17.12.10

लेह बाईक ट्रीप - बारावा दिवस (सरचू ते मनाली)

१९ ऑगस्ट २००९, काल मला मस्त झोप लागली होती, रोजच्या प्रमाणे सकाळी ६ वाजता उठलो. हल्ले-डूल्ले बेड वर मस्त झोप लागली पण काल रात्री पेक्षा हि आता जास्त थंडी वाजत होती. स्लीपिंग बॅगच्या बाहेर आल्यावर तर जास्तच थंडी वाजत होती आणि टेन्टच्या बाहेर आल्यावर तर त्या हून मजबूत थंडी वाजायला लागली. एवढ्या थंडीत दात घासणे आणि उर्वरित प्रात:विधी कसे उरकायचे या विचारातच होतो, एवढ्यात कुणी तरी कळवले कि या सर्व कामांसाठी कॅम्पवाल्यांनी गरम पाण्याची सोय केली आहे. मग काय सोन्याहून पिवळे, लगेच गेलो प्रात:विधी उरकायला. सर्व प्रात:विधी उरकून आम्ही नाश्त्याला आलो. मस्त गरम-गरम नाश्ता केला व पाणी वगैरे भरायला लागलो. सर्व आवरून बाईक पण गरम करायला ठेवल्या. एवढ्यात कळले कि आमच्या बाईक्सला पण भूख लागली आहे. विशेष करून माझ्या आणि कुलदीपच्या, पण यावेळी मात्र आदित्यच्या पण बाईकला भूख लागली होती. मग आदित्यला आमच्या गाडीच्या ड्राइवरला घेऊन परत १० किलो मीटर मागे पेट्रोलच्या शोधात पाठवले. त्याला यायला बराच वेळ लागणार म्हणून काही जण थोडे रिलॅक्स झाले. काल कॅम्प साईट वर रात्री उशिरा काळोखात आलो होतो म्हणून आम्हाला कॅम्प साईटचा परिसर पाहायला मिळाला नव्हता. तो पर्येंत मी कॅम्प साईट न्याहाळायला लागलो. काय मस्त परिसर होता, डोंगराच्या कुशीत तयार केलेली हि मस्त कॅम्प साईट होती. आदित्य येई पर्येंत मी तिकडचे काही फोटो काढत रहिलो. 

थोड्या वेळाने आदित्य पेट्रोल घेऊन आला. माझ्या आणि कुलदीपच्या बाईकला जास्त पेट्रोल पाजले व बाकी सर्व बाईक्सला थोडे थोडे पेट्रोल पाजून आम्ही निघायच्या तयारीला लागलो. या कॅम्प साईट वर एक ग्रुप फोटो काढावा असे वाटले म्हणून सर्व फोटो साठी उभे राहिले. पण आज सर्वच रिलॅक्स झाले होते म्हणून मस्त मूड मध्ये होतो. फोटो काढायचा तर स्पेशल साधना स्टाइल मध्ये "चाल तर मग" अशा पोझ मध्ये. सर्वांचे एक मत करून "चला तर मग" पोझ मध्ये काढलेला हा फोटो.


सकाळी उठल्या पासून सारखे कॅम्प साईटच्या कामगारान कडून किंवा बाकीच्या ड्राइवर कडून आम्हाला "आगे बारालाच्छा को आपको बारिश मिलेगा" असे सांगणे होते. त्यात आता आमचा ड्राइवर पण तेच सांगायला लागला. मग जास्त वेळ वाया न घालवता आम्ही ७.३० च्या दरम्यान सरचू सोडून मनालीच्या दिशेने बारालाच्छा-ला कडे निघालो. 

आज नेहमी प्रमाणे मी आणि दिपाली एकत्र होतो. आज मी फ्रेश होतो म्हणून फोटो काढायचे वाटत होते आणि त्या प्रमाणे मी काढत पण होतो. जस-जसे मला फोटो काढावेसे वाटत होते तस-तसे मी आता काढत होतो. असे करत करत कधी आम्ही १३,२८९ फुटावरच्या बारालाच्छा-ला (ला म्हणजे लधाकी भाषेत खिंड) गाठले कळलेच नाही. याचे कारण माझ्या आणि दीपालीच्या गप्पा असाव्यात किंवा मस्त निसर्गात फोटोग्राफीत गुंतलो होतो म्हणून म्हणाना. ८.३० च्या दरम्यान आम्ही बारालाच्छा-ला पार करून पुढे निघालो. आता आमचे पुढचे लक्ष होते झिंग-झिंग बारचा घाट. जस-जसे आम्ही पुढे चढायला लागलो तसे कधी नव्हे तर अभीची बाईक त्रास द्यायला लागली. आज अभी बरोबर शोबित होता, मनालीला जरा आराम हवा होता.पण शोबितच वजन घेऊन अभिची डिस्कवर घाट चढतच नव्हती. अभी मला बोलला दिपालीला त्याच्या बाईकवर बसु दे आणि शोबितला माझ्या बाईकवर, म्हणजे घाट चढताना फार त्रास होणार नाही. आता शोबित माझ्या बरोबर होता. मस्त फोटोग्राफी करत आम्ही पुढे चाललो होतो. हवेत अजूनही थंडावा होताच. जॅकेट घातल्या मुळे मला तशी फार थंडी वाजत नव्हती, पण माझ्या हाताला मात्र नेहमी प्रमाणे हात मोजे घालून सुद्धा फारच थंडी वाजत होती. थोड्या वेळेने तर कल्च पण दाबायला जमेना एवढे माझे हात गारठले. शेवटी आम्ही थांबलो आणि शोबित ने माझ्या हातांना, त्याच्या हातांने घर्षणाच्या द्वारे थोडी ऊब द्याचा प्रयेत्न करत होतो. बराच वेळाने हातात थोडा जीव आला. अजून थोडा वेळ तिकडेच हातात जीव आणण्याचा प्रयेत्न करत होतो. बाईकचा क्लच दाबण्या इतपत हातात जीव आला आणि मग आम्ही पुढे निघालो. आता आम्ही बाकीच्या बाईक्स पेक्षा बरेच मागे राहिलो होतो म्हणून पटा-पट पुढे पळू लागलो. 

थोड्या वेळातच आम्ही झिंग-झिंग बार पार करून पुढे गेलो आणि बाकी सर्व बाईक टेन्ट स्वरुपात असलेल्या होटेल जवळ थांबले होते. सर्वांना असे काही दिसले कि लगेच भूख लागते आणि त्या प्रमाणे ती आम्ही मिटवली सुध्दा. कॅम्पचा नाश्ता आज कोणाला आवडला नव्हता म्हणून इकडे भूख मिटवून आम्ही सर्व रिलॅक्स करत बसलो होतो, एवढ्यात आमच्या गाडीचा ड्राइवर आला आणि आरडा-ओरड करयला लागला "चलो आगे बारिश होने से पहिले हमे निकालना होगा". नाश्ता करून आम्ही ९.३०च्या दरम्यान तिकडन निघालो. आता सारे उतरण होते आणि रस्ता हि चांगला होता. पटा-पट घाट  उतरत आम्ही जिस्पा गाव मागे टाकले आणि थोड्या वेळातच दारचा-ला गाठला. इकडे तर असे वाटले कि आता पाऊस आम्हाला भिजवणार. थोडासा चिरी-मिरी पाऊस चालू झाला पण. रस्ता ओला आणि तोही वळणा-वळणांचा म्हणून बाईक्स आरामात चालल्या होत्या, त्यात मी सर्वात पाठी नेहमी प्रमाणे. एवढ्यात मागाहून आमची गाडी आली आणि मला रोहनने थांबवले. मनालीला या वळणा-वळणांच्या रस्त्यामुळे गाडीत मळ-मळल्या सारखे होत होते, म्हणून शोबित आता गाडी गेला आणि माझ्या बरोबर मनाली होती. या ट्रीप मध्ये दिपाली प्रमाणे मनाली बरोबर पण माझी थोडी-थोडी मैत्री व्हायला लागली होती. माझ्यात आणि मनालीत पण आता मस्त गप्पा रंगायला लागल्या होत्या. मला काय कोणाबरोबर पण चर्चा करायला आवडते. या माझ्या सवयी प्रमाणे मस्त गप्पा मारत आम्ही पुढे चललो होतो. पुढे गेलेल्या सर्व बाईकस मधेच एका होटेल मध्ये थांबले होते. मी पण सर्वां बरोबर थांबलो आणि मस्त गरम चहा-बिस्कीट घेतले. लधाक परिसरात जास्त करून प्रत्येक होटेल मध्ये मॅग्गीच मिळायची आणि तेच मला तरी खाण्या सारखे वाटायचे. मला तर मॅग्गीचा प्रचंड कंटाळा आला होता आणि मॅग्गी खाल्या नंतर लगेच थोड्या वेळाने भूख लागायची. जास्त वेळ न दवडता आम्ही पुढे केलोंगच्या दिशेने निघालो.


आता मनाली परत अभी बरोबर होती आणि दिपाली माझ्या बरोबर. म्हणजे परत मस्ती वाल्या गप्पा.....यातच
लगेच केलोंग गाठले. लेह सोडल्या नंतर केलोंग शिवाय मध्ये कुठेही पेट्रोल पंप नाही आहे. या ३६५ किलोमीटर मध्ये कुठेही पेट्रोल सरकारी भावाने मिळत नाही, पण सध्या तिकडचे काही लोकल लोग वाढीव भावाने पेट्रोल विकतात. सर्वानी आप-आपल्या बाईकला पेट्रोल पाजून घेतले आणि पुढे निघालो. आमची गाडी आधीच  पुढे निघून गेली होती. जस-जसे केलोंग सोडले तस पावसाने आम्हाला घेरायला सुरवात केली होती. मनात फार भीती वाटत होती, जर पाऊस जोरात कोसळला तर मेलो. आता सर्व उतरण होते आणि आम्ही हिमाचल मध्ये प्रवेश केला असे जाणवत होते. रस्त्या बाजूचे सर्व डोंगर आता थोडेसे हिरवे वाटत होते आणि हे पाहून दिपाली बोलली "आता जरा बर वाटायला लागले हे हिरवे डोंगर पाहून". दिपालीला गेले बरेच दिवस लेह-लधाक परिसरातले वाळवंटी उगडे-नागडे डोंगर पाहून फार कंटाळा आला होता, यावर बरेचदा आमची चर्चा पण झाली होती. पण आता मात्र हि हिरवळ पाहून दिपालीला झालेला आनंद मला तिच्या शब्दातून जाणवत होता. जस-जसे पुढे जात होतो तस-तसे पावसाच्या आगमनाची आम्हाला जाणीव व्हायला लागली होती. पण संपूर्ण चिंब भिजू असे वाटत नव्हते, म्हणून आम्ही रेनकोट नाही काढला. घाट उतरून आम्ही जेव्हा संपूर्ण खाली आलो तेव्हा आपल्या कडे सह्याद्रीत जसे पावसाळ्यात वातावरण असते तसे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवे डोंगर, डोंगरांचे माथे ढगात लपून गेले होते. काय मस्त दृश होते ते आणि त्यात भर घालायला म्हणून डोंगरातून येणारा हा धब-धबा. वरचा भाग बर्फाचा आणि मधून येणारे हे पाणी. हा परिसर पाहून मला स्वर्ग असे तर नाही का? असा माझ्या मनाला प्रश्न चाटून गेला. मी जेव्हा दिपालीला हे सांगितले तेव्हा मला दिपालीला झालेला आनंद पाहायला मिळाला, काही तिच्या शब्दाने आणि जेव्हा मी फोटो काढायला थांबायचो त्यावेळेला तिच्या आचरट चाळ्यांने. अशीच मस्ती करत-करत आणि अद्भूत आनंद लुटत आम्ही गोंधला, सिस्सू कधी पार करत काकसर गाठले ते कळलेच नाही. आम्ही बरेच मागे राहिलो होतो, सर्व एका छोट्या होटेल जवळ आमची वाट पाहत थांबले होतो. २ वाजत आले होते आणि सर्वांना तशी फार भूख लागतेच या वेळेला...असो. पावसात सर्व भिझल्या मुळे म्हणा किंवा आमच्या खादाडी सवयीला निरसून सर्वांनी रोटी आणि भाजी हाणायला सुरवात केली. त्या हॉटेलचा मालक काय मस्त होता. डोक्यावर हिमाचली टोपी, अंगात जॅकेट आणि दिल खुलास मनाचा. तो मालक मस्त आमच्या बरोबर मस्तीच्या मूड मध्ये होता आणि तसा हि तो मस्ती करत जेवण वाढत होता. त्याच्या त्या लडिवाळ मस्ती मुळे आम्ही किती रोट्या हाणल्या ते कळलेच नाही.


पोट भरून जेवण झाले आणि आम्ही पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागलो. पावसामुळे सर्वांनी आप-आपले महत्वाचे समान गाडीत ठेवले, कारण आता पुढे जास्त पाऊस लागणार होता असे सर्वच लोकल लोक बोलत होते. मी कॅमेरा आत गाडीत दिला आणि आम्ही सर्वांनी रेनकोट घालून घेतले होते. ३ वाजता आम्ही काकसर सोडले आणि मनालीच्या दिशेने प्रयाण केले. इकडून मनाली हे अंतर ७० किलोमीटर आहे. मनात असे वाटले कि, बस ७० किलोमीटरच ना? पण अस्तिवात तसे काही नव्हते. प्रत्येक्षात मात्र अनुभव काही फारच निराळा होता. या परिसरात पाऊस मजबूत पडून गेला होता आणि पडणे पण चालू होतेच. त्यामुळे रस्त्याची वाट लागली होती. रस्त्याला लागल्या-लागल्या काही मिनिटातच आता आमचा पुढचा प्रवास खडतर होणार असे जाणवायला लागले होते. रस्ता  फार घाणेरडा होते असे म्हणणे बरे, किंबहुना तिकडे रस्ताच नव्हता नुसता चिखल...... रस्त्यावर किमान फुट भर तरी चिखल होता. यातून बाईक चालवणे फार कठीण जात होते. बाईक चालवायला फार कॉन्सेंट्रेट करायला लागत होते, म्हणून आता  माझी आणि दिपलिची बक-बक संपूर्ण बंद झाली होती. काकसर ते रोहतांग टोप १४ किलोमीटर आणि पुढे रोहतांग टोप ते मोहरी ८ किलोमीटर असा साराच रस्ता चिखलमय झाला होता. या चिखलातून कशी-बशी आम्ही सर्वच बाईक हाकत होतो. ट्रक गेलेला असेल तर त्याच्या टायर मुळे चिखल बाजूला व्हायचा आणि मी बरीचशी मधून बाईक चालवण्याचा प्रयेत्न करत होतो. पण हे-हि काही सोपे नव्हते, जरा बॅलेन्स इकडे-तिकडे झाला कि परत चिखलात. सारखे बाईक वरून पडायची मनात भीती होतीच आणि यातून घाटातली वळणे पण होतीच. मधेच आम्हाला काही पडलेले ट्रक दिसले. असे कधी चिखलात आणि कधी बाजूला सरलेल्या चिखलातून आम्ही घाट चढत दीड एक तासाच्या करामतीने रोहतांग टोप गाठले . माझी बाईक बसकी असल्या मुळे बरच हळू-हळू येणे झाले. बाकी सर्व बाईकस पुढे निघून गेले होतो. जरा ५ मिनिटान करता मी आणि दिपाली रिलॅक्स झालो आणि रोहतांग टोप वरून घाट उतरायला लागलो. आता या चिखलातून घाट उतरणे तर जास्तच कठीण जात होते. बाईकला ब्रेक मारला तर बाईक इकडे-तिकडे सरकायची, त्यातून बॅलेन्स पण पाय खाली न टेकता सांभाळायचा. जर पाय खाली गेला तर फुट भर चिखलात जाईल याची भीती. काय ते सर्कशीचे खेळ करत आम्ही मोहरीला पोहोचलो. जवळ-जवळ दोन अडीच तासाच्या करामतीतून आमची सुटका झाली. माझ्या आयुष्यातल्या बाईक चालवायचा सर्वात थ्रिलिंग एक्सपीरिअन्स होता हा. 

मोहरी हे तर मनाली जवळचे पर्यटक स्थळ आहे. खर तर मनालीतले सर्व टूर ऑपरेटर हेच ठिकाण  रोहतांग म्हणून घेऊन येतात. इकडेच सर्वांनी चहा ऑर्डर केली.चहा येई पर्येंत आमच्या या थ्रिलिंग एक्सपीरिअन्स वर साधनाला फुटेज हवे होते. साधना आणि उमेशने फुटेज घेतले आणि सर्व चहा घेत रिलॅक्स करत बसलो होतो. एवढ्यात एश्वर्या आणि पूनमने पावभाजी ऑर्डर केल्याचे कळले. हे पाहून रोहन तर खावासला. जरा रिलॅक्स होऊन चहा घेऊन पुढे जायचे होते. ५ वाजून गेले होते आणि मनाली अजून ५० किलोमीटर वर होते, अंधार व्हायच्या आत पोहोचायचे होते. चहा व पावभाजी आवरून सर्व मनालीच्या दिशेने निघालो. आता रस्ता मस्त होता. परत माझ्या आणि दिपालीच्या गप्पा सुरु झाल्या, पण या वेळेला मात्र फक्त गेल्या २ तासान बद्दलच्याच चर्चा चालू होत्या. या गप्पांन मध्ये गुलाबा, केठी, पालचन अशी गावे मागे टाकून पुढे निघालो होतो आणि मधेच आम्हाला ट्राफिक जाम लागले. आता आम्ही सर्व बाईकस आणि गाडी पुढे पाठी होतो. गाडी रांगेत थांबली आणि मागे आम्ही पण थांबलो. आजू-बाजूला असलेले सर्व देशी-विदेशी पर्यटकांनी आम्हाला पाहून टाळ्या वाजवायला लागले. पहिले तर मला काही कळेचना, मग कळाले कि रोहतांगच्या चिखलातून बाईक्स पार केल्या बद्दल आमच हे स्वागत होते. फार बरे वाटले हे पाहून, आयुष्यात काही तरी केल्याचा आनंद होता. ट्राफिकचे कारण पाहायला लागलो आणि कळाले कि अक्षरशा १० टनचा ट्रकने विली मारले होते. ट्रक मध्ये शिगा भरल्या होत्या आणि घाट चढताना ओवरलोड मुळे टांगा पलटी पुढून उलटी असे झाली होते. पहाहा फोटो...
 
सर्वांचे धन्यवाद मनात आम्ही बाईकसने त्यांचा निरोप घेला आणि गाडीला रांगेत ठेवून पुढे गेलो. ट्रक जवळ गेलो आणि एका बाजूला थांबलो होतो. एवढ्यात सर्वात पुढे असलेल्या अमेय म्हात्रेने कुलदीपच्या मार्गदर्शना वरून, ट्रकच्या डोंगराच्या बाजूने बाईक वरती चढवून काढली. मागो-मग आशिष, आदित्य, मी आणि अभी पण कुलदीपच्या आइडियाने बाईकस काढल्या. पण गाडी मध्ये मात्र बाकी सर्व अडकले होते. होटेल वर भेटायचे असे ठरवून गाडीतल्या सर्वांचा निरोप घेतला आणि सर्व बाईकस पुढे मनालीच्या दिशेने निघालो. लगेचच मनाली शहर समोर दिसायला लागले होते. आता सर्व उतरण पण होते. मस्त गप्पा-गोष्टी करत कधी अंधार पडायला लागला आणि बिआस नदीच्या काठी येऊन पोहोचलो हे कळलेच नाही. बिआस नदीचा पुल ओलांडला आणि मनाली शहरात प्रवेश केला. पुल ओलांडल्या-ओलांडल्या डावीकडेच आमचे बुकिंग  असलेले हॉटेल बियास होते. हॉटेल मुख्य रहदारीच्या रस्त्या वर असल्या कारणास्तव बाईक्स जरा लांब त्यांच्याच पार्किंग एरिया मध्ये लावल्या आणि हॉटेल वर आलो. रोहतांग पास मध्ये अडकलेल्या गाडीची चौकशी करायला फोन लावला तर कळाले कि ते पण ट्राफिक जाम मधून निघाले आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील. सर्व रूमस ताब्यात  घेतल्या आणि गाडीची वाट पाहत बसलो कारण सर्व सामान मात्र गाडीत होते. ९ च्या दरम्यान गाडी आली आणि सर्व सामान काढून रूम मध्ये फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होणे तर आज गरजेचे होते, सर्व अंगावर चिखल माखला होता. तत पूर्वी रोहन आणि अभीने जेवणाची ऑर्डर करून ठेवली. लगेच फ्रेश होऊन सर्व हॉटेल चंद्रताल मध्ये जेवायला गेलो. आज फारच थकलो होतो सर्व, जास्त मस्ती न करता जेवलो आणि हॉटेलवर परतलो. उद्या नेहमी प्रमाणे लवकर न उठता जरा उशिरा उठायचे असे ठरले. आज पण मी,आदित्य आणि शोबित एका रूम मध्ये होतो. आमचे हॉटेल बिआस नदीच्या काठी होते, खिडकी उघडताच खळ-खळणाऱ्या पाण्याचा आवाज. किंबहुना पाण्याच्या आवाजानेच मी खिडकी उघडली. थोडा वेळ हवेतील थंडावा आणि खळ-खळणाऱ्या पाण्याच्या आवाजाची मजा घेत मी खिडकी काठी उभा राहिलो आणि ११ च्या दरम्यान सर्व झोपी गेलो.

No comments:

Post a Comment