11.8.10

लेह बाईक ट्रीप - अकरावा दिवस (त्सो-मोरिरी ते सरचू)

१८ ऑगस्ट २००९ , काल रात्री काही केल्या एक तर झोप लागत नव्हती आणि लागायची तर सारखी उडत होती , काय झाले होते ते कळलेच नाही. जरा झोप लागायची आणि जाग यायची , असे बरेच वेळा झाले. तसे पहायला गेले तर मला एकदा झोप लागली कि , सकाळी कोणीही उठवत नाही तो पर्येंत कधीच जाग येत नाही. पण त्या दिवशी काय झाले होते ते कळेच ना. मला जरा थंडी पण वाजत होती. शेवटच्या वेळी उठलो तेव्हा खिडकितून पाहिले तर उजाडण्या पूर्वीचे निळे आकाश आणि त्यामध्ये चंद्र-तारे. मी पटकन उठून खिडकितून बाहेर पाहायला लागलो. थोड्या वेळाने सूर्योदय होणार हे जाणवायला लागले. त्सो-मोरीरीच्या काठी डोंगरांच्या मागून होणाऱ्या सूर्योदय अनुभवायला मिळणार आणि त्या क्षणाचे फोटो काढावेत म्हणून मी कॅमेरा काढायला लागलो. कॅमेरा काढायच्या आवाजात अमेय म्हात्रे आणि कुलदीप पण उठले. त्यांनी मला विचारले काय झाले , मी बोललो सूर्योदय होणार आहे मस्त वाटते बघ. म्हणून मी फोटो काढायला गच्चीवर चाललो आहे. मी कॅमेरा आणि ट्रायपॉट घेऊन गच्ची वर जाणारी बांबूची शिडी चढत होतो , एवढ्यात माझ्या मागे अमेय म्हात्रे आणि कुलदीप आप-आपला कॅमेरा घेऊन उभे होते. मी बोललो व्हा! आता मज्जा येईल फोटोग्राफिला. आम्ही गच्ची वर चढलो तेव्हा हे जाणवले कि त्या घराचे संपूर्ण छत मातीचे होते. लाकडांवर माती पसरवून बनवलेले ते छत होते , त्यामुळे आम्ही हळू हळू पुढे जाऊन ट्रायपॉट लावून फ़ोटोग्राफी करायला लागलो. वर मस्त वारा होता त्यामुळे मला फारच थंडी वाजत होती. सूर्योदय होण्याची मी वाट पाहत होतो आणि बराच वेळ फोटोग्राफी करून मग मी खाली आलो. अमेय म्हात्रे आणि कुलदीप मात्र थोडा वेळ फोटोग्राफी करत होते. आम्ही गच्ची वरती चढलो म्हणून खाली झोपलेल्या लोकांच्या अंगावर थोडी-थोडी माती पडायला लागली आणि आवाज यायला लागला म्हणून ते घाबरून उठले. पुनमला पण वर जायचे होते , तिला आम्ही सर्वानी वरती चढवले आणि मी दात घासायला गेलो. परत येतो आणि पाहतो तर अमेय म्हात्रे आणि कुलदीप खाली आले होते , पण खाली येताना त्यांनी गच्ची वर जायची शिडी बाजूला काढून ठेवली होती. सर्व आपल्या कामाला लागले तरी पूनम बोंबलतच होती. १५ मिनिट तिला गच्चीवर बोंबलत ठेवले आणि मग शिडी लावली.

७ च्या दरम्यान सर्व तयार होऊन चाह-नाश्त्यासाठी खाली आलो. मस्त थंडीत गरम-गरम चहा घेतली आणि आमच्या कड़े असलेल्या बिस्किट व फरसाणचा नाश्ता केला. बाईक गरम करून सर्व सामान बाईक वर आणि गाडीत टाकले. पाणी भरून घेतले , आज मी आणि शोबित एकत्र होतो. दिपलिला जरा आराम हवा होता. तसा आज मला ही आरामाची गरज वाटत होती पण माझी अवेंजेर बाईक कोण चालवणार. उमेश बोलला मी चालविण पण हा पहिला कच्चा रस्ता तू चालव मग पुढे मी चालवतो असे म्हणून ८ च्या दरम्यान त्सो-मोरिरी वरून आम्ही निघालो.
सकाळच्या वेळी त्सो-मोरिरी मस्त दिसत होता आणि काल संध्याकाळच्या पेक्षा फारच निराळे . गाव सोडले आणि परत आलो त्याच रस्त्याने जायला लागलो. कार्झोक चेक पोस्ट मागे टाकुन आम्ही त्सो-कर च्या दिशेने त्याच वाळूच्या रस्त्याने पुढे निघालो. मागे डोंगरावर वसलेल्या गावाचा मी हा शेवटचा काढलेला फोटो. वाळू एवढी भुस-भूषित होती की टायरला ग्रिप बरेचदा भेटत नव्हती. २-३ वेळा आम्ही पड़ता-पड़ता वाचलो. त्यानंतर एकदा-दोनदा मी शोबितला उतरवले पण होते. याच भागात काल मी आणि दीपाली पण पडताना वाचलो होतो , म्हणून मी तिला ही एकदा-दोनदा उतरवले होते. पाय खाली सोडून हळू-हळू आम्ही पुढे चललो होतो. मधे एकदा आमचा एक बाजूला तोल गेलाच अणि आम्ही थोडीशी रेती खाल्लीच. थोडेसे सावरून परत आम्ही मार्गस्त झालो. आता त्सो-मोरीरीचा परिसर मस्त दिसत होता , मी परत फोटोग्राफी करायला लागलो. आज फारच थकलो होतो आणि कालची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून तसा काय फार फोटो काढायचा मूड नव्हता. तरी मी अधून मधून एखाद दुसरा फोटो काढत होतो.
आमच्या गाडीचा ड्राइवर तेनसिंग , या गाडीने आम्हाला आज पांग पर्येंतच सोडणार होता आणि तिकडन आम्हाला पुढे दुसरी गाडी घेऊन जाणार होती. आम्हाला पांग पर्येंत सोडून तेनसिंगला लेहला पोहोचायचे होते म्हणून आज तो जरा घाईत पळवत होता. त्याला काय घाई लागली होती , तो कुठूनही गाडी काढत होतो. रस्ता सोडून अधून-मधून तो बरेच शॉर्टकट मारत होता. आधीच रस्ता भुस-भूषित आणि हा पट्ट्या मस्त रस्ता सोडून बाजूच्या रेतीतून गाडी चालवत होतो . मला पण जर वाटले कि जाऊया त्याच्या मागो-माग , पण लगेच मन आवरले आणि मनातच बोललो तो बाबा इकडचा लोकल आहे. बहुदा त्याला सर्व माहिती असेल असे बोलून आम्ही मात्र शिस्तीत रस्त्याने पुढे चाललो होतो. जरा पुढे गेलो आणि पाहतो तर आमची गाडी थांबून सर्व बाहेर उभे होते. आम्ही सर्वांनी बाईक रस्त्याच्या बाजूला लावल्या आणि गाडी कडे गेलो. पाहतोतर गाडी वाळूत रुतली होती आणि तेनसिंग गाडी पुढे काढण्याच्या प्रयेत्नात अजून रुतवत होता. आम्ही जरा त्याला थांबवले. सर्व मागून धक्का मारत मग त्याला गाडी बाहेर काढायला सांगितले. गाडी काढायचा बराच प्रयेत्न आम्ही करायला लागलो पण काही केल्या गाडी निघेना. गाडीला धक्का मारून सर्वांची वाट लागली होती , त्या उंचीवर गाडीला धक्का मारणे किंवा उचलणे काय सोपे नव्हते. एवढ्यात मागाहून ४-५ दुसऱ्या गाड्या आल्या. मग त्या गाडीचे ड्राइवर आणि काही फिरंग प्रवाशी आमच्या मदतीला आले. सर्वानी एक जोर लावून धक्का मारला आणि गाडी बाहेर काढून रस्त्यावर आणली. सर्वाना धन्यवाद म्हणत आम्ही वाळूतच दम खायला बसलो . डोक्यावर ऊन पण रण-रणत होते , दम खाऊन पाणी पिऊन आम्ही सर्व पुढे निघालो. आता मात्र तेनसिंगला आम्ही ताकीद दिली होती , कि तू इकडे तिकडे कुठे हि गाडी घालू नकोस शिस्तीत सरळ रस्त्याने गाडी चालव.
मग पुन्हा तोच वाळूचा रस्ता आम्ही पार करायला लागलो. थोड्या वेळाने पक्का रस्ता लागला. पक्का रस्ता पण पार करत आम्ही सुमधोला पोहोचलो. १० च्या दरम्यान आम्ही त्सो-कार च्या फाट्यावर होतो. तेनसिंग आमच्या साठी फाट्यावर थांबला होतों. उमेश नि मला विचारले चालवू का बाईक. मी तर एका पायावर तयार झालो. मला जरा आराम हवाच होता. आता माझी बाईक उमेश चालवणार होता आणि मी मस्त गाडी आराम करणार होतो. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो. बाईक पुढे निघाल्या आणि मागाहून गाडी. मी गाडीत बसल्या पासून तेनसिंगच्या मागे लागलो कि मला त्या रस्त्यावर झायलो चालवायची आहे. पहिला रस्ता थोडा चांगला होता पण लगेचच कच्चा रस्ता सुरु झाला म्हणून तेनसिंग मला गाडी चालवायला देईना. मी तर चिवट बनून त्याच्या पाठी लागलो , तरीही तो काही केल्या मला गाडी चालवायला देईना. तो फक्त एक वाक्य बोलायचा "आगे अच्छा रास्ता आने पर देता हु". मी तर त्याच्या पाठी लागलोच होतो , यात मला झोप लागली. मी झोपलो आणि मधेच थोड्या वेळाने मला परत जाग आली . मी परत तेनसिंगच्या पाठी लागलो. तरी तो तेच बोलत होता.थोड्या वेळाने परत चांगला रस्ता लागला आणि मी त्या कडे परत गाडी चालवायला मागितली. पण समोरच तेनसिंगचा मालक दुसरी गाडी घेऊन आमची वाट पाहत उभा होता. आमचे सर्व समान दुसऱ्या गाडीत लोड केले आणि आमच्या बाईकसची वाट पाहत उभे होतो. मी यात सुद्धा तेनसिंगला सतवत होतो , " देखा ना तुमने मुझे गाडी चलाने नही दी". तो तर एकदम निरागस होऊन मला बोलला "मे तो आपको गाडी चलाने के लीये देने वाला था , पर मेरा मलिक दुसरी गाडी लेकर पांग के बदले यहां ही आ गया". बराच वेळ बाईकसची आम्ही वाट पाहिली , मग तेनसिंग आणि त्याचा मालक आम्हाला बोलला "तुम अभी आगे निकलो , हम बाईकस को देखते है ” . तरी थोडा वेळ बाईकसची वाट पाहिली आणि मग आम्ही पुढे निघालो.
रस्ता मस्त नवीन बनवलेला होता , मला वाटले आता जरा वेवस्थित झोपता येईल. कारण मगाशी सारखी गाडी हलत होती रस्ता खराब असल्यामुळे. असे बोलून मी मस्त झोपी गेलो , पण झोप लागते न लागते तेवढ्यात परत गाडी उडालीच आणि पहातोतर परत कच्चा रस्ता. नुसती भूस-भूषित मातीचा रस्ता आणि पुढची गाडी मजबूत धुरळा उडवत चालली होती. पण मला आज फार थकायला झाले होते आणि झोप पण येत होती , म्हणून मी तसाच झोपलो. अधून मधून गाडीने दचके मारले कि मी झोपेतून उठायचो. बाहेर फोटो काढण्यासारखे असेल तर एखाद-दुसरा फोटो पण काढायचो आणि परत झोपायचो.
पण मी बराच वेळ गाडीत झोप काढली आणि कधी पांग च्या जवळ पोहचलो ते कळलेच नाही. पांग च्या शेवटच्या उतरणावर मला जाग आली आणि ५-१० मिनटात आम्ही पांगला पोहोचलो. पांग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरीच लोकल लोक टेन्ट लावून , राहण्याची आणि खाण्याची सोय करतात. आम्हाला पण तशी फार भूख लागली होती आणि मागे असलेल्या बाईक यायची पण वाट पाहायची होती. लधाक परिसरात कुठेही खायला काय असे विचारले तर एकाच उत्तर मॅगी , अंडा आणि राजमा चावल. मला तर मॅगी आणि राजमा चावल खाऊन-खाऊन कंटाळा आला होता , पण काय करणार त्या परिसरात दुसरे काहीही मिळत नाही. भूखे अभावी जे मिळेल ते खायला लागत होते पण आता वीट आला होता. नुसती मॅगी खाऊन मला कंटाळा आला म्हणून मी अंडा मॅगी मागवली , जरा चव बदलेल या आशेने. पण कसले काय साध्या मॅगी पेक्षा जास्त बेकार लागत होती , झक मारली आणि अंडा मॅगी मागवली असे वाटले होते. कशी-बशी खाल्ली आणि बाईकस ची वाट पाहत निद्रेच्या अधीन गेलो. अधून-मधून जाग यायची आणि मी विचारायचो आले का ?
२-३ वेळा असे झाले आणि शेवटी मला दीपाली ने उठवून बाईकस आल्या असे सांगितले. टेन्टच्या बाहेर आलो आणि सर्वन कडे पाहिले तर , सर्वच मातीने माखले होते. अभी आणि रोहन नि तर माझ्यावर बॉम्-बार्डिंग सुरवात केली. “ काय तुम्ही मध्ये कुठे हि का थांबला नाहीत ” . तुमची मध्ये गरज लागली असती तर … आणि बरीच बड-बड. मागाहून मनाली , अमेय म्हात्रे , आशिष सर्वच फाइरिंग करायला लागले. मला बोलायची संधी पण देत नव्हते. जरा शांत झाल्यावर मग मी बोललो , अरे मध्ये थांबण्यासारखे काही नव्हते रे आणि मला अधून-मधून सारखी झोप लागत होती. तसे हि आम्ही फाट्यावर बराच वेळ थांबलो होतो. मग तेनसिंग आणि त्याचा मालक हि आम्हाला बोलला “ तुम निकालो आगे में बाईकस को देखता हु और भेज देता हु ”. तरी पण माझ्या वर थोडीशी फाइरिंग झालीच , पण त्यांची ती अवस्था पाहून मला कळाले होते कि त्यांचे काय हाल झाले असतील. म्हणून मी मुकाट्याने सर्व ऐकून घेत होतो. त्यांचे फ्रस्टेशन मला कळत होते. या सर्व पॅच मध्ये एका पाठून एक अशा सर्वच बाईकस पडल्या होत्या असे कळाले. म्हणजे लवकिक अर्थाने प्रतेकाने एकदा तरी माती खाललीच होती. तेवड्यात उमेश माझ्या कडे आला आणि बाईकची चावी माझ्या हातात देत तो मला फक्त सॉरी बोल्ला . मला फार वाईट वाटले कि त्याने मला सॉरी म्हणावे लागले , वास्तविक मी त्याला सॉरी आणि थॅंकयू म्हणायला पाहिजे होतो. कारण मी थकलो म्हणून त्याला विनाकारण बाईक चालवयला लागली. तो आमच्या ट्रिपचा टीम मेंबर होता पण त्याच बरोबर तो IBN लोकमतचा कॅमेरामन पण होता. मी माझ्या बाईकचे परीक्षण केले आणि बाकी सर्व फ्रेश होण्यास गेले. मग सर्व परत खायला गेलो आणि सर्व बाईक स्वार आम्हाला त्याची कहाणी सांगायला लागले.
आम्ही फार वेळ वाया न घालवता सर्वांनी थोडा आराम करून पुढे निघायच्या तयारीला लागलो. माझी आणि कुलदीपची बाईक नेहमी प्रमाणे फार जास्त पेट्रोल खात होती. आम्ही ज्या टेन्ट स्वरुपात असलेल्या हॉटेल मध्ये जेवण केले होते त्यांच्या कडे असलेले ५ लिटर पेट्रोल घेतले. अशाप्रकरे तिकडचे लोक पेट्रोल ब्लॅकचा पण धंदा करतात , कारण लेह सोडल्या नंतर केलोंग पर्येंत कुठेही पेट्रोल मिळत नाही. आम्ही ब्लॅकने १०० रुपये लिटरने पेट्रोल बाईक मध्ये भरून घेतले. आता परत मी आणि दिपाली बाईक वर , बराच झाला आराम आणि तसे हि काही जण थकले होते. मस्त आराम करून परत बाईक वर स्वार झालो आणि पुढे सरचुच्या दिशेने निघालो.

४ वाजून गेले होते आणि अजून सरचू बरेच लांब होते . पटा-पट आम्ही सरचूच्या दिशेने चललो होतो. माझ्या आणि दिपाली मध्ये आता परत मस्त गप्पा रंगल्या होत्या. मी जरा पश्याताप भावनेने बोलत होतो तिच्याशी. मला थोडासा आराम हवा होता म्हणून उमेशला बाईक चालवावी लागली आणि मग पुढे त्याचे आक्सिडेंट झाले. मला हे फार लागून-लागून राहत होते. बाईक वर सर्व वेळ मी माझ्या कडून दर वेळा अशा होणाऱ्या गोष्टींची आणि सर्व प्रकारच्या पश्याताप भावनांवर चर्चा चालली होती. या गंभीर चर्चा करत-करत आम्ही १६६१६ फुट उंचीवरच्या " लाचूलुंग-ला" पार करत १००० फुट खाली उतरून परत "नकी-ला" चढायला लागलो. थोड्या वेळातच आम्ही १५५४७ फुट उंचीवर " नकी-ला" ला पोहोचलो. आता ६ वाजत आले होते आणि हवेत मस्त थंडी वाढायला लागली होती. आता मी थंडी मस्त बोलतोय कारण आज आम्ही कालच्या सारखा अति शहाणपणा केला नव्हता , कारण आज आम्ही पांग पासुनच जॅकेट घालून होती. पण आज पूनमने अति शहाणपणा केला होता. पांगवरून गाडीतून बाईक वर आली तेव्हा ती चप्पल वर आली होती आणि ते हि पायात मोजे न घालता. व्हा! काय हुशार आहे पूनम , तिला पायाला फार थंडी वाजत होती. मग तिचा मफलर एका पायाला बांधून कवर केला आणि माझ्या कडे असलेला माझ्या आजीच्या साडीचा बनवलेला तोंडाला बांधायचा कपडा दिला दुसऱ्या पायासाठी. त्याने तिच्या पायाला जरा आधार मिळाला.
आम्ही नकी-ला उतरायला लागलो आणि पहातोतर २१ लुप्स समोर दिसले . हा पुढचा रस्ता २१ छोट्या-मोठ्या वळणांचा होता , मस्त वाटत होते . काय सुंदर दृश्य होते ते. २१ लहान मोठी वळणे घेऊन आम्ही ८-१० किलोमीटरचा रस्ता पार करून १३७८० फुटावर आलो. म्हणजे अवघ्या काही मिनटात आम्ही जवळ-जवळ १५०० फुट खाली आलो होतो. इकडन सरचू अंदाजे २० एक किलोमीटर आहे. तसेच आम्ही पुढे निघालो. ७.३० च्या दरम्यान आम्ही सरचू ला पोहोचलो आणि अंधार हि पडायला लागला होता. सरचू मध्ये पण पांग सारखेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकल लोकांनी टेन्ट लावून राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. विचारले तर १०० रुपये प्रत्येकी राहण्याचे , पण तिथे राहण्यासारखी तशी ती व्यवस्थीत जागा नव्हती आणि आमची गाडी पण पुढे निघून गेली होती. मागो-माग आम्ही पण पुढे निघून गेलो. जवळ-जवळ ७-८ किलोमीटर आम्ही पुढे आलो तरी गाडी दिसेना. शेवटी आम्हला आर्मीचा चेक पोस्ट लागला. सर्व तिकडे थांबलो आणि चेक पोस्टच्या बाहेर असलेल्या जवानांना विचारले , पुढे कुठे राहायची सोय आहे का ? व कुठली गाडी पुढे गेली आहे का ? . त्यांनी ' हा ' असे उत्तर दिले. पण आमचीच गाडी पुढे गेली आहे का हे पाहायला अभी-रोहन पुढे गेले आणि बाकी आम्ही सर्व तिकडेच थांबलो. पण उभ्या-उभ्या आम्हा सर्वांनाच फारच थंडी वाजत होती म्हणून त्या जवानांनी आम्हला त्यांच्या पोस्ट मध्ये बसायला सांगितले. म्हणून त्यांचे आतले काही जवान बाहेर येताना बियरची बाटली फुटली. हे पाहून आमच्यात हास्य पिकले या मुळे जवानांच्या आणि आमच्या मध्ये दुरावा एकदम कमी झाला. मग गप्पान्ति आम्हाला त्यांच्या कडूनच कळाले कि , १३००० फुट नंतर आर्मीच्या जवानांना दारू मनाई आहे. मस्त गप्पा चालल्या होत्या , पण जेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या कडच्या रायफल बद्दल विचारले तेव्हा मात्र त्यांनी काही सांगण्यास मनाई केली. ते बोलले "आप प्रेस वालो के सामने कुछ भी बोला तो , आप छाप देंगे और फिर हमारी नौकरी मुश्कील मै होगी". त्यांनी बर्याच गप्पान नंतर इन्सास रायफल असल्याचे सांगितले पण रायफल बद्दल काहीही माहिती मात्र नाही सांगितली. बर्याच वेळाने अभी-रोहन आले आणि आम्ही जवानांनचा निरोप घेऊन पुढे कॅम्पसाईट वर गेलो. ९ वाजले होते आणि काय मस्त थंडी होती तिकडे. सर्वाना आप-आपले टेन्ट दाखवले आणि फ्रेश होण्या करता गेलो. फ्रेश होई पर्येंत जेवण लागले होते. जेवायला गेलो तर जेवण पण थंड झाले होते. जेवताना सर्व जन आप-आपले दिवस भारतले किस्से सांगत होते. त्यावेळी मला असे वाटले कि मी आजच्या दिवसाची मज्जा मिस केली . जेवण उरकून सर्व आप-आपल्या टेन्ट मध्ये गेलो. आज मी , अभी आणि रोहन एका टेन्ट मध्ये होतो. २ बेड वर तिघे , आमच्या स्लीपिंग बॅग घेतल्या आणि मारल्या उड्या बेड वर. कसला नाजूक बेड होता , वाकला आमच्या वजनाने मध्ये. कसे-बसे स्वःताला अड्जस्ट करून घेतले आणि झोपी गेलो.

2 comments:

  1. अरे मस्त.. तो दिवस तर जबरीच होता.. खरच माती खाल्ली होती रे... :) कधी संपतोय असे सुद्धा झाले होते आणि मज्जा सुद्धा आली होती. तुझे लिखाण अतिशय डिटेल होतंय आणि मुख्य म्हणजे आधी सारखे तुटक नाही आहे... गेले काही भाग तर लिंक अजिबात तुटत नाही आहे... लागे राहो... अजूनही बरेच अंतर जायचे आहे आपल्याला... :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद रोहन....हो रे अजून बरेच जायचे आहे...

    ReplyDelete