15.3.10

लेह बाईक ट्रीप - तिसरा दिवस (श्रीनगर ते सोनमर्ग)

१० ऑगस्ट २००९, सकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही ७ वाजता उठलो. सर्वाना कालचा थकवा थोडा जाणवतच होता. तयार होऊन सर्व बाहेर गार्डन मध्ये  नाश्ता करायला आलो. मस्त गरम-गरम पराठे  खाल्ले  आणि  पाणी  भरून घेतल. आज गाडी जरा उशिरा बोलावली होती. गाडी येई पर्येंत अमेय म्हात्रे, कुलदीप आणि उमेश फुलांची  फोटोग्राफी करीत होते. मी एखाद-दुसरा फोटो काढला आणि बाईक गरम करून आराम करत बसलो, मला काय फोटो काढायचा विशेष मूड नव्हता. तेवढ्यात गाडी आली, सर्व समान लोड केले. आता रोहन-शमिका पण होते, म्हणून गाडी मध्ये ५ जण आणि बाईक्स वर १० जण. रोहन काल श्रीनगर फिरला होता म्हणून "दाल लेक" जवळ थांबायच ठरल. कारण साधना आणि उमेशला त्याच्या १५ ऑगस्टच्या शोसाठी शाळा, युनिवर्सिटीच्या विद्यार्थांचे आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचे फुटेज हवे होते. अमेय म्हात्रे आणि कुलदीपने तर आपले फोटो काढलेच नव्हते. ऐश्वर्या आणि आदित्यने डॉक्युमेंट्स फोटोकॉपी करून आणले नव्हते. या सर्वांचा लेहला परमीटसाठी वापर होणार होता आणि हे सर्व अभिने मुंबईहूनच करून आणायला सांगितले होते. शामिकला आज श्वास घेण्यास त्रास होत होता. पुढे जाण्याआधी म्हणून डॉक्टरकडे रोहन तिला घेऊन गेला कारण पुढे अजून उंचीवर जाण्याआधी गरजेचे होते.
  
तेवढ्या वेळेत मी दाल सरोवर जवळ फोटोग्राफी केली. "दाल सरोवर" म्हणून जे काय प्रसिद्ध आहे. "दाल सरोवर" म्हटले कि अप्रतिम असे  उदगार निघतात, पण मला असे काही नाही वाटले. सुंदर होत पण अप्रतिम नाही, बहुदा आम्ही चुकीच्या वेळेला होतो तेथे. सर्व शिकाऱ्या वर Lux Cozi Innerwear च्या जाहिराती होत्या आणि मला ते अजिबात आवडल नव्हत. ते "दाल सरोवरच्या" सौंदर्यावर विरजण घालत होते. तरी पण मी काही फोटो काढले. साधना आणि उमेशने "दाल सरोवरच्या" परिसरात एक फुटेज घेतला आणि मग त्यांना पटकन युनिवर्सिटीला घेऊन जाण्यास ड्रायवरला सांगितले. ड्रायवर म्हणाला "इधर उधर नहीं लेके जाऊंगा, आपको सिर्फ लेह तक लेके जाऊंगा. वो भी अब लागता नही हें की पहुचेंगे, तो में कारगिल तक ही लेकर जाऊंगा". मग आम्ही त्याच्या मालकाशी बोललो, तो हि तेच  बोलला. "अपने ८ तारिकसे गाडी बुक कि थी और पुरा दिन अपने वो जम्मू मे हि बरबाद कर दिया". वास्तविक आम्ही ठाण्यातला मन्सूर म्हणून एजंट त्याकडून सर्व गाड्या बुक केल्या होत्या. हा मन्सूर अमेय म्हात्रेच्या  मामाच्या ओळखीचा होता. मग आम्ही मन्सूर आणि अमेय म्हात्रेच्या मामाला सर्व नाटक सांगितले. अमेय म्हात्रेच्या मामाने मन्सूरला फोन करून सर्व निस्तरायला सांगितले. मन्सूर ने आम्हाला भेटायला येतो येतो म्हणून बराच वेळ खाल्ला. अमेय म्हात्रे आणि मन्सुरची फोन वर बाचा-बाची झाली. शेवटी आम्ही मन्सूरला गाठून लेह पर्येंत या गाडीने सोडायचे कबूल करून घेतले. या सर्व नाटकात १२ वाजून गेले होते. साधना आणि उमेश फुटेज साठी गेलेले अजूनही आले नव्हते. मधल्या कालावधीत काही जणांनी शिकाऱ्यातून सरोवराचा फेर-फटका मारला आणि काही जण शॉपिंग करायला  लागले. शॉपिंग वरून अभिजीतने मच-मच केली आणि मला काही माहित नव्हत. त्यात मी पण भर घातली, वास्तविक मला शॉपिंग वगैरे फार आवडते असे हि नाही. पण नवीन नवीन लग्न ठरल होत म्हणून म्हणा किंवा मला ड्रेस आवडला म्हणून, मी एक ड्रेस पीस विकत घेतला आणि अभी ते पाहून माझ्या वर पिसाटला. पाहायला गेल तर तो बरोबर होता कारण आधीच गाडीचा लफडा होता. डोक्यावर रण-रणत ऊन आणि गाडीच्या नाटकामुळे अभिजीतच वैतागण साहाजिक होत. माझी चूक असल्या कारणास्तव मी थोडा वेळ त्याची बड-बड ऐकुन घेतली आणि मग प्रती उत्तर करायला सुरवात केली. पण आम्ही एक-मेकांना बरीच वर्षे ओळखत असल्या कारणास्तव फार वेळ चाललं नाही. लगेच सर्व शांत होऊन आम्ही दाल सरोवरच्या समोर असलेल्या "नथू स्वीट्स" मध्ये जेवायला गेलो. साधना आणि उमेशला आम्ही तिकडेच बोलावले होते. आमचे जेवण होई पर्यंत ते आले, पटा-पट त्यांना जेवायला सांगितले कारण उमेशला श्रीनगरच्या आय बी एन ऑफिस मध्ये काही काम होते. मी हॉटेलच्या बाहेर त्यांची वाट पाहात असताना एक इसम आला आणि मला विचारले "Which country your from?" मी चपापलो आणि म्हणालो इंडिया. तो म्हणाला "ये तो फिरंग करते हे" बहुदा त्याला मी निगरो वाटलो असेन. मग मी आणि अभी उमेश बरोबर आय बी एन च्या ऑफिस मध्ये जाऊन आलो, तो पर्यंत सर्वाना तयार राहण्यास सांगितले होते. आम्ही परत येताच सर्व पुढे जाण्यास एकदाचे निघालो.

आज आमचे कारगिल पर्यंत जायचे ठरले होते, पण या सर्व लफड्यात २ वाजेल होते आणि आम्ही अजून श्रीनगर मधेच होतो. आता आम्ही काय कारगिल पर्यंत जाऊ असे काही वाटत नव्हते, कारण अजून सोनमर्ग मग झोजीला पास करून द्रास आणि त्याच्या पुढे कारगिल. हे काय शक्य नव्हते म्हणून किमान दिवसा
उजेडी झोजीला पास करून द्रास पर्येंत जायचे ठरले. आम्ही जे सुसाट निघालो ते मध्ये कुठेही न थांबता ८० किलो मीटर वर एका पेट्रोल पंपा जवळ ब्रेक घेतला. चहा, बिस्कीट, फोटोग्राफी आणि मस्ती हे नेहमी प्रमाणे चालूच होते. बाईक मध्ये पेट्रोल भरून आम्ही निघालो. मी बाईक बाहेर काढली आणि बाईक हलते असे जाणवले. मला वाटले कि टायर पंचर झाला. दिपालीला उतरण्यास सांगितले आणि पाहतोतर खरोखरच टायर पंचर झाला होता. च्यैला अगोदरच   उशीर झाला होता आणि आता हि पंचायत. अभी पुढे निसटला होता, मग त्याला फोन करून परत मागे बोलावले कारण टूल किट त्याच्या बाईकला बांधले होते. मग मी, एका उत्साही गावकऱ्याच्या मदतीने मी टायर काढला. वास्तविक त्या गावकऱ्याने मला मदती पेक्षा त्रासच दिला. टायर काढताना चैन स्पोकेट काढायची गरज नव्हती, पण "वो निकालना पडेगा, निकालना पडेगा" कडून त्याने चैन स्पोकेट काढले. त्यातच आम्हला कळले कि ४ किलो मीटर मागे गावात पंचर काढणारा आहे. मी आणि अभी टायर घेऊन तेथे गेलो. तो पंचर वाला नमाज पडायला गेला होता. तो पर्यंत मी ट्यूब मधली हवा काढायला गेलो. तेव्हा मला आणि अभिला कळले कि आम्ही सर्व टूल आणि पंचर किट आणलाय पण टायर मधली हवा काढायची चावी आणली नाही आहे. आम्ही एक-मेकांकडे बघून हसलो,  तेवढ्यात तो पंचरवाला आला. त्याने कधी या बाईकचे पंचर काढले नव्हते, त्याने फक्त ट्रकचेच पंचर काढले होते. भरपूर करामत करून त्याने पंचर काढले आणि त्याला मी पैसे विचारले. तो म्हणाला "में ने कभी ये पंचर नहीं निकला हे, आप दे दो जो होता हे". अभी कडे ५० रुपये होते ते मी त्याला दिले. निघताना तो मला  बोलला  "ये जो रेडियो पर गाना चल रहा हे, वो गायक आपको मालूम हे, ये पाकिस्तानी गायक हे. आप  ने इसे कभी सुना भी नहीं होगा". पंचरवाल्याने पाकिस्तानी फ्रिकवेन्सी वर रेडियो लावला होता. पंचर काढून परत आलो तो पर्यंत आमची गाडी सोनमर्गला पोहोचली होती. त्यांच्या कडून रोहनला कळले कि द्रासच्या अलीकडे ब्रिज कोसळलाय. आर्मी ब्रिज दुरुस्त करायचे काम करत आहे, उद्या दुपार पर्यंत वाहतूक चालू होईल असा निरोप आला. शेवटी नाहीलाजास्तव रोहनने त्यांना राहण्याची आणि जेवण्याची सोय पाहायला सांगितली. कारण सोनमर्ग नंतर झोजीला पास करून द्रास आणि द्रासच्या अलीकडेच ब्रिज पडला म्हणून मध्ये कुठे हि राहायची सोय होणार नव्हती. मग मी त्याच गावकऱ्याच्या मदतीने टायर लावला आणि आम्ही सर्व सोनमर्गच्या दिशेने निघालो.
सोनमर्गला पोहोचे पर्यंत गाडीतून पुढे आलेल्या मंडळीनी राहण्याची व जेवण्याची सोय करून ठेवली होती आणि आता अंधार ही पडायला लागला होता. सोनमर्गला आम्ही सर्व भेटलो आणि साधनाने फुटेज घेऊन सर्व जेवायला गेलो. जेवता-जेवताच मीटिंग घेतली आणि नंतर मी, कुलदीप, अमेय म्हात्रे सरकारी  रेस्ट हाउसचा रस्ता पाहायला गेलो. रेस्ट हाउस एका छोट्या टेकाडावर होते आणि मस्त थंडी पडायला लागली होती. आम्ही परत खाली येऊन सर्व रेस्ट हाउसवर आलो. एवढ्या थंडीत रेस्ट हाउस मध्ये मस्त कॉझी वाटत होते आणि ते होते सुद्धा. ऐश्वर्या आणि शोबितची तब्बेत जरा जास्तच खराब होत होती. त्यांना गरम पाणी देऊन झोपायला सांगितले. आम्ही पण उद्याची आणि झोपायची तयारी करून घेतली. आज फार प्रवास झाला नव्हता म्हणून मला चंद्र पाहून फोटोग्राफी करायचा मूड आला. मी कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन बाहेर आलो, माझ्या मागोमाग कुलदीप, अमेय म्हात्रे आणि उमेश पण आले. बाकी सर्व आम्हाला शिव्या घालत होते, पण फोटोग्राफीच्या पुढ्यात आम्हाला काही कळतच नाही. आम्ही फोटोग्राफी करत आहोत पाहून २ मुले बाजूला वरांड्यात येऊन बसली. नंतर चार्चान्ति मला  कळाले  कि ते दोघे जम्मू मध्ये सौफ्टवेयर कंपनीत इंजिनियर आहेत. मी त्यांना बोललो "क्या लकी हो यार तुम मस्त जगह पर काम कर रहे हो, मजा आयेगा  काम करने में इधर". मग तो मला बोलला "आप को लगता हे पर आप का बॉम्बे-पूना अच्छा हे". माझ्या मनात विचार आला कि हा "Grass is always, Greener on other side" कारण मी भोगलंय हे, माझी पहिली कंपनी सोडून cleartrip मध्ये भुललो तेव्हा. तास भर फोटोग्राफी आणि गप्पा मारून आम्ही झोपी गेलो.

या दिवसाचे मी काढलेले सर्व फोटो पहायचे असल्यास टिचकी मारा: तिसऱ्या दिवसाचे सर्व फोटो.

2 comments:

  1. टायर पंचर काढतानाचा फोटो छान आहे amey

    ReplyDelete
  2. अमेय साळवी - फटका माणूस18/3/10 21:20

    धन्यवाद अक्षता....

    ReplyDelete