27.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - सतरावा दिवस (आईचे रत्नागिरी जिल्ह्यातले १७० किलोमीटर)

३ जून २००५, मी ठरवल्याप्रमाणे आईला तिच्या सर्व देवरुख जवळच्या नातेवाईकांन कडे घेऊन जाणार होतो. याची सुरवात तर कालच कोसुंब मधे येऊन केली. सकाळी उजडायच्या आता आम्ही उठलो. सर्व तयारी करून चहा नाष्टा उरकून आईच्या मामींचा म्हणजे माझ्या आजींचा निरोप घेतला आणि निघालो पुढे. कोसुंब वरून आम्ही निघालो ते संगमेश्वर मार्गे कारभाटल्यात गेलो.

कारभाटल्यात जाण्यासाठी नदीच्या काठेने जावे लागते. मस्त निसर्गरम्य परिसर आहे. कारभाटल्यात आईचे मामा आजोबा राहतात म्हणजे माझ्या आजोबांचे सख्खे मामा. त्यांचे वय ९७ होते तरी पण ते तसे काटक होते. एस.टी. ने एकटे प्रवास करायचे. त्यांच्या कडे एक विशिष्ट प्रकारचे आंब्याचे झाड आहे. आंबा चुपायचा आहे पण त्याच्या रस दह्या सारखा लागत होता, म्हणून त्या जातीच्या आंब्याला तिकडचे लोक दही आंबा बोलायचे. थोडा वेळ त्यांच्याकडे आराम करून मी बरेचशे दही आंबे हाडले आणि तो पर्येंत आई आपल्या सर्व नातेवाईकांशी गप्पा मारत बसली. त्यांच्या गप्पा मारुन आणि माझे आंबे हाणून झाल्यावर आम्ही निघालो, पुढे रत्नागिरीच्या दिशेने. परत संगमेश्वर पार करून मुंबई गोवा महामार्गाने आम्ही हातखांब्याच्या फाट्यावर आलो. आता ऊन डोक्यावर यायला लागले होते आणि एक तास भर बाईक वर बसून आईला थोडा त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही थांबलो आणि मला पण बाईक मधे पेट्रोल घालायचे होते. बाईकला पेट्रोल पाजून आम्ही पुढे निघालो आमच्या गावी टेंब्यला जायला.

रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन सोडून कुवारबाव पार करताच साळवी स्टॉपच्या फाट्यावर डावीकडे वळलो आणि काझर घाटीच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याला लगताच्या आईला तिचे चुलत काका, मधु काकांचे घर याच रस्त्याला आहे असे जाणवले. मग काय माझी सवारी या दिशेने गेली. मधु काकांचे घर रस्त्याला लागूनच आहे....वास्तविक माझे हे आजोबा, पण मी लहानपणा पासूनच आई तिच्या मामा-काकांना ज्या नावाने संबोधीतते त्याच नावाने मी त्यांना संबोधित असतो. पण हे मात्र त्यांच्या कुठे उल्लेख करीत असें तर. मात्र त्यांच्या पुढया आजोबा-आजीच म्हणत असतो.

मधु आजोबांकडे कधीही आणि कुठल्या ही वेळी गेलो तर काही ना काही तरी खाल्ल्या शिवाय ते पाठावतच नाहीत. या आजी-आजोबांचा आग्रह फारच असतो. मग काय त्यांच्या आग्रह आम्हाला मोडवे ना आणि त्याचा कडे नाष्टा करत गप्पा मारत बसलो. थोडा वेळ गप्पा आणि आराम करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. काझर घाटी पार करून आम्ही टेंबे गाव गाठले. काझर घाटी हा परिसर फरच छान आहे सह्याद्री कडून वाहत ऐणारी नदी रत्नागिरीच्या समुद्रात विलीन होणारी आणि आम्ही तिच्या कडेने गती ने चललो होतो. टेंब्याच्या आमच्या साळव्यांच्या ग्राम देवाच्या देवळाकडे आम्ही वळलो.

देवळापाशी बाईक लावली आणि शिरलो देवळात. कोकणातील ग्राम देवतेची देवळे हि वाड्यापासून बरीच लांब असतात. देवळाच्या आजुबाजूला तशी फारशी वस्ती नसते. त्यामुळे देवळात फारच शांतता होती. मला तर अश्या शांत देवळात फारच बरे वाटते. आई नेहमी ग्राम देवतेच्या देवळात येताना आपली सर्व तयारी करून येते. नारळ, खण, तूपाचे दिवे, तांदूळ, अगरबत्ती, हळद-कुंकू, काहीतरी देवाला गोड आणि वगैरे-वगैरे पूजेचे लागणारे सर्व साहित्य. माझा वास्तविक देवाला या सर्व गोष्टी द्याव्या यावर फारसा विश्वास नाही. मी मात्र देवला भेटण्यासाठी नक्की जात असतो. मी गाभार्यातील सर्व देवांच्या पाया पडून देवळाच्या सभा मंडपात आराम करत व शांततेचा आनंद लुटत बसलो. आई मात्र तिने आणलेले सर्व पूजेचे सहित्त्य काढण्यात गुंग होती आणि मी लुटत असलेल्या शांततेच्या आनंदात विरजण घालत होती. ती मला सारखा आग्रह करत होती कि माझ्या हस्ते आणलेले सर्व देवाचे साहित्य देवाला अर्पण करावे. शेवटी कंटाळून का होईना मी तिची ती इच्छा पटा-पट पूर्ण केली व परत शांततेचा आनंद लुटायला लागलो. आता ऊन चांगलेच रण-रणायला लागले होते, म्हणून आम्ही बराच वेळ देवळाच्या सभा मंडपात आराम करत बसलो. देवाशी बराच संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला.

टेंबे हे आमचे मूळ गाव आणि बर्‍याच वर्षां पुर्वी आमचे पूर्वज टेंबे सोडून टेंब्या पासून २५ एक किलो मीटर वर असलेल्या पुनस या गावी स्थायीक झाले आणि तिकडची खोतगिरी करायला लागले. माझ्या बाबांचे चुलत काकांची घरे तिकडे आहेत. आमचे एकही नातेवाईक टेंब्यात नाही आहे म्हणुन नुसते देवळ्यातूनच आम्ही पुढे पुनसला निघालो. पुनसला पण जाताना बराचसा रस्ता नदी काठून आहे. मस्त निसर्गाचा आनंद लुटत आम्ही अर्ध्या तासात पुनस गाठले. पण या अर्ध्या तासात ऊनाच्या आणि गरम्याचा फरच त्रास झाला होता. विशेष करून आईला आणि साहजिक आहे. पुनसेत रस्त्याला लागूनच बाबांचे सुरेश काका यांचे घर आहे. सर्व त्यांना सुरेश तात्या असे संबोधितात. नेहमी आम्ही पुनसेत गेलो की सुरेश तात्यांकडे वस्ती करायचो. म्हणून पहिल त्यांच्या कडे थांबलो. सुरेश तात्या आणि त्याची फॅमिली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कडे निवडणुकीच्या तयारी ची गडबड होती. पण गडबडी तून सुद्धा त्यांनी आमचे आदरतिथ्य करायचे काही सोडले नाही. पण आम्हीच त्यांना खाण्याचा फार काही घाट घालू नका असे सांगितले. आमचे पोट तसे बऱ्या पैकी भरले होते. फक्त आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेतला. मी बाईक वरून एवढ्या लांब आलो या बद्दल त्यांना फारच कौतुक वाटत होते. असो!

सुरेश तात्यांचा मोठ्या मुलाने आम्हाला त्या गडबडीतून सुद्धा वेळ काढून पुनसेच्या ग्राम देवतेच्या देवळात घेऊन गेले आणि मग आमचे मूळ घर दत्ताराम तात्यांन कडे घेऊन गेला. पण त्यांच्या घरात कोणीच नव्हते म्हणून मग मनोहर तात्यांच्या घरा कढे सोडले. मनोहर तात्यांनी घर नवीनचे बांधेल होते. बराच वेळ मनोहर तात्यांच्या घरी आम्ही गप्पा मारत बसलो. यांच्याकडे आम्हाला जेवणाचा फारच आग्रह होऊ लागला आणि तो मोडता आला हि नाही. बराच वेळ ऊनात फिरून आईला पण त्रास झाला होता, म्हणून आम्ही जेवण उरकून आराम करत गप्पा टाकत होतो. बराच वेळ आराम झाला त्यात आईला पण जरा बरे वाटले. थोडासा ऊनाचा मारा पण कमी होईल म्हणून आम्ही सर्वांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचे एकच ठिकाण राहीले होते, कोरले. आईच्या सख्या काकांकडे, आप्पा आजोबांकडे. पुनस सोडले आणि देवढे मार्गे कोर्ल्याच्या रस्त्याला लागलो. अंदाजे २०-२५ किलोमीटरचे हे अंतर आम्ही एका तासात पार केले. मी आधीच काही दिवसान पूर्वी कोर्ल्यात आप्पा आजोबांच्या कडे येऊन गेलो होतो, म्हणून घरा कडचा रस्ता मला माहिती होता. आम्ही सरळ घरीच गेलो. आप्पा आजोबा आणि आजींना त्यांची पुतणी आल्या बद्दल फारच आनंद झाला. बराच वेळ त्यांचात गप्पा चालल्या होत्या. चहा आणि संध्याकाळचा नाष्टा घेऊन परत सर्व गप्पान मध्ये रंगले. थोड्या वेळाने मात्र मी आईला बोललो अंधार पडायच्या आत आपण देवरुखला पोहोचलो पाहिजे. या वेळी पण आप्पा आजोबा आणि आजींने आम्हाला राहायचा आग्रह फारच चालू होता. मात्र आईनेच उद्या देवरुखात काम आहे म्हणून त्यांचा आग्रह मोडला. वास्तविक त्यांचा हा प्रेमाचा आग्रह आम्हाला मोडवत नव्हता. पण काय करणार कामे होतीच ना आणि शिवाय मी काही दिवसान पूर्वीच कोर्ल्यात राहून गेलो होतोच की....

निघताना आज पण आप्पा आजोबांनी गोणी भरून आंबे बाहेर काढले. आता एवढे आंबे आम्हाला बाईक वर न्हायला कसे जमणार? तरी पण आप्पा आजोबा सर्व आंबे घेऊन जा असे आग्रह करत होते. त्यांचा मान राखायला म्हणून आईने पिशवी भरून आंबे घेतले आणि निघालो देवरुखच्या दिशेने. आता हळू-हळू बाईक  चालवत आम्ही चाललो होतो. साखरपा ते देवरुख हा रस्ता फार वळणा-वळणांचा आहे आणि आता अंधार पडायची वेळ पण झाली होती. आज दिवस भराची बाईक भटकंती करून आम्ही बरोबर अंधार पडताना देवरुखला आमच्या घरी पोहोचलो.

आज दिवस भराच्या जवळ-जवळ १७० किलोमीटरचा बाईक प्रवसामुळे आई फारच थकली होती, पण ते सहाजिकच होते. वयाच्या 55नव्या वर्षी बाईक वर फिरणे हे तर फार मोठे धाडसाचे काम आहेच. पण हा दिवस भराचा कठीण बाईक प्रवास आई ने फार जिद्दीने पार पाडला. आता मात्र ती फारच थकली होती. मी तिला काही जेवल्या करून नकोस असे सांगितले आणि बाहेरून जेवायला घेऊन आलो. जेवण उरकून आम्ही झोपी गेलो.

No comments:

Post a Comment