10.5.10

लेह बाईक ट्रीप - नववा दिवस (लेह ते खार्दुंग-ला पार करून नुम्ब्रा वॅली)


१६ ऑगस्ट २००९, आज आमच्या ट्रिपचा सर्वात महत्त्वाचा  दिवस होता. कितेक वर्षान पासून मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण होणार या उत्साहात आम्ही सर्व उठलो. आज आमचे लक्ष होते खर्दुंग-ला पार करून नुम्ब्रा वॅलीत जाऊन राहायचे. नुम्ब्रा वॅलीत नाबिच्या ओळखीने १ दिवसा करता राहायची सोय केली होती. सर्वांचे समान आमच्या रूम मध्ये टाकले आणि बाकी सर्व रूम रिकाम्या केल्या. नाष्टा करून, बाईक्स आणि गाडी लोड केली. ७.०० च्या आस-पास उत्साहित मनाने आम्ही सर्व निघालो. लेह मार्केट कडे न जाता मागच्या बाजूनेच आम्ही लगेच घाट चढायला लागलो. ३० एक मिनटातच आम्ही १३२०० फुटावर "गंग्लोक" ला पोहोचलो. मी एखाद दुसरा फोटो काढला आणि पुढे निघालो. बाकी सर्व न थांबता पुढे निघून गेले होते. वळण-वळण घेत आम्ही घाट चढत होतो. मला तर चंग-ला चढतोय असेच वाटत होते. तसाच रस्ता आणि तशीच वळणे. थोडाफार फरक होता, पण मला तसे वाटले होते. चंग-ला सारखच सरळ चढण मग यु टर्न, परत चढण मग यु टर्न होते. मात्र इकडे हवामान फारच निराळे होते. जसजसे वर चढत होतो तसतसे वातावरण बदलत चालले होते. निळे भोर खुले आभाळ नव्हते आज. खार्दुंग-ला च्या दिशेने पाहिले तर आभाळ दाटून आले होते. बहुदा आम्ही खार्दुंग-ला सर करणार म्हणून असेल कि काय कोण जाणे....  पण मनात असे वाटत होते कि पाऊस पडला तर मेलो, मी दीपालीला हे बोलून सुद्धा दाखवले. आज अजून एक निराळा अनुभव येत होता, म्हणजे जस-जसे वर चढत होतो तसे वारा जाणवत होता. दक्षिणे कडे (लेहच्या दिशेने) तोंड करून चढताना मजबूत समोरून वर यायचा आणि बाईक २०-२५च्या स्पीडला पण रडत चढायची. पण यु टर्न घेऊन उत्तरे कडे (खार्दुंग-लाच्या दिशेने) तोंड करून चढताना व्यवस्थित ४०च्या स्पीडला बाईक चढायची. पण खार्दुंग-ला सर करायच्या उस्फुर्तीत या सर्व अडचणींवर सहजच मात होत होती. ८ च्या सुमारास आम्ही १७००० फूटावरील "साऊथ पुल्लू", खर्दुंग-लाच्या दक्षिणेकडच्या चेकपोस्टला पोहोचलो. आता इथून सर्व रस्ता कच्चा होता आणि वेडी-वाकडी वळणे घेत आम्ही खार्दुंग-ला च्या दिशेने चढत होतो. अखेर ९ च्या सुमारास आम्ही खार्दुंग-ला च्या माथ्यावर पोहोचलो. अवघ्या २ तासात ३९ किलोमीटर अंतर पार करून सुमारे ७००० फुटांची उंची गाठली होती. लेहच्या १३५०० फुट वरून आम्ही १८३८० फुटावर खार्दुंग-ला च्या  माथ्यावर होतो.

१८३८० फुटावर जगातील सर्वोच्च वाहतुकीच्या रस्ता "खार्दुंग-ला टॉप" आम्ही सर केला होता. काय तो प्रत्येकाच्या  चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जगातील सर्वोच्च वाहतुकीच्या रस्ता सर केल्याचा, कितेक वर्षान पासूनचे स्वप्न पूर्ण झाल्याच, आम्ही सर्व सुखरूप इथ पर्येंत आलेल्याचा, हि बाईक ट्रीप सार्थकी झालेल्याचा कोण जाणे पण सर्व आनंदात होते. इकडे एका बोर्ड वर "Top of the World" असे लिहिले होते आणि सर्वाना तसे वाटत ही होते. रोहनने तर घेऊन आलेला तिरंगा काढला आणि फडकवला. मी रोहन-शामिकाचा फोटो काढला. प्रत्येक जण खर्दुंग-ला टॉप वर पोहोचलो म्हणून आप-आपल्या परीने  फोटोग्राफी करत होते. "Khargund-La Highest Motorable Road In The World" पार्किंगच्या बोर्ड जवळ अभिने  त्याची बाईक लावली आणि मी अभी-मनालीच्या फोटो काढला. मग मी माझी बाईक लावली आणि त्याने माझा फोटो काढला, नंतर माझा-दीपालीचा हि फोटो  काढला. साधनाला पण खर्दुंग-ला चा फुटेज हवा होतो, पण बाईक चालवताना. मग अभी-उमेश आणि मी-साधना थोडेसे लेहच्या दिशेने मागे गेलो. उमेश अभिच्या बाईक वर उलटा बसून शुटींग करत होता आणि साधना माझ्या बाईक वर बसून खर्दुंग-ला बद्दल संचालन करत होती. पण चामारी एका टेक मध्ये तिचे संपूर्ण संचालन होताच नव्हते. काही ना काही आणि कुठे तरी ती चुकायचीच. मग परत मागे फिरून पुन्हा एक टेक, परत चुकली कि पुन्हा मागे आणि टेक. टेक वर टेक, टेक वर टेक असे करत १० टेक झाले तरी पण पाहिजे तसा काय टेक मिळत नव्हता. आता मला कंटाळा यायला लागला होता. ऐकून-ऐकून मला ते संचालन पाठ झाले होते. अभी पण वैतागला  होता, उमेश अभिच्या बाईक वरून उतरला आणि मग उलटा पळत शूट करत होता. शेवटी १५ एक टेक नंतर हवा तसा टेक मिळाला. आम्ही परत येई पर्येंत सर्वानी आर्मी पोस्ट मध्ये मिळत असलेले खर्दुग-लाचे टी-शर्ट्स विकत घेतले होते. इकडे कळले कि सोमवारी खर्दुग-ला बंद असतो. अरेच्या म्हणजे उद्याच रे....असे आम्ही बोललो. बोंबला...लागली आमच्या प्लानची परत वाट. जर आम्हाला नुम्ब्रा वॅलीत रहायचे असे तर मग उद्या परत येऊन खर्दुंग-ला पार करता येणार नाही म्हणजे परवा यावे लागणार आणि हे काय आम्हाला जमण्या सारखे नव्हते. आमचे आधीचं २ दिवस वाया गेले होते. पुढच्या प्लानची वाट लागली असती, मग काय पर्याय नाही म्हणून हुंडर पर्येंत जायचे आणि आजच खर्दुंग-ला परत पार करायचा. बाकी सर्व ठिकाण वगळायचे असे ठरले. तशी आर्मीच्या पोस्ट वर नोंदणी केली कि आजच परत येणार. इकडे हि आम्हाला काही मराठी मंडळी भेटली. त्यांच्याशी फार वेळ गप्पा न मारता आम्ही पुढे निघालो.

खर्दुंग-लाची  दुसरी  बाजू आम्ही उतरत होतो. हवेत जराशी थंडी होती, फार तशी नाही. वारा जोराचा होता पण, बहुदा त्यामुळे थंडी जाणवत होती. अधून-मधून माझी मात्र फोटोग्राफी चालूच होती. जस-जसे खाली उतरत पुढे जात होतो तसे खर्दुंग-ला वरून येणारे ढग आमच्याच वरून मागे येत आहेत असे मला आणि दिपाली वाटले. या विषयावर माझी आणि तिची चर्चा सुरु झाली. तसे आम्हाला चर्चेसाठी  कुठलाही विषय चालतो, आता हा विषय होता. गप्पा मारत आणि फोटोग्राफी करत १८ किलोमीटर अंतर पार करून १६००० फुटावर "नॉर्थ पुल्लू" चेकपोस्टला पोहोचलो. आता ११ वाजत आले होते म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही पुढे तसेच निघालो. कारण आम्हला अजून अंदाजे ६० किलोमीटर अंतर गाठायचे होते. आता रस्ता मस्त होता. जरा बाईक पळवल्या आणि खर्दुग गावा कडे पोहोचलो. इकडे आम्ही गाडी थांबली होती. भुका लागल्या होत्या म्हणून चहा-बिस्कीट खाल्ले. रोहन आज जरा सुटलाच होता, जबरदस्त गाडी पळवत तो  आधीचं पुढे निघून गेला, त्यामुळे तो इकडे थांबला नव्हता. जास्त वेळ न दवडता पुढे निघालो. बऱ्याच वेळाने तो आम्हला भेटला. खूप वेळ झाला आणि मागे कोणीही दिसत नाही म्हणून तो थांबला होता. पण आम्ही तर चहा घेत बसलो होतो. १२ वाजलेत आता पुढे कुठ पर्येंत जायचे आणि कुठून मागे फिरायचे याच्या वर आमच्यात चर्चा सुरु झाली. मग २ च्या जवळ-पास जिकडे असू तिकडून परत फिरायचे असे ठरले आणि पुढे निघालो. परत रोहन पुढे सुटला होता.

वेडी-वाकडी वळण सावध पणे घेत, सरळ रस्त्यावर सुसाट बाईक पळवत होतो. आता माझी आणि दीपालीची बडबड जरा कमी झाली होती, कारण लक्ष जास्त बाईक वेगात पळवण्यात होते. पण नक्कीच सावध पणे. रस्ता छान होता बाईक चालवायला मजा येत होती. आता आम्हाला सिंधू नदीने पण साथ दिली होती. पण जस-जसे आम्ही पुढे चललो होतो तस-तसे नदीचे पात्र मोठ-मोठे होत होते. एके ठिकाणी नदी एवढी रुद्र झाली कि समोर दिसणाऱ्या डोंगरान पर्येंत नदीचे पात्र वाढले होते. म्हणजे आमच्या या रस्त्याच्या बाजूने ते पलीकडच्या डोंगर रांगान पर्येंत, एवढी मोठी झाली होती. पहा हा फोटो......खाल्सर, डिस्किट अशी गावे पार करत आम्ही पुढे निघालो. डिस्किट हे नुम्ब्रा वॅलीचे डिस्ट्रिक मुख्यालय आहे. इकडून पुढे गेलो आणि २ रस्ते फुटताना दिसले. एक रस्ता "सुमुर" कडे आणि दुसरा "हुंडर" कडे जातो. "सुमुर" हे "सियाचीन बेस" परिसरातले बॉर्डर कडचे गाव आहे. तिकडे जाण्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते, जी आमच्या कडे नव्हती आणि वेळ पण नव्हता. बघू पुन्हा कधी आलो तर जाऊ असे म्हणून आम्ही "हुंडर"च्या दिशेने निघालो. आत तर रस्ता अजूनच चांगला होता आणि नदी पासून लांब जात चालला होता. आता परिसर हि बदलला होता. लांब-लांब नजर जाई पर्येंत वाळवंट दिसत होते. नुसत रख-रखीत वाळवंट आणि मधून जाणारा सरळ रस्ता. आम्ही या वाळवंटातून पुढे सरकत होतो. इकडे हि रोहन सुटलाच, मी त्याला पकडायचा प्रयत्न करत राहिलो पण काय भाड्या बाईक पळवत होता. स्पीडो मीटर कडे लक्ष गेले तेव्हा कळले कि मी ९०-९५ ला बाईक पळवत होते. मनाला जरा आवरले, कारण जर मध्येच अचानक खड्डा  किंवा रस्ता खराब झाला तर बाईक आवरता नाही येणार. क्षणभरात मोह आवरला आणि परत ६०-७० च्या स्पीडला बाईक पळवायला लागलो. एवढ्यात रोहन बराच पुढे निघून गेला. अभी, आदित्य माझ्या मागो-मग आता आले होते. अमेय म्हात्रे मात्र बराच मागे होता.


थोड्या वेळात आम्ही "हुंडर"ला पोहोचलो. रस्त्याच्या मध्ये उभा राहून रोहन आम्हाला बाईक इकडे लाव असे हाताने इशारा करत होता. जवळ गेलो आणि रोहनच्या बाईकच्या बाजूला आम्ही बाईक लावल्या. समोर दिसत होता एक बोर्ड आणि रोहन हाच बोर्ड उत्साहाने आम्हाला दाखवत होता. कसला असेल तो बोर्ड, कॅफे १२५ आणि मेनू पण याच बोर्ड वर लिहिला होता. काय असेल मेनू? जे कधी या वाळवंटात खायला मिळले असे वाटले पण नव्हते आम्हाला, असे होते मेनू. पहाच तुम्ही ना........
डोसा हा प्रकार इकडे वाह काय बात हे असे म्हणत आश्चर्य मुद्रा घेऊन आम्ही आत शिरलो. मागाहून अमेय म्हात्रे आणि आमची गाडी पण आली. मसाला डोसा, साधा डोसा, समोसा आणि जिलेबी ऑर्डर केली. जस-जशी ऑर्डर येत होती तस-तसे  सर्वच तुटून पडत होते. मनोसोप्त जेवून घेतले आणि मी बाहेर आलो. हा कॅफे "खर्दुंग-ला टायगर्स ५४ RCC (GREF)" रेजिमेंटच्या गेटला लागूनच आहे. रेजिमेंटच्या गेट वर कमान करून बोर्ड लावला आहे "KHARDUNGLA TIGERS 54 RCC (GREF) WE MAINTAIN WORLDS HIGHEST MOTORABLE ROAD". खर्दुंग-ला आणि नुंबर वॅली परिसरातले सर्व रस्ते हि रेजिमेंट संभाळते. मानले पाहिजे या लोकांना, एवढ्या प्रतिकूल वातावरणात रस्ता चांगला सांभाळतात.
 

आता आम्हाला पाहायला जायचे होते ते "डबल हंप कॅमल" आणि "हुंडर सॅन्ड ड्यून्स", जे हुंडरचे आकर्षण आहे. "सॅन्ड ड्यून्स" रस्त्याने येताना दिसतच होते, पण आम्हाला पाहायाचे होते "डबल हंप कॅमल". फार लांब नव्हते तसे जरा एक किलोमीटर भरच जावे लागले. छोटासा ओढा आला म्हणून बाईक लावल्या आणि पुढे पाई चालत गेलो. झाडीत उंटाचे  मालक आराम करत बसले होते. यांनी १५ मिनटांच्या राइडचे २५० रुपये सांगितले. तसे आमच्या पैकी कोणाला हि राइड करायची इच्छा नव्हती, फक्त पहायचा होता. त्यांनी उंट अजून पुढे कुठे तरी झाडीत लपवून ठेवले होते. मग ऐश्वर्याला बकरा बनवून उंटा वर बसवायची ठरले. त्यांना सांगितले आणा एक उंट १५ मिनटांसाठी. ते बोलले "सब करेंगी तो हि लेकर आयेंगे एक के लिये नही". कसा-बसा एक बकरा तयार केला होता, बाकी कोणालाच राइड करायची इच्छा नव्हती. आम्हाला तर फक्त पहायचा होता. कसला माज होता त्यांना. शेवटी नाही करायचे म्हणून आम्ही परत फिरलो. आता परत ओढा ओलांडताना पूनम धडपडली, तसे काही लागले नाही. पण आमची मस्ती चालू झाली. वेळे अभावी आणि उंट मालकांच्या मस्ती मुळे आम्हाला उंट न पाहता परत निघावे लागले होते. मनात असेही वाटत होते कि जर उद्या खार्दुंग-ला बंद नसता तर आज आपण इकडे राहून सर्व परिसर पाहायला मिळाला असता. पण काय करणार जसे वाटते तसे होत नाही. हेही मनातच म्हणत मी बाईक काढली आणि सर्व ३.३० वाजता लेहच्या दिशेने निघालो.


इथून परत सुसाट निघालो लवकरात-लवकर आम्हाला खार्दुंग-ला पार करायचे होते. तोच वाळवंटातला मस्त रस्ता सुसाट तुडवायला लागलो. अधून-मधून मी फोटोग्राफी साठी मात्र थांबत होतो, पण ह्याच्या शिवाय मध्ये कुठेही न थांबता ४.३० ला आम्ही खार्दुंग गावात पोहोचलो. आमची गाडी परत तिकडेच थांबली होती जिकडे आम्ही सकाळी चहा-बिस्कीट खालले होते. आता परत चहा-बिस्कीटचा एक राउंड झाला आणि आमची मस्ती तर चालूच होती. माझी आणि कुलदीपची बाईक सर्वात जास्त पेट्रोल पीयायची म्हणून बरोबर एक्सट्रा घेतलेलं पेट्रोल बाईकला पण दिले प्यायला आणि निघण्याची तयारी करायला लागलो. एवढ्यात पूनम ओरडली माझा कॅमेरा मिळत नाही आहे, मग शोधा-शोध. कॅमेरा कुलदीपने लपवला होता. थोडी मस्ती झाली आणि मग सर्व खार्दुंग-लाच्या दिशेने निघालो. जस-जसे खार्दुंग-ला चढत होतो तस-तसे वातावरण पावसाळी होत होते. परत मला आणि दीपालीला वाटले कि पाऊस पडला तर मेलो. आभाळा कडे लक्ष देत आम्ही घाट चढत होतो. काही वेळातच १४७३८ फुट वरून १८३८० फुटावर होतो. सर्वच फार आनंदात होतो आणि का नसणार, एका दिवसात दोनदा खार्दुंग-ला टॉप सर केला होता. सकाळी साधनाच्या फुटेज  मुळे मला आणि अभीला इकडे काही खरेदी करायला मिळाली नव्हती. मग मी, दिपाली, अभी आणि मनाली आर्मीच्या खार्दुंग-लाच्या पोस्ट मध्ये गेलो आणि खार्दुंग-ला संदर्भातल्या टी-शर्ट, मग, ग्लास वगैरे-वगैरे अशा बर्याच गोष्टी विकत घेतल्या. बाहेर वातावरण फारच गार होत आणि वारा ही मजबूत सुटला होता. जास्त वेळ  तिकडे उभे राहावे असे वाटच नव्हते. मी अभिजित रावच "प्रो-ट्रेक" घड्याळ ट्रीपसाठी घेतले होते, त्यात मी बाहेरच तापमान पहिले तर ते ५ डीग्री होते. 
पटकन मी आणि उमेशने सर्व बाईक्स एकत्र  लावल्या आणि त्या भवती सर्वांना उभे करून एक एकत्र फोटो काढला. खार्दुंग-ला वर मनोसोक्त आनंद लुटून ६ वाजता लेहच्या दिशेने खार्दुंग-ला उतरायला लागलो.


आता जरा मी निवांत बाईक चालवत होतो, कारण दिवस भराच्या धावपळी मुळे थकलो होतो आणि जरा शांतता हवी होती. मी फोटो काढीत आरामात बाईक चालवत सर्वात मागे राहिलो होतो आणि मागे काय म्हणतात माझ्या व दीपालीच्या गप्पा नेहमी प्रमाणे चालू झाल्या होत्या. पण या गप्पान मध्ये नेहमी पेक्षा जरा फरक होता. आमच्या आता वैयक्तिक आयुषावर चर्चा चालू झाल्या होत्या. नेहमी मस्ती करणारे आम्ही दोघे आज गंभीर झालो होतो...... तुम्हाला वाटत असेलना अरे हे कसे काय झाले. पण शेवटी आम्ही पण माणूसच आहोत, जवळच्या मित्रान कडे मन मोकळे करतोच. या सर्वांत कधी अंधार पडायला लागला हे जाणवलेच नाही, एवढ्या गहन चर्चेत आम्ही शिरलो होतो. मस्त छान आभाळ पहिले तेव्हा जाणवले, अरेच्या अंधार पडायला लागला आणि लेहच्या पण जवळ यायला लागलो आहोत. मागच्याच बाजूने आम्ही लेह मध्ये शिरलो आणि ७.३० नंतर हॉटेल रेनबो वर गेलो. पोहोचल्यावर कळले मी खार्दुंग-ला उत्तरताना आशिष-साधना बाईक वरून पडले होते. पण फारसे तसे काय त्यांना लागले नव्हते. सकाळी सर्वांनी रूम खाली केल्या होत्या, परत नाबीने सर्वांची राहण्याची  व्यवस्थित सोय करून दिली. तसे आम्हाला एकच रात्र काढायची होती तिकडे. सर्वच फार थकलो होतो महणून आज कुठे हि उपद्याप करायला न जाता हॉटेल रेनबो मधेच जेवायचे असे ठरले आणि तसे नाबिला सांगितले. जेवणं नंतर उद्या बद्दल सर्व माहिती दिली आणि सर्व आवरायला घेतले. आमची खोली तर गोडाऊन वाटत होती आधीच आमचा सर्व पसारा आणि त्यात भर म्हणून सर्वांचे समान. दिपाली बोलली "मेल्यानो कसे तुम्ही राहतात रे, आवर आता". मग काय लागलो आम्ही आवरायला. उद्या लेह सोडायची म्हणून सर्व पॅकिंग करायला लागलो. सर्व आवरून इतके दिवस लेह मध्ये जी मजा केली आणि उद्या लेह  सोडायचे अशी मनाशी खंत बाळगून मी झोपी गेलो.

1.5.10

लेह बाईक ट्रीप - आठवा दिवस (लेह स्वतंत्र दिवस परेड, मॅग्नेटिक हिल, अल्ची आणि परत लेह)


१५ ऑगस्ट २००९ , आज आम्हाला पहिले स्वतंत्र दिवस परेड पाहायला जायचे होते. काल जरा थकायला झाले होते, पण नवीन दिवस नवीन उत्साह असे म्हणत ७.३० उठलो. प्राप्त विधी उरकून सर्व नाष्ट्याला भेटलो. नाष्टा नेहमी सारखाच होता, तेच-तेच खाऊन कंटाळा आला होता, म्हणून जरासा नाष्टा केला आणि सर्व पोलो ग्राउंड कडे गेलो. हे ग्राउंड लेह मार्केटच्या वरच्या बाजूला आहे. गाडी दुपार नंतर बोलावली होती, म्हणून आम्हीच बाईकने  सर्वांना  एक-एक करून ग्राउंड पर्येंत घेऊन आलो. बाईक्स एक बाजूला लावल्या आणि ग्राउंड मध्ये आलो. सुरक्षा तशी मजबूत होती. पण जम्मू-काश्मीर मध्ये लेह असून सुद्धा एकदम थाटात आणि उत्साहात भारताचा स्वतंत्र दिन साजरा करत असलेले पाहून फार बरे वाटले. गर्दी पण तशी मजबूतच होती. कुलदीप आणि उमेश प्रेसच्या कार्ड वर आधीचं  परेड एरिया मध्ये  घुसले  होते. आम्ही मात्र गर्दीतच कुठून चांगले फोटो काढायला मिळतील अशी जागा पाहत होतो. तेवढ्यात नाबी आला आणि त्याने मला आणि अमेय म्हात्रे प्रेसवाले म्हणून परेड एरियात सोडले. तेव्हा असे वाटले कि हा काय मोठा माणूस आहे, एवढ्या सुरक्षेतून त्याने आम्हला प्रेस एरियात नेहून सोडले होते. प्रमुख पाहुणे येई पर्येंत मी तिकडे उभे असलेल्या सर्व दलाचे मी फोटो काढत होतो. बरोबर ८.३० ला प्रमुख पाहुणे आले. त्यांनी झेंडा वंदन केले आणि सर्वत्र "जन गण मन" चे  घोष  सुरु झाला. सर्व  दलांचे  प्रमुख पाहुण्यांनी निरक्षण केले. प्रमुख पाहुण्यांना सलामी देऊन सर्व  दलाने संचालन केले. त्या सर्वांचे मी फोटो काढातच होतो. हे सर्व पाहून मला माझ्या एन.सी.सी च्या दिवसांची आठवण आली. त्यावेळेला मी यांच्या पैकी एक असायचो आणि आता मात्र त्यांचे बाहेरून फोटो काढत होतो. हा १५ ऑगस्ट मी वेगळ्या तरेने   साजरा केले म्हणून मला फार आनंद झाला होता. हे मी इकडे काढलेले काही फोटो.......

सांस्कृतिक कार्येक्रम साठी आम्ही थांबलो नाही. कारण आमचे पुढे काही कार्येक्रम ठरले होते आणि त्यातला पहिला म्हणजे शॉपिंग. शॉपिंग म्हटले कि मुलींच्या आवडीचा विषय. पण आमच्यातली मुलही काही कमी नाहीत. सर्वच मिळून लेह मार्केट मध्ये शॉपिंग साठी गेलो. साधनाला शॉपिंगच फुटेज  हवे  होते. म्हणून ४-५ टेक घेऊन का होईना शुटींग झाले. मग अभी आणि रोहन सोडले तर आम्ही सर्वच मुलींच्या आवडीच्या दुकानात शिरलो. अभी आणि रोहन टी-शर्ट पहायला गेले . मला एक स्टोल घायच होता म्हणून मी मनाली व दीपाली बरोबर होतो. पण एकसो-एक किमती ऐकून मला लेहच्या थंड वातावरणात घाम फुटायला लागला. हवशीने फुढे सरकून मागे येण्या मध्ये मी एकटाच नव्हतो आमच्या मध्ये. काय त्या किमती च्यामारी.......मग सर्व आप-आपल्या शॉपिंग साठी विखारलो. मनाली, दिपाली आणि मी आपल्या अवाक्यात असलेल्या गोष्टीची शॉपिंग करायला गेलो. पुनन, एश्वर्या, अमेय म्हात्रे, कुलदीप आणि आदित्य एकी कडे. बाकी सर्व आप-आपली शॉपिंग करत होते. मी एक स्टोल घेतला माझ्या करिता. दिपाली आणि मनाली ने पर्स घेतल्या. मस्त होत्या म्हणून त्या दोघींच्या  मदतीने मी पण आईसाठी एक पर्स घेतली. फोना-फोनी करून सर्व रोहन आणि अभीने शोधून काढलेल्या टी-शर्टच्या दुकानात भेटलो. लेह मार्केट मध्ये टी-शर्ट वर अमरोडोरी करून देणारी बरीच दुकाने आहेत. इकडे टी-शर्ट वर लेह-लढक संदर्भातल्या गोष्टी अमरोडोरीकरून देतात. प्रत्येकाने आप-आपल्या आवडीचे टी-शर्ट घेतले आणि नसल्यास ऑर्डर केली. सर्वान साठी एक आमच्या ट्रीपच्या रूटचा नकाशा असलेला टी-शर्ट हि बनवायला सांगितला. मी आणि रोहन त्याला आमच्या रूट मध्ये असलेल्या महत्वाचे ठिकाण, पास आणि त्यांची उंची अशी सर्व माहिती द्याला लागलो.
 
आता आमचा दुसरा ठरलेला कार्येक्रम म्हणजे काय, दुपार झाली मग जेवण. शॉपिंगच्या दरम्यान रोहनने नवीन हॉटेल शोधून काढले होते. आम्ही काही जण पुढे हॉटेल मध्ये गेलो आणि बाकी सर्व शॉपिंग आवरून येणार होते. ठरल्या प्रमाणे सर्व वेळेत कधी नव्हते हॉटेल वर जेवणंसाठी आले. पण च्यामारी काय त्या हॉटेलवाल्याला अवदसा सुटली होती. एकही ऑर्डर त्याने वेळेत आणली नाही. जवळ-जवळ २ तास त्याने आमचे  खालले. वरून त्याने बिल मध्ये सुद्धा लोच्या केला, त्यात परत वेळ गेला.

या सर्व कारणास्तव पुढच्या कार्येक्रमाला आम्हाला उशीर झाला होता. पटकन सर्व हॉटेल रेनबो वर गेलो आणि शॉपिंग केलेले टाकले. तयार होऊन सर्व ३.३० वाजता लेह जवळच ६० किलोमीटर वर असलेली १००० वर्ष जुनी अल्ची गुम्पा आणि त्याच्या मध्येच ३० किलोमीटर वर मॅग्नेटिक हिल पहायला निघालो. आज अभी-मनाली गाडीत होते आणि नेहमी प्रमाणे मी-दिपाली बाईक वर. आम्ही कारगिल वरून लेहला १२ तारखेला याच रस्त्याने येताना रात्र झाली म्हणून ह्या दोन्ही जागा पाहू शकलो नव्हतो. म्हणून परत आता त्याच रस्त्याला लागलो. रस्ता मस्त होता ६०-७० ला मी बाईक पळवत होतो. त्याच बरोबर माझी फोटोग्राफी आणि दीपालीची बडबड पण चालूच होती. ते काय आम्हाला सांगायला नकोच. पण त्यामुळे झाले काय मी बाकी सर्वन
पेक्षा मागे पडलो. मॅग्नेटिक हिल्स पार करून अल्ची कडे निघालो. मॅग्नेटिक हिल्सच्या मधून गेल्या वर १२ तारखेला रात्र जसे बाईक खेचल्या सारखी झाली होती न तसेच झाले. एकदम ६०-७० च्या स्पीड वरून मी ४० च्या स्पीडला  लागलो आणि १२ तारखेच्या रात्रची खात्री झाली कि आम्ही मॅग्नेटिक हिल्स मधूनच गेलो होतो.

पुढे अल्ची फाट्या वर आशिष आमच्यासाठी उभा राहिला होता. लेह-कारगील मार्गा वरून अल्ची गुम्पा ५ किलोमीटर आत मध्ये आहे. मग आम्ही वळलो आणि अल्ची गुम्पा कडे निघालो. मी मध्ये परत फोटो काढायला थांबलो, तोपार्येंत सर्व परत पुढे निघून गेले होते. मधेच दोन रस्ते फुटत होते, एक रस्ता खाली आणि एक वरती. मी वरचा रस्ता पकडला. पण बरेच पुढे गेलो तर काही दिसेना, सुदैवाने  आम्हाला काही लोक दिसले. त्यांना विचारले तेव्हा कळाले कि मी चुकीच्या रस्त्यावर आलो होतो, मग काय परत मागे फिरा....मागे फिरून मी अल्ची गावात आलो. इकडे आमच्या बाकी सर्व बाईक्स पार्क केलेल्या होत्या आणि एका बाजूला गाडी पण. मी बाईक लावली आणि दीपालीला बोललो, आहे आपली मंडळी. मी आणि दिपाली अल्ची गुम्पा कडे निघालो. गुम्पाच्या रस्त्यावर पहिली दोन्ही बाजूला काही दुकाने आहेत आणि जरा पुढे सफरचंद, जर्दाळू, पीच आणि एप्रिकॉटची झाडे आहेत. अल्ची गुम्पा हि १००० वर्षे जुनी आहे हे बघूनच जाणवत होते. मी आणि दिपाली एका छोट्याशा इमारतीत चढलो तर तिकडे एक वृद्ध लामा खोलीचा दरवाजा बंद करत होता. मी त्याला  बोललो "एक मिनट रुकीये, हम जल्दी देख लेते है". तो मला बोलला "पैसे रखोगे उधार तो मै खोलता हू". मी मनात बोललो कसला खवचट लामा आहे आणि परत त्याची आळवणी करायला लागलो, पण तो काही केल्या ऐकेना "पैसे रखोगे उधार तो मै खोलता हू". मी त्याला बोललो "पैसे हमारे लीडर के पास हे, मेरे पास नाही", तरी तो ऐकेना. मग काय मी तसाच निघालो, तेवढ्यात तो बोलला "देख लो जल्दी से". आत मध्ये गौतम बुद्धांची प्रतिमा आणि त्याच्या पुढे दिवा लावला होता. ह्याच्या अखेरी पाहण्या सारखे काहीच नव्हते आत. मी फोटो  काढायला गेलो तर तो चिवट माझ्यावर खवसला "पैसा नही देना है और फोटो निकालना है, चलो बहार". मग काय मी निघालो त्याच्या शिव्या खाऊन. पुढच्या भागात आम्हाला आमची बाकी सर्व मंडळी भेटली. अल्ची गुम्पाच्या आत बऱ्याच ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे हे मला इकडे कळले. उगाचच मी त्या वृद्ध लामाला मनातल्या-मनात कोचले असे मला वाटले. या गुम्पा मध्ये ३-४ मुख्य इमारती आहे. त्यात भिंतींवर प्रसंग चित्र काढलेली आहेत. गौतम बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुर्त्त्या आणि प्रतिमा आहेत. सर्व पहिले आणि मी, उमेश, कुलदीप आणि अमेय म्हात्रे परिसरातल्या पुलाची फोटोग्राफी करायला लागलो. रोहन आणि साधना मात्र गुम्पाच्या बद्दल जास्तीस-जास्त माहिती गोळा करत होते. गुम्पाच्या बाहेच्या बाजूने पण आम्ही एक फेरफटका मारला आणि बाईकस कडे आलो.


५ वाजले होते. दीपालीला कंटाळा आला म्हणून ती गाडीत बसली. आता मी आणि उमेश एकत्र होतो. बाईक्स काढल्या आणि सर्व लेहच्या दिशेने निघालो. मध्ये मॅग्नेटिक हिलला थांबायचे असे ठरले. रस्ता मस्त होता म्हणून बाईक्स जरा पळवल्या आणि मॅग्नेटिक हिल कडे थांबलो.
इकडे रस्त्याच्या मध्य भागी चौकोन काढला आहे. इकडे गाडी उभी करयची, न्यूट्रल मध्ये टाकायची आणि ब्रेक सोडून जायचा. आपोआप गाडी हलते असे म्हणतात. आम्ही निरनिराळे प्रयोग करून पहिले. मी पण बाईक उभी करून पहिली पण मला काय तसे जाणवले नाही. तेवढ्यात आमची गाडी आली, ड्राइवरने करून दाखवले. कसे ते माहित नाही पण गाडी हलली. रोहनला ने तर मस्तच पराक्रम  केला. बाईक रस्त्यावरून खाली उतरवली आणि बाजूच्या डोंगरावर घेऊन जायला लागला जोपर्यंत जाते तोपर्यंत. उमेश हे सर्व शूट करत होता आणि मग कशी बशी परत बाईक उलटी फिरवून खाली आला. त्याला पाहून माझ्या मनात पण असे करावेसे वाटले पण मी मनाला आवर घातली कारण माझी बाईक फिरणार नाही त्या जागेत. मॅग्नेटिक हिल हा काय प्रकार आहे हे माझ्या मनात सारखे चलू होते. मुंबईत परत आल्यावर मी त्याचा उलघडा केला. मला असे वाटायचे कि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फिल्ड फार जास्त असेल म्हणून तसे होते. पण तसे नाही गाडी हालण्याचे कारण निराळेच आहे.  त्याचा अभ्यास करताना मला हे आढळले  "After trying this natural phenomenon you may question it's causes. Well, we don't want to disappoint you, but whether it is called a Magnetic Hill, Gravity Hill, Mystery Hill or Electric Brae it is an optical illusion. It has nothing to do with magnetic fields, electricity or unknown forces working along mysterious lines." पण जर हे खरे असे तर मग ६०-७० च्या स्पीड एकदम ४० वर का येतो. मॅग्नेटिक हिल हे काय प्रकरण आहे, हा अजून मला प्रश्नच आहे.

पुढे निघलो, मी आणि उमेश  दोघेही  फोटोग्राफर काही छान दिसले कि आम्ही थांबायचो. मस्त संध्याकाळची वेळ होती, मावळत्या सूर्याच्या किरणात डोंगर, निळ आभाळ, त्यात पांढरे ढग आणि सरळ रस्ता. काय सुंदर नजरा होता तो. मी आणि उमेश  थोड्या  फार गप्पा हि मारत होतो, एवढ्यात मला समोर रस्त्यात मध्ये एक मोठा दगड दिसला. मी तो चुकवायचा प्रयत्न केला पण काय चुकवता नाही आला. ६०चा स्पीड तर नकीच असेल. दगडा वरून उडालो आणि बाईक उजवी-डावी करून कशी-बशी सावरून थांबवली. जरा श्वास घेतला आणि दोघेही एकत्र बोललो वाचलो रे बाबा. नाही तर मजबूत आपटून फुटलो असतो. पण त्या वेळी उमेशने पण मस्त प्रसंगावधनता दाखवली जराही हल्ला नाही पट्या.....आणि ते गरजेचे होते. पाणी पियालो आणि पुढे लेह कडे निघालो. ८ च्या दरम्यान लेहला हॉटेलवर पोहचून सर्वाना घडलेली गोष्ट सांगितली आणि फ्रेश व्हायला गेलो.
  
आता जेवायला कुठे जायचे हा मोठा प्रश्न मला नाही पण आमच्या पैकी काही जणांना. हॉटेल ड्रीमलॅंड नको  आज असे ठरले. मग रोहनने जाऊन एक नवीन हॉटेल शोधले आणि टेबल बुक करून आला. फ्रेश होऊन सर्व जेवायला हॉटेल मोनालिसा मध्ये गेलो. चिकन, मोमो आणि बरेच काही ऑर्डर केले. त्याने आधीच सांगितले कि "थोड़ी  देर लगेगी". तसा आमच्या कड़े  काय पर्याय होता. मग मी अभीला बोललो चल मीटिंग घेऊन टाक तो  पर्यंत. अभी बोलला काय करायची आहे मीटिंग "कोणी दिलेली वेळ पळत नाही आणि मिटींग कशाला". आईला दुपार पासून अभी गप्प का होता त्याचे मला कारण आता उलघडले. मी विचारले काय झाले रे बाबा. तो बोलला दुपारी आपण किती वाजता निघणार होतो आणि आपण कधी निघालो आणि वगरे-वगेरे. मला  त्याच्या रागावण्याचे कारण कळले. वास्तविक दररोज काहीना-काही कारण करून आमच्या पैकी बरेच जणान मुळे  उशीर व्हायचा. त्यामुळे आम्हाला कुठेना-कुठे तरी तडजोड करावी लागत होती. हलगर्जीपणा  आणि बेजवाबदार पणाचा कहर होत होता. पण आजचा उशीर आमच्या मुळे नसून तो दुसऱ्या काही कारणास्तव होता, म्हणून मी अभिच्या काही गोष्टीना सहमत नव्हतो. बाकी सर्व बाबतीत मी अभी बरोबर सहमत होतो. माझ्या आणि त्याच्या मध्ये मजबूत चर्चा सुरु झाली. अधून-मधून रोहन, आशिष, मनाली, अमेय म्हात्रे चर्चेत  सहभागी होत होते. मुख्यता रोहन आणि आशिष. हा विषय तसा गंभीर होता, म्हणून तसे कोणी चर्चेत सहभागी होत नव्हते. आम्हाला तसा हक्क होता, कारण आम्हीं थोडी घासली आहे आमची यात मुख्यता अभी, मी आणि रोहनने. अभिचा मूड फारच खराब झाला होता. मग सर्व सुला होऊन आम्ही जेवायला लागलो.

११ वाजता आम्ही हॉटेल रेनबो वर परत आलो. उद्या आम्ही हे हॉटेल रेनबो सोडून खर्दुंग-ला करून नुम्ब्रा वॅलीत राहायला जाणार होतो, म्हणून एक दिवसाचे लागणारे समान घ्याचे होते. सर्व तयारी करून आम्ही उद्याची वाट पाहत झोपी गेलो. कारण उद्या माझे कितेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार होते. जगातील सर्वोच्च वाहतुकीचा रस्ता आम्ही पार करणार होतो.