31.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - विसावा दिवस (देवरुख ते महाड)

६ जून २००५, अलार्म वाजल्या बरोबर ५.३० वाजता मी उठलो. प्रातविधी आवरले आणि निघण्याच्या शेवटच्या तयारीला लागलो. आईच्या सुचनेचे सर्व पालन करत घरच्या खिडक्या दरवाजे नीट लावून ६ च्या दरम्यान मी देवरुख सोडले. पांगेरी मार्गे जाणारा रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो. सकाळी बाईक चालवायला मस्त वाटत होते. पाऊण एक तासात बाव नदीच्या फाट्यावर आलो. मला भूख लागली होती पण एवढ्या सकाळी कुठली टपरी उघडली असणार. कसा बसा एक माणूस रस्त्याने जाताना दिसला त्याला मी जयगडला जाणारा रस्ता विचारून घेतला. आम्ही सर्व गणपतीपुळ्याला जाताना जयगड किल्ला पाहायचा राहून गेला होता म्हणून मी महाडला जायच्या आधी जयगड पाहून घेऊ असे मी ठरवले होते.

जाकादेवी मार्गे मी दीड एक तासात जयगड बंदराला पोहोचलो. जाकादेवी वरुन जयगडला येताना मस्त वाटत होते. सकाळच्या वेळी या परिसरात मस्त गार वाटत होते. जयगड बंदरावर एक-दोन माणसे सोडली तर फार कोणी नव्हते. काहीही उघडले नव्हते आणि रहदारी पण चालू झाली नव्हती. बंदरावर तसे काही पाहण्यासारखे दिसले नाही, म्हणून मी तिकडच्या त्या एका-दोन माणसांना गडाकडे जायचा रस्ता विचारून घेतला. जयगड किल्ला बंदराला लागूनच असलेल्या टेकडावर आहे. लगेच त्या दिशेने मी बाईक फिरवली आणि ते टेकाड चढून किल्ल्याच्या दिशेने गेलो. किल्ल्याच्या बाहेर बाईक लावली आणि शिरलो आत. किल्ल्यात शिरलो आणि पाहोतोतर किल्ल्याची फक्त तटबंदीच दिसून आली बाकी किल्ल्याचे सर्व अवशेष ढासळून गेले होते. मध्यभागी फक्त माळ रान होते, पण चारी बाजूची तटबंदी मजबूत भक्कम राहिली होती.

मी तटबंदी वरुन आरामात एक फेर-फटका मारला. थोडा वेळ माळावर फिरत राहिलो आणि आलो किल्ल्याच्या बाहेर. या सर्व फेर-फटक्यात आता ऊन डोक्यावर आले होते. बाईक काढली आणि निघालो पर्तीच्या दिशेने. जयगड वरून भातगावचा ब्रिज घेतला आणि सावर्ड्याच्या दिशेने निघालो. भातगाव ते सवार्डा हा रस्ता मला पण नवीन होता. मधेच गाव लागले कि सावर्ड्याला जातो याची खात्री करून घ्यायचो आणि मग पुढे निघायचो. आता ऊन फारच रण-रणायला लागले होते. सुमारे एक-दीड तासाने मी सावर्ड्याला पोहोचलो. फारच ऊन होते म्हणून आणि बाईक चालवून थोडा ब्रेक घ्यावा या कारणास्तव चहाचा ब्रेक घेतला.

चहा घेत थोडा आराम केला व सुजयला पण फोन लावून घेतला. सुजयला सांगितले की संध्याकाळ पर्येंत मी महाडला पोहोचतो. छोट्याश्या ब्रेक मुळे जर बरे वाटले आणि निघालो पुढे. आता माझा पुढचा सर्व प्रवास राष्ट्रीय महामार्ग १७ वरुन होता. रस्त्याला रहदारी पण फार होती, म्हणून बाईक जरा लक्षपूर्वक चालवावी लागत होती. आरामात सावर्डा ते चिपळूण हे अंतर एका तासात पार केले. आता मला मजबूत भूक लागली होती. चिपळूण मधे हॉटेल अभिषेक जवळ थांबलो. मस्त माश्याची थाळी ऑर्डर केली. फ्रेश होऊन जेवण यायची वाट पाहत बसलो. जेवण आले आणि मी तुटून पडलो. जेवण आवरले आणि हॉटेलच्या बाहेरच असलेल्या पानवल्या कडे पान खाल्ले. त्या पानवाल्याला पाहून मला पान खायची काय इच्छा झाली काय माहित. बाहेरच थोडा वेळ रेंगाळत बसलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

चिपळूण वरुन निघालो आणि आरामात बाईक चालवत परशुराम घाट चढायला लागलो. परशुराम घाटात परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. मी फिरलो मंदिराच्या दिशेने. मंदिर फारच प्राचीन आहे. मंदिराच्या बाजूने फेर-फटका मारला व परशुरामाचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या दिशेने. हळू-हळू बाईक चालवत लोटे करत भरणा नाका, नातूनगर पाठी टाकत निघालो आणि कशेडी घाटाच्या पायथ्याशी आलो. बाईक चालवून कंटाळा आला, म्हणून एक छोटा ब्रेक घेतला. आता पुढे घाटात बाईक चालवायची होती, त्यामुळे मी जर तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन घेतले आणि लागलो घाट चढायला. कशेडी घाट हा कोकणातील सर्वात मोठा आणि फार वळणा-वळनांचा घाट आहे. आरामात हळू-हळू एका पाठो-पाठ एक वळण पाठी टाकत मी घाट चढत होतो. अर्ध्या तासात मी घाट चढून कशेडीच्या माथ्यावर होतो. आता मात्र माझे बुड दुखायला लागले म्हणून मी जर थांबलो. बाईक लावली आणि तिकडच्या टपरीवर चहा घेतला. तिकडेच उभा राहून बुडाला थोडा वेळ आराम दिला आणि निघालो घाट उतरायला.

घाट उतरताना फार ऊनाचा त्रास होत नव्हता. कशेडी घाटाच्या गोव्या कडून मुंबई कडे जाताना घाटाच्या या बाजूच्या बर्‍यापैकी झाडी आहे. त्यामुळे बाईक चालवायला जर बरे वाटत होते. आरामात घाट उतरून च्या दरम्यान मी पोलादपूरला आलो. इकडे पण एक-दोन मिनिटे पाय मोकळे करायला ब्रेक घेतला. सुजयला फोन लावून त्याच्या घराकडे कसे यायचे हे विचारून घेतले. फोन ठेवून लगेच निघालो महाडच्या दिशेने. अर्ध्या एक तासात मी महाच्या अलीकडे बिरवाडीच्या फाट्यावर पोहोचलो. फाट्यावरून उजवीकडे महाड-बिरवाडी एम.आई.डी.सी त घुसलो. सुजयला तिथून त्याच्या घराकडे कसे यायचे हे विचारले. सुजयने मला व्यवस्थित मार्ग सांगितला आणि मी नोवार्तीस कॉलनी मधे घुसलो. सुजयचे बाबा नोवार्तीस महाड प्लाँटचे जी.एम. आहेत. या कॉलनीच्या मध्यभागी त्यांच्या एकट्याचाच बंगला आहे. बंगल्याच्या बाहेरच सुजय माझी वाट पाहत होता. बंगल्याच्या आत ग्यारेज मध्ये एका बाजूला बाईक लावली आणि मी माळकटलेल्या अवस्थेत त्यांच्या बंगल्यात शिरलो.

सुजयच्या आई-बाबान बरोबर माझी फार वर्षां पासूनची ओळख होती. तरी पण त्या बंगल्यात आणि माझ्या या अवतारामुळे मला न्यूनगंड वाटत होता. त्यांनी माझी इकड-तिकडची विचार पूस करून, फ्रेश व्हायला पाठवले. सुजय मला त्याच्या रूम मध्ये वरती घेऊन गेला आणि फ्रेश व्हायला दिले. फ्रेश होऊन आम्ही परत खाली आलो. सुजयच्या बाबांनी रायगड रोड वर बरीच जमीन घेतली होती. तिकडे ते बऱ्याच प्रकारची फळ बागायत करत होते. आम्हाला ते सर्व दाखवायला घेऊन गेले. शेतवर गेलो आणि सुजयच्या बाबांनी कहरच केला. शेतावर गेल्या-गेल्या शर्ट काढले व कुदळ घेऊन बागेत काम करायला लागले. मी हे पाहून स्तब्धच झालो. पण ते मात्र या कामाचा फार आनंद लूटत होते, हे मला जाणवले. मग आम्ही पण घुसलो त्यांच्या बरोबर शेतातले काम करायला. थोडा वेळ बागेत घाम गाळून शेतातल्या समान ठेवण्याच्या घराच्या ओटीवर येऊन बसलो. पाणी पिऊन आराम केला आणि आम्ही परत शेतात फेर-फटका मारायला लागलो. आता सूर्य मावळायला लागला आणि आम्ही घराकडे परतलो. घरी आलो, फ्रेश होऊन बराच वेळ सुजयचे आई-बाबा आमच्या बरोबर गप्पा मारत होते. ते आम्हाला इकड-तिकडचे प्रश्ना विचारात होते, विशेष करून मला. मुळात सर्वात जास्त प्रश्नांवर जोर होता तो आम्ही "बाईक ने एवढ्या लांब कशाला फिरायच आणि वगैरे-वगैरे". बराच वेळ आमच्यात गप्पा चलल्या होत्या. आता मात्र सुजयच्या आई-बाबांनी मला त्या वातावरणात थोडेशे कंफर्टबल करून घेतले होते.

सुजयच्या या घरात खानसमा पण आहे, त्यानी सर्व जेवण तयार करून ठेवले होते. सुजयच्या बाबांचे मित्र महाडचे डी.वाय.एस.पी आज सुजयच्या घरी परिवारासाहित जेवायला येणार होते. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. ठरलेल्या वेळे प्रमाणे ते आले आणि आम्ही सर्व त्यांचे स्वागत करायला गेटकडे गेलो. ते स्वतः त्यांची लाल दिव्याची गाडी चालवत आले होते. गाडीच्या बाहेर पडले आणि मी त्यांची ती पर्सनॅलिटी पाहून परत एकदा माझा न्यूनगंड उभारला. वयाने ते सुजयच्या बाबा पेक्षा बरेच लहान असावेत पण कसली कडक पर्सनॅलिटी होती. सुजयच्या बाबांनी सर्वान बरोबर माझी सुजयचा मित्र म्हणून ओळख करून दिली. सर्व बंगल्यात जाऊन बराच वेळ गप्पा मारू लागलो. वास्तविक सुजयचे आई-बाबा आणि त्यांचे मित्र व परिवारा मध्येच चर्चा चालू होती. आम्ही दोघे मात्र शांत पणे त्यांच्या चर्चा ऐकत होते. अधून-मधून एखाद-दुसरा प्रश्न विचारला तर थोडक्यात उत्तर द्यायचो. आता परत एकदा सगळ्यांनी मला थोडेसे कंफर्टबल करून घेतले. सर्व आता जेवणाच्या टेबल वर जमलो आणि जेवता-जेवता गप्पा करायला लागले.

जेवण अवरले आणि पाहुणे मंडळींचा निरोप घ्यायला बाहेर अलो. पाहुण्यांना टा-टा बाय-बाय करताना सुजयच्या बाबांनी मस्ती म्हणून त्यांना सांगितले कि "कधी तरी आम्हाला पण लाल दिव्याची गाडी चालवायला द्या". मग त्यांचे मित्र म्हणाले "तुमच्या साठी कधी पण". दोन मोठ्या माणसांमध्ये आमच्या सारखीच मस्ती चालली हे पाहून जरा निराळे वाटेल. पाहुण्यांचा निरोप घेऊन सर्व परत गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने, मी आज बाईक चालवून फार थकलो असेन म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला पाठवले. आम्ही दोघे रूम मध्ये गेलो आणि थोडा वेळ टंगळ-मंगळ करत झोपी गेलो. 

2 comments:

  1. किल्ल्यावर सध्यातरी बरेच अवशेष पाहायला मिळतात आणि ते आता बांधले असतील असे वाटले नाही.

    ReplyDelete
  2. कुठल्या किल्ल्या बद्दल आपण बोलत आहात साहेब आणि आपणास काय बोलायचे आहे हे मला कळले नाही. कृपा करून आपले म्हणणे मला सविस्तर सांगितले तर मला तुमच्या कडून अधिक माहिती मिळेल.

    ReplyDelete