25.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - दहावा दिवस (कोल्हापूर ते कोरले)


२७ मे २००५, सकाळी आरामात उठलो आणि प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. आज आमच्या या बाईक ट्रीपचा पहिला भाग खऱ्या अर्थाने संपला असे म्हणत आम्ही दुशिकडच्या दिशेने जायला सज्ज झालो. राव वा राजू आज पुण्यात जाऊन मग थोडा आराम करून उद्या मुंबई गाठणार होते आणि मी देवरुखात राहून आईची राहिलेली कामे करणार होतो. आईला पण मुंबई वरुन एस.टी. ने देवरुखात बोलावले होते.

नाष्टा करून रावच्या प्रेमळ परिवारचा निरोप घेतला आणि पुन्हा भेटू असे बोलत आम्ही आप-आपल्या मार्गाला लागलो. उन्हाचा तडका लागत होताच. मी कोल्हापूरची पंचगंगा नदी ओलांडून गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो. बाइक मधे पेट्रोल थोडे कमी होते म्हणून कोल्हापूरची हद्द सोडली आणि पहिला मोठ्या पेट्रोल पंपावर बाईकला पण नाष्टा करवला. गगनबावड्याच्या रस्ता हाच आहे याची खात्री करून निघालो गगनबावड्याच्या दिशेने. कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर अंदाजे ६० किलो मीटर आहे.  मस्त आरामात कोल्हापुरचा परिसर पाहत मी सुमारे २ - २.३० तासाने गगनबावड्याच्या चौकात पोहोचलो. गगनबावड्यातून कोकणात उतरायला २ घाट आहे, चौकातून डावीकडच्या रस्त्याने घाट उतरून वैभववाडीला जातो आणि उजवीकडच्या रस्त्याने घाट उतरून खारेपाटणला जातो. मी चौकातच गगनगड कडे जायचा रस्ता विचारून घेतला आणि गड पाहायला गेलो. गडाच्या जवळ पर्येंत बाईक नेऊन लावली आणि पायी गड फिरायला लागलो.

गड तसा काही फार मोठा नव्हता. गडावर गगनगिरी महाराजांचे मठ आहे. चारी बाजूने गडला फेर-फटका मारुन मी मठ पाहायला लागलो. उंनहाचा फार तडका लागायला लागला म्हणून मी थोडा वेळ मठात बसून आराम करून घेतला. गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला. गडा वरुन बाईक उतरवली आणि लागलो रस्त्याला. आता मला तर्ली घाट उतरायचा होता. तर्ली घाटाचा रस्ता फारच अरुंद आणि कच्चा होता. रस्ता एवढा अरुंद होता की समोरून गाडी आली तर मला थोडे हळू व्हावे लागत होते. कसे बसे त्या गर्मिचे चटके खात मी घाट उतरलो आणि पुढे राजापूर-पाचल कडे कसे जायचे हे विचारू लागलो. पुढच्या रस्त्याची विचारपूस करून निघालो.मी मस्त आरामात बाइक चालवत होतो, फार काय पळ-पळ नव्हती माझी. माधेच एके ठिकाणी भल्या मोठ्या विहिरीवर गावकरी लोक पाणी भारत होते. ते पाहून मी त्यांना पाचलचा रस्ता विचारला आणि पोट भरून पाणी पिऊन घेतले व भरून पण घेतले.थोडा वेळ इकडेच मस्त सावलीत आराम करून मी निघालो पुढे. पाचल येई पर्येंत दुपार उलटली आणि आता मला भूक पण लागली होती. पाचल एस.टी. स्टॅंड जवळच मस्त मिसळ पाव - वडा पावचे हॉटेल पाहिले आणि घुसलो जेवायला. मस्त गरम-गरम आणि झन-झणित मिसळ हाणली आणि थोडा वेळ चहा पीत आराम करत बसलो. बराच वेळ निवांत घेऊन पुढे साखरप्याला किंवा देवरुखला कसे जायच याची विचार-पूस करयला लागलो. सर्व माहिती घेतली आणि निघालो आरामात साखरप्याच्या दिशेने.

मस्त आरामात आजूबाजूच उन्हाळ्यातला राकट निसर्ग पाहत मी पुढे चाललो होतो. १ तासाभराची बाईक दवडल्यावर पुढे येईल त्या गावा कडे किंवा मस्त छान पैकी सावली मिळेल तिकडे थांबेन या विचारात होतोच आणि लगेचच मला एक गाव लागले. निवांत कुठे बसता येईल का? हे पाहता पाहता कळले की हे गाव लांजा तालुक्यातील कोरले हे गाव आहे. कोर्ल्यात माझ्या आईचे सख्या काकांचे घर आणि भली मोठी आमराई आहे हे मला माहिती होते. कोल्हपुरला मी जया मामाकडे गेलो होतो त्यांचे हे वडील आणि माझे "आप्पा" आजोबा. कोल्हापुरात जया मामाकडे गेलो होतो तेव्हा कळाले होते की आप्पा आजोबा सध्या कोर्ल्यातच आहेत. आता नकळत फिरत फिरत त्यांच्या एवढ्या जवळ पर्येंत येऊन पोहोचलो होतो आणि त्यांना न भेटता तसेच सरळ पुढे जायचे मला काय जमले नाही. वास्तविक आपल्या जिवाळ्यच्या माणसांच्या एवढ्या जवळ आल्यावर त्यांना किमान थोडा वेळ तरी भेटावे असे मला नेहमीच वाटते. याच माझ्या स्वभावाला निरसून मी वागलो. चला पाहूया आप्पा आजोबांचे घर भेटते का? याचा प्रयेत्न तरी करून पाहु असे मी माझ्याशी बोलून एका पानवल्याच्या टपरी जवळ असलेल्या काही माणसांना विचारले की कदमांचे घर कुठे आहेत. मग कुठले कदम आणि वैगेरे-वैगेरे अशी बरीच प्रश्नावली माझ्यावर आली. मी बोललो भातगावचे कदम आणि कोल्हापुरात राहतात ते आणि त्यांची बरीच मोठी आंब्यांची बाग आहे ते. मग लगेच मला त्या माणसांच्या पैकी एकाने लांजाकडे जाणार्‍या रस्त्याने जरासे पुढे जा आणि एक छोट्याश्या मोरी जवळच त्यांची बाग आहे असे सांगितले.

त्या गावकरी मंडळींना धन्यवाद म्हणत मी लांजाच्या रस्त्याला लागलो. अर्धा किलोमीटर भर पुढे गेलो आणि मोरीच्या अलीकडेच डाव्या हाताला मला आप्पा आजोबांची बाग लागली.गेटातून मी आत शिरलो. माझ्या बाईकचा आवाज ऐकून आप्पा आजोबाच बाहेर आले आणि माझ्याकडे आश्चर्य मुद्राने पाहू लागले. बहुदा हा कोण मूर्ख बाईक स्वार आमच्या बागेत आला हा त्यांच्या मनात विचार चालला असावा. मी हेल्मेट काढले आणि त्यांना प्रश्न केला "ओळखले का आप्पा आजोबा मला". पण एवढात त्यांनी मला ओळखले होते आणि ये ये रे एवढ्या लांब बाईकने कसा आलास आणि वैगेरे-वैगेरे बरेच प्रश्न विचारात घरात घेऊन गेले. आत आजींना आजोबांनी मी आलेल्याचे कळवून माझ्यासाठी पाणी घेऊन आले. दोघा आजी-आजोबांनी मिळून मला बरेच प्रश्न विचारून पुरे-पूर करून सोडले. वास्तविक मी बाईकने एवढ्या लांब फिरत फिरत आलो यामुळे त्यांचे फार प्रश्न नव्हते, ते दोघेहि मला ओरडत होते. त्यांचा  माझ्यावर एवढा हक्क आहे. मी आपला कसे-बसे, असे नाही तसे आणि इकडे तिकडे फिरवा फिरवीची उत्तरं देऊन त्यांना शांत करायचा प्रयेत्न करत होतो. बराच वेळाने सर्व शांत झाले आणि मला फ्रेश होण्यास सांगितले.

संध्याकाळ झाली होती मस्त फ्रेश होऊन मला आप्पा आजोबा त्यांची आमराई दाखवायला घेऊन गेले. उन्हाळ्यात सूर्य मावळण्याच्या वेळी मस्त वारा सुटला होता आणि यातून  नातू-आजोबा मस्त गप्पा मारत आमराईत फिरत होतो. आप्पा आजोबांनी मला आंब्याची, काजू, फणस, नारळ, फोफळी, गांडूळ खात प्रकल्प आणि वैगेरे-वैगेरे अशा बऱ्याच गोष्टी दाखवत मस्त एक-दीड तसांची बाग भटकंती करवली. मुळात मला पण या गोष्टींची फार आवड आहे म्हणून मी पण यात मज्जा लुटून घेतली.जेवणाचा बेत आम्ही बाग फिरायला जायच्या आधीच आप्पा आजोबांनी आजीला सांगून ठेवला होता. मस्त ओल्या काजू आणि बटाट्याची भाजी, तांदळाची गरम-गरम भाकरी आणि वरण-भात. या वरुन मला सर्वात जास्त आवडणारे म्हणजे आंबे…. आप्पा आजोबांच्या बागेत मस्त रसाल आणि चवदार तरतरीत आंबे मी हक्काने मनभरून हान्डले. नक्कीच ६-७ आंबे तर मी उडवले असतीलच. पोट भरून जेवून सर्व आवरा-आवर करून मी आप्पा आजोबा आणि आजींन बरोबर गप्पा मारत बसलो आणि निवांत झोपी गेलो.

No comments:

Post a Comment