4.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सहावा दिवस (मालवण ते वेंगुर्ला)

१० जून २०१०, सकाळी उठलो आणि सर्व प्रार्तविधी उरकून पुढे निघायच्या तयारीला लागलो. तसे आजही आम्ही सकाळी आरामातच उठलो होतो. रावची तब्येत अजून थोडीशी नरम गरम होतीच, पण आता आमच्या कडे काही पर्याय पण नव्हता. आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पुढे जायचे होतेच आणि प्रशांत व हेमंतला पण मुंबईला जायचे होते. आज आम्ही घरीच चहा व बिस्किटांचा नाश्ता केला आणि सर्व सामान बाईकवर लावायला लागलो. सर्वांनी आम्हाला सामान लावायला मदत केली. प्रशांत व हेमंत चा निरोप घेऊन ११च्या दरम्यान आम्ही मालवणातले आचरेकारांचे घर सोडले.

एक तासभाराची आरामात बाईक चालवून आम्ही परूळ्याच्या काही किलोमीटर आली कडे पोहोचलो. एवढ्या राजुला लक्षात आले की तो त्याचा फोन प्रशांतच्या घरी विसरला आहे. मग काय आमची सर्वांना फोना-फोनी चालू झाली. राजूचा फोन वाजताच होता. प्रशांत व हेमंत या आचरेकर बंधूनी पण त्यांचे घर सोडले होते आणि कुडाळच्या रस्त्याला लागले होते. आता करायचे काय हा विचार चालला होता, यातूनच अचानक राजुला लक्षात आले की त्याने फोन निघताना घराच्या बाहेर जिन्याच्या जवळच कठड्यावर शेवटचा ठेवलेला असे आठवले. फोन बद्दलची हि त्याची शेवटचे आठवण होती. मग आता काय करायचे, परत मागे गेल्या शिवाय काही पर्याय तर नव्हताच. उन्मेष व राजू परत मागे जाऊन फोन घेऊन येतील आणि तो पर्येंत आम्ही परुळ्यात जाऊन त्यांची वाट पाहू असे ठरले आणि आम्ही आप-आपल्या मार्गाला निघालो.

मी, अभिजित आणि अक्षता परुळ्यात पोहोचलो आणि भोगवे-निवतीच्या फाट्यावर थांबलो. फाट्यावर एक छोटेसे हॉटेल पाहून आमची तिकडेच पथारी पसरली. सर्वप्रथम गर्म्या मुळे एक-एक मॅंगोला मारला आणि मग काय मिळेल ते खायला मागवायचे त्याचा विचार करायला लागलो. बर्याच आरामात आमचे काय खायला मागवायचे याचा विचार चालला होते. कारण आम्ही हा विचार करे पर्येंत उन्मेष व राजू मालवणात पोहोचले होते. राजूला जे वाटत होते, फोन तिकडेच होता. फोन घेऊन ते आता निघाले आहेत असे त्यांनी सांगितले. फोने ठेवला आणि माझ्या व राव मध्ये चर्चा चालू झाल्या, की आज उन्मेष ने बाईक मजबूत पळवली असणार, नाहीतर एवढ्या पटकन १७-१८ किलोमीटर कसे जाणार. आता उन्मेषला बरेच दिवस आमच्या बरोबर झाले होते आणि आमच्या बरोबर त्याला बाईक पळवायला मिळाली नव्हती. त्याला बाईक हळू चालवणे अजिबात आवडत नाही. तसा तो काय रावडी बाईक चालवणारा नाही आहे, पण आमच्यात त्यातल्या-त्यात उन्मेषच जर जास्त बाईक पळवतो. आमच्या सर्वांच्य स्वभावामध्ये बाईक सुसाट रावडी सारखे पळवणे तसे जरा कमीच आहे. आज राजूच्या फोनच्या निमित्ताने उन्मेष सुटला होता. वास्तविक आम्हीच आज त्याला आता काय ती बाईक पळवच असे सांगितले होते. याचे कारण जर तो फोन कोणाच्या हातात लागला असता तर मग मिळाला नसता आणि मग फोन गेला असता. जो पर्येंत तो फोन वाजत होता म्हणजे तो पर्येंत फोन साबुत होता. अजून कोणाच्या हात पडला नव्हता, याची आम्हाला जाणीव झाली होती. या कामासाठी उन्मेष फारच योग्य व्यक्ती होता असे मला व रावला माहिती होते महणूनच राजुला उन्मेष बरोबरच पाठवले होते.

आमच्या सर्व विचार आणि चर्चांमध्ये एका तासाच्या आत राजू व उन्मेष मालवण वरुन फोन घेऊन परत आले. राजूला मॅंगोला पियायचा नव्हता कारण तो मालवण वरून येताना उन्मेषच्या मागे बसून त्याला पियायचे ते तो घेऊन पितच येत होता. उन्मेषला तर काहीच पियायचे नव्हते. मग त्यांच्या बरोबर उन्मेषच्या बाईक चालवण्याच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग निघालो भोगव्याच्या दिशेने. परुळे ते भोगवे हे ७-८ किलोमीटरचे अंतर आरामात मध्ये-मध्ये विचारत विचारत अर्ध्या तासात पार केले. भोगवे बीच हा बर्‍या पैकी प्रसिध आहे. भोगवे गावातून बीच वर जाण्याचा रस्ता विचारला आणि गेलो बीचच्या दिशेने. बीच गावा पासून जरा बाहेर आहे आणि दुपारची उन्हाची वेळ होती म्हणून बीचच्या आजु-बाजूला पण कोणी दिसत नव्हते. बीचच्या जवळ असलेल्या दोन हॉटेलच्या मधून एक छोटासा रस्ता बीच कडे जातो. त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये हाच का भोगवे बीच असे विचारून घेतले आणि बीच वर गेलो. मस्त बीच होता पण उन्हा मुळे सर्वांना चटके लागत होते. थोड्याच वेळात बीच वरची फोटोग्राफी करून घेतली आणि परत त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये येऊन बसलो. उन्हाच्या त्या चटक्यातून आता हॉटेलच्या सावली मध्ये जरा बरे वाटत होते. हॉटेल मध्ये तोंड धुवून आणि थोडेसे हाणून घेतले. मस्त थोडा वेळ हॉटेलच्या सावलीत आराम करून घेतला आणि मग निघालो निवती किल्ल्याच्या दिशेने. किल्ला एका छोट्या टेकडीवर आहे आणि किल्ल्या पर्येंत रस्ता झला असून बाईक वर पर्येंत जाते असे कळाले.

भोगव्यातून निघालो आणि ५-६ किलोमीटर वर असलेल्या निवती गावातून निवती किल्ल्या वर गेलो. किल्ल्याच्या जवळ जीत पर्येंत रस्ता आहे तीत पर्येंत बाईक घेऊन गेलो आणि बाईक लावल्या एका बाजूला. त्याच्या पुढे जराशी एक तटबंदी चढून किल्ल्यावर आलो. किल्ल्याच्या थोड्याश्या राहिलेल्या तटबंदी वर आता फक्त एखाद दुसराच बुरूज साबुत आहे. किल्ल्याच्या पठारावर पण छोटीशी झाडी सोडली तर एकही इमारतीचे अवशेष आता दिसत नाही. पण आम्हाला मात्र या किल्ल्याच्या पठारावर सर्वत्र कचरा दिसला. प्रत्येक झाडा-झुडपाच्या बुंध्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या. एक-दोन नाही तर शेकडो होत्या. हे पाहून आमची टाळकीच सरकली. हा एवढा आधुनिक कचरा कश्या मुळे हे काही केल्या कळेच ना. शिवाजी महाराजांच्या काळात प्लास्टिक नव्हते एवडे तर नक्की, मग आता हा कचरा कुठून आला हा प्रश्न माझ्या मनात पडला. प्रथम दर्शनी गडावर येणाऱ्या पर्यटकांनी, गड प्रेमींनी किंवा शिव प्रेमींनी हा कचरा केला असावा असे वाटले. अजून पुढे गेलो आणि अजून जास्त कचरा दिसला म्हणून कसली तरी पिकनिक किंवा सहल वाल्यांनी हा कचरा केला असावा असे हि आम्हाला वाटले. पण पुढे गड पाहात फिरत असताना मध्येच आम्हाला ड्रम, बॅरल आणि लाकडाचे बांधकाम दिसले. हे सर्व समान पण सर्वत्र मोडकळीच्या अवस्थेत पसरलेले दिसले. हे पाहून माझे व रावचे मजबूत डोके फिरले होते आणि तेवढ्यातच समोरून २ लहान मुले येत असलेली दिसली. मी व रावने त्यांना या सर्व प्रकारच्या कचऱ्या बद्दल आमच्या मनात असलेले सर्व प्रश्न विचारले. अभिजित राव ने त्याच्या हाताच्या घडीच्या मधून त्या मुलांचे आणि आमचे संभाषण रेकॉर्ड करून घेत. त्या मुलां कडून मिळालेली माहिती तर फारच धक्कादायक होती. हा कचरा एका खाजगी टी. वि. वाहिनीच्या एका मालिकेचे चित्रीकरणाच्या वेळी केला होता. यू.टी.वी. बिंदास वाहिनीचा दादागिरी नावाची मालिकेचे चित्रीकरण तब्बल ४० एक दिवस झाले होते. त्या मुलांच्या सांगण्या वरून यांनी केलेला हा सर्व उपद्व्याप आहे. उपद्व्याप कसला हि तर गडाची आणि निसर्गाची नासधूस आहे आणि ते पण एका जवाबदार टी. वि. वाहिनी कडून. हे ऐकून तर माझे टाळके फारच जास्त सरकले होते त्यांच्या वर. आता मुंबईत गेल्यावर हे आपण उघडकीस आणायचे असे मी व रावने ठरवले. आमच्या लेह बाईक ट्रीप वर आइ.बी.एन. लोकमत ची पत्रकार साधनाला हि माहिती द्याची हे ठरले.

हे पहा त्या कचऱ्याचे फोटो…

 
 
 


त्या पोरांना धन्यवाद म्हणत त्यांचा निरोप घेतला आणि राहिलेला किल्ला फिरायला लागलो. समुद्राच्या बाजूच्या तटबंदिवर जाऊन समुद्र किनाऱ्याची फोटोग्राफी करू लागलो. रावला आकाशात एक घार आमच्या  डोक्यावर गिरक्या मारत असल्याची दिसली. लगेच त्याने माझ्या कॅमेऱ्याला दुसरी लेन्स लावली आणि त्या घारीचे फोटो टिपायचा प्रयत्न करू लागला. घारीचे दोने चार फोटो टिपले आणि आता जास्त वेळ उन्हात नको असे म्हणत आम्ही किल्ल्याच्या एक छोटासा फेर-फटका मारून बाईक पाशी आलो. माझे मन किल्ल्यावर पहिलेलाया कचऱ्याने फारच चल-बिचल झाले होते. बाईक काढल्या आणि थेट परुळ्याच्या फाट्यावर आलो. निवतीच्या या कचऱ्या बद्दल तिकडे कोणाला तर विचारू असे माझ्या मनात होते. शेवटी हा निवातीचा कचरा माझ्या डोक्यात फारच झाला आणि मी तिकडे हॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या एका इसमाला विचारले. त्या गावकऱ्याला पण या सर्व कचऱ्या बद्दल चांगलीच माहिती होती. पण तिथली ग्रामपंचायत काहीच करत नाही अशी अजून एक धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली. थोडावेळ त्या इसमाशी कचऱ्या विषयी चर्चा झाली. त्यांच्या कडून निवती ग्रामपंचायतीचा पत्ता घेतला आणि जरा मन शांत करून आणि हॉटेल मध्ये शिरलो.

हॉटेल मध्ये चहा आणि मोनॅकोची बिस्कीटे हांडली. आज चहा, बिस्कीटान बरोबर आम्हाच्या कडे गरम-गरम निवतीचा कचरा पण होता. चर्चंती सर्वांचे मन जरा शांत झाले आणि निघालो पुढे वेंगुर्ल्याच्या दिशेने. अंधार  पडायच्या आत आम्हाला वेंगुर्ला गाठायचे होते. परुळे ते वेंगुर्ला हे अंतर सुमारे ३० किलोमीटर आहे.  आम्ही मस्त मावळणार्‍या सूर्याच्या कीरणाच्या सोबतीने फोटोग्राफी करत सुमारे २ एक तासांनी वेंगुर्ल्याच्या मुख्य बाजार पेठेच्या २ किलोमीटर अलीकडच्या टेकडीवर थांबलो. जवळ-जवळ मावळलेल्या सूर्याचे व सागरेश्वराचे मस्त दृष्या दिसत होते. आता काय आम्ही वेंगुर्ल्याच्या जवळच आलो आहोत म्हणून आम्ही बराच वेळ तिकडे थांबलो होतो.  तिकडेच मस्त आराम करत आणि फोटोग्राफी करत रिलॅक्स झालो. थोड्या वेळाने वेंगुर्ला बाजार पेठेच्या चौकातून मी माझ्या मावशीच्या मिस्टरांना म्हणजे पिंगे काकांना फोन लाऊन त्यांच्या ओळखीचा अभी याचा फोन नंबर घेतला. कारण आजची रात्र आम्हाला वेंगुर्ल्यात काढायची होती. अभी हा वेंगुर्ल्यातील स्थाईक इसम आहे. त्याच्या ओळखीने आम्हाला कुठे तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये नक्की राहायला मिळेल. मी पिंगे काकांन कडून अभीचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन लावला आणि आमची राहण्याची कुठल्या तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये सोय कर असे सांगितले. त्याने मला त्याच्या ओळखीचे एक हॉटेल सांगितले आणि तिकडे जा तुम्ही मी येतो मागवून. बाजारपेठेच्या मागच्या बाजूने आम्ही त्या हॉटेलला पोहोचलो आणि मागो माग अभी पण आला. त्याने आमच्या साठी २ रूमची सोय करून दिली आणि १२०० रुपये भाडे ठरवले.

बराच वेळ मी अभीशी गप्पा मारत बसलो. मला २००८ मध्ये ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता तेव्हा मला  डॉक्टरांनी विश्रांती आणि हवा पाणी बदला साठी कुठे तरी बाहेर जा असे सांगितले होते.  डॉक्टर माझ्या पिंगे काकांचे मित्र आणि वेंगुर्ल्यातलेच आहेत. त्यांना माहिती होते कि पिंगे काकांचे वेंगुर्ल्यात घर आहे, मग काय त्यांनी ठरवले कि आपल्या वेंगुर्ल्याला घेऊन जा याला. त्यावेळेला काकांनी मला २ आठवडे वेंगुर्लात राहायला आणले होतो. तेव्हा अभी दररोज दिवसातून किमान २-३ वेळा काकांच्या घरी यायचा. अभी हा स्वभावाने फारच खोडकर व मिश्किल. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सर्वांचे मनोरंजन करून जायचा. यामुळे अभी हा मजबूत मिश्किल आणि हस्या माय वकती आहे याची मला पहिल्या पासून माहिती होती. आज पण तो आमच्या बरोबर मस्त गप्पा-टप्पा आणि मज्जा मस्ती असाल मालवणी पद्धतीने करत होता. आभिला कुठे तरी काम साठी जायचे होते म्हणून तो निघाला. आम्ही वेंगुर्ल्यात चांगले जेवण कुठे मिळेल हे त्याला विचारून घेतले आणि त्याला निरोप दिला.

सर्वांनी आंघोळ वगरै करून अभीने सांगितलेल्या हॉटेल मध्ये म्हणजे बाजार पेठे जवळच गेलो. आम्हा सर्वांचे आवरून जेवायला हॉटेल वर जायला जरा उशीरच झाला होता आणि त्यामुळे हॉटेल मध्ये बर्‍या पैकी जेवण संपले होते. सर्व प्रथम तर त्यांनी जेवणाची ऑर्डर घेण्यास तयारी दाखवली नाही. मग आमच्या थोड्या आग्रहास्तव आणि आम्हाला अभीने तुमचे हॉटेल वेंगुर्ल्यतले सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे असे सांगून इकडे पाठवले आहे असे हि सांगितले. मी तर त्यांना बोललो आता जे तुम्ही जेवायला देऊ शकतात ते द्या, माशे, चिकन, मटण आणि काही शकाहारी पण चालेल. मग आमच्या येवढ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला आता फक्त चिकन आणि शाकाहारी देण्यास तयार झाले. मात्र हे हि जेवण ते आम्हाला बनवून देणार होते त्यामुळे जेवण यायला वेळ लागणार असे हि त्यांनी सांगितले. आम्हाला कसली घाई होती, हरकत नाही असे बोलून आम्ही जरा बाजारात फेर-फटका मारुन येतो असे त्यांना सांगितले. हॉटेलच्या बाहेर पडलो आणि पहातोतर सर्वत्र सामसूम बाजार संपूर्ण बंद झाला होता आणि रस्त्याला पण फारसे कोणी नव्हते, काही बेवडे आणि कुत्रे-मांजरीन शिवाय. मग काय परत फिरलो हॉटेल कडे आणि जेवण यायची आतुरतेने वाट पाहत व गप्पा मारत बसलो. आजही रावची तब्बेत जास्त काही चांगली नव्हती आणि अक्षता तर मौसाहार खातच नाही. तसा आज माझा ही शकाहारी जेवणाचा मूड होता. म्हणून आम्ही शाकाहारी जेवण मागवले आणि राजूने मात्र चिकन ऑर्डर केली. बराच वेळाने जेवण आले, पण जेवण मात्र मस्तच होते. छान गरम-गरम घरगुती जेवण मिळाले आणि तेही बरेच दिवसांनी शाहाकारी जेवण. जरा बरे वाटत होते. जेवण उरकले आणि परत हॉटेल वर आलो. आज २ रूम होत्या म्हणून, मी व अक्षता एका रूम मध्ये आणि राव, राजू व उन्मेष एका रूम मध्ये. उद्या आमचा दिवस फार मोठा आणि मजबूत पळा-पळीचा आहे याची सर्वांना मी जाणीव करून दिली आणि जो काय आराम करायचा आहे तो आजच करून घेऊया असे सांगितले. त्यामुळे आज जास्त उपद्व्याप न करता आम्ही आप-आपल्या रूम मध्ये गेलो. बर्‍याच दिवसांनी मला टी. वी. पाहायला मिळाला म्हणून मी थोडा वेळ टी. वी. बघत राहिलो मात्र अक्षता झोपी गेली आणि मग थोड्या वेळानी मी पण झोपलो. 

No comments:

Post a Comment