29.12.10

लेह बाईक ट्रीप - तेरावा दिवस (मनाली ते चंदीगड)

२० ऑगस्ट २००९, काल उशिरा उठायचे ठरल्या प्रमाणे तसे सर्वांनी हे काम मात्र आवडीने केले. सकाळी ८ च्या दरम्यान उठलो आणि फ्रेश होऊन अभी, मी आणि मनाली, आमच्या पुढच्या प्रवासाकरता गाडीची सोय करायला बाजारात गेलो. आज मस्त सर्व रिलॅक्स मूड मध्ये होते फार पळा-पळ नव्हती रोजच्या प्रमाणे. काल रात्री उशिरा ने आम्ही मनालीत आल्यामुळे, शहर पाहायला मिळाले नव्हते आणि आज चंदीगड गाठायचे होते म्हणूनही शहर पाहायला हि मिळणार नव्हते. या कारणास्तव आम्ही टॅक्सी स्टॅंड पर्येंत पायीच जायचे ठरवले. हॉटेल ते टॅक्सी स्टॅंड तसे काही फार अंतर नव्हते. टॅक्सी स्टॅंड वर चौकशी अंती मनाली ते चंदिगड आणि एक दिवस हॉल्ट करून दिल्ली सोडायच्या गाडीचे भाडे आमच्या बजेटच्या बाहेर आहे असे कळाले. या बद्दल अभी आणि माझ्या मध्ये चर्चा चालू झाल्या. नाश्त्यासाठी बाकी सर्वांना हॉटेल वरून मनाली शहराच्या चौकात बोलावले होते. तो पर्येंत अभी, मनाली आणि मी बाझारात फेर-फटका मारायला गेलो. थोडा वेळ बाजारात फिरून, अभिने ए.टी. एम. मधून पैसे काढले आणि आम्ही चौकात सर्वांना भेटलो. मस्त हॉटेल मध्ये पुरी-भाजीचा नाश्ता मागवला, बरेच दिवसंनी जरा चम-चमित नाश्ता करायला मिळणार होता म्हणून बरे वाटले. नाश्ता करता-करता अभी, रोहन आणि मी पुढच्या प्रवासा बद्दल चर्चा करायला लागलो. मनाली शहरातली टॅक्सी यूनियनची गाडी फार महाग पडणार होती, म्हणून बरेच दुसरे पर्याय पाहायला लागलो. अभीच्या मते वोल्वो बसने ५ जण आणि सामान पुढे पाठवायचे असे होते, पण हा पर्याय अभी सहित कोणालाही पसंत नव्हता. कारण मग ग्रूप संपूर्णपणे तुटला असता. नाईलाजास्तव जर काहीच सोय नाही झाली तर हा पर्याय शेवटचा असे गृहीत धरून आम्ही दुसरे पर्याय पाहायला लागलो. एवढ्यात मला काका जोशीचा मित्र गोकुळ मनालीत राहतो असे लक्षात आले. काकाला फोन लावून गोकुळचा फोन नंबर घेतला आणि काकाला पण त्याच्याशी बोलायला सांगितले.

नाश्ता उरकून आम्ही हॉटेल वर परतलो, बाकी सर्व बाजारात फिरून मग येणार होते. मी परत काकाशी बोललो आणि मग गोकुळला फोन लावला. काकाने गोकुळला  आमच्या अडचणी बद्दल आधीच कल्पना दिली होती. गोकुळने आम्हाला भेटायला बोलावले. मी, अभी आणि  रोहन बाईकस घेऊन इष्ट स्थळी गोकुळला भेटायला गेलो. गोकुळ बरोबर चहा झाली आणि बऱ्याच जुन्या-पुराण्या आठवणींच्या गप्पा… एवढ्यात त्याने आमच्या साठी पाहिलेल्या गाडीच कॉन्फोर्मेशॉन आले. हि गाडी चंदिगडची  होती आणि परत रिकामी जाणार त्या ऐवजी आम्हाला अर्ध्या  किमतीत  घेऊन  जाणार. मग पुढे चंदिगड ते  दिल्ली  दुसर्या  गाडीची  सोय  करून  देणार  होती. गोकुळने केलेल्या  मदती  बद्दल  त्याचे  आभार  मानले  आणि  हॉटेल  वर  परतलो. आम्ही  परत  हॉटेलवर येई  पर्येंत  बाकी  सर्व  बाजारातून  मस्त  शॉपिंग करून आले होते. अमेय  म्हात्रे , कुलदीप , ऐश्वर्या, पूनम  यांनी  त्यांच्या  मुंबईच्या  मित्रान  करता भेट द्यायला   म्हणून  लाकडावर  नावे  लिहिलेल्या   किचेन्स   करून  घेतल्या  होत्या . मला  ते  फार  आवडले   आणि  माझ्या  मित्रान  करता  पण  मला  घ्यायचे  होते . पण  काय  करणार  कामा  अभावी  आणि  त्याहून महत्वाचे   म्हणजे  वेळे  अभावी  मला  मनालीत शॉपिंग  करायला मिळालीच  नाही.

आम्ही  सर्व  सामान   आवरून  निघायच्या  तयारीला  लागलो. एवढ्यात गोकुळने  ठरवून  दिलेली  गाडी  हॉटेल  कडे  आली . सर्वांनी  सामान  गाडीत  भरून  ठेवले पण  गाडी  निघायला  दोन - एक  तास  होते. कारण  ड्रायवर  रात्रभर  गाडी  चालवून  मनालीला  आला  होता,  म्हणून  त्याला  थोडीशी  झोप  हवी  होती . गाडी  निघे  पर्येंत  गाडीतील  सर्व  टीम    मेम्बर  ओल्ड  मनाली   पाहून  येणार   होते . पण बाईक मात्र पुढे निघणार असे ठरले. ११ वाजता आम्ही हॉटेल बिआस सोडले आणि कुल्लुच्या दिशेने निघालो. आज परत मी आणि दीपाली बाईक वर एकत्र होतो, दुसर्या बाईकस वर अभी-मानली, रोहन-शमिका, आदित्य-ऐश्वर्या आणि अमेय म्हात्रे-साधना. मनाली शहराची  हद्द सोडली पण नव्हती एवढ्यात आम्हाला सकाळचा नाश्ता पचला आणि   परत भुका लागल्या आहेत असे जाणवले. मग काय पुढे कुठे हि जास्त वेळ थांबता येणार नाही असे म्हणून आम्ही लगेच हॉटेल पाहून थांबलो आणि भूकेच निरसन करायला  हॉटेल मध्ये शिरलो. मस्त शॉपिंग कॉंप्लेक्स मध्ये हॉटेल पहिल्या मजल्यावर होते. तळ मजल्याला  साडी आणि ड्रेसच्या कपड्यांची दुकाने होती. हॉटेल साठी वर  चढताना माझे, शामिकाचे आणि अमेय म्हात्रेचे डोळे फिरले आणि या बाबत चर्चा चालू झाल्या. सर्वांनी हॉटेल मध्ये मसाला डोसा ऑर्डर केला, नाश्ता येई पर्येंत मी, शमिका व अमेय म्हात्रे खाली दुकानात साड्या पाहायला गेलो. वास्तविक मीच शामिकला खाली घेऊन गेलो होतो, कारण मला आईसाठी साडी घ्यायची  होती. काल मी आई बरोबर फोन वर बोललो त्यावेळी मी तिला काही घेतले नाही म्हणून ती जरा नाराज झाली असे मला जाणवले. पण पाहिले तर साड्या मात्र एकसो-एक होत्या. शामिकाच्या मदतीने मी आणि अमेय म्हात्रेने आई साठी मनाली सिल्कच्या साड्या घेतल्या. साड्या पाहत असता शामिकला पण मोह आवरता आला नाही, तिने हि मनाली सिल्कचे ड्रेसचे कापड घेतले. शमिका मला बोलली रोहन आता शिव्या घालणार….तसे आम्ही तिघांनी पण सर्वान काढून शिव्या खाल्ल्या आणि त्या बरोबर मसाला डोसा पण खाऊन घेतला.

नाश्ता  कम जेवण उरकून आम्ही ११.३० च्या दरम्यान पुढे कुल्लुच्या दिशेने निघालो. बाईक चालवायला रस्ता मस्त होता, सुसाट बाईक पळवत होतो. रस्त्याला जरा ट्राफिक पण होते आणि वळणा-वळणाच्या रस्त्या मुळे थोड्या सावधानतेने बाईक चालवाव्या लागत होत्या. बिआस नदी रस्त्याला लागुनच आमच्या बरोबर धावत होती. आज बाईक चालवाची  मज्जा  काय औरच होती. मस्त डावीकडे बिआस नदीच्या सोबतीने आम्ही पतलीकूहल पार करत कुल्लू जवळ आलो ते कळलेच नाही आणि नेहमी प्रमाणे मी आज हि सर्वात मागे होतो. बाकी सर्व बाईकस पुढे निघून गेल्या होत्या. आज आमचे मागे राहण्याचे कारण फोटोग्राफी नव्हते गप्पा होत्या. गप्पांना पण आज काय वेगळाच रंग चढला होता, मस्त मूड मध्ये होतो दोघेही आणि एन्जॉय करत होतो. त्या गप्पा आणि निर्सगमय प्रवास या सर्व एन्जॉयमेंट मध्ये मी कुल्लू गावाला बायपास करून भून्तरला जाणारा पूल न घेता सरळ गेलो आणि कुल्लू गावातल्या अडगळीच्या रस्त्याने बऱ्याच वेळाने भून्तरला पोहोचलो. बाकी सर्व बाईकस भून्तर शहर पार करून आमच्या साठी रस्त्याला लागून असलेल्या एका सफरचंदाच्या दुकाना जवळ थांबले  होते. थांबण्याचे कारण नंतर कळाले कि ऐश्वर्याला सफरचंद हवी होती आणि मग जरा चहा घेऊन थोडे रिलॅक्स होऊया. 

आम्ही सर्व घोळका करून चहा घेऊ लागलो असता आमच्या मधूनच एक लोकल मुलगा आला आणि तो मनाली व ऐश्वर्याला धक्का मारून आत दुकानात गेला. चुकून धक्का लागला असेल असे वाटले म्हणून आम्ही दुर्लक्ष करून परत चहा घ्यायला लागलो. तोच मुलगा  दुकानातून बाहेर येताना मनालीला परत धक्का मारला. आता मात्र हा धक्का चुकून नव्हता,  एवढे कळण्या इतपत आपण सर्वच शहाणे आहोत. अभी आणि अमेय म्हात्रेने त्याला  अडवून “क्या भाई धक्का क्यों मार राहा हे लडकियों को ” असे विचारले. एवढ्या त्यांच्यात बाचा -बाची सुरु झाली, मग मी, रोहन आणि आदित्य पण बाचा-बाची मध्ये शामिल झालो. तो मुलगा आमचीच कशी चूक आहे आणि मुलीना घेऊन आम्हीच  मधेच कशी काय शाइनिंग मारतोय असे बोलायला लागला. या सर्व बाचा-बाची मध्ये आता आमचा पण पार चढायला लागला होता आणि बाचा-बाची पण वाढली. एवढ्यात त्या मुलाने अभिला जोरात धक्का मारला आणि बाचा-बाची सोडून हाणा-हाणी सुरु झाली. अभी आणि त्या मुला मध्ये मजबूत हाणा-हाणी झाली, हे पाहून मग आम्ही लगेच घुसलो मध्ये आणि त्या मुलाला दिले ढकलून अभी पासून लांब. परत मग आमच्यात आणि त्या मुलात बाचा-बाची झाली, मारा-हाण सुरु केल्या बद्दल. या बाचा-बाची मध्ये परत एकदा त्याने अभी, मला आणि अमेय म्हात्रेला धक्का-बुक्की करून मारा-मारी साठी प्रवृत्त  करत होता. किंबहुना अभी झाला सुद्धा आणि परत हाणा-मारीला सुरवात झाली. माझे तर  टाळकेच सरकले होते, पण कधी नव्हे तर मी आज संयम बाळगून होतो. सारखे माझे हात त्या मुलाला मारायला शिव-शिवत होते, पण आपण पर प्रांतात आहोत आणि तो मुलगा तिकडचा लोकल आहे याची लगेच जाण व्हायची, यामुळे मी बरेचदा मला आवरले. आम्ही अभी आणि त्या मुलाची हाणा-मारी परत एकदा सोडवली व त्या मुला बरोबर हुज्जत घालायला लागलो. एवढे सर्व पराक्रम पाहून आजू-बाजूला बरीच माणसे जमून घोळका जमला. आता बाचा-बाची मध्ये आजू-बाजूचे १-२ मंडळी पण त्याच्या बाजूने शामिल झाली होती. रोहन काही तरी बोलला आणि अचानक एका माणसाने रोहनच्या तोंडा वर हात मारला. हे पाहून साधना बोलली “ क्यों मारते हो, हमारी क्या गलती हे उस लडके कि गलती है”. रोहनला ज्याने मारले तो मुलगा साधनाला बोलला “चुप बे नाही तो तुमको भी दुंगा लगाकर एक”. या सर्वात ज्याच्याशी हाणा-मारी झालेली तो मुलगा “फोन लगाकर लोगो को बुलाता हु, अभी तुम रुको इधर” असे बोलत आणि फोन लावत घोळक्यात कुठे तरी नाहीसा झाला…….सर्व शांत झालेले पाहून तिकडच्या काही लोकल समंजस मंडळीनी आम्हाला “चलो अभी निकलो यहाँ से” असे सांगितले. लगेच आम्ही तिकडन पळ काढला.....चहाचे पैसे पण त्यांनी घेतले नाही आणि आम्ही देखील दिले नाही. तिकडन निघालो आणि माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी दीपालीला विचारले सर्व सामान वगैरे घेतले ना? काही राहिले नाही ना तिकडे. एवढ्यात दिपाली ओरडली “माझी बॅग राहिली”. लगेच परत फिरलो, तिकडची ती चहावाली बॅग घेऊन बाहेर होतीच. बॅग घेतली आणि आम्ही सर्व सुसाट बाईक पळवल्या. आता मात्र माझ्या आणि दीपाली मध्ये निराळ्या चर्चा होत्या. या सर्व प्रकरणा मुळे संपूर्ण मूड बदलला होता. मजबूत राग घुसला होता डोक्यात, बराच त्या मुलावर आणि थोडासा आमच्या स्व:तावर. मी तर जास्त करून आम्हा सर्वांना जास्त दोष देत होत पण दीपालीचे मात्र थोडेसे निराळे मत होते. दुसर्याच्या प्रदेशात मारा-मारी करायचे आणि त्यातून आम्ही ५ मुलां बरोबर ५ मुली. हे सर्व समीकरण मला पटत नव्हते म्हणूनच मी मारा-मारी सोडवण्यात भाग घेत होतो आणि आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयेत्न करत होतो. किंबहुना मारा-मारी म्हटले कि माझे जास्त डोके पेटते आणि मी लगेच मारा-मारीत सहभागी ही होतो. पण या वेळेला मात्र माझ्या स्वभावाला निरसून फार निराळे वागणे झाले, ते हि त्या मुलाची चूक असताना. सहसा आपली चूक नसेल तर, मी जराही माघार घेत नाही आणि जर आपली चूक असेल तर माफी मागायला पण कमी पडणार नाही. पण यावेळेला कसा काय थांबलो ते मलाच कळाले नाही, बहुदा सर्वांनी मिळून मारा-मारी केली असती तर राडा अजून चांगलाच चीगळला असता. कसे-बसे रड्यातून पळालो होतो आणि बिलासपुर - मंडी रस्त्या वर १५ एक किलोमीटर वर एका पेट्रोल पंप जवळ थांबलो.

जरा रिलॅक्स होऊन पुन्हा मारा-मारीच्या च चर्चा करत आम्ही पुढे निघालो. सारा मूड मारा-मारी मधेच होता, पण आता आम्ही बाईकस मगास सारख्या पळवत नव्हतो. मस्त नेहमी प्रमाणे आरामात बाईक चालवत आजू-बाजूचा आनंद लुटत पुढे मंडीच्या दिशेने चाललो होतो. आता बर्याच पैकी रड्याच्या मूड मधून बाहेर निघलो होता आणि मी व दिपाली परत साधारण गप्पान मध्ये घुसलो.  थोड्या वेळाने मधेच एक भोगदा लागला. भोगदा बघितल्या-बघीतल्या मी थांबलो. कारण नंबरचा गोगल काढायला, नाहीतर भोगद्यात सर्व काळ-काळ दिसायचे आणि नको तिकडे घुसायचो. गोगल काढला आणि चष्मा घालून भोगद्यात शिरलो. भोगदा संपता संपत नव्हता. दिवसा-ढवळ्या फुल काळोकातून ३ किलोमीटरचा भोगदा पार करून बाहेर आलो. चष्मा काढ-घाल मुळे मी मागे पडलो होता म्हणून सर्व बाईकस भोगद्याच्या बाहेर माझी वाट पाहत होत्या. आता परत चष्मा काढून गोगल चढवला आणि पुढे निघालो. लगेच मंडी शहर लागले, ४ वाजले होते आणि सर्वांना मजबूत भुका लागल्या होत्या. साहाजिक आहे ४ वाजता सर्व साधारण पणे कोणालाही भूक लागतेच किंबहुना नाष्टा १२ वाजता केला असेल तरीही आणि यातून आम्ही काही अपवाद नव्हतो.  मंडी शहरा जवळ रस्त्याला लागूनच हॉटेल पाहिले आणि घुसलो आत. छान हॉटेल पण शांत, दुसरे कोणीही गिराईक हॉटेल मध्ये नव्हते. आज तसे आम्ही पण झाल्या प्रकारा मुळे शांत होतो. जेवण उरकून संपवायच्या मार्गवर असे पर्येंत मागाहून येणारी आमची गाडी पण याच हॉटेल वर येऊन धडकली. मग त्यांचे पण जेवण ऑर्डर झाले, आता मात्र आमचा शांतपणा विस्कटला आणि झाल्या प्रकारणा बद्दल त्यांना माहिती द्यायला लागलो. पुन्हा त्या विषया वर चर्चा सुरु झाल्या. चर्चेयन्ति असे कळाले की उमेश आमच्या त्या राड्यात नव्हता म्हणून बरे झाले, कारण उमेश आमच्या सर्वान मध्ये सर्वात जास्त तापट डोक्याचा आहे. जर तो रड्या मध्ये असता तर मजबूत फोडा-फोडी झाली असती, पहिली त्यांची आणि मग आमची….

याच चर्चांन मध्ये सर्वांचे जेवण झाले आणि पुढे निघलो. आता आमची गाडी बाईकस साठी न थांबता पुढे सुटणार होती, कारण ड्रायवर थकल्या मुळे त्याला पटा-पट चंदीगडला पोहोचायचे होते. गाडी सुटली आणि पाटो-पाट आम्ही पण निघालो. ५ वाजून गेले होते आणि आता रस्त्याला ट्रकची रहदारी पण जास्त होती. आजचा राडा सोडला तर बाईक चालवायला आणि आजू-बाजूच्या परिसरामुळे फार मजा आली होती. तसा मूड फारच छान होता आज. परत मी आणि दीपाली गप्पान मध्ये घुसलो, रस्त्याला रहदारी फार होती तरीही आम्ही मज्जा करत होतो. रस्ता चढ-उतारांचा होता, आपल्या पुण्या-मुंबई जवळचे घाट आहेत तसे. याच ट्राफिक मधून आम्ही पुढे चललो होतो. आज काय मज्जा निराळीच होती. मी आणि दीपाली ती वेळ, तो प्रवास फार एन्जॉय करत होतो. मला तो प्रसंग अजूनही आठवतो आहे, दीपालीने तिच्या सासू बाईंना खुशाली विचारण्याकरता फोन लावलेला. ती बाईक वर बसूनच त्यांच्याशी गप्पा मारत आणि ट्रीप बद्दलच्या गोष्टी सांगत होती. नंतर अमोल बरोबर पण ती गप्पा मारायला लागली. अधून-मधून मी पण तिच्या त्या गप्पांन मध्ये मस्ती करायला म्हणून सहभागी होत होतो. माझ्या कॉमेंट्स पण ती सासू बाईन कडे आणि अमोल पर्यंत पोहचवत होती. आमच्या फार निराळ्या गप्पा चालल्या होत्या, वेगळ्या विश्वातच मी आहे असे मला वाटत होते. किंबहुना मला दीपालीच्या फॅमिलीच्या विश्वात आहे असे वाटत होते.

आता अंधार पडायला लागला होता, मधेच रोहनच्या बाईकच्या टायर मध्ये हवा कमी झाली असे त्याला जाणवले म्हणून आम्ही सर्व थांबलो आणि थोडा ब्रेक हि घेतला. तो पर्येंत त्याने टायर मध्ये हवा चेक करून घेतली आणि पुढे निघालो. परत जरा बाईक चालवून थोड्या वेळाने सर्वांचेच बुड दुखायला लागले म्हणून एका हॉटेल जवळ आम्ही चहाला थांबलो. फ्रेश होऊन चहा घेत १५-२० मिनटांचा ब्रेक घेऊन पुढे चंदिगडच्या दिशेने निघालो. पुढचा प्रवास अजून अंदाजे १०० किलोमीटरचा होता. घाटातला रस्ता आणि ट्राफिक मुळे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाइट्सचा फार त्रास होत-होता. अशाच परीस्थीतीतून बराच वेळ बाईक चालवून सर्व थकलो होतो आणि १०.३० च्या दरम्यान पुन्हा भुका लागल्या म्हणून किरतपूर साहेब जवळ-पास एका हॉटेल जवळ थांबलो. वास्तविक आमच्या गाडीच्या ड्रायवरने इकडे चांगले जेवण मिळते असे सांगून थांबवले होते. पण हॉटेलचा परिसर पण तसा हि मला आवडला होता. मस्त उतरत्या घाटात वळणावर होते ते हॉटेल. वरून थंड वारा पण छान लागत होता, हॉटेलच्या दारात. पटा-पट जेवण हाणले आणि पुढे निघलो. आता सारा रस्ता उतरणाचा होता. घाट उतरून जसे खाली पठाराला लागलो तर सर्वीकडे रस्त्याचे काम चालू होते.  कच्च्या रस्त्यावरून, ट्रक मुळे धुरळा उडत होता आणि त्यांच्या पाठोपाठ जाताना आम्हाला फार त्रास होत-होता. यातून आज अभीला बाईक वर भलतीच झोप येत होती, त्यामुळे आता तो जरा हळू झाला होता. रोहन, अमेय म्हात्रे आणि आदित्य जरा पुढे निघून गेले होते व अभी आणि मी त्यांच्या थोडेसे पाठी होतो. मध्ये जरा कुठेही थांबायला मिळाले कि पुढचा ग्रूप थांबायचा आणि मागून आम्ही आलो कि मग सर्व एकत्र निघायचो पुढे. पण लगेच २ ग्रूप मध्ये ग्याप पडायचा. अभी जरा फारच हळू झाला होता आणि ते साहाजिक आहे. १३ दिवस बाईक चालवायचे म्हणजे काय खायचे काम नाही आहे आणि ते हि एकही दिवस आराम न करता. वरून अभी वर एक्सपीडीशनची सर्वात जास्त जबाबदारी होती, एक्सपीडीशन लीडर होता ना..हरकत नाही होते असे एवढ्या कठीण परिस्थिती मध्ये. मधेच एका ठिकाणी गाड्यांची लाईन लागलेली होती, रेलवे क्रॉसिंग साठी थांबले होते. आम्ही पण थांबलो रोहन आणि ग्रूप रेलवे क्रॉसिंग पार करून जरा पुढे एका पेट्रोल पंपच्या बाहेर आमची वाट पाहत उभे होते.

आम्ही क्रॉसिंग साठी जेव्हा थांबलो, तेव्हा पण अभी बाईक वर बसल्या-बसल्या हॅंडल वर डोके ठेवून झोप काढायला लागला. ट्रेन क्रॉस होई पर्येंत त्याने मस्त थोडीशी झोप काढली आणि फाटक उघडताच आम्ही पुढे निघालो. पुढे आमची सर्व वाट पाहताच होते, त्यांना भेटताच रोहन ने  विचार-पूस सुरु केली अभिच्या झोपे  बद्दल. अभी, मी आणि रोहन मध्ये चर्चा झाली. रोहन ने आमची गाडी चंदीगडला हॉटेल वर आताच पोहचल्याचे पण सांगितले. आता सर्व थकले होते, साहाजिक आहे १२ वाजत आले होते. १२ तास बाईक चालवून किंवा मागे बसून पण थकायला होतेच. मग मीच रोहनला बोललो चंदिगड अजून ७०-८० किलोमीटर आहे तुम्ही सर्व पुढे व्हा, मी आणि अभी मागून येतो हळू-हळू. उगीचच सर्वंना त्रास कशाला असे म्हणून रोहन, आदित्य आणि अमेय म्हात्रे सुटले पुढे, मागाहून अभी आणि मी निघालो. आता सर्व टीमशी आणि अभिच्या झोपेशी काहीही संबंध राहिला नव्हता. सर्व टीम स्वतंत्ररीत्या विभागल्या गेल्या होत्या. मला आणि दीपालीला तर फारच मज्जा  येत होती, मस्त मूड मध्ये होतो आम्ही. अभी बिचारा थकल्या मुळे झोपेच्या आहारी जात होता आणि मनाली त्याला काहीना-काही तरी करून जागे ठेवण्याचा प्रयेत्न करत होती. मी मनालीला सांगून ठेवले होते, अभिच्या मागे सारखी बक-बक चालू ठेव. जशी माझी आणि दीपालीची चालू असते तशी.

आज गप्पांनी तर वरचाच स्तर गाठला होता. जस-जसे ट्रिपचे दिवस जात होते तस-तशी आमची मैत्री पण घट्ट होत गेली आणि आज तर त्याचा उचांकच गाठला, आम्ही दोघे गहन मित्र होऊन गेलो होतो. पण गप्पा मारत असताना देखील माझे आणि दीपाली, दोघांचेही मागून अभी कडे लक्ष होतेच. कधी ५ तर कधी १० किलोमीटर पुढे जायचो आणि मला मागून अभिची बाईक आजू-बाजूला गेल्या सारखे जाणवायचे. मग मी पुढे जाऊन अभीला ब्रेक साठी विचारायचो. कधी अभी ब्रेक घ्यायचा, तर कधी जरा पुढे जाऊन ब्रेक घेऊ असे म्हणायचा. असे करत कर आम्ही पुढे चाललो होतो. बरेचदा मी त्याला अर्धा-एक तास रस्त्या लागत कुठे तरी शिस्तीत झोप काढ असे हि सांगितले, पण आमच्या दये खातर तो चला पुढे हळू-हळू जाऊ असा म्हणायचा. तसे पाहायला गेले तर मनाली पण थकली होती पण अभिची हि अवस्था पाहून आणि त्याला सांभाळण्यामुळे ती स्व:ताचा थकवा विसरत होती. माझी आणि दीपालीची तर मज्जा चालू होती. अभी ब्रेक साठी थांबला कि आम्ही काही ना काही तरी कारण काढून मस्ती करायचो आणि मनालीला पण मस्तीत शामिल करायचो. असे करत-करत आम्ही बरेच पुढे आलो आणि चंदिगड पासून २५ एक किलोमीटर अलीकडे अभी एका पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबला. त्या वेळेला मात्र अभिची संपूर्ण शक्तीच संपली होती. तो फक्त अडवा व्हायचाच राहिला होता, पण माझ्या मते तो थोडा वेळ अडवा पडला असता तर जरा फ्रेश झाला असता. त्याने तसेच जामिनावर बसल्या बसल्या १०-१५ मिनट एक झोप काढली. जरा तोंडावर पाणी मारून सर्वांनीच फ्रेश होऊन घेतले आणि पुढे निघालो. आता जरा गप्पा कमी होऊन माझे जास्त लक्ष अभीच्या बाईक चालवण्याच्या पद्धती कडे होते, तसे मी दीपालीला पण सांगितले. जरा बड-बड कमी करूया आता,मला अभी कडे लक्ष देऊ दे. असे करत आम्ही १०-१२ किलोमीटर गाठले आणि २.३० च्या दरम्यान रोहनचा आम्हाला हॉटेल वर पोहोचल्याचा फोन आला. आम्ही अजून चंदिगड पासून १३ किलोमीटर अलीकडे आहोत असे सांगितले आणि जवळच रस्त्याच्या बाजूला एक चहावाल्या कडे चहा घेतला. या वेळेला मात्र आम्ही पण थकलो असे जाणवले. चहा मी, मनाली आणि दिपालीनेच घेतली. अभीने चहा न घेता इकडे हि टेबल वर डोके ठेवून झोप काढून घेतली. इकडून निघताना अभिने मला विचारले अजून चंदिगड किती लांब आहे. मी १३ किलोमीटर असे सांगताच अभीच बोलला चल आता कुठे हि न थांबता एका फटक्यात जाऊया आणि तसेच आम्ही केले. ३ च्या दरम्यान आम्ही चंदिगड शहरा कडे जाणाऱ्या रस्त्या जवळ पोहोचलो. मी रोहनला फोन केला आणि हॉटेल वर कसे यायचे विचारून घेतले. रोहन ने हॉटेलचे नाव पार्क व्यू, सेक्टर आणि पंजाब यूनिवर्सिटीचा बोर्ड पाहात ये असे सांगीतले. रोहनच्या सुचने प्रमाणे निघालो. ३ च्या दरम्यान चंदिगड शहरा मध्ये एकही माणूस रस्त्याला नसताना, हि न चुकता आम्ही बरोबर ३.१५ वाजता हॉटेल वर पोहचलो. काय मस्त सुनियोजित शहर आहे चंदिगड याची जाणीव झाली.

हॉटेलच्या दारात उमेश आणि रोहनचा मित्र कुणाल, फोन केल्या मुळे बाहेरच आमची वाट पाहात होता. बाईक लावली आणि कुणाल आम्हाला रूम मध्ये घेऊन गेला. अभी तर रूम वर जाताच झोपी गेला. आमचा पिक्चर अजून बाकी होता. कुणाल काही केल्या आम्हाला जेवल्या शिवाय झोपून देतच नव्हता. तो बोलला “आप हम चंदिगड वालो कि खातीरदारी देखो तो. आप बस क्या चाहिये बोलो, हम लाके देंगे”. मग मी बोललो “जाने दो ना, ३.१५ बजे क्या मिलेगा”. एवढ्यात त्याने आत्ताच आणलेले बटर चिकन – रोटी आणि बिर्यानी बाहेर काढून “ये दोनो मै अभी लेकर आया हु” असे बोलला. पुढ्यात जेवण पाहून मी त्याला बोललो “फिर बस हो गया, हम अड्जस्ट कर लेंगे” हे बोलताच, तो बोलला “किऊ अड्जस्ट करेंगे, हम ला नही सकते क्या तुम्हारे लिये. अड्जस्ट करने कि जरा भी जरुरत नही हे. ये लाया हुआ पहेले वाले खालो, मै पीछे वालो के लिये अभी लेकर आता हु” असे बोलून तो उमेशला घेऊन निसटला. कुणाल आमच्या करता जेवण आने पर्येंत मी फ्रेश होऊन पहिले आणलेल्या जेवना मध्ये हात मारायला सुरवात केली. अभी सोडला तर सर्वच रात्री ३.३० वाजता जेवण हाणायला लागले. एवढ्यात कुणाल परत जेवण घेऊन आला. जोर-जोरात मस्ती आणि अभिचे किस्से एन्जॉय करत आम्ही जेवत होतो. एकदा-दोनदा आरडा-ओरडा नको, आवाज जरा कमी करा अशा हि आरोळ्या ऐकायला मिळाल्या. आज परत मी, आदित्य आणि शोबित एकत्र रूम मध्ये होतो. जेवण आमच्याच रूम मध्ये चालले होते. जेवण उरकून, रूम साफ केला आणि सर्व रूम मध्येच गप्पा मारत बसलो. शेवटी ४ वाजता कुणाल बोलला “अभी ४ बाज गये आप सो जाओ, बहुत थक गये हो”. मी आणि दीपाली तर अजून मजा करायच्या मूड मध्ये होतो. पण परत उद्या दिल्ली सर करायची होती आणि परवा मुंबई असे बोलून सर्व आप-आपल्या रूम मध्ये झोपी गेलो.

No comments:

Post a Comment