31.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - एकविसावा दिवस (रायगड आणि परिसर)

७ जून २००५, सकाळी ८ च्या दरम्यान सुजयच्या आईने आम्हाला उठवले आणि तयार होऊन नाश्त्याला बोलावले. पटा-पट आम्ही दोघे तयार होऊन नाश्त्याला खाली आलो. नाश्ता तयार होतच. सुजयच्या आईने मला झोप नीट लागली या बद्दल चौकशी केली आणि आम्हाला नाश्ता वाढला. मस्त गरम-गरम घरचा नाश्ता बरेच दिवसांनी मिळाल्या बद्दल लगेच उरकला आणि बसलो टंगळ-मंगळ करत. सुजयचे बाबा ऑफिसला गेले होते. त्यांनी आमच्या करता त्यांची ऑपट्रा गाडी परत पाठवली होती आणि आज आम्ही बाईक कुठेही फिरवायची नाही असे बजावले होते. मग काय आम्हाला त्यांची मर्जी मोडायला जमणार होती काय.


सुजयच्या आईने सुजयला आमच्या आजच्या भटकंती साठी पैसे दिले आणि ड्राइवरला सांगितले की आम्हाला सर्वत्र फिरवायला. आज आमच्या ट्रिपचा सर्वात आरामाचा दिवस होता. मस्त आलिशान गाडीतून आमची भटकंती होणार होती. सुजयच्या बंगल्यातून निघालो आणि बिरवाडी मार्गे भोरघाटाच्या रस्त्याला लागलो. भोरघाट चालू व्हायच्या थोडाच अलीकडे शिवथळ घळ आहे. शिवथळ घळच्या पायथ्याशी ड्राइवरने गाडी थांबवली आणि आम्ही घाळ चढायला लागलो. शिवथळ घळ फार उंचावर नाही आहे, १० मिनटात चढलो.  शिवथळ घळ ही एक फार मोठी गुहा आहे आणि या गुहेच्या बाजूने धब-धबा आहे. आता उन्हाळ्यात मात्र हा धब-धबा सुकलेला असतो पण पावसाळ्यात मात्र मजबूत जोरात पडत असतो. शिवथळ घळाचे प्रामुख्याने महत्त्व दासबोधामुळे आहे. रामदास स्वामींचे बरेच वास्तव्य या गुहेत होते आणि त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ दासबोध याच गुहेत लिहिला. आता शिवथळ घळाचे मठात रुपांतर झाले आहे. आम्ही रामदास स्वामींचे दर्शन घेतले.

आम्ही खाली उतरून आलो आणि निघालो पर्तीच्या दिशेने. आता आमचे पुढेचे ठिकाण होते झुलता पूल. सुजय आधी या ठिकाणी गेला होता. ड्राइवर आणि सुजय हे दोघे पण मला या जागे बद्दल काही सांगायला तयार नव्हते. मला ते फक्त "तू तिकडे गेल्यावर कळेल काय जागा आहे ती" असेच बोलत होते. मी  शिवथळ घळला आधी भेट दिली होती, पण हा झुलता पूल काय आहे ते मला माहीत नव्हते.  म्हणूनच मला फार कुतूहल लागून राहीले होते या जागे बद्दल.
झुलता पुलाकडे जाताना ड्राइवरने आम्हाला रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी फुलात गणपतीचे स्वरूप दिसत आहे असे सांगलीतले. येताना तो आम्हाला तेही दाखवणार होता. ३-४ किलो मीटर पुढे गेलो आणि झुलता पूल लांबून दिसला. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि आम्हाला चप्पल पुलाच्या याच बाजूला काढायला सांगितले. चांगल्या ऊनाने तापलेल्या जमिनीवर पाय ठेवत पण नव्हते आणि आम्हाला तर लोखंडी पूल पार करायचा होता. मी आणि सुजय जे गाडीतून बाहेर पडलो ते सरळ पाळायला लागलो. पूल सुसाट पार केला आणि देवळाच्या सावलीत जाऊन उभे राहिलो. हा झुळता पूल नदीच्या डोहा वर आहे. या डोहात बरेच मासे आहेत आणि डोहाच्या तीरावर देवीचे मंदिर आहे. या परिसरातले लोक डोहातल्या माश्यांना देवीचे माशे बोलता असे मला सुजयच्या ड्राइवर कडुन कळाले. म्हणूनच या ठिकाणी मासेमारी होत नाही. नाहीतर कसले मोठे मासे आहेत या डोहात ते राहिले तरी असते का? देवाच्या करणामुळे राहिले होते आणि नाही तर एवढे सर्व मासे आजू-बाजूच्या गावकर्यांच्या पोटात असते. असो !  

आता बराच वेळ झाला म्हणून आम्ही निघालो परत घराकडे. ठरल्याप्रमाणे ड्राइवरने स्वयंभू गणपतीच्या ठिकाणी गाडी थांबवली. पटा-पट आम्ही फुलात फुललेला गणपती पाहून घेतला आणि निघालो. बऱ्या पैकी उशीर झाला होता, म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता घराकडे पळालो. काकूंनी जेवणाची तयारी करून ठेवलीच होती. आम्ही फ्रेश होऊन येई पर्येंत जेवण वाढण्यात आले. गरम-गरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम करत बसलो. मस्त आराम केला आणि थोडेसे ऊन सरले म्हणून रायगडच्या दिशेने निघालो.  

४ च्या दरम्यान रायगड रोप वे जावळ होतो. तिकीट काढले आणि बसलो रोप वे मध्ये. जस-जसी रोप वे वर जायला लागली तस-तसा सुजय कडक व्हायला लागला. बराच वेळ मला हे जाणवलेच नाही, पण मी जेव्हा सुजयला सांगितले की जरा या बाजूला हो मला एक फोटो काढायचा आहे. तेव्हा तो मला बोलला की जरा गप बस भाड्या, केबल कार बघ किती हलते आहे ते. याच्या पहिले मला माहीत नव्हते की सुजयला उंचीची भीती आहे. आता मला जाणवले मग मी कसला सुजयला सोडतोय. पहिल्यांदा सुजयला पिडायची संधी मिळाली होती, मी काय त्याला सोडणार होतो. सारखे त्याला मी जरा अस होना आणि तसा होना, असे माझे चालू होते. सुजय मात्र मला जरा गप्प बस ना रे तू. तो एवढेच फक्त माझ्याशी बोलत होता. 

रोप वे तून रायगडचा परिसर फारच छान दिसत होता. १५ मिनटात आम्ही रायगडच्या माथ्यावर आलो. केबल कार थांबली आणि सुजयने श्वास सोडला. केबल कारच्या बाहेर येउन तो मला शिव्या घालायला लागला. आता पुढे रायगड किल्ला पायीच फिरायचा होता आणि आम्हाला अंधार व्हायच्या आत परत पायथा गाठायचा होता.  पटा-पट आम्ही रायगडचा बराचसा भाग पाहायचा ठरवले आणि सुटलो. होळी माळ, बाजारपेठ, टकमक टोक, रान्यांचा महल्, मंत्रांचा महल, मंदिर, तलाव करत आम्ही मस्त फिरत-फिरत परत रोप वे कडे आलो. आता परत सुजयला मी पिडायला लागलो आणि सुजय मला शिव्या घालायला लागला. रोपवेत बसलो आणि सुजय परत कडक झाला. रोप वे तून उतरून आम्ही पर्तीच्या रस्त्याला लागलो आणि घराकडे निघालो. घरी पोहोचे पर्येंत सुजयचे बाबा ऑफीस मधून घरी परतले होते. आजचा दिवस फार मस्त गेला.  सुजयच्या आई-बाबानी आम्हाला फारच फिरवले. आम्ही फ्रेश होऊन जेवायला खाली आलो. मस्त शानदार सुजयच्या आई-बाबान बरोबर आरामात जेवण चलले होते. आता मात्र सुजयच्या आई-बाबानी गोड शब्दात आमची कान उघडणी करायला सुरवात केली. मुद्दे होते एम.एस.सी. त्यानंतर पुढे काय? बाईक ट्रिप व अशी भटकंती कशाला आणि वगैरे-वगैरे…… 

जेवण उरकून आम्ही सर्व गार्डन मधे मस्त आराम करत बसलो होतो आणि आता मात्र सुजयचे आई-बाबा आम्हाला आमच्या भल्याच सांगायला लागले. विशेष करून सुजयला कारण त्यांच्या मते सुजय कोणाचेच काही ऐकत नाही. आता सर्व चर्चा सुजयच्या वागणुकी बद्दल चालू होती. त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल. बराच वेळ या सर्व विषयावर चर्चा करून शेवटी सुजयचे आई-बाबा हतबल होऊन, मी सुजयला काही तरी समजवावे असे त्यांचे मत होते. उद्या सकाळी आम्हा सर्वांना लवकर मुंबईला निघायचे होते म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला पाठवले. आम्ही कसले झोपतोय, रूम वर गेल्यावर परत या गोष्टीन वर चर्चा करायला लागलो. किंबहुना मी बराच वेळ सुजयचे डोके खात होतो.  त्याने त्याच्या आई-बाबांचे सांगणे नीट ऐकायला हवे आणि वगैरे-वगैरे. बराच वेळ मी सुजयचे मजबूत डोके खाल्ले आणि यातच आम्ही झोपी गेलो.

No comments:

Post a Comment