3.12.09

लेह बाईक ट्रीप करिता माझी नवीन बाईक - बजाज अवेंजर २००.

जेव्हा माझ लेहला बाईकने जायचं  निश्चित झाले, त्याच वेळी माझ्या डोक्यात विचार आला कि माझी बाईक (टी.वि.एस. विक्टर) हि जुनी झाली आहे, ६ वर्ष आणि ८६००० किलोमीटर चालली आहे. वास्तविक ती मुंबईत चालवायला ठीक होती, कारण मी तिचे शॉक अब्ज़ॉरबर, बॅटरी, सगळे बेर्रिंग, टायर आणि बरेचसे पार्टस नवीन घातले होते. पण ती लेह सारख्या मोठ्या ट्रीप साठी पात्र वाटत नव्हती. म्हणून मी तिला   विकायचे ठरवले. मला माझी विक्टर विकायची जराही इच्छा नव्हती, कारण माझ्या बऱ्याच आठवणी या बाईक बरोबर होत्या. पण दोन दोन बाईक मला पोसता नसत्या आल्या म्हणून मी माझ्या मेकॅनिकला आणि बऱ्याच लोकांना बाईक विकण्याबद्दल  सांगितले. मी इंटरनेट वर www.bike4sale.com, वर पण जाहिरात दिली. तब्बल २ दिवसात मला हि जाहिरात पाहून फोन आला, कि बाईक बघायची आहे आणि केव्हा पाहू शकतो. मी त्यांना त्याच संध्याकाळी या असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी येऊन बाईकच परीक्षण केल. त्यांनी मला तिथल्या तिथेच होकार सांगितला आणि कितीला विकणार म्हणून विचारले. मी त्यांना १५००० रुपये सांगितले. यानंतर दररोज ते मला बाईक नेण्यासाठी फोन करू लागले. मी माझ्या आईशी चर्चा करून, तिचा होकार घेऊन त्यांना येण्यास सांगितले. त्याच दिवशी ते पैसे आणि बाईक  ट्रान्सफर करायचे कागद पत्र घेऊन घरी येऊन बाईक घेऊन गेले. तब्बल ८ दिवसात माझी बाईक विकली गेली. हि लोकं बाईक घेऊन जाण्यापूर्वी मी बाईकची काही छायाचित्रे काढली होती, कारण माझा या बाईक वर फार लळा लागला होता. मला फार वाईट वाटत होते, मी या बाईक वरून बऱ्याच ट्रीप आणि उपद्याप केले होते. मला या बाईकची फार आठवण येत राहणार हे मला ठाऊक होते आणि ती आठवण आता हि येत आहे.

आता नवीन बाईक कुठली घ्यायची, हे माझ्या डोक्यात चालू झाले होते. मला बुलेट बाईक फार आवडते, म्हणून बुलेट बद्दल सर्व प्रकारचा अभ्यास चालू केला. बुलेट ट्वीन स्पार्क मध्ये नवीन आधुनिक टेक्नोलॉजी वापरली आहे आणि हि बाईक सोडली तर बाकी सर्व बुलेट बाईक मध्ये जुनी १५० वर्षां पूर्वीची टेक्नोलॉजीच वापरत आहेत. यामुळे अभिजित राव मला सारखा बुलेट घेणार तर फक्त ट्वीन स्पार्क, नाही तर बाकी कुठली हि बुलेट घेऊ नकोस असे सांगत होता. अभिजित राव हे सांगत होता त्याच्या मगच कारण मला वास्तवात अनुभवायला मिळाल, संजूची बुलेट दुरुस्त करताना. ट्वीन स्पार्क घ्याची तर १ लाख १५ हजार रुपये मोजावे लागणार होते. वास्तविक या किमतीत दुसरी कोणतीही चांगली बाईक आणि लेह ट्रीप दोन्ही होईल हे आम्हाला जाणवत होते. यामुळे बुलेटला आम्ही बाजूला ठेवून दुसर्या बाईक्सचा अभ्यास सुरु केला, यात युनीकॉर्न आणि अवेंजर यापैकी कुठलीतरी एक असे ठरले. माझा मित्र सुजय कडे युनीकॉर्न आहे आणि अभिजित राव कडे अवेंजर आहे. आम्हाला दोन्ही बाईक्स बदल माहिती होती आणि दोघांच्या किमती पण सारख्याच होत्या. युनीकॉर्नच इंजिन फार स्मूथ आणि स्पोर्ट्स बाईक आहे, पण अवेंजरच इंजिन हि फार छान आणि दमदार आहे. अवेंजर हि क्र्यूज़ बाईक आहे, त्यामुळे तिचा कमफर्ट फारच चांगला आहे आणि लांब पल्ल्यांच्या ट्रिप्स साठी फार आरामदायक आहे. आम्ही बऱ्याचदा लांब पल्ल्यांच्या बाईक ट्रिप्स तर करीत असतोच, त्यात आम्हाला फायदा होणारच होता. म्हणून शेवटी अवेंजर घ्याची हे नक्की झाल.

मी बजाज शोरूमला गेलो बाईक बुक करायला, पण मला कळाल कि आता बुक केली तर एका महिन्यानी बाईक मिळेल, हे मला काही ठीक नाही वाटत होत. कारण महिन्यानंतर बाईक मिळाली तर त्या नवीन बाईकच रनिंग करून लेहला जायच्या आत २ सर्विसिंग कशा करणार. शोरूम बाहेर आल्या आल्या मी माझ्या मोठ्या मामाला फोन लावला आणि बाईक लवकर मिळावी म्हणून काही करू शकतो का, असे सांगून बाईकची सर्व माहिती दिली. मामाने मला सांगितले कि बाईक तू आता बुक करू नकोस, मी तुला काय ते उद्या सांगतो. मला त्यानंतर मामाचा फोन आला आणि तुला गाडी ४-८ दिवसात मिळेल, त्याने आकुर्डीतील  बजाज कंपनीतील जी. एम. कुलकर्णी आणि मुंबईचे साई सर्विसचे सतीश पै यांच्याशी बोलण केल होत. माझा मामा एम. आय. डी. सी. पुण्याचा हेड प्लानर आहे आणि मला माहिती होत कि बजाज कंपनी त्याच्या अंडर आहे. म्हणून मी त्याला हे सांगितल कारण मामाने मनावर घेतल तर हे शक्य आहे आणि मामाने ते करून दाखवल. पण माझ नशीब नेहमी प्रमाणे चाललं. ८ दिवसात मिळणारी बाईक मला १ महिन्यानी मिळाली, वास्तविक १ महिन्यात पण फार लवकर होते कारण माझ्या रेगुलर नंबर प्रमाणे मला २-३ महिन्यानंतर बाईक मिळाली असती. हि सर्व मामाची कृपा. खरतर ८ दिवसातच मला मामाच्या कृपेने बाईक मिळाली पाहिजे होती, पण एम. आर. एफ. टायर्सच्या संपामुळे उशीर झाला. मधल्या कालावधीत माझा मामा आणि बजाजच्या अधिकाऱ्यान बरोबर बाईक लवकर मिळण्याकरता सारखा बोलण चालू होता. बजाजच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले कि बाईक तयार आहे पण एम. आर. एफ. टायर्सच्या संपामुळे टायर्स येत नाही आहेत. खरोखरच संप संपल्या संपल्या मला बाईक मुंबईला पाठवली आणि आर. टी. ओ. नोंदणी सहित मला बाईक १ महिन्याच्या आत मिळाली. आता बाईकच पहिले काही वेग मर्यादेचे किलो मीटर आणि २ सर्विसिंगला लागणारे किलो मीटर मला १ का महिन्यात पूर्ण करायचे होते. मी सिद्धेशला बरोबर घेऊन वाड्याला एका दिवसात जाऊन आलो, ऑफिसला आणि इकडे तिकडे बाईक फिरवून एका आठवड्याच्या आत बाईकची पहिली सर्विसिंग करून घेतली.