11.5.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - तिसरा दिवस (कशेळी ते मालवण)

०७ जून २०१०, सकाळी आम्ही लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी आवरून घेतले. आज अंघोळीला सुट्टी होती. सर्व सामान भरले आणि बाईकला लावायला लागलो. एवढ्यात मंदिराचे दुसरे सेवेकरी आमच्या कडे आले आणि त्यांनी अमेय साळवी कोण असे विचारले. मग मी पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी चर्चा करु लागलो. त्यांनी मला विचारले कि तुम्ही फक्त १०० रुपयेच भरले आणि तुम्ही एकूण ५ व्यक्ती आहात. इकडे राहण्याचे प्रत्येकी १०० रुपये घेतले जातात. त्यांच्या अश्या बोलण्या मुळे मी व राव जरा वैतागलो. मी त्यांना सांगितले की आम्हाला भागवतांनी जेवढे पैसे सांगितले तेवडेच पैसे आम्ही त्यांना दिले. त्यांनी जर आम्हाला ५०० रुपये सांगितले असते तर तेवढे दिले असते. या सर्व चर्चेत राव थोडासा जास्त वैतागला आणि मला बोलला देत्यांना वरचे ४०० रुपये. राव वैतागलेला पाहून मग मात्र ते आम्हाला बोलले राहू दे आता ठीक आहे. भागवतांना माहिती नव्हते दरात बदल झाला आहे. आता आम्ही थोड्याश्या वैतागलेल्या मूड मध्येच होतो. पण आम्ही कालच धर्मशाळेत नाश्त्या साठी सांगितले होते. म्हणून हलकासा नाश्ता केला आणि त्यांचे कालचे जेवणाचे व आता नाश्त्याचे पैशे दिले. सर्व सामान बाईक वर लावून निघालो पुढच्या दिशेने.



आमचा पुढच्या टप्पा होता येशवंतगड. कशेळी ते
येशवंतगड हे अंतर सुमारे २० एक किलोमीटर आहे. तासा भरात आम्ही येशवंतगड गाठला. येशवंतगड गावाकडे जातानाच मध्ये आम्हाला डाव्या बाजूला गडाची तटबंदी दिसली. हाच येशवंतगड असावा असे वाटले म्हणून थांबलो. रस्त्या वरुन माळरानात बाईक घातल्या आणि गडाच्या बाजूला झाडाखाली बाईकस लावल्या. गडाच्या एका बुरुजावर येशवंतगड अशी पाटी दिसली आणि खात्री झाली कि हाच आहे येशवंतगड . आता गडाचा दरवाजा कुठल्या बाजूने आहे त्याचा सोधा सुरु झाला. एक-दोन गावचे लोक गडाच्या बाहेर येताना दिसले आणि गडाचा दरवाजा कळला. आम्ही गडाच्या आत शिरलो आणि लगेच एक मंदिर लागले. मंदिराच्या जवळ सर्वच आराम करत बसलो. थोडी मस्ती झाली आणि मग फोटो काढत गड फिरायला लागलो. बुरुजाच्या बाजूने जाणारी वाट पकडली. तसे गडावर पाहायला काहीच नाही आहे. आम्ही नुसते फिरत होतो. गड फिरत असताना मध्येच मला लक्षात आले की मी माझ्या बाईकची चावी बाईक वरच ठेवली आहे. जरासा मी टेन्शन मध्ये आलो होतो पण मग सर्व मला भरपूर शिव्या घालू लागले. त्यात मात्र माझे टेन्शन निघून गेले. या चावी मुळे आम्हाला गड पटा-पट पाहायला लागला. गड तसा बर्या पैकी लांब लचक होता. पण फार दाट झाडी वाढल्या होत्या आणि तसे काही पाहण्या सारखे विशेष नव्हते. बराचश्या पडक्या भिंतीचे अवशेष होते. लगेच काही इकड तिकडचे फोटो काढले आणि आम्ही गडाच्या बाहेर आलो. पळत बाईक जवळ गेलो आणि पाहतो तर चावी तशीच होती. आता पुन्हा सर्वांनी मला एकदा शिव्या घालून घेतले.




पाणी वगैरे पिऊन घेतले आणि सुटलो पुढच्या गडाकडे. आमच्या पुढच्या गड होता आंबोळगड. येशवंतगड वरुन आंबोळगड जवळच आहे, सुमारे १० किलोमीटरच. सकाळचा नाश्ता करून सुद्धा आता सर्वांना परत भुका लागल्या. पहिला गड फिरूया आणि मग नाश्ता करूया असे ठरले. आंबोळगडा च्या जवळ आलो तसे समुद्राचे दर्शन झाले. आता उन पण डोकवायला लागले होते. सकाळच्या वेळी आंबोळ गावात शिरलो तर गावातल्या लोकांची वरदळ चालू होती. आम्ही तिकडच्या काही लोकांना आंबोळगडचा रस्ता विचारला. त्यांनी समोरच असलेल्या देवळाच्या बाजूला एक ५-६ गुंत्यांची व १०-१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथरा दाखवला. वास्तविक सध्या आंबोळगड असे काही राहीले नाही आहे. फक्त एक ५-६ गुणत्यांचा व १० -१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथराचा राहिला आहे आणि मध्या भागी प्रचंड मोठे वडाच्या झाडाचे जंगल झाले होते. आम्ही बाईक देवळाच्या बाजूला लावल्या. एके काळी आंबोळगड म्हणून ओळखला जाणारा आणि आता जमीन दोस्त होऊन फक्त चौथरा रलेल्या गडाला एक प्रदक्षिणा मारली व परत बाईक जवळ आलो. आज त्या देवळात कसले तरी कार्यक्रम होते. आंबोळगड मध्ये आल्या पासून देवळातल्या कर्णाच्या आवाजाने आमचे डोके दुखायला लागले होते. जोकाय गड पाहायला मिळाला त्याने आधीच फार निराशा झाली होती.



आंबोळगड वरुन निघालो पुढे. रस्त्यात छोटेसे गावठी हॉटेल यशोदा दिसले. आम्ही लगेच बाईक थांबवल्या आणि घुस्लो आत. मस्त सर्वांनी मिसळ-पाव, वडा मिसळ मागवले. खरे तर तिकडे दुसरे काही नव्हतेच, हेच मिळत होते. बराच वेळ आम्ही तिकडे टाइम पास करत बसलो. या ब्लॉगसाठी म्हणून नाश्ता करताना फोटो पण काढत होतो. बराच वेळ गप्पा झाल्या आणि पुन्हा बाईक वर स्वार होऊन आता लागलो जैतापुरच्या मार्गाला. जैतापुरच्या पुलावर आलो आणि मस्त निसर्गाचे दर्शन झाले. त्यामुळे आज फोटोग्राफी साठी मस्त दिवस होता आणि आम्ही पण उत्साहाने भरून वाहत होतो. जैतापुरच्या पूला वरून सुटलो ते अधून-मधून आम्ही बरेचदा बाईक थांबवून फोटो काढत होतो. जयतापुर वरुन विजयदुर्गा कडे जाणारा रस्ता तर फारच मस्त होता. आजू-बाजूचे लाल मातीचे व चीऱ्याचे माळरान होते. पुढे तर बराचसा सरळ रस्ता होता. मला तर आम्ही कोकणात बाईक चालवत आहे असे वाटतच नव्हते. कुठे तरी अमेरिकेत किव्हा ऑस्टेलियात सरळ लांब लचक रस्त्याने चाललो आहोत असे वाटत होते. जस-जसे आम्ही विजयदुर्गा च्या दिशेने जवळ चाललो होतो, तसे आता लाल मातीचा रस्त कमी झाला होत. आता एका बाजूला समुद्राचे पाणी लागले होते. आम्ही छोटेसे उतरण उतरून पठारा वरुन समुद्र सपाटीला आलो होतो फोटो काढावेसे वाटले म्हणून थांबलो. आज वातावरण मस्तच वाटत होते आणि आम्हला पण त्यामुळे जरा उत्साह येत होता. गरम तर होत होतेच, पण आकाशात पावसाळ्या पूर्वीचे तुरळत ढग आले होते.










विजयदुर्ग खाडीचा पुल पार केला आणि मस्त २ एक तासांच्या व जवळ-जवळ ५० एक किलोमीटरची बाईक चालवून आम्ही विजयदूर्ग जवळ पोहोचलो. पण हा विजयदुर्गचा रस्ता फारच मस्त होता. या रस्त्यावर बाईक चालवायला फार मज्जा आली. विजयदुर्ग बंदरावर पोहोचलो आणि विजयदूर्ग किल्ल्याचे संपूर्ण दर्शन घडले. आज फोटोग्राफी करायचा माझा फारच मूड होत होता, म्हणून मी सारखे थांबून फोटो काढत होतो. विजयदुर्ग बंदरा वरच आम्ही बाईक थांबवून फोटो काढायला लागलो. विजयदूर्ग किल्ल्याच्या बाहेरच दुपारच्या उन्हाच्या माऱ्या मुळे एका हॉटेल जवळ बाईक लावल्या आणि शिरलो आत हॉटेल मध्ये.





सर्व प्रथम मँगोला मागवला आणि आप-आपला गळा ओला करून घेतला होता. या हॉटेल वल्यांना आमच्या बाईक व त्यावरच्या सामना कडे लक्ष ठेवा असे सांगून निघालो विजयदुर्ग पाहायला. विजयदुर्ग किल्ला फारच मोठा आहे. आमच्या आता पर्येंतच्या सागरी किल्ले भटकंती मधला जंजिरा पेक्षाही बराच मोठा आहे. संपूर्ण किल्ला आणि त्याची तटबंदी सर्वच चांगल्या अवस्थेत अजूनही साबुद आहे. मी व राव किल्ल्याच्या बाहेरूनच फोटो काढत सुटलो. किल्ला पाहता-पाहता मी, अक्षता व राजू आणि राव व उन्मेश असे विभागले गेलो. विजयदुर्ग या किल्ल्याला बरेचशे पर्येटक भेट देतात पण अश्या ठिकाणी सार्वजनिक शौच्यालय पण नाही आहे. पुरूष मंडळी काय कुठेही मुत्र विसर्जन करू शकतात, पण स्त्रियांचे काय? असो! जर एवढी समज अपल्या समाजातल्या त्या वर्गाला असती तर आज आपला देश प्रगत देशान मध्ये गणला असता. अश्या आमच्या चर्चा झाल्या आणि अक्षतासाठी मुत्र विसर्जन करण्यासाठी जागा शोधायला लागलो. तट बंदीचा एक आडोसा पाहून दुशीकडे मी व राजू पाहारा देत अक्षताने आपल काम उरकून घेतले.














सर्व किल्ला पाहून आम्ही एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसलेल्या राव व उम्नेश पाशी आलो. आता आम्ही पण थकलो होतो त्या उन्हात गड फिरून. रावने आम्हाला मस्त गार पाणी (त्याच्या नवीन बाटलीतले) दिले व थोडासा उरलेला मँगोला पण दिला. जरा वेळ आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या सावलीत आराम करून घेतला. तिकडे मस्त हवा पण येत होती. जरा बरे वाटले आणि निघालो विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेर.









बाईक लावलेल्या हॉटेल जवळ आलो आणि हॉटेलच्या बाहेरूनच पाण्याच्या थंड बाटल्या वा मँगोला मागवला . थोडा-थोडा मँगोला प्यालो आणि निघलो पुढे देवगडच्या दिशेने. ३. ३० वाजले म्हणून मध्ये कुठेही न थांबता आम्ही एका तासात ३० किलोमीटर अंतर पार करून देवगड शहर गाठले. तिकडे कळाले की देवगड किल्ला शहरा पासून ३-४ किलोमीटर बाहेर समुद्राच्या जवळ आहे. पण आता सर्वांना फार भूक लागली होती विशेष करून राजुला. मग सर्व मत करून आम्ही हॉटेल शोधायला लागलो. बरीच शी जेवणाची हॉटेल आता बंद झाली होती. मग परत शोधत-शोधत देवगड सहराच्या एक किलोमीटर मागे आलो. एक हॉटेल उघडे दिसले पण तिकडे हि जेवण नव्हते मिळणार, फक्त नाश्ताच मिळणार होता. मग काय भुका तर फारच लागल्या होत्या. पटा-पट नाश्ता ऑर्डर केला. या हॉटेल मधे पाव-भाजी, इडली सांबार अश्यच गोष्टी मिळत होत्या. किमान मिसळ वगैर तरी मिळाले असते तर बरे वाटले असते. मग काय करणार आम्ही पण पाव-भाजी, इडली सांबार असाच नाश्ता मागवला. आज जरा आमची तंगड तोड जास्त झाली होतो आणि उन्हाच्या मार्या मुळे सर्व फारच थकले होते. नाश्ता येई पर्येंत सर्वांनी तोंडावर पाणी मारुन फ्रेश होऊन घेतले. आता मात्र सर्व सुस्तावले पण होते, नाश्ता येई पर्येंत आम्ही रेंगाळत आराम करून घेतला. नाश्ता यायला पण फारच वेळ लागला होता.

नाश्ता उरकून मस्त गरम गरम चहा मारला आणि तरतरी आणून सर्व देवगड किल्ल्याच्या दिशेने निघालो. देवगड किल्ला छोट्याश्या टेकडाच्या पठाराला तटबंदी करून बनवलेला किल्ला आहे. देवगड किल्ल्याच्या पठारा वर बाईक जाते आणि किल्ल्याच्या आत पर्येंत. आम्ही किल्ल्याच्या आत शिरलो तिथे लागूनच असलेल्या तटबंदीच्या समोर ओळीने बाईक लावल्या. सामान तसेच बाईक वर ठेवले आणि किल्ल्याच्या आत असलेल्या एकमेव मंदिरात गेलो. देवाचे दर्शन घेतले आणि सर्व बाजूने किल्ला फिरायला लागलो. समुद्राच्या बाजूच्या तटबंदी जवळ आम्ही गेलो. समुद्राच्या दिशेने काळे ढग दाटून येताना आम्हाला दिसु लागले होते. ढगाच्या आतून मावळणाऱ्या सूर्याचे किरण बाहेर डोकावत होते. पाहायला हा नजारा फारच मस्त वाटत होता. राव या नजाऱ्याचे फार फोटो काढत होता. मी एखाद-दुसरा फोटो कडून घेतला. मस्त शांत वातावरण झाले होते. उन ढगा आड गेले होते. पण आता पुढे जोरचा पाऊस कोसळणार याची मला शक्यता वाटतच होती. तसे मी रावला बोलून सुद्धा दाखवले.






आम्ही सर्व बाईक पर्येंत आलो आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. इतक्यात मजदूत जोरचा वारा सुटला आणि पावसाचे थोडे-थोडे शिंतोडे पडायला लागले. आता तर एक मोठी सर नक्कीच येऊन जाणार याची आम्हाला खात्री पटली कारण सर्वत्र वारा आणि ढगाने अंधार केला होता. माझ्या कडे एक टारपोलिन होते ते मी काढले. मी व रावने आमच्या बाईक वर लावलेले सर्व सामान जेम-तेम टारपोलिनने झाकून घेतले. हे काम होते न होते एवद्यात जोरची सर आली आणि आम्ही आमच्या सगळ्या कॅमेरच्या आणि बाकी सर्व छोट्या बॅगा घेऊन मंदिराकाडे पळालो. एक छोटीसीच सर आली आणि वारा पण जोरात सुटला होता. हे टारपोलिन फार वेळ बाईक वरचे सामान पाउसा पासून वाचवू शकणार नव्हते हे आम्हाला जाणवले. मी, राव, राजू व उन्मेश थोडासा पाऊस सरला म्हणून बाईक कडे पळत गेलो. बारीक पावसात बाईक वर लावलेले सर्व सामान काढले आणि घेऊन मंदिराच्या अंगणात ठेवले. आता परत मजबूत जोरचा पाऊस कोसळायला लागला. बराच जोरात पाऊस पडत होता. मंदिराचे अंगण फारच छोटे होते आणि त्यात आमचे सामान व बाकी सर्व माणसे पण उभी होती. बराच वारा सुटला होता म्हणून बर्या पैकी पावसाचे पाणी अंगणात येत होते. मी आमचे सर्व सामान टारपोलिन ने झाकून घेतले.

अर्ध तास भर मजबूत पाऊस पडला आणि मग पूर्ण पणे थांबला. या सर्व करामतीती आम्ही थोडेसे भिजालो पण होतो. आता एक-एक करून बाकीची सर्व माणसे पाऊस थांबला म्हणून मंदिरातून बाहेर पडायला लागली. जरा अंगणात जागा झाली म्हणून आम्ही सर्व आमच्या सामानाची जमवा जमवी करू लागलो आणि सामान व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. आमचे वर-वरचे थोडेसे सामान भीजले होते पण आतले सर्व सामान प्लास्टिक पिशव्यात होते म्हणून व्यवस्थित होते. अजूनही पावसाचे लक्षण दिसत होते आणि आम्हाला अजून ५० एक किलोमीटर जायचे होते. आता काही वेळात अंधार पण होणार होता. आम्ही सर्व आमचे सामान पटा- पट बाईक वर परत लावले आणि आमच्या कडे असलेल्या टारपोलिन ने सामान बांधून घेतले . पाऊस थोडा रिमझिमत होताच व अंधार पण पडायला लागला होता. आज कुठल्या ही परिस्तितित आम्हाला मालवण गाठायचे होते. मालवण मधे आमचा मित्र प्रशांत आचरेकारचे घर आहे आणि तो व त्याचा मोठा भाऊ हेमंत आज मालवण मध्ये दाखल झालेले होते. रावने प्रशांतला कळवले की आम्ही देवगडला आहोत आणि पावसाने आम्हाला जकडले आहे. म्हणून मालवणात पोहोचायला जरा वेळ होईल, किंभव्ना रात्र होईल. प्रशांतशी सविस्तर फोना-फोनी केली आणि निघालो मालवणच्या दिशेने.

आता संपूर्ण अंधार पडला होता. देवगड शहरातून आलो त्याच रस्त्याला लागलो आणि मग उजवी कडे वळलो मालवणच्या दिशेने. आम्ही जरा आरामात चाललो होतो, याची बरीच कारण होती. पाऊस पडून गेल्या मुळे रस्ता ओला होता, अंधार पडला होता, बारीक पाऊसा मुळे हेल्मेटच्या काचेवरचे पाणी अंधारात त्रास देत होते. या सर्व कारणानं मुळे कमी दिसत होते. आम्ही हळू-हळू ३० किलोमीटरचा प्रवास केला होता न होता तेवढ्यात परत एकदा मजबूत जोराचा पाऊस आला. सुदैवाने आम्हाला समोरच एस.टी ची शेड दिसली. बरीचशी दुसरी माणसे पण इकडेच थांबली होती. आम्ही आमच्या बाईक वरचे सामान बर्यापैकी प्लास्टिक मधे झाकून घेतले होते. मागास सारखे बाईक वरचे सर्व सामान एस. टी शेड मधे घेऊन घुसलो. आता मात्र बराच जोरात पाऊस कोसळत होता. जवळ-जवळ पाऊण एक तास शेड मधे बसलो होतो, पाऊस एकदाचा कधी जातोय याची वाट पाहात होतो. या कालावधीत राव व प्रशांत मध्ये बरेचदा फोना-फोनी झाली. जास्त उशीर झाला तर आम्हाला मालवण मधे जेवायला मिळणार नव्हते असे त्याचे सांगणे होते. त्याने आम्हाला १० पर्येंत कसेही करून या असे सांगितले. आम्ही त्याला बोललो बघतो कसे काय जमतेते आणि पाऊसा वर अवलंबून होते आणि पाऊस जायची वाट पाहत बसलो होतो.

पाऊस थांबल्या बरोबर आम्ही पटा-पट बाईकवर सामान लावले आणि सुटलो . शेवटचे २० किलोमीटरचे अंतर आम्ही कसे बसे बारीक पावसातून हळू-हळू एका तासात पार केला. जेम-तेम आम्ही १० वाजायच्या १० मिनिटे असताना प्रशांतच्या घरी पोहोचलो. प्रशांतने आम्ही ५ जण येणार याची हॉटेल वाल्यांना आधीच अंदाज दिला होता. हॉटेल अथिति बांबू हे प्रशंतच्या घरा समोरच होते. बाईक घराकडेच लावल्या आणि तसेच हॉटेल मधे शिरलो. सर्वांनी आप-आपपल्या ऑर्डर प्रशांतला सांगितल्या मी मात्र मालवणात आलो म्हणून माश्या शिवाय काय सांगणार. किती थकलो तरी मला माश्याच्या जेवणाची फार भूख् लागली होती. प्रशांतने आमच्या साठी पापले थाळी सांगितली. आम्ही फ्रेश होऊन घेतले आणि लगेच जेवणाला आलो. मस्त गरम गरम जेवण सर्वांनी सुरवात केली आणि गप्पा मारत आरामात जेवणाचा आस्वाद घेत होतो.

जेवण उरकून सर्व परत प्रशांतच्या घरी आलो. आता मात्र सर्वांना सुस्ती आली होती आणि येणारच सर्वच फार थकलो होतो. आमचे बाईकवरचे सामान पण काढायला आणि प्रशंतच्या घरी पहिल्या मजल्यावर न्याहला सुद्धा कंटाळा आला होता. मी व रावने कसे बसे सर्व सामान काढले आणि प्रशांत व हेमंत सहित सर्वांनी सामान वर न्याहायला मदत केली. सामान ठेवले, फेश झालो आणि कपडे बदलून बराच वेळ रिलॅक्स गप्पा मारत बसलो. प्रशांत आणि हेमंतला आमच्या आता पर्येंत ट्रीपच्या गोष्टी सांगायला लागलो. प्रशंतचे मालवणचे घर बरेच मोठे आहे. प्रशांतने मला व अक्षताला एक स्वतंत्र खोली दिली. अक्षता आज मात्र फारच थकली होती. म्हणून तिला निवांत झोपवले आणि मी, राव, राजू, प्रशांत, हेमंत व उन्मेश बराच वेळ गप्पा-टप्पा मारत दिवस भराच्या प्रवासाचा त्राण घालवू लागलो. जवळ पास १२ पर्येंत गप्पा चालल्या आणि मग सर्व झोपी गेलो.

No comments:

Post a Comment