रस्त्याने निघालो. आज मी मस्त फोटोग्राफीच्या मूड मध्ये होतो आणि वातावरण पण मस्त समर्पक होते. छान निळ्या भोर आकाशात तुरळक पांढरे ढग आले होते. इकडनच आता परत आम्हाला सिंधू नदी हि लागली. पण नेहमी आमच्या बरोबर वाहणारी सिंधू नदी आज मात्र उलट्या दिशेने वाहत होती. मस्त डोंगरांच्या मधून वळसे घेत वाहत येणारी नदी आणि डोंगरांच्या एका बाजूने वळण घेत जाणारा रस्ता. रस्ता पण मस्त होता, मध्ये थोडी-थोडी रेती होती पण बाईक चालवायला मजा येत होती. डोंगर भुस-भूशीत मातीचा आहे असे वाटत होते आणि कधी हि आपली जागा सोडेल असे हि वाटत होते. मस्त बाईकिंगचा आनंद लुटत आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे सरकत होतो. या परीसरात आम्हाला निसर्गाचे नीर-निराळे रूप पाहायला मिळत होते. मधेच तपकिरी रंगाच्या डोंगरान मध्ये हिरवळ, निळे आभाळ आणि पांढरे ढग पाहायला मिळाले. काय मस्त दृश्य होते ते. आवर्जून थांबून फोटो काढला मी. तिकडन हलवेसे असे वाटतच नव्हते, पण सर्वात मागे मीच राहिले होतो. म्हणून थोडा वेळ नेत्र सुख घेतले आणि पुढे निघलो. तरी अधून मधून मी फोटोग्राफी साठी थांबतच होतो. आता मी आणि अभी मागे एकत्र होतो. एवढ्या सर्व रस्त्यात आम्हाला एके ठिकाणी मोठ्या दगडांचा  आडोसा दिसला, दीपालीच्या भाषेत "सु-सु का मुरंबा" साठी थांबलो. कारण पुढे कुठे हि आडोसा मिळेल याची खात्री नव्हती. या सर्वात मी फोटोग्राफी मात्र करत होतोच, काय मस्त वातावरण होते आज. इकडन पुढे निघालो, तरी निसर्ग आपले नीर-निराळे रूप दाखवतच होता. मधेच डोंगराचा रंग जांभळा हि झालेला जाणवत होता. असे डोंगराचे नीर-निराळे रंग पाहत, त्याच डोंगरांच्या मधून आम्ही पुढे जात-जात कियारी चेक पोस्टला पोहोचलो.  

१२ वाजत आले होते, थोड्या थोड्या भूखा लागल्या होत्याच. आता नेहमीच्या रीती प्रमाने अभी सर्व परवाने काढून  दाखवायला लागला. आर्मिच्या सुबेदारने रितसर एंट्री करायला घेतली आणि विचारले “किधार से आये हो तुम”, आम्ही बोललो "मुंबई-बम्बई से...…". मुंबई ऐकताच तो सूबेदार आमच्या वर खवसला आणि शब्दांचा भडीमार सुरु केला. “किस लिए यह तक इतना लंबा आये हो”, मी बोललो  “ये अच्छा निसर्ग और ये पहाडिया देखने आये है ”. तर तो अजूनच खवसल आणि बोलला "क्या हे इधर देखने के लीऐ, खुले-नंगे पहाड, रेत-पत्थर और सर्दीयो मे सिर्फ बर्फ हि बर्फ. हमारी मजबुरी कि वजह से हमे यह पे रहना पडता है, आप किस लिये यह पे मरने आते हो. क्या हे यह पे, बहुत सारा पैसा खर्च करते हो आप." या सर्वात मला त्यांच्यात आलेल्या नैराशाची  जाण होत होती.पण मुळेचे ते तसे नाही आहेत हेही माहित होते. म्हणून मी जरा त्यांना प्रेमाच बोट लावाव, अशा उदेशाने "हम आपको मिलने आये है" असे बोललो. हे ऐकताच जो काय त्यांच्यातला राग, नैराश होत, ते गळून पडल. त्याने आम्हाला त्याच्या ऑफिस मध्ये बसायला दिले आणि त्याच्या बरोबरच्या एका जवानाला घेऊन तो आत गेला. आम्ही त्याच्या ऑफिस मधल्या मस्त माठातले गार पाणी पीत होतो. तो जो बाहेर आला तो ओंजळी भरून  बदाम  आणि बरोबरच्या जवानाच्या ओंजळीत काजू असे घेऊन. सर्व त्यांनी आमच्या पुढ्यात टेबल वर पसरले आणि म्हणाला "खाओ पहले फिर पानी पिना" आणि परत आत गेले. हे सर्व पाहून तर आम्ही थक्क झालो आणि ते परत ओंजळी भर पिस्ता व नाइसच्या बिस्कीटचे पुडे घेऊन आले. सर्व पुढ्यात ठेवले आणि बोलले "खाओ अब पेट भरके". बराच वेळ आम्हाला काय करावे असे सुचेचना. ते परत बोलले "खाओ आराम से", मग मात्र आम्ही सर्व तुटून पडलो आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारायला लागलो होतो. मात्र आता आमचे  संवाद थोडे प्रेमळ ढंगात होत होते. थोडा वेळ गप्पा झाल्या आणि  आम्ही  निघायच्या तयारीला लागलो. तो आम्हला बोलला "ये सब खतम करके जाओ", आम्ही बोललो "नही-नही बस हो गया" तरी तो आग्रह करतच होता आणि आम्ही नाही-नाही करत होतो. शेवटी तो बोलला "ये सब मैने  आपके लिये निकले है, खतम करो नही तो लेकर जाओ". त्या त्याच्या रागात पण आम्हाला एक निराळे प्रेम दिसत होते. त्यांचा मान राखून मी, दिपाली, कुलदीप आणि अमेय म्हात्रेने उरलेले सर्व काजू, बदाम आणि पिस्ते खिशात टाकले. तरी त्याने आम्हाला उरलेली बिस्कीट पण दिलीच. हे सर्व पाहून मला असे वाटले कि, काय हे रख-राखीत पण खर प्रेम. वास्तविक आम्ही त्यांचे कोण होतो, काय आम्हचा  आणि त्यांचा संबंध. तसे पाहायला गेल्यास आम्ही त्यांच्या साठी फक्त वाट सरूच, रीतसर नोंदणी करायची आणि द्याच आम्हला पाठवून पुढे. एवढीच त्यांची जवाबदारी होती, तरीही त्यांनी आमच्या वर एवढा प्रेमाचा वर्षाव का करावा. या सर्व प्रश्नाचे उत्तर बहुदा "माणुसकी आणि प्रेम" असावे असे त्यावेळी  मला वाटले. हा क्षण माझ्या या ट्रीपचा सर्वात जास्त भाव पूर्ण होता. या सर्वाना प्रेम वंदना देऊन आम्ही पुढे निघालो. 

मागे गाड़ीशी संपर्क साधून आम्ही पुढे निघालो. आता जरा डोंगरांचे रंग बदलायला लागले होते. मधेच जांभळ्या रंगाचे तर मधेच राखाडी रंगाचे. आमच्या उजव्या हाताला सिंधु नदी आणि डाव्या हाताला रंग बदलणारे डोंगर. या मधून आम्ही आरामात पुढे चाललो होतो. आज काय आम्ही बाईकस पळवत नव्हतो मी तर  मस्त फोटो काढत-काढत आरामात मागुन येत होतो. आज मूड,  निसर्ग, वेळ सर्वच मस्त होते, म्हणून मज्जा येत होती.हळू-हळू आरामात केशर, नुर्नीस, किदमांग अशी गावे पार करत आम्ही चूमाथांगला पोहोचलो. सकाळी लेह सोडून आता पर्येंत रस्त्यात आम्हाला लागलेले पहिले हॉटेल. हे छोटेसे गाव आहे, रस्त्या लागत असलेल्या घरातच त्यांनी हॉटेल बनवले आहे. आम्हाला परत भुका लागल्याच होत्या, म्हणून खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर “मॅगी और राजमा-चावल”. या  पलीकडे त्या परिसरात आणि काय अपेक्षा करू शकतो. तसे पाहिले तर त्या ठिकाणी एवढ खायला मिळाले यातच आम्ह्चे नशीब असे आम्ही मानून काहींनी मॅगी आणि काहींनी राजमा-चावल मागवले. मस्त गरम जेवण जेवलो आणि परत रोहनशी संपर्क साधायचा प्रयेंत करायला लागलो, पण काही केल्या त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मग काय करणार ३.४५ वाजत आले होते, पर्याय नाही म्हणून आम्ही पुढे निघालो. 



४  च्या  दरम्यान  आम्ही माहे चेक पोस्टला पोहचलो. रिती प्रमाणे एन्ट्री केली आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच सुमधो ला  पोहचलो. सुमधो वरून २ रस्ते फुटतात, एक त्सो-कार करून पांग मार्गे मनालीला जाणाऱ्या रस्त्याला  मिळतो आणि दुसरा डावीकडे आतल्या बाजूला कार्झोकला जातो. आम्हाला कार्झोकलाच जायचे होते, कारण त्सो-मोरीरी कार्झोक गावच्याच पायथ्याशी आहे आणि ते अंतर जवळ-जवळ ६० किलोमीटर होते. पहिले २५ किलोमीटर रस्ता चांगला आहे आणि मग पुढचा रस्ता  कच्चा  होता. वातावरणात पण आता जरा थंडावा जाणवायला लागला होता आणि निसर्ग पण मस्त वाटत होता. छान लॅंडस्केप्स दिसत होते, निळ्या आभाळात पांढरे ढग खाली उतरले होते. मला तर  प्रत्येक  वळणावर एक नवीन लॅंडस्केप्स दिसत होता आणि सारखे थांबून फोटो काढावेसे वाटत होते, तसे मी करतही होतो. आज मी आणि अभी सर्वात पाठी होतो, जरा आरामातच. मी फोटो साठी थांबायचो आणि अभिला कवर करायचो. असे करत करत आम्ही रस्ता कापत होतो. काही केल्या रस्ता संपतच नव्हता आणि रस्त्याला पण बारीक खडी होती, त्यामुळे हळू हळू जावे लागत होते. पण आम्ही हि आरामातच  चाललो  होतो, फोटो  काढत  आणि आराम करत कच्च्या रस्त्या पर्येंत आलो. हवेत थंडावा वाढायला लागला होता आता बाईक वर जरा थंडी लागत होती. तरी पण मी नुसते फोटोच काढत होतो. काय सुरेख लॅंडस्केप्स होते सारखे पॅनोरमा काढावेसे वाटत होते, म्हणून मी काढत हि होतो.यामुळे आता माझ्यात आणि अभी मध्ये  अंतर वाढायला लागले होते. अभी पण पुढे निघून गेला होता आणि मी मागे शेवटी होतो. अधून मधून माझ्या आणि दीपालीच्या गप्पा तर चालूच होत्या, गप्पा नाही असे कधी  होणार  का. गप्पा आणि फोटोग्राफी करत आम्ही पुढे चाललो  होतो. रस्ता आता तर पूर्ण वाळू आणि भूस-भुशित मातीचा होता.

मला आता फारच थंडी वाजत होती आणि दीपालीला पण थोडीशी थंडी वाटत होती. वास्तविक थंडी नव्हती पण वारा गार होता आणि बाईक वर तर थंड वारा मजबूत  लागत  होता, जास्त करून छातीला, हाताला आणि हातांच्या बोटांना. माझ्या हातांची बोटे तर सुन्न व्हायला लागली होती, साधा क्लच दाबायला जमत नव्हता. मधेच बाईक थांबवून दीपालीने मला ग्लव्स काढायला लावले आणि माझे दोन्ही हात तिच्या हाताने चोळायला लागली. घर्षणाने हाताच्या बोटांचा रक्त प्रवाह वाढवण्याचा प्रयेत्न करत होती. बराच वेळ  हात चोळल्या नंतर तिला यात यश आले. आम्हाला थंडी लागण्यात माझा अति शहाणपणा आणि पूनमचा अति प्रेमळ पण कारणीभूत होता. सकाळी हॉटेल सोडताना मी आणि दीपालीने जॅकेट घातले होते, पण पूनमच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून तिने आम्हाला दिवसा गर्मीत जॅकेट कशाला असे सांगून आमचे जॅकेट गाडीत ठेवून घेतले आणि गाडी मध्ये  बंद  पडल्या मुळे अजूनही आमच्या मागे होती. थंडी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही एका  टी-शर्ट वर होतो आणि जॅकेट मागे गाडीत. म्हणून आपल्याला दिवस भर लागणारे समान बाईक वर आपल्या बरोबर ठेवावे असे अनुभवी लोक सांगतात आणि हे मला माहित असून मी हे केले नाही म्हणून अति शहाणपणा केला असे मी म्हणतो. काय करणार आता पर्याय नाही म्हणून आम्ही तसेच कुड-कुडत पुढे निघालो.

आता सूर्य मावळायला लागला होता, त्यामुळे सारा परिसर सोनेरी किरणांनी माखला होता. यातच आम्हाला त्सो-मोरीरीचे लांबून पहिले दर्शन झाले. 
 ते पाहून डोळे दिपुनच गेले आणि मला सारखे फोटो काढावे से वाटत होते, पण हात गारठले होते म्हणून म्हणा किंवा अजून थंडी वाढायच्या आत आम्हाला इच्छित स्थळी पोहचायचे होते म्हणून जास्त फोटो न काढत आम्ही पुढे चाललो होतो. सारखे वाटत होते कधी येणार कार्झोक गाव, तेवढ्यात थोड्या वेळाने मागून आमची गाडी आली. गाडी तून जॅकेट घेतले आणि मग गाडीच्या पाटोपाट आम्ही निघालो. आता जरा फोटो काढायला हातात जीव आला होता. रस्ता कच्चा आणि खडकाळ होता, त्यामुळे सर्वच हळू चालले होते. आता परत सर्व एकत्र आलो होतो.रस्त्याच्या  डाव्या हाताला त्सो-मोरीरी आणि त्याच्या  पलीकडे डोंगरच्या वर मघाशी दिसलेला एक मोठा ढग आता सूर्याच्या मावळत्या किरणाने मस्त सोनेरी दिसत होता. मला तर सारखे त्याचे  फोटो काढावे असे वाटत होते. दर वेळेला डाव्या बाजूला पहिले तर मी वाह काय मस्त आहे असे म्हणून थांबायचो आणि फोटो काढायचो. दर ५-५ मिनटांनी मी फोटो काढायला थांबत होतो, या खेपेला मी दिपाली कडे पाहिलं तर तिची मला दया आली  आणि तिला मी बोललो आता पुढे लगेच थांबणार नाही.पण मी दिपाली जे बोललो ते फार वेळ काय पाळू शकलो नाही, जरा पुढे गेलो आणि लगेचच डाव्या बाजूला पाहिल्या बरोबर वाह असे बोलून फोटो साठी थांबलो. पण या सर्वात दीपालीला फार मानले पाहिजे सारखे-सारखे मी फोटोग्राफी साठी थांबत होतो आणि या साठी तिला पण सारखे बाईक वरून उतरावे लागत होते, तरी पण तिची जराही चीड-चीड किंवा कच्च-कच्च नव्हती. या वेळेला मात्र मला तिची फारच दया आली. म्हणून मी फोटो काढायचा काय थांबलो नव्हतो, पण आता मात्र बाईक वरून न उतरता फोटो काढत होतो.

असे करत-करत आम्ही सर्वात मागाहून ७ च्या  दरम्यान कार्झोक चेक पोस्टला पोहोचलो. मी एन्ट्री  करायला गेलो तर कळले कि आताच तुमची एन्ट्री झाली. मग मी पुढे निघलो डावीकडच्या बाजूला सारखे माझे लक्ष होतेच. चेक  पोस्टच्या मागच्या बाजूला एक कॅम्प साईट दिसली. मला वाटले बहुदा आज आम्हाला टेन्ट मध्ये राहायचे आहे कि काय, या विचाराने मन मस्त उत्साही झाले. पण आमचे बाकी सर्व पुढे गावाकडे जाणाऱ्या दिशेने दिसत होते, मी पण त्यांच्या  पाठो-पाठ गेलो. जसे मला गावाचे संपूर्ण दर्शन घडले, तेव्हा या ट्रीप वरचा सर्वात  मोठा आश्चर्याचा धक्का मला बसला. तो म्हणजे १५०७५ फुटावर, त्सो-मोरीरीच्या काठावर १००० च्या  आस -पास लोकसंख्या असलेले कार्झोक गाव. मला तर एवढे  मोठे गाव असेल अशी अपेक्षा नव्हती. माझ्या सहित आमच्या पैकी बरेच जणांना असाच  धक्का  लागला. एका घरा कडे आम्ही सर्व थांबलो. आजचा आमचा मुक्काम इकडे असे कळले. मग मी विचारले आपण मागच्या कॅम्प मध्ये का नाही राहत आहोत. तेव्हा मला कळले एका डबल बेड टेन्टच भाड होत ३५०० रुपये आणि जे काय आमच्या आवाक्यात नव्हते. म्हणून सर्व तिकडे का नाही थांबले ते कळले आणि आता आम्ही राहणार होतो तिकडे फक्त ४०० रुपये प्रत्येक रूमचे होते.
अजूनही मला तशी थंडी वाजतच होती. गावातून त्सो-मोरीरी मस्त दिसत होतो, मी एक-दोन फोटो काढले आणि मी पटकन घरात शिरलो. आज मी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप रूम मध्ये एकत्र होतो. फ्रेश होऊन सर्व आप-आपली कामे करायला लागलो. आज शमिका आणि पूनमला जेवण बनवायचा मूड आला होता, म्हणून त्यांनी किचनचा ताबा घेतला. जेवण होई पर्येंत आम्ही काही जण उमेश, शोबित, आदित्य, दादाच्या रूम मध्ये टाइम पास करत बसलो. तर काही फोटो ट्रान्स्फरच काम करत होते. १०च्या  दरम्यान जेवण तयार आहे, चला जेवायला अशी आरोळी आली . तरी पण आम्ही सर्व रूम मध्ये गप्पा मारतच होतो, पण शेवटच दम आला तेव्हा मात्र सर्व उतरलो जेवायला. शमिका आणि पूनमने बनवलेले सुंदर जेवण खालले आणि झोपायची तयारी करायला  लागलो. ११ वाजता सर्व झोपी गेलो, पण आज मला काही केल्या झोप येतच नव्हती. तरी मी थोडा वेळ  वळवळतच राहिलो आणि कधी झोपी गेलो ते कळलेच नाही.