29.12.11

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - पहिला दिवस (मुंबई ते मुरुड)


१८ मे २००५, बाईक ट्रीपचा दिवस उजाडला आणि ठरल्या प्रमाणे ६ वाजवता रुईया नाक्यावर भेटलो. सर्वच फार उत्साही होतो. नाक्यावर सुजयला पाहिले तर त्याच्या पाठीवर भलीमोठी बॅग. एका बाईकवर २ माणसे आणि त्या २ माणसांचे सामान एका बॅगेत असे करायला लागणार होते. मग काय ४ जणांचे सामान मी आणि रावने २ मोठ्या बॅगेत भरले. लगेच हाताळण्यासाठी लागणारे सामान आम्ही छोट्या बॅगेत भरून घेतले. ७ वाजता आम्ही नाक्यावर विष्णू चाहावाल्याच्या साक्षीने नारळ फोडून आमची कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीपची सुरवात केली. 

रुईया नाक्या वरून आम्ही ४ जण वेडात निघलो. मनात सर्वांच्या उदंड उत्साह होता. सर्वांच्या आयुष्यातली पहिली सर्वात मोठी आणि स्वबळावर प्लान केलेली हि ट्रीप होती. आम्ही वडाळा – शिवडीच्या ४ रस्त्यावरून माझगाव डॉक जवळचा भाऊचा धक्का गाठला. डॉकवर भली मोठी लाईन होती, सुजय आणि राजूला रेवसचे तिकीट काढायला सांगितले. तो पर्येंत मी आणि राव बाईक रेवस लॉंच मध्ये चढवायच्या कामाला लागलो. बाईक लॉंच मध्ये चढवल्या आणि मस्त लॉंचच्या वरच्या बाजूला बाईक धरून बसलो. बाईक त्या लॉंच वाल्यांनी लॉंचच्या रेलींगला बांधली होती. मला आणि रावला तर मानता फारच धक-धक होत होती. जर रेलिंग तुटली आणि बाईक समुद्रात पडली तर? असे विचित्र विचार पण आमच्या मनाला चाटून गेले. अशा थोड्याश्या चांगल्या-वाईट आणि भरपूर आनंद दायक विचारांनी आम्ही मुंबईचा भाऊचा धक्का सोडून भर समुद्रात झेप घेतली.


सकाळचे ९.०० चे कोवळे ऊन जाऊन आता डोके तापायला लगले होते. दीड एक तासाचा ऊनातून चटके खात समुद्र प्रवासा नंतर आम्ही रेवासला पोहोचलो. रेवस धक्याला लॉंच लागताच बाईक उतरवल्या आणि बाहेर निघलो. बाहेर बरेचशे छोटे हॉटेल दिसले. सकाळ पासून राजूच्या घरचा चहा सोडला तर पोटात काहीही पडले नव्हते. हॉटेल पाहताच पुढचं प्रवास गेला तेल लावत आम्ही घुसलो हॉटेल मध्ये. सर्वांनी मिसळ पाव ऑर्डर केला, मी आणि रावने दही मिसळ ऑर्डर केली. चौघात  मिळून १५-१७ पाव मिसळी बरोबर हंडले आणि चहा घेऊन पुढे निघलो अलिबागच्या दिशेने. मांडवा फाटा, किहीम पार करून आम्ही अलिबाग शहरात शिरलो. एक-दीड तासात रेवस ते अलिबाग ३४ किलोमीटरचे अंतर मस्त आरामात एखाद-दुसरा ब्रेक घेत गाठले. मध्ये जाताना रावने काढलेला हा फोटो.

अलिबागचा कुलाबा किल्ला हा आमच्या लिस्ट मधला पहिला किल्ला होता म्हणून वळलो लोकांना विचारून किल्याच्या दिशेने. बाईक लावल्या आणि किल्याच्या दिशेने चालत निघालो तर कळाले कि भरती मुळे कुलाबा किल्ल्यात आम्ही जाऊ शकत नाही. मग काय थोडा वेळ बीच वर मस्ती केली आणि डोक्यावर ऊन रण-रणायला लागले म्हणून आम्ही परतलो बाईक कडे. ऊनाने तापल्या मुळे बाईकच्या बाजूला झाडाखाली गोळेवाल्या कडे आपली पथारी पसरवली. प्रत्येकाने एक-एक गोळा घेऊन आप-आपल्या जीभा रंगवल्या आणि जीव गार करून घेतला. राव फोटोग्राफी मध्ये घुसला होता तो पर्येंत आम्ही मस्ती करत बसून राहिलो. बराचवेळ झाडा खाली बसून रिलॅक्स होऊन घेतले आणि निघलो पुढे मुरूडच्या दिशेने. 

आम्ही फार पळा-पळ न करता आरामात चाललो होतो. २.३० च्या दरम्यान आम्ही रेवदंडा गाठले. सुजयला बिर्यानी खायचा मूड झाला. त्याने तिकडे लोकल माणसाला विचारून, रेवदंडा मध्ये चांगली बिर्यानी कुठे मिळते ते विचारून घेतले. मग काय सुजयला नाही बोलायचं, आमच्या पैकी कोणतही हिम्मत नव्हती. घुसलो आम्ही हॉटेल मध्ये सुजयच्या मागो-माग. वास्तविक घराच्या अंगणातच बनवलेले ते छोटेसे हॉटेल होते. ४ प्लेट बिर्यानी ऑर्डर झाल्या. बरीयानी यायला बराच वेळ लागला, तो पर्येंत आम्ही पथारी पसरायला लागलो. राजूने ट्रीप गिटार घेतली होती, सर्व शांत झाले म्हणून राजूने काढली गिटार आणि लागला सौम्य स्वरात तारा छेडायला. फार छान वाटत होते. एवढ्यात बिर्यानी आली. मस्त मुस्लीम घरी बनवलेली बिर्यानी साफ केली. सुजयने तर अजून एक प्लेट मागवली. मग थोडीशी हीमत जमा करून आम्ही सुजयच्या प्लेट मध्ये पण हात मारून घेतला.

एक तर दुपारची वेळ आणि आता आमचे पोट पण मजबूत भरले होते. मला तर खुर्चीतून उठावेसे पण वाटत नव्हते. हीच परिस्थिती पाहायला गेलो तर सर्वांची झाली होती. खुर्चीत बसल्या-बसल्याच सर्व लोळू लागले. परत राजूने गिटारचे स्वर छेडले. या वेळेला अभिजीत रावने त्याला पिंक फ्लोईड च्या गाण्याला साथ दिली. मग माझ्या आणि सुजयच्या फर्माईशी सुरु झाल्या. अर्थातच हिंदी, हे इंग्लिश गाणे आम्हाला काय फार कळत नाही. बरेच इकड तिकडची गाणी गाऊन आमच्या मैफिलीचा शेवट झाला, तो "डुबा-डुबा" या गाण्याने. वाह! काय मज्जा आली या कोरसला. सर्वांनी ते गाणे एन्जोय केले असे जाणवत होते. किंबहुना त्या हॉटेल मालकाने पण एन्जोय केल्याचे जाणवत होते. म्हणूनच त्याने आम्हाला इतका वेळ बसायला दिले असेल.


३.३० च्या दरम्यान, बराच झाला आराम असे म्हणत आम्ही पुढे मुरूडच्या दिशेने निघालो. आरामात रमत गमत आम्ही पुढे निघालो. मध्ये काही फोटो काढावेसे वाटले कि थांबायचो. मनाला पाहिजे तसा फोटो काढून घ्यायचो. जरा हि वेळेचा विचार न करता आरामात चालले होते आमचे. तसे पाहायला गेले तर काहीही घाई नव्हती. मध्ये एक दोन फोटो काढून आम्ही काशीद बीच जवळ थांबलो. आम्ही ४ जण सोडले तर बीच वर एकही चीट पाखरू सुद्धा नव्हते. एवढा शांत बीच लाभला म्हणून आम्ही बराच वेळ घालवला टंगळ-मंगळ करत. मी आणि अभिजीत राव या ट्रीप वर भरपूर फोटोग्राफी करायच्या उद्दीष्टाने होतो. मी ब्लॅक आंड व्हाईट आणि रावने कलर रोल घेऊन ठेवले होते. गरजेनुसार कलर, ब्लॅक आंड व्हाईट फोटोग्राफी करायचे असे ठरले होते. काशीद बीच वर पण रावने फोटो काढून घेतले आणि आम्ही बाईक हाकल्या मुरूडच्या दिशेने.

५.३० च्या दरम्यान आम्ही मुरुड गाठले. राहण्याची सोय नंतर पाहू, आता पहिला जंजिरा  किल्ला सर करूया असे म्हणत आम्ही सरळ मुरुड जेट्टी गाठली. मुरुड जेट्टी कडे जाताना रस्त्या वरून काढलेला हा जंजिरा किल्ल्याचा फोटो.


बाईक लावल्या आणि शिरलो नावेत. आता सर्वाना जरा थकल्या सारखे वाटले होते, जास्त करून सुजय आणि राजूला. त्याहुनी जास्त राजूला, बाईक चालवायला येत नाही म्हणून संपूर्ण वेळ बॅग उचलायला लागली होती त्याला. पण कितीही थकलो तरी मजा करायाची या मताचे आम्ही असल्या मुळे नावेत बसून सुद्धा मस्ती करतच होतो. त्या वेळी रावने काढलेला हा फोटो.


जंजिरा हा संपूर्ण पणे समुद्रात वसलेला किल्ला आहे. नावेने किल्ल्याच्या जवळ पोहोचलो तरी किल्ल्याचा दरवाजा काही दिसेच ना आणि अचानक एका बुरुजाच्या पाठून दरवाज्याने दर्शन दिले. नावेतून उतरलो आणि किल्याचा फेर-फटका मारायला लागलो. संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवर चालत असतानाचा जंजिरा किल्ल्याची  महानता जाणवायला लागली होते, कारण ९०० वर्ष हा किल्ला समुद्रात उभा राहून सुद्धा अजूनही दौलत होता. बहुदा यामुळेच हा किल्ला मराठ्यांना सिद्दी जोहर कडून एकदाही काबीज करता आला नाही. या अजिंक्य किल्ल्याला तटबंदि वरून प्रदक्षिणा मारली, नावाबचा वाडा पाहिला, तलाव पाहून आणि २३ फुटी तोफ कलालबंगाडी पाहून किल्ल्याच्या दरवाजाकडे आलो. जंजिरा  किल्ल्याच्या  सर्व बाजूने  समुद्राचे  खरे  पाणी  असून  सुद्धा  किल्ल्यातील  दोन्ही  तलाव  हि  गोड्या  पाण्याची  आहेत . काय  ती  निसर्गाची  किमया .


किल्ल्याचा फेर-फटका मारताना मी आणि रावने काढलेले काही फोटो.










परत नावेतून तीरावर आलो आणि बाईक घेऊन मुरुड गाव कडे निघालो. अंधार पडायला हि लागला होता, आमचे आता पुढे काम होते ते रात्र काढायची जागा शोधायची. बरेच फेऱ्या मारून आम्हाला शाळा, देऊळ, किंवा कोणाचे अंगण मिळायची काहीच चिन्हे दिसत नव्हती. ८ वाजत आले होते, भूख लागली म्हणून  पहिले जेऊन घेऊया आणि मग शोधूया असे ठरले. मस्त आरामात जेवून घेतले आणि सगळे सामना सहित कशाला शोधायच्या मोहिमेला निघायचे म्हणून राजू आणि सुजयला सामना सहित बसवले हॉटेल वर आणि मी व राव निघलो. मधेच एक इसम भेटला आणि आम्हाला त्याचा घराचे अंगण झोपायला द्यायला  तयार झाला. पण त्याची एक अट होती कि आमच्या बरोबर बायडी (मुलगी) नसली पाहिजे आणि जी आमच्या  बरोबर नव्हती. तरी पण खात्री करायला म्हणून आमच्या बरोबर तो इसम आला. हॉटेलच्या बाहेरूनच आम्ही त्याला पाठमोरा बसलेला सुजय आणि राजू दाखवला. "बघा आमच्या मध्ये बायडी नाही आहे". सुजायचे खाद्य  पर्येंत वाढलेले केस आणि अंगयष्टी पाठमोरी पाहून तो इसम "ती, पहा बायडी! ती, पहा बायडी! तुमच्यात आहे"  असे जोर-जोराने ओरडायला लागला. आम्ही त्याची बरीच समजूत काढण्याचा पर्येंत करू लागलो. अरे आमच्यात बायडी नाही आहे रे तो आमचा मित्र मुलगा आहे. पण काही हि तो ऐकायला तयारच नव्हता. तो आपला फक्त तुमच्यात बायडी आहे असेच बोलत होता. मग सुजायला बोलावून घेतले आणि दाखवले त्याला. बघ हि मुलगी नाही मुलगा आहे. सुजायला पाहून तर तो जास्तच खवळल आणि आम्हाला तसेच रस्त्यावर टाकून निघून गेला. 


त्या प्रकारावरून रावने सुजायला मजबूत शिव्या घातल्या, कारण रावने त्याला आधीच सांगितले होते कि केस कापून ये. पर प्रदेशात जाताना असा विचित्र अवतार नसता असे बजावले होते. पण सुजय कसला ऐकणार आणि त्याचा परिणाम सर्वांना भोगायला लागला. मग आता परत मी आणि राव निघालो एस.टी.स्टॅंडच्या दिशेने झोपायची जागा शोधायच्या मोहिमेला. मध्ये कुठे कोणाचे अंगण, शाळा किंवा देऊळ पाहत एस.टी स्टॅंड पर्येंत पोहोचलो. स्टॅंड मध्ये एका बाजूला बाईक लावून मग आम्ही स्टॅंडच्या आत झोपू शकतो असे रोने सांगितले. स्टॅंड तसे काय फार स्वच्छ नव्हते. पण काय करणार, आमच्या कडे दुसरा काही पर्याय नव्हता. नाहीलाजास्तव स्टॅंड वर झोपू असे ठरवले आणि आम्ही परतलो सुजय-राजूला बोलवायला परत निघालो तोच स्टॅंडच्या जवळ गतिरोधक लागला म्हणून मी बाईक हळू केली. गतिरोधक ओलांडतो न ओलांडतो तेवढ्यात रस्त्याच्या कडे एक कुत्रा जोरात धावत माझ्या बाईकच्या मध्ये आला आणि मी काही प्रयेत्न करण्याच्या आताच आम्ही तिघे हि (मी, राव आणि बाईक) रस्त्यावर लोळलो होतो, मात्र कुत्रा सुखरूप पणे कुई-कुई करत रस्त्याच्या दुसरी कडून अदृश झाला होतो. आम्ही रस्त्यावर माखलेले पाहून बाजूलाच असलेल्या दुकानातून पटा-पट ४-५ माणसे समस्त श्वान प्रजातीला शिव्या घालत आम्हाला उचलायला आली. काही वेळा करता आम्ही जरासे सुन्न झालो होतो. पहिले मला दुकानाजवळ घेऊन आले. मागे पाहिले तर एक जण बाईक उचलत होता तर बाकी अभिजीत रावला घेऊन येत होते. पण रावला मात्र चालायला जमतच नव्हते हे मला आता जाणवले. अभिजीत येई पर्येंत पाणी आणा, अशा आरोळ्या ऐकू आल्या. मग पाणी आले. मला आणि रावला पाणी पाजले आणि अम्हीची विचारपूस करू लागले. मी सर्व प्रथम अभिजीतची विचारपूस किली. तो मला बोलला गुढग्याला मार लागला आहे आणि चालायला अजिबात जमत नाही आहे. त्याला गुढगा दुमडायला पण जमतच नव्हता. मग गावकऱ्यांनी मला बाजूला केला आणि रावची गुढग्याचे परीक्षण करायला लागले. या बरोबर पुन्हा एकदा त्यांनी समस्त श्वान प्रजातीला मनोसक्त शिव्या घालून घेतल्या. ते मला बोलले कि त्या कुत्र्यांनी बरेचदा असे बाईक वाल्यांना पाडले आहे आणि पुन्हा शिव्या घातल्या. थोडा वेळ आराम करून मी बाईकच्या जखमांच्या परीक्षणाला निघालो. माझ्या बरोबर एक-दोन गावकरी पण आले. बाईकला आणि मला तसे काही विशेष लागले नव्हते, मात्र अभिजीतच्या गुढग्याला मजबूत मार लागला आहे या विचाराने मी जरा चिंता ग्रस्त झालो.

कसे-बसे गावकऱ्यांच्या मदतीने अभिजीतला बाईकवर बसवले आणि त्या सर्व प्रेमळ गावकऱ्यांचे आम्ही मना पासून आभार मानून निघालो. हॉटेलच्या दारात आलो आणि सुजय-राजूला हाक मारून बोलावले आणि अभिजीतला बाईक वरून उतरवले. मी बाईक लावली आणि घडलेली सर्व हकीकत राजू-सुजायला सांगितली. सुजय आणि राजू आम्हा तिघांची फार विचार पूस करू लागले, विशेष करून रावची. त्या दोघांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत आम्ही थोडा वेळ आराम करून घेतला आणि आता पुढे राहायचे कुठे यावर चर्चा करून लागलो. मला, सुजायला आणि राजूला रावची परिस्थिती फारच गंभीर वाटत होती. मग एकमत करून त्याच होटेल मध्ये राहायचे असे ठरले.

रावच्या परिस्थितीवर आता आमच्या ट्रीपचे पुढे भवितव्य होते. हॉटेलच्या लोकांकडून डॉक्टरचा पत्ता घेतला आणि, मी रावला डॉक्टरन कडे घेऊन गेलो. आमच्या पराक्रमाची सारी हकीकत सांगितली आणि पुढे करायला जाणाऱ्या पराक्रमाची सुद्धा. त्यांनी प्रिस्क्रिप्षन लिहून औषध व मला दिले आणि उद्या सकाळी या, पाहू काय ते? असे बोलून आमची पाठवणी केली. आम्ही डॉक्टरांचा निरोप घेऊन हॉटेल वर परतलो तो पर्येंत सुजय आणि राजूने हॉटेल मध्ये रूम बुक करून सर्व समान ठेवून दिले होते. तसे पाहायला गेले तर आज फार थकायला झाले होते. ट्रिपचा पहिला दिवस, त्याच्या आधी बरेच दिवस परीक्षा आणि आता बाईक वरून पडलो. आता रस्त्यावर राहण्याची आमच्यात ताकद नव्हती आणि रावला अश्या परीस्तीतीद रस्त्यावर झोपवणे बरे नव्हते. रावला बेड  वर झोपवला आणि आम्ही रूम वर मस्त आराम करत आता पुढे काय? या वर चर्चा करत बसलो. ऐवढ्यात  राजू ने गिटारीचे स्वर छेडले. याच स्वर मय वातावरणात आमच्या चर्चा चालू होत्या.

राजू आणि सुजय चे तर ठाम मत होते, परत मुंबईला चला, रावचे मत नाही पुढे जायचे. दोघे हि टोकाच्या आणि  दुषी कडच्या मताचे होते. मी मात्र मध्यम भूमिकेत होते. कारण पाहायला गेले तर राजू आणि सुजायचे बरोबर  होते. रावला धड चालायला हि होत नव्हते. बाईक ट्रिपचा पहिला दिवस आणि अजून पुढे बरेच दिवस जायचे होते. एवढा ९०० किलो मीटरचा प्रवास, बाईक वर बसने, चालवणे आणि चढ-उतर त्याला कसे जमणार. एवढे सारे प्रश्न आमच्या मनात घोळत होते. रावला आणि मला हि ट्रीप फार वर्षान पासून करायची होतीच. मी या दुविधा मनस्थितीत होते. राव काही केल्या ऐकेच ना, त्याचे मात्र एकाच मत होते ट्रीप पुढचे करायची. आम्ही रावला सांगितले कि उद्या डॉक्टरांचे काय मत आहे ते पाहू आणि मग पुढचे ठरवू. तरी पण राव, सुजय आणि राजू आप-आपल्या टोकाच्या भूमिकेलाच होते आणि या वेळेला मी मात्र डॉक्टरांच्या मतावर पुढचे ठरवायचे या वर ठाम होतो. याच चर्चेत १२ च्या दरम्यान आम्ही  झोपी गेलो.