11.5.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - दुसरा दिवस (देवरुख ते कशेळी)

०६ जून २०१०, आज आमचे सकाळी लवकर उठायचे ठरले होते. पण कालच्या प्रवासाने सर्वच फार थकलो होतो. पहाटे लवकर ठरवलेल्या वेळी आम्ही कोणीच उठलो नाही. पण मी, अक्षता, उन्नु आणि राजू मात्र ८ पर्येंत सर्व उठलो होतो. राव सर्वात शेवटी उठणार असे ठरले, असे करत करत तो लोळत होता. तो उठे पर्येंत आम्ही सर्व आंघोळ व प्रातविधी उरकून तयार झालो, तरी राव काही उठेना. आता सर्वांना भुखा पण लागल्या होत्या. किमान चहा तरी घ्यावा असे वाटत होते. मी रावला सारखे उठवण्याचा प्रयेत्न करत होतो. कळले की रावची तब्बेत आज बरी नाही आहे. त्याला थोडासा आराम हवा होता. मग आता पुढच्या ट्रीपच्या प्लान बद्दल चर्चा करू लागलो. या सर्व चर्चेत राव उठला नी बोलला "अरे थोडासा आराम हवा आहे यार, फार पळ-पळ नको". मग आम्ही नाश्त्याला पुढे निघू का असे विचारले. त्यात मग राव उठे पर्येंत नाश्ता घरी करायचा की बाहेरून आणायचा याचा पण विचार करू लागलो. एवढ्यात राव बोलला "आपण नाश्ता बाहेरच जाऊन करू, मी उठतो थोड्या वेळात". मग राव उठे पर्येंत उन्मेष ने जाऊन आमच्या सर्वांसाठी किमान चहा आणला.

थोड्या वेळाने राव उठला आणि त्याचे प्रातविधी उरकायला लागला. तयार होऊन आम्ही घराच्या जवळ सह्याद्री नगरच्या नाक्या वर गेलो. राव व उन्मेशची एक ठरलेली नाश्त्याची टपरी आहे. आम्ही पण तिकडेच गेलो. टपरीत घुसलो तेच टपरीचा मामा बाहेर आला व रावला साम्भोडीत म्हणाला "या या साहेब, या. काय कसे चालले आहे? कधी आलात? तुमचे घर वगैरे सर्व ठीक आहे ना?". हे ऐकताच आम्ही सर्व हसायला लागलो. राव त्या मामाला बोलला "अहो हे घर माझे नाही आहे".
रावने माझ्या कडे बोट करून, घराचा मालक हा आहे हो असे सांगितले. थोडावेळ आम्ही रावला "मालक-मालक" करून चिडवत होतो. मामान कडे मिसळ पाव, पोहे ऑर्डर केली व चहा पण सांगितला. नाश्ता येई पर्येंत आम्ही रावला झालेल्या किस्स्या वरुन परत चिडवायला लागलो. नाश्ता आल्या वर मात्र रावची टेर खेचायचे सोडून नाश्त्या वर तुटून पडलो. मामानी काही आणले की आम्ही राव कडे बोट करून बोलायचो "साहेबांना द्या पहिले". बराच वेळ मस्ती चालली होती आणि नाश्ता उरकून ११ पर्येंत घरी आलो.

कालच्या एवढ्या लांबच्या बाईक प्रवासाने रावला फारच त्रास झाला होता. राव औषधाची गोळी घेऊन परत थोडा वेळ आराम करतो असे बोलत झोपी गेला. आता ठरल्या प्रमाणे आमच्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात होणार नव्हती. मग काय आम्ही पण मस्त आराम करत थोड्या गप्पा टाकत बसलो. एक तास-दिडतास रावचा आराम झाला आणि मग तो उठला. आम्ही सर्वांनी त्याची तब्येत कशी आहे असे विचारले. पहिल्या पेक्षा आता जरा त्याला बरे वाटत होते. रावला अजून जरा आराम करायला मिळाला असता तर त्याला जास्त बरे वाटले असते. पण मग आम्हाला आज पण देवरुखातच रहावे लागले असते आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाचा बटर्‍या बोळ झाला असता. २ दिवसांनी प्रशांत आचरेकर आणि त्याचा भाऊ हेमंत आम्हाला मालवण मध्ये भेटणार होता. आमच्या प्लान प्रमाणे आज आम्ही राजापुरच्या जवळ पास कुठे तरी राहायचे ठरले होते. पण आता ते शक्य नव्हते म्हणून आज जास्त प्रवास न करता पावस पर्येंत तरी जाऊ असे शेवटी ठरले.

रावने फ्रेश होऊन घेतले आणि आम्ही सर्व पुढे जायची तयारी करू लागलो. या सर्वात आणि पुढच्या निर्णय होई पर्येंत १ वाजला. पुढे कुठे तरी जेवण जेवायचे तर मग आरामात देवरुखाताच जेवून घेऊ असे ठरले. राव आणि उन्मेश अभ्यासासाठी राहिले असताना त्यांची एक ठरलेली खाणावळ होती तिकडेच जेवू असे ठरले. पटा-पट सर्व निघालो, पण खाणावळ बंद झाली होती. मग काय राव व उन्मेशला देवरुखातली बरीच ठिकाणे माहिती होती. ते आम्हाला जेवायला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. सर्वांनी शुद्ध शाकाहारी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.  मस्त पोटभर जेवण हाणून परत घरी आलो.आम्ही निघण्याची सर्व तयारी आधीच केली होती. सर्व बॅगा बाईकवर लावल्या आणि निघालो पुढच्या प्रवासाला. देवरुख वरुन जे निघालो ते मधे कुठेही न थांबता पांगेरी मार्गे राष्टीय महामार्ग १७ वर आलो. बाव नदी फाट्या वर जरा छोटासा ब्रेक उभ्या-उभ्यानेच घेतला आणि निघालो पुढे. आता परत आम्ही मुंबई-गोवा महामार्गावर लागलो होतो. जास्त नाही पण फक्त १० -१२ किलोमीटर साठी. आरामात बाईक चालवत हातखंबा गाठला आणि पुन्हा मुंबई-गोवा महामार्ग सोडून रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो. रत्नागिरी शहरातून डावीकडे गोगटे-जोगळेकर महाविध्यालयाच्या रस्त्याने भाट्या पूल गाठला.  भाट्या पूल पार करून उजव्या हाताला भाट्या बीचचे सुरुचे बनाचे सौंदर्य न्याहाळत पुढे चाललो होतो. कोहिनूर हॉटेल, फिनोलेक्स, कसोप-फणसोप हे सर्व मागे टाकत आम्ही पावस गाठले.

पावस मठाच्या बाहेर बाईक लावल्या. बाईक वर जेवढे महत्वाचे सामान होते तेवढेच काढून घेतले आणि बाकी सर्व बांधलेल्या बॅगा तश्याच बाईकवर ठेवल्या. मठात जाऊन हात पाय धुऊन स्वरूपानंद स्वामींचे दर्शन घेतले आणि मठाच्या अंगणात आराम करत बसलो. मठात कोकम सरबत, पन्हे आणि चहा-कॉफी मिळते. फार गर्मी होत-होती म्हणून आम्ही पन्हे व कोकम सरबत मागवले पण तिकडे मात्र फक्त कोकम सरबतच होते. मग काय तेच घेतले. आम्ही सर्वांनी आप-आपला जीव गार करून घेतला परत बाईकस कडे आलो. बाईकस जवळ जास्त वेळ न घालवता निघालो पुढे पूर्णगड पाहायला. पूर्णगड पावस पासून ७-८ किलोमीटरवर आहे. पटा-पट आम्ही पुर्णगडाचा पायथा गाठला. गडाच्या पायथ्यालाच गाव आहे आम्ही बाईक तिकडेच लावल्या.
तिकडे असलेल्या गावकऱ्यांना गडाचा रस्ता विचारून गड चढायला लागलो. गडाकडे जायचा रस्ता गावच्या वाडीच्या घरांकडूनच आहे. थोडेसे चढण चढून आम्ही गड गाठला. आता सुर्य मावळण्याची वेळ जवळ यायला लागली  म्हणून आम्ही पटा-पट गडाचा फेर-फटका मारायला लागलो. गड काय फार मोठा नव्हता. बाकी सर्व सागरी किल्ल्यान प्रमाणे हा गड ही समुद्रावर दस्त ठेवणारा किल्ला आहे. आम्ही किल्ल्याच्या तट बंदी वरुन एक चक्कर मारली आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूला एके ठिकाणी तटबंदी कोसळलेली होती तिकडे बाहेर पडलो. किल्ल्याच्या मागून मस्त समुद्र आणि गावखेडीची खाडी दिसत होती. इकडंच आम्ही सूर्यास्त पाहू लागलो आणि सूर्याला राम-राम करू लागलो. हलक्या अंधारातच किल्ला उतरायला लागलो. बाईक घेतल्या आणि आलो पक्क्या रस्त्याला.


  


माझ्या बाईकचा लाईट जास्त वरती जात होता म्हणून मी रावच्या मदतीने व्यवस्तीत करून घेतला आणि निघालो पुढे कशेळीच्या दिशेने. पूर्णगड ते कशेळी हे अंतर अंदाजे ३० किलोमीटरचे आहे. अंधार पडल्या मुळे आम्ही हळू-हळू तासा भारात हे अंतर पार केले आणि कशेळीच्या सुर्य मंदिर गाठले. बाईक मंदिराच्या बाहेरच लावल्या आणि शिरलो मंदिरात काही राहण्याची सोय होते का पाहायल. मंदिरात शिरलो तर आमच्या कानावर भजनाचे सूर यायला लागले.माझ्या माहिती नुसार हे सुर्य मंदिर संध्याकाळी सुर्य मावळणाच्या वेळेला बंद होते आणि पहाटे उजडण्याच्या वेळेला उघडते. पण आज मात्र मंदिर रात्री पर्येंत उघडे होते, याच्या आम्हाला धक्काच बसला. कारण हि ट्रीप प्लान करताना कशेळी काही केल्या सुर्य मावळण्याच्या आधी पोहोचायचे ठरले होते, नाही तर सुर्य मंदिर पाहायला मिळणार नाही. काही विशिष्ट दिवशी हे मंदिर रात्री ९ पर्येंत उघडे असते असे कळाले. ते कुठले दिवस ते मला आता आठवत नाही आहे. मंदिराचे सेवेकारी भागवत यांना आम्ही राहण्याची सोय होते का? असे विचारले. त्याच्या धर्मशाळेत आधी पासूनच एक मुंबईची मंडळी आली होती, त्यामुळे झोपायचे सामान पुरेसे नाही आहे असे सांगितले. मग मी त्यांना बोललो कि आम्हाला फक्त आजची रात्र झोपायला जागा हवी आहे. झोपायचे सामान आमच्या कडे आहे. मग मात्र ते तयार झाले. लगेच मी त्यांना जेवणाची पण सोय होऊ शकेल का हे हि विचारून घेतले. त्यांनी भोजनशाळेत जाऊन या बद्दल खात्री करून मग आम्हाला जेवणाची सोय होईल असे सांगितले. मात्र जेवणासाठी किमान अर्धातास लागेल असे सांगितले. आम्हाला कुठे कसली घाई होती आणि जेवणासाठी कुठे बाहेर जाण्याची आमची तयारी नव्हतीच. लगेच आम्ही जेवणासाठी होकार दिला आणि त्यांनी भोजनशाळेत जाऊन सांगितले. या सर्व चर्चा होई पर्येंत मंदिरातले भंजन संपले आणि त्यांनी आम्हाला सुर्य देवाचे दर्शन घेण्यास सांगितले.

दर्शन घेऊन आम्ही धर्मशाळेत रहाण्याचे पैसे द्याला ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी पावती पुस्तक काढले आणि मला विचारले आपले नाव? मी त्यांना अमेय साळवी असे सांगितले. साळवी हे आडनाव त्यांच्या कानावर जाताच त्यांनी आश्चर्य नजरेने माझ्याकडे पाहिले. आधी सांगितल्या प्रमाणे त्यांनी १०० रुपये घेऊन मला पावती दिली. आम्ही धर्मशाळेत आलो आणि एका बाजूला सर्व आमचे सामान लावून पथारी पसरली. पटा-पट फ्रेश होऊन जेवणासाठी भोजनशाळेत गेलो. आमच्या आधीच तिकडे एक ब्राम्हण परिवार बसले होते. आम्ही ५ माणसे जेवणासाठी अचानक वाढल्या मुळे, वाढीव जेवणाची तयारी करत होते. थोड्या वेळाने जेवण आले. मस्त गरम-गरम शुद्ध-शाकाहारी जेवणावर आम्ही तुटून पडलो. पोळ्यान वर पोळ्या मागत होतो. मस्त ब्राम्हणी पद्धतीचे जेवण होते. जेवण उरकून आम्ही धर्मशाळेच्या अंगणात गप्पा मारत बसलो. मगाशी घडलेलं भागवतांचं किस्सा आता आम्ही चर्चेत घेतला. वास्तविक संपूर्णवेळ मीच भागवतांशी राहाण्या आणि जेवण्या विषयी चर्चा करत होतो. माझ्या मराठी बोलण्याच्या पद्धतीने आणि कानात असलेल्या बिगबाळी मुळे, त्यांना मी ब्राम्हण आहे असे वाटले होते. त्यांच्या पैकीच भटूरडा आहे असे वाटल्या मुळे ते माझ्याशी आपले पणाने व्यवहार करत होते.कदाचित त्यांना मी भटूरडा वाटलो असें म्हणूनच त्यांनी आम्हाला राहायला परवानगी दिली असावी आणि ते पण फक्त १०० रुपये या माफक दराने. पण मी त्यांना माझ्या वागण्या-बोलण्यातून साफ फसवले होते असे आम्हाला त्या वेळेला जाणवले. त्यावेळेला आम्ही सर्व गप्प बसलो. आता मात्र  या विषयावर आमच्या मध्ये मजबूत हास्य मस्ती चालली होती. पण माझ्या वागण्या-बोलण्या-चालण्या-राहण्यातून भागवत हे फसलेले पहिले व्यक्ती नाही आहेत. यांच्या आधी माझी ट्रेकिंगची  मैत्रीण अनुजा चव्हाण पण फसली होती. अनुजा तर ५०० रुपयांची पैज हरली आहे.

या सर्व चर्चा करत आम्ही थोडा वेळ आराम केला आणि धर्मशाळेत आलो.आमच्या आधीच ब्राम्हण मंडळी झोपी गेली होती. त्यांना त्रास नको म्हणून आम्ही हेडलॅंपच्या मदतीने स्लीपिंग बॅग पसरून घेतल्या आणि आडवे झालो.

No comments:

Post a Comment