4.11.12

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- पाचवा दिवस (गणपतीपुळे ते देवरुख)

२२ मे २००६, सकाळी ८च्या दरम्यान मंदिरात येणार्‍या जाणार्‍या भक्तांच्या गर्दीच्या आवाजाने आम्ही उठलो. उठून पाहतो तर माझ्या स्लीपिंग बॅग वर बरीचशी वाळू साचली होती. आजूबाजूचे येणारे जाणारे आमच्याकडे पाहून हसत होते. थोडेसे हसलेल्या सारखे वाटले म्हणून पटा-पट उठलो आणि समान आवरून हात पाय तोंड धुवून घेतले. शौचाला गेलो तर फार मोठी लाईन होती आणि मला व राजूला जोरात लागली होती. राव आणि सुजयला मंदिराकडे सामनासहित सोडले आणि मी व राजू मंदिराच्या बराच पुढे बीच वर सुरूच्या बनाच्या आडोशाला जाऊन बसलो काम फत्ते करायला. आमचे विधी उरकून परत मंदिराकडे आलो तर आता सुजय बोलला मला पण लागली आहे मग तो गेला. सर्व प्रातविधी उरकून आम्ही पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेरच नाष्टा करून १० च्या दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने निघालो.

Ratnadurg, Ratnagiri गणपतीपुळे ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ३० किलोमीटरचे आहे. निवळी मार्गे नाही हा सागरी किनाऱ्यामार्गे काय सुंदर रस्ता होता मस्त समुद्राला लागून आणि कुठे कुठे कोळी गावांकडून. मध्ये बरेचदा फोटोग्राफी साठी थांबत थांबत १२च्या दरम्यान रत्नागिरीला टिळकआळीमधे काकाच्या घरी पोहोचलो. काकाचे भाडेकरू साळवी परिवार माझ्या परिचयाचे होते आणि काकाने त्यांना आधीच फोन करून सांगितले होते की मी येणार आहे. काकाच्या घराची चावी त्यांच्याकडे असते. साळवी काकांनी आमची विचार पूस केली आणि दिली चावी हातात. आम्ही सर्वांनी फ्रेश होऊन घेतले आणि समान काकांच्या घरीच ठेवून भगवती बंदराला लागून असलेला रतनदुर्ग किल्ला पाहायला निघालो. सकाळचा नाष्टा फार काय चांगला नव्हता म्हणून परत टिळक आळीतली फेमस टपरीवरची मिसळ खाऊ आणि मग किल्ला सर करू असे ठरले. मिसळ हाणली आणि निघालो किल्ला सर करायला. किल्ल्याच्या पायथ्या पर्येंत रस्ता आहे. बाइक लावल्या आणि घुसलो किल्ल्यात. किल्ल्यात शिरल्या-शिरल्या भगवती देवीचे मंदिर आहे. भगवती देवी हे रत्नागिरीच्या लोकांचे आराध्य दैवत मानले जाते. दर्शन घेतले आणि किल्ल्याचा फेर-फटका मारायला निघालो. किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीचे काम चालू होते. आम्ही तटबंदि वरूनच फिरायचे ठरवले. तसे पाहायला गेल्यास तटबंदि आणि मंदिर सोडले तर बाकी काहीच नाही आहे. मधे सर्व माळरान आहे आणि किल्ला पण तसा छोटा आहे. मात्र किल्ल्याची बरीचशी बाजू समुद्राच्या दिशेने आहे त्यामुळे समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा खडकांवर आपटताना पाहायला मिळतात. काय सुंदर नजारा होता तो. मी आणि राव ने बरेच फोटो काढले आणि भगवती मंदिराच्या बाजूला असलेल्या एक चौथऱ्यावर सावलीत बसलो.


Sea from Ratnadurg, Ratnagiri

आमच्या ट्रीपचा ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा संपला आणि ठरल्याप्रमाणे सुजय व राजुला रजा द्यायची वेळ आली होती. पण राजूने आमच्या बरोबर पुढे ट्रीपवर यायचे ठरवल्यामुळे आता फक्त सुजयला रजा द्यायची वेळ आली. आम्ही पुढचे प्लॅनिंग करायला लागलो. रत्नागिरी वरुन मुंबईला निघणाऱ्या बसेस सर्व रात्रीच्या असतात तो पर्येंत सुजय एकटा काय करणार आणि वगैरे-वगैरे. पण काय पर्याय नव्हता आम्हाला माझ्या घरी देवरुखला संध्याकाळच्या आत पोहोचायचे होते. रतनदुर्ग उतरलो आणि टिळक आळीत मी व राजू मस्त माश्याच्या जेवणावर ताव मारू लागलो आणि राव व सुजय चिकन आणि मटन वर होते. जेवण आवरले आणि रत्नागिरी स्टॅंडला आलो सुजयसाठी मुंबईचे तिकीट पाहायला. आता मात्र सुजयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आम्ही सर्व आता पासून वेगळे होणार या भावनेने सुजयचा चेहरा पडला होता. समजू शकतो मी त्याच्या भावना कितीही भांडलो तरी आम्ही सर्व मित्र आहोत आणि आम्हाला या मजेदार ट्रीप वर सोडून जायला जमत नव्हते. सुजयचे रात्रीच्या मुंबई गाडीचे तिकीट दिले हातात आणि काही टाइमपास करण्यासाठी वाचायला पेपर व मासिके घेतली. आम्ही सुजयसाठी रात्री पर्येंत रत्नागिरी मधे थांबणार नव्हतो, आम्हाला संध्याकाळच्या आत देवरुख गाठायचे होते. सुजयची परतीची सोय करून परत काकाच्या घरी गेलो. समान उचलले आणि सुजयला पुन्हा रत्नागिरी स्टॅंड वर सोडले. सुजयचा निरोप घेण्यापुर्वी एक-एक मॅंगोला मारू असे ठरले. सुजय किती हळवा झाला होता की त्याने गरीब गाय सारखे आज्ञाकारक होऊन रावला विचारले मी आता तरी मॅंगोलाच्या ऐवजी थंप्स अप पीऊ का? आता माझी ट्रीप संपली. या वेळा सुजयच्या निरागस आणि बद्दललेल्या रूपाने आमचे सर्वांचेच मन हळवे झाले. आम्ही तिघांनी मॅंगोला आणि सुजयने  थंप्स अप मारून त्याला ट्रावल  ऑफीस मधे बसवले आणि एकमेकांचा निरोप घेऊन २ च्या दरम्यान देवरुखच्या दिशेने निघालो.


Hornbill, Devrukhरत्नागिरी ते देवरुख हे अंतर ५० किलोमीटर आहे. आरामात बाइक चालवत अधून मधून थांबत. २ तासांनी ४ वाजता देवरुखला माझ्या घरी पोहचलो. माझ्या देवरुखच्या घराचा अर्धा भाग भाड्याने दूरदर्शनचा इंजिनियर हरीलाल ला दिलेला होता आणि त्याला आईने आधीच कळवले होते की आम्ही येणार आहोत. त्याने सर्व घर साफ करून घेतले होते, नाही तर गेल्या-गेल्या आम्हाला साफ-सफाई करावी लागली असती. त्याचा कडून कळले की ग्राम पंचायतीचे पाणी उन्हाळ्या मुळे येत नाही आहे. पाहायला गेले तर कोकणात नेहमीच उन्हाळ्यात पाण्याचा प्रोब्लेम तर हा असतोच आम्हाला काय हे नवीन नव्हते. पण एक ३-४ दिवस उन्हात आणि मातीत माखून आम्ही देवरुख गाठले होते आणि आज मात्र काही केल्या आंघोळीची गरज होती. हरीलालच्या मदतीने ६० रुपये देऊन ५०० लिटर पाण्याचा टॅंकर मागवला. कपडे धुवायला भिजत घालून, आंघोळ्या करून घेतल्या. स्लॅपचे घर असल्या कारणास्तव घरात फार गरम होत होते.माझ्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भली मोठी आमराई आहे आणि त्या बाजूला सावली असल्या कारणास्तव थोडा थंडवा आहे. आम्ही जाऊन बसलो तिकडे हवा खायला. तेवढ्यात आमच्या कानावर पक्षाचा आवाज यायला लागला, पाहतोतर एक मोठा पक्षी जवळच फांदीवर बसलेला दिसला. राव या प्रकारची फोटोग्राफी करण्यात माहीर होता पाया मुळे ताटवरून उडी मारणे शक्य नव्हते. रावचा कॅमरा घेऊन मी मारली उडी तटवरून. उपद्याप करून एक-दोन फोटो माझ्या परीने काढून घरात जाऊन आरामा करत बसलो. राजू टाइम पास म्हणून गिटार वाजवू लागला. मी आणि राव, राजूने छेडलेल्या सुरांचा आनंद लुटत होतो. मला तो आजही छान आठवतो आहे. राजू कॉटवर बसून गिटार वाजवत होता, राव दरवाज्यात वारा खात आणि मी लादिवर आडवा पडून ऐकत होतो. मी ऐकता-ऐकता मस्त अंतराळत  पोहोचलो, कधी झोपलो कळलेच नाही. राव आणि राजूने बराच वेळ मैफिल चालू ठेवली. तासाभराची झोप काढून आम्ही कपडे धुवून घेतले आणि नंतर बराच वेळ हरीलाल बरोबर गप्पा टाकत बसलो.Rajendra, of the guitar

देवरुख तसे फारच लहान शहर आहे. त्यावेळी देवरुखात एकाच हॉटेल होते आणि तेही १०-१०.३० ला बंद होते असे कळाले. ७ च्या दरम्यान आम्ही देवरुख स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो. परत मासे आणि चिकन ऑर्डर केले. जेवण येई पर्येंत आमच्या गप्पा चालू होत्या. दीपक हॉटेल पाहायला गेले तर फारच साधे आणि छोटे हॉटेल आहे. वरुन पर्मिट रूम असल्या कारणास्तव बरीच सारी लोकपण येतात. आमचा अवतार पाहून बर्‍याच लोकांना "कोण बाबा हे लोक आलेत"? असा पण प्रश्न एकडे ही पडलेला जाणवले. आमचा अवतार फारच विचित्र होता यात काय शंकाच नाही मात्र आमचे बरेचशे संभाषण इंग्लीश मधे चालले होते. विशेष करून माझा अवतार फारच विचित्र होता. मोरपिसी कलरची  ट्रेक पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट. त्यातल्या त्यात राजुच जरा बरा होता. राव पण मळलेले फाटके टी -शर्ट. बराच वेळ गप्पा टाकत जेवण उरकले आणि आलो घरी. ४-५ दिवसांचा थकवा होताच फार, मस्ती टंगळ मंगळ न करता तिघेही ११च्या दरम्यान झोपी गेलो.

No comments:

Post a Comment