3.12.09

लेह बाईक ट्रीप करिता माझी नवीन बाईक - बजाज अवेंजर २००.

जेव्हा माझ लेहला बाईकने जायचं  निश्चित झाले, त्याच वेळी माझ्या डोक्यात विचार आला कि माझी बाईक (टी.वि.एस. विक्टर) हि जुनी झाली आहे, ६ वर्ष आणि ८६००० किलोमीटर चालली आहे. वास्तविक ती मुंबईत चालवायला ठीक होती, कारण मी तिचे शॉक अब्ज़ॉरबर, बॅटरी, सगळे बेर्रिंग, टायर आणि बरेचसे पार्टस नवीन घातले होते. पण ती लेह सारख्या मोठ्या ट्रीप साठी पात्र वाटत नव्हती. म्हणून मी तिला   विकायचे ठरवले. मला माझी विक्टर विकायची जराही इच्छा नव्हती, कारण माझ्या बऱ्याच आठवणी या बाईक बरोबर होत्या. पण दोन दोन बाईक मला पोसता नसत्या आल्या म्हणून मी माझ्या मेकॅनिकला आणि बऱ्याच लोकांना बाईक विकण्याबद्दल  सांगितले. मी इंटरनेट वर www.bike4sale.com, वर पण जाहिरात दिली. तब्बल २ दिवसात मला हि जाहिरात पाहून फोन आला, कि बाईक बघायची आहे आणि केव्हा पाहू शकतो. मी त्यांना त्याच संध्याकाळी या असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी येऊन बाईकच परीक्षण केल. त्यांनी मला तिथल्या तिथेच होकार सांगितला आणि कितीला विकणार म्हणून विचारले. मी त्यांना १५००० रुपये सांगितले. यानंतर दररोज ते मला बाईक नेण्यासाठी फोन करू लागले. मी माझ्या आईशी चर्चा करून, तिचा होकार घेऊन त्यांना येण्यास सांगितले. त्याच दिवशी ते पैसे आणि बाईक  ट्रान्सफर करायचे कागद पत्र घेऊन घरी येऊन बाईक घेऊन गेले. तब्बल ८ दिवसात माझी बाईक विकली गेली. हि लोकं बाईक घेऊन जाण्यापूर्वी मी बाईकची काही छायाचित्रे काढली होती, कारण माझा या बाईक वर फार लळा लागला होता. मला फार वाईट वाटत होते, मी या बाईक वरून बऱ्याच ट्रीप आणि उपद्याप केले होते. मला या बाईकची फार आठवण येत राहणार हे मला ठाऊक होते आणि ती आठवण आता हि येत आहे.

आता नवीन बाईक कुठली घ्यायची, हे माझ्या डोक्यात चालू झाले होते. मला बुलेट बाईक फार आवडते, म्हणून बुलेट बद्दल सर्व प्रकारचा अभ्यास चालू केला. बुलेट ट्वीन स्पार्क मध्ये नवीन आधुनिक टेक्नोलॉजी वापरली आहे आणि हि बाईक सोडली तर बाकी सर्व बुलेट बाईक मध्ये जुनी १५० वर्षां पूर्वीची टेक्नोलॉजीच वापरत आहेत. यामुळे अभिजित राव मला सारखा बुलेट घेणार तर फक्त ट्वीन स्पार्क, नाही तर बाकी कुठली हि बुलेट घेऊ नकोस असे सांगत होता. अभिजित राव हे सांगत होता त्याच्या मगच कारण मला वास्तवात अनुभवायला मिळाल, संजूची बुलेट दुरुस्त करताना. ट्वीन स्पार्क घ्याची तर १ लाख १५ हजार रुपये मोजावे लागणार होते. वास्तविक या किमतीत दुसरी कोणतीही चांगली बाईक आणि लेह ट्रीप दोन्ही होईल हे आम्हाला जाणवत होते. यामुळे बुलेटला आम्ही बाजूला ठेवून दुसर्या बाईक्सचा अभ्यास सुरु केला, यात युनीकॉर्न आणि अवेंजर यापैकी कुठलीतरी एक असे ठरले. माझा मित्र सुजय कडे युनीकॉर्न आहे आणि अभिजित राव कडे अवेंजर आहे. आम्हाला दोन्ही बाईक्स बदल माहिती होती आणि दोघांच्या किमती पण सारख्याच होत्या. युनीकॉर्नच इंजिन फार स्मूथ आणि स्पोर्ट्स बाईक आहे, पण अवेंजरच इंजिन हि फार छान आणि दमदार आहे. अवेंजर हि क्र्यूज़ बाईक आहे, त्यामुळे तिचा कमफर्ट फारच चांगला आहे आणि लांब पल्ल्यांच्या ट्रिप्स साठी फार आरामदायक आहे. आम्ही बऱ्याचदा लांब पल्ल्यांच्या बाईक ट्रिप्स तर करीत असतोच, त्यात आम्हाला फायदा होणारच होता. म्हणून शेवटी अवेंजर घ्याची हे नक्की झाल.

मी बजाज शोरूमला गेलो बाईक बुक करायला, पण मला कळाल कि आता बुक केली तर एका महिन्यानी बाईक मिळेल, हे मला काही ठीक नाही वाटत होत. कारण महिन्यानंतर बाईक मिळाली तर त्या नवीन बाईकच रनिंग करून लेहला जायच्या आत २ सर्विसिंग कशा करणार. शोरूम बाहेर आल्या आल्या मी माझ्या मोठ्या मामाला फोन लावला आणि बाईक लवकर मिळावी म्हणून काही करू शकतो का, असे सांगून बाईकची सर्व माहिती दिली. मामाने मला सांगितले कि बाईक तू आता बुक करू नकोस, मी तुला काय ते उद्या सांगतो. मला त्यानंतर मामाचा फोन आला आणि तुला गाडी ४-८ दिवसात मिळेल, त्याने आकुर्डीतील  बजाज कंपनीतील जी. एम. कुलकर्णी आणि मुंबईचे साई सर्विसचे सतीश पै यांच्याशी बोलण केल होत. माझा मामा एम. आय. डी. सी. पुण्याचा हेड प्लानर आहे आणि मला माहिती होत कि बजाज कंपनी त्याच्या अंडर आहे. म्हणून मी त्याला हे सांगितल कारण मामाने मनावर घेतल तर हे शक्य आहे आणि मामाने ते करून दाखवल. पण माझ नशीब नेहमी प्रमाणे चाललं. ८ दिवसात मिळणारी बाईक मला १ महिन्यानी मिळाली, वास्तविक १ महिन्यात पण फार लवकर होते कारण माझ्या रेगुलर नंबर प्रमाणे मला २-३ महिन्यानंतर बाईक मिळाली असती. हि सर्व मामाची कृपा. खरतर ८ दिवसातच मला मामाच्या कृपेने बाईक मिळाली पाहिजे होती, पण एम. आर. एफ. टायर्सच्या संपामुळे उशीर झाला. मधल्या कालावधीत माझा मामा आणि बजाजच्या अधिकाऱ्यान बरोबर बाईक लवकर मिळण्याकरता सारखा बोलण चालू होता. बजाजच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले कि बाईक तयार आहे पण एम. आर. एफ. टायर्सच्या संपामुळे टायर्स येत नाही आहेत. खरोखरच संप संपल्या संपल्या मला बाईक मुंबईला पाठवली आणि आर. टी. ओ. नोंदणी सहित मला बाईक १ महिन्याच्या आत मिळाली. आता बाईकच पहिले काही वेग मर्यादेचे किलो मीटर आणि २ सर्विसिंगला लागणारे किलो मीटर मला १ का महिन्यात पूर्ण करायचे होते. मी सिद्धेशला बरोबर घेऊन वाड्याला एका दिवसात जाऊन आलो, ऑफिसला आणि इकडे तिकडे बाईक फिरवून एका आठवड्याच्या आत बाईकची पहिली सर्विसिंग करून घेतली.

18.11.09

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - सराव ट्रीप राजमाची

आता सराव ट्रीपचा मुहूर्त शेवटी लागला. अभिजीतला जे कोणी लेहला येणार आहेत त्यापैकी प्रत्येक जण राजमाचीला यायला हवे होते, कारण आम्ही सर्व एकत्र पहिल्यांदा भेटणार होतो आणि बऱ्याच गोष्टींवर त्याला चर्चा करायची होती. पण नेहमीच्या सवयी प्रमाणे म्हणा किंवा ट्रीपला महत्त्व नाही दिल म्हणून, काही जण नाटक करू लागली. आता अभिजित आणि आम्ह्च्या डोक्यात जायला लागल होत, लोकांचा  निष्काळजी आणि बेजवाबदारपणा तर कहर करून डोक्यावरून वाहायला लागला होता. यातच अभिजित आणि आम्ही काही कठोर निर्णय घेतले, जे अभिजित सर्वान बरोबर राजमाचीवर चर्चा करणार होता. अभिजितने या राजमाची ट्रीपच्या पण सर्व गोष्टी व्यवस्थित प्लान करून पाठवल्या आणि सर्वाना १०० % उपस्थितीचे आव्हान केल.

आता राजमाचीला जायचा दिवस उजाडला, आम्ही सर्व ठाण्यात दुपारी भेटून मग पुढे एकत्र राजमाचीला जायचं ठरल होत. याच लेह ट्रीपसाठी मी माझी पहिली बाईक (TVS Victor) विकली होती, म्हणून माझ्याकडे बाईक नसल्या कारणास्तव अभिजितने माझी सोय संजूचा पिलियन रायडर म्हणून केली होती. मी सकळी समान भरून ४६० बसने मुलुंड वाया ठाण्याला जायचे ठरवले. एक तर ती बस पाऊन तास आलीच नाही आणि मग दुनिया भर फिरून तिने मुलुंडला फार उशिरा पोहचवले. सारखे मला या सर्वांचे फोन येत होते. शेवटी अभिजित आणि संजू मला वोकार्ड हॉस्पिटलच्या समोर घ्यायला आले आणि बाकी सर्वाना ऐरोली सिग्नल जवळ थांबायला सांगितले होते. सगळ्यांनी मला उशिरा आल्या बदल शिव्या घातल्या आणि आम्ही सर्व राजमाचीच्या दिशेने निघालो. सर्व पहिल्यांदा एकत्र बाईक ट्रीप करीत असल्या कारणास्तव, आमच्या मध्ये ताळमेळ अजिबात नव्हता. आम्हा सर्वान मध्ये ताळमेळ राखायचे काम करीत होते ते मोबाईल फोन. संजूची होती जुनी स्टॅंडर्ड बुलेट, तिच्या मध्ये पिक-अप आणि बरेच प्रॉब्लेम होते. मला आणि संजूला वाटल कि आम्ही फार मागे पडलो आहोत, म्हणून संजूने जरा बाईक रेमटवली आणि आम्ही खोपोलीला पोहचल्यावर अभिजितला फोन केला. आम्हाला कळाल कि हे सर्व मागे आहेत, मग एक एक करून सर्व रमाकांत येथे पुन्हा एकत्र भेटलो. सर्व नवीन मंडळीची तोंड परिचय येथे, नाश्ता व बटाटे वडे खाता खाता होत होती. यात ऐश्वर्या, पूनमची टेर खेचणे काम आणि बरीच मस्ती चालली होती. मी या सर्वातून अभिजितला सांगितल, आपल्या मध्ये जराही ताळमेळ नाही आहे. कारण आज जर मोबाईल फोन नसते तर आपल्या मध्ये फार गोंधळ झाला असता. लेहला तर मोबाईल फोन चालतील कि नाही हे आम्हाला माहित नव्हते, याच कारणास्तव मला सराव ट्रिप्स मधून ताळमेळ आण्याची गरज भासत होती.

आता पुढे घाट आहे आणि राजमाची फाटा फक्त, अभिजित आणि मलाच माहित होता. म्हणून संजूची बाईक पुढे, मध्ये सर्व बाईक्स आणि अभिजितची बाईक शेवटी. अशा प्रकारे आम्ही सर्व एकत्र राजमाची फाट्या पर्येंत जायचं ठरवल, जे काय व्यवस्थित पाळल गेल नाही आणि आम्ही सर्व कसे बसे राजमाची फाट्याला पोहचलो. पुढचा रस्ता खडतर, बैलगाडीचा आहे हे मला आणि अभिजीतला माहित होते म्हणून हळू जायचे ठरले. दरम्यान अंधार पडायला हि सुरवात झाली होती. राजमाचीच्या ४ किलोमीटर अलीकडे संजूची बुलेट बंद पडली, क्लच दाबून किक मारल्यावर जसे होत तसे होत होते. किक फ्री होत होती म्हणून बाईक चालू होत नव्हती. आम्ही बाईकला धक्का मारून ही पाहिले, तरी बाईक चालू होईना. मग संजूच्या बाईक मेकॅनिकला फोन लावून सर्व अडचण सांगितली आणि त्याने आम्हाला किक जवळच्या डब्यात एक नट सैल करून त्यातील स्क्रू घट्ट करायला सांगितला आणि मग पुन्हा तो नट घट्ट करा असे सांगितले. संजयच्या बाईक मध्ये टूल किट नव्हता म्हणून मी काहीहि करू शकत नव्हतो, तत्पूर्वी रोहन आणि अभिजित पुढे गेले होते. मी अभिजीतला फोन लावून सर्वांना राजमाची गावात मामांकडे सोडून, तू आणि रोहन सर्वांच्या गाडीतले टूल किट घेऊन परत येण्यास सांगितले. आम्ही चौघांनी अंधारात हेड टॉर्चच्या प्रकाशात एक एक हात मारून पहिले, तरीही काही केल्या बाईक चालू झाली नाही. शेवटी बाईकच उद्या सकाळी बघू असे ठरवून आम्ही बाईक झाडात लपवून राजमाची गावात मामांकडे जाण्यास निघालो. रस्त्यात एका भुस-भुशीत मातीच्या चढत्या वळणावर अभिजीतच्या बाईकचे पुढचे चाक वर होऊन तो पडला आणि मातीत माखला गेला. हे दृश्य मी पाहता पाहता जोरात ओरडलो, अरेरे.... पडला पडला .......या नंतर चौघेही पोटात खड्डा पडे पर्येंत हसायला लागलो.

मामांकडे छान जेवण करून आम्ही मनोरंजन आणि श्रीवर्धन गडाच्या मधल्या गळीत असलेल्या देवीच्या मंदिरात निजायला गेलो. मंदिराच्या पडवीत आम्ही सर्वांनी पथारी पसरली आणि यातच मला पिंगे काका (माझ्या मावशीचे मिस्टर) यांचा फोन आला, त्यांचा मुलगा (रोहन) याचा आठवड्या पूर्वीच झालेला साखरपुडा मोडला हे कळाले. यावर माझी आणि काकाची फार वेळ चर्चा झाली आणि मला फार राग आला होता हे सर्व ऐकून. आता पर्येतचा प्रवास, बुलेट बंध पडून दुरुस्त करण्याचा प्रयेत्न आणि त्यात केलेली मजा या सर्वावर, हि धक्कादायक आणि दु:खद घटनेने विरजण पडले. या मुळे मूड पूर्ण हटला पण काय करणार शेवटी काम हे काम आहे, ते केलच पाहिजे. बाकी सर्व माझा फोन संपण्याचीच वाट पाहत होते आणि तो पर्येंत सर्वांची मस्ती चालली होती.

बराच उशीर झाला होता आणि सर्वाना झोप पण येत होती, तरी पण आमच्या ट्रीपची हि पहिली एकत्र सामोरा-समोर होणारी चर्चा होती. अभिजित आता सर्व पत्ते उघडणार होता. जे लोक निष्काळजी आणि बेजवाबदारपणा दाखवत होते, त्यांना या ट्रीप मधून वगळण्याचा निर्णय अभिजितने सर्वांच्या पुढ्यात मांडला आणि त्यावर सर्व सहमत झाले. या नंतर बऱ्याच चर्चा झाल्या, विचारांची देवाण घेवाण पण झाली आणि सर्व झोपी गेलो. पहाटे मामानी चहा व नाश्ता वरतीच मंदिरात आणला आणि सर्व जण नाश्ता करून गड फिरायला गेले. मी, अभिजित आणि संजू, त्याची बुलेट दुरुस्त करायला गेलो. बरीच मारा-मारी आणि मेकॅनिकने सांगितल्या प्रमाणे उपद्याप करून कशी बशी एकदाची संजूची बाईक चालू झाली. बुलेट चालू करायचा अनुभव कधीच विसरू शकत नाही आणि त्याच क्षणा पासून मी बुलेट बुक नाही केल्याचा आनंद मानत होतो. आम्ही गड बरेचदा पाहिला होता म्हणून सर्व आवरून मामांकडे समान ठेवले आणि तलावावर अंघोळीला गेलो. दुपार पर्येंत सर्वजण गड आणि तलाव परिसर फिरून मामांकडे जेवायला आलो. जेवण करून आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला लागलो. अभिजित राव पुण्यावरून मुंबईला चालला होता, म्हणून मी येता-येता त्याला राजमाचीच्या रस्त्यावर मधेच आम्हाला भेट असे सांगितले होते. मी अमेय म्हात्रेला सांगितले कि समोरून येणारी कुठली अवेंजर दिसली तर त्याला तिथेच थांबायला सांग. थोड्या वेळाने तो भेटला तिथेच आम्ही बाकीच्यांची वाट पाहत बसलो होतो. इतक्यात आदित्य, अमोलची बाईक पंचर झाल्याचे आम्हाला सांगायला पुढे आला. आम्ही सर्व फाट्या पर्येंत जाऊन, चहा पीत बसलो. मागाहून थोड्या वेळाने अभिजित आणि अमोल टायर काढून पंचर काढायला बाहेर फाट्या पर्येंत आले.

मी, अभिजित राव, अमेय म्हात्रे, संजू आणि कविता सर्व वेस्टनला राहत होतो म्हणून पुढे निघायचे ठरवले आणि बाकी सर्व सेन्ट्रलला राहतात म्हणून पंचर काढून मागाहून येणार होते. पनवेल येईच तो अंधार पडायला चालू झाला होता, यातच अमेय म्हात्रेच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीने तो घाबरतोय हे मला आणि अभिजित रावला जाणवले. नंतर चार्चान्ति तो हायवेवर पहिल्यांदा बाईक चालवतोय हे हि कळाल. मी अभिजित रावची बाईक कविताला मागे घेऊन चालवायला घेतली आणि अमेय म्हात्रे त्याची बाईक अभिजित रावला मागे घेऊन चालवायला लागला. याच कालावधीत अभिजित रावने अमेय म्हात्रेचा ब्रेन वॉश केला. पुढे ऐरोलीवरून कविताला संजू बरोबर पाठवले आणि आम्ही घोडबंदर वरून गेलो, कारण अमेय म्हात्रेला हा रस्ता जवळ पडणार होता. पण संजूच्या मते वसई, जे. वी. एल. आर. वरून जवळ पडेल आणि आमच्या मते वसई, घोडबंदर वरून जवळ पडते असे त्याला सांगत होतो. संजू काही केल्या जराही ऐकेना. शेवटी नाईलाजास्तव आम्ही त्याला कविताला बोरिवलीला घरी सोडून तू घरी जा आणि आम्ही अमेय म्हात्रेला फाउंटन हॉटेल पर्येंत सोडले. पुढे तो वसईला गेला, कारण तो रस्ता त्याला माहित होता आणि अभिजित राव मला कांदिवलीला सोडून पुढे घरी गेला.

16.11.09

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - कागदोपत्री

माझ्या सहित बऱ्याच मित्रांनी अभिजीतला होकाराचे ई-मेल पाठवले होते. अभिजित आणि रोहन यांनी प्राथमिक पूर्वतयारी जोरात सुरु केली, पण आम्ही मात्र या दोघांना लागेल तशी आणि लागेल त्या वेळी मदत करायचे मनात ठरवल होत. वास्तविक या दोघांना प्राथमिक पूर्वतयारीत आम्ह्ची कुठेच मदत लागली नाही आणि पहिला कागदी प्लान असलेला अभिजीतचा ई-मेल सर्व होकार असलेल्या मंडळींना आला. यामध्ये किती दिवस, प्रत्येक दिवसांचा आराखडा, येणारी माणस, येणारा खर्च, वगैरे वगैरे बऱ्याच ट्रीप संदर्भातल्या गोष्टी नमूद केल्या होत्या, त्याच बरोबर अभिजीतला प्रत्येकाची वयक्तिक माहिती आणि प्राथमिक खर्चाला लागणारे ५ हजार रुपये हवे होते.

कोणी अभिजीतला माहिती आणि पैसे दिले, कोणी फक्त माहिती दिली तर कोणी फक्त पैसे दिले, तर कोणी काहीच दिले नाही. मी मात्र फक्त माहिती दिली आणि पैशा बद्दल जरा थांब बोललो, कारण मला ऑफिस मध्ये सुट्टी करिता विचारायच होत. वास्तविक माझ्या ऑफिस मध्ये लग्नाला कशीबशी १० कामाचे दिवस सुट्टी मिळते आणि मला तर फिरायला ११ कामाचे दिवस सुट्टी हवी होती. मनावर दडपण, संकोच आणि थोडीशी लाज घेऊन मी माझ्या मॅनेजर कडे गेलो सुट्टी मागायला. मॅनेजर म्हणाला लग्न करत असशील आणि बायकोला घेऊन जात असशील तर देतो, वास्तविक ते मस्करीत होत. मग कशाला चाललास वगैरे वगैरे चालू झाल आणि ऑगस्ट मधेना, मग बघु. मी बोललो की तुम्ही सुट्टी देणार असाल तरचं मी पैसे भरीन. थोडासा विचार केल्यावर मॅनेजरने सुट्टी देण्याचे ठरवले. मी आनंदाच्या भरात अभिजीतला फोन केला आणि लवकरात-लवकर मी तुला पैसे पाठवतो असे सांगितले, पण पैसे काही लवकर गेले नाही. बरेच दिवसांनी पैसे मी अभिजीतला पाठविले.

मधल्या कालावधीत अभिजित आणि माझे, फोन किंवा ई-मेल वर भरपूर बोलन चालू होते. माझ्या शंका आणि विचारांची देवाण-घेवाण अभिजित बरोबर चालूच होती. रोहन किंवा आम्हा कोणाशीही, जर अभिजीतची चर्चा झाली की तो सर्वाना ती माहिती पोहचवत होता. मी सर्व चर्चान मध्ये जसे जमेल तसे भाग घेत होतो, मात्र सर्वात जास्त जोर सराव ट्रीप वर देत होतो कारण आम्ही सर्वांनी एकत्र भरपूर ट्रेकिंग केल आहे, पण आम्ही सर्वांनी बाईक ट्रीप मात्र एकत्र कधीच केली नव्हती. पाहायला गेल्यास हेच फार महत्वाचे होते आणि म्हणूनच मी सराव ट्रिप्स वर जोर देत होतो. सराव ट्रिप्सचा माझा सुजाव अभिजित आणि रोहनला पटला कारण बाईक ट्रीपच्या अडचणी आणि होणारे त्रास आम्हा तिघां व्यतिरिक्त कोणाला हि जाणवत नव्हता. आम्हा तिघांना ट्रेकिंग आणि बाईकिंगचा बराच अनुभव होता. त्यात अभिजित आणि रोहनला, ट्रेकिंग आणि ट्रीप नियोजांचा चांगलाच अनुभव होता. मी अभिजित राव बरोबर बऱ्याच बाईक ट्रिप्स केल्या होत्या, त्या कारणास्तव  मला सराव ट्रिप्स महत्वाच्या वाटत होत्या. माझ्या आणि रावच्या अजूनपर्यंतच्या बाईक भटकंतीत आम्हाला बराच बाईकिंगचा अनुभव आला होता, म्हणूनच सराव ट्रिप्स महत्वाच्या वाटत होत्या. पण मला, अभिजित नाचरे, रोहन आणि अभिजित राव सोडल तर सराव ट्रिप्सच महत्त्व कोणाला फारस जाणवत नव्हत. शेवटी अभिजित नाचरे ने आम्हा सर्वांच्या म्हणण्याला जोर देऊन पहिली सराव बाईक ट्रीप प्लान केली आणि आम्हा सर्वांना राजमाची सराव बाईक ट्रीपचा ई-मेल आला.

अजूनही सर्वजण अभिजीतला हवे असलेल्या माहिती आणि गोष्टी पाठवत नव्हते. याच संदर्भात माझे अभिजित बरोबर एकदा फोनवर बोलण झाल आणि असा हलगर्जीपणा आता चालणार नाही, असे अभिजितने सर्वांना सांगण्याची जरुरी भासत होते. अभिजीतला बरेच मनाविरुद्ध पण सफल लेह बाईक ट्रीपसाठी काही निर्णय घ्यावे लागत आणि लागणार होते. पण याला काही पर्याय नव्हता, कारण आम्ह्च सर्वांना सारखा सांगण होत कि हि काय नेहमीची बाईक ट्रीप किंवा ट्रेक नाही आहे. आपण सर्व लेह बाईक ट्रीप करणार आहोत, हि एक मोठी मोहीम आहे. या मोहिमेच महत्त्व आम्ही काही जण सोडले तर फारसे कोणाला समजत नव्हत, म्हणूनच अभिजीतला बरेच कठोर निर्णय घ्यावे लागले आणि आम्ही त्याचाशी सर्वच सहमत होतो.

अशा प्रकारे आमची पहिली सराव बाईक ट्रीप राजमाचीला जाण्याच ठरल. सराव राजमाची बाईक ट्रीप बद्दल  पुढील ब्लोग मध्ये सविस्तर सांगीन.

22.10.09

लेह बाईक ट्रिप संकल्पनेचा उगम

माझे काही मित्र लेहला जाऊन आले होते आणि बरयाच मित्रानं कडून मी लेहच्या सौंदर्या बद्दल ऐकले होते. जे कोणी "लेह-लडाख" बद्दल काही बोलायचे, तर फक्त "अप्रतिम" हाच शब्द मला कानी पडायचा. त्याच क्षणा पासून मला लेहला जायचे वेध लागायला चालू झाले होते. याच दरम्यान ऑक्टोबर २००३ मध्ये, मी माझी पहिली बाईक (TVS Victor) घेतली आणि मी लेहला बाईकने जायचं असे ठरवले, मग कईक मित्रानं बरोबर लेह बद्दल बोलताना आपण लेहला बाईकने जायचं अस बोलून जायचो. त्याच दरम्यान लेहला बाईकने जाण्याचा खर्च, रूट आणि कोणा बरोबर हे विचार मनात येऊ लागले. शेवटी सर्व प्रकारच्या चर्चा आणि झाल्यावर, अंदाजे मुंबई - लेह - मुंबई बाईकने रुपये ३५ हजार दरम्यान खर्च निघाला आणि शेवटी सर्व प्लान धुसर होत असल्याचे जाणवले..........

साल २००४ मध्ये, मी माझ्या मित्रानं बरोबर एन. सी. पी. ए. ला शाम मंचर याचं लेह - लडाखचे छायाचित्र प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो आणि त्याच क्षणा पासून लेहला आयुष्यात केव्हातरी एकदा बाईकने जायचे हे मी निश्चित केल. यानंतर बरेचदा या वर्षी आपण लेहला जाऊया, या वर्षी जाऊया, असे करीत करीत बरीच वर्षे निघून गेली. या वर्षी मार्च मध्ये अभिजित नाचरे चा आम्हा सर्वांना इमेल आला. तो लेह सफारी आणि ट्रेक प्लान करत आहे आणि आमच्या पैकी कोणाचीही इच्छा असल्यास, त्याला कळवावे. मी त्याच्या इमेल ला परत उत्तर पाठवल कि, तुझा प्लान फार छान आहे, पण मला लेहला बाईकने जायच आहे. त्याच करिता लेह सफारी साठी २० % मला धर आणि जर बाईक ट्रीप असेल तर मला तू २०० % धर. यानंतर बरेच जणांनी या मेल ला उत्तर पाठवले. बाईक ट्रीप असेल तर मज्जा येईल आणि वगैरे वगैरे. मला माहित होते कि रोहन आणि अभिजित ला पण बाईकने लेहला जायचं बर्र्याच वर्षा पासूनची इच्छा होती, त्यमुळे मला कुठे तरी माहित होते कि हे होऊ शकते. माझ्या वात्रट उत्तराने का होईना, प्रत्येक जण बाईक ट्रीप बद्दल विचार करायला लागले होते.

माझ्या वाढदिवसा निमित्त मी, रोहन, ऐश्वर्या, पूनम आणि सिद्धेश असे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे सर्व रुईया नाका येथे भेटलो आणि हेच लेह बाईक ट्रीप करूया ना अशी चर्चा सुरु झाली. चर्चा बरीच सकारात्मक होती, पण रोहनचं आणि माझा किंतु – परंतु , याला जमेल - त्याल जमणार नाही, असे - मग तसे, अशा बऱ्याच  विषयांवर आम्ही चर्चा हाताळत होतो. तत्पूर्वी माझे अभिजित बरोबर पण फोनवर बोलणं झालं, माझे मत तेच बाईक ट्रीप तर मी २०० % नाही तर २० % आणि वरील सगळ्या चर्चा केल्या होत्या. वास्तवीक पाहायला गेल्यास, प्रत्येकाच्या मनात हेच विचार चालेले होते. आखिर बरेच दिवसांनी पुन्हा एक अभिजीतचा मेल आला, लेह बाईक ट्रीप करूया. पण आम्हा सर्वांना माहित होते कि, आता खरं काम पुढे आहे. अशा प्रकारे आमच्या बाईक ट्रीपच्या संदर्भात चर्चा सुरु केल्या आणि अभिजितने पुढकार घेऊन प्राथमिक कामाला सुरुवात केली.