24.3.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - नववा दिवस (कोल्हापुरात)

२६ मे २००५, सकाळी आरामात उठलो. प्लान प्रमाणेच सकाळी लवकर उठून अभिजीत राव, त्याचे आई-बाबा, विवेक-रश्मी, त्याचे काका-काकी आणि चुलत भावंडे सर्व कर्नाटकात त्यांच्या कुलदैवत यललंमा, सौंदतीला  गेले होते. आज मला पण कोल्हापुरात माझ्या आईचे सख्ये काका आणि सर्व चुलत भावंडे राहतात त्यांच्या पैकी एकाकडे जायचे होते. मी माझ्या जया मामला फोन लावून कधी आणि कसे यायचे हे विचारून घेतले. पण आज राजूचा ताप फारच वाढला होता. रावच्या मामांच्या घरातल्यांनी राजूची फारच छान सुश्रूषा केली. राजूची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली आणि मी ११ च्या दरम्यान तयार होऊन जया मामाच्या घरी जायला निघालो.

पिट्ट्याने मला जया मामाच्या घराकडे कसे जायचे थोडे फार समजवले होते पण तरी हि मला सारखे मधे थांबून विचारावे लागत होते. मधेच एकदा मी एका ट्रॅफिक पोलिसाला विचारले की या ठिकाणी कसे जायचे. तो मला बोलला रस्ता सांगतो नंतर पहिले मला लाइसेन्स दाखव आणि मुंबईची गाडी कोल्हापूर पर्येंत कशी आली. मी बोललो चालवत आली....एवड्यात तो थोडासा खवसला आणि मला बोलला, हो का! मग आता गाडीचे सर्व पेपर दाखव. मी बाईकचे सर्व पेपर दाखवून त्याचे समाधान केले आणि पुढे परत तो आश्चर्य मुद्रा करून बोलला मुंबई वरुन कोल्हापूर पर्येंत बाईक चालवत आलात? मी त्यांना बोललो हा पण हळू-हळू आरामात फिरत-फिरत कोकणातून ८ दिवसात आलो आहोत. मग त्याचे अजून थोडे समाधान झाले आणि त्यांनी मला पत्ता सांगितला.

जया मामाच्या घरी मी जरा उशीराच पोहोचलो, सर्व माझी वाट पाहत होते. जया मामा काही कामासाठी बाहेर गेला होता पण सुधा मामी आणि तिचे बाबा होते. थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारल्या आणि मग सुधा मामीने जेवणाची पाने वाढली. गप्पा मारत आमचे जेवण चालले होते. गप्पा जास्त करून मी बाईकने का एवढा लांब आलो आणि काय गरज होती वगैरे-वगैरे याच होत्या. सुधा मामीने माझ्यासाठी जेवणाचा बराच थट मांडला होता.  मस्त पोट भरून जेवलो आणि लागलो परत सुधा मामींच्या वडिलान बरोबर गप्पा मारायला. एवढ्यात जया मामाचा पण फोन आला त्याला उशीर होणार होता आणि म्हणून तो माझ्याशी फोन वर चर्चा करायला लागला. त्याने तर मला बाईक घाडगे पाटील ने परत मुंबईला पाठवून देतो आणि मला मस्त कोंडुसकरच्या   ए.सी. बस मध्ये बसवून देतो इथ पर्येंत पर्याय दिला. मी त्या सर्वांना सारखे समजावत होतो की मी बाईकने कोकणात आणि जवळ पासचा परिसर फिरायच्या पराक्रमावर निघालो आहे. तरी काही केल्या ते एकेनाच. तत्पूर्वी जया मामाने माझ्या आईला पण फोन लावून हे सर्व सांगितले होते.माझ्या आईने पण जया मामाला  सांगितले की अमेय काय ऐकणार नाही तो माझे पण ऐकत नाही. शेवटी जया मामाने पण प्रयेत्न थकले आणि मी, माझे म्हणणेच खरे केले. मला थोडे जाणवले होते की मी सुधा मामीचे बाबा आणि जया मामा यांना जरा नाराज केले आणि ते माझ्यावर थोडेसे रागवले होते. पण काय करणार मला बाइक ट्रीप तर पूर्ण करायची होतीच ना.

सर्वांचा निरोप घेऊन मी कोल्हापुरचे राजा शाहू महाराज यांचा न्यू पॅलेस पाहायला गेलो. शोधत शोधत मी  राजवाड्याकडे पोहोचलो आणि बाईक लावून महल पाहायला लागलो. संध्याकाळ होई पर्येंत मी महल पाहिला आणि सर्व उरकून परत रावच्या मामांच्या घरी गेलो. दिवसभराचा आराम आणि रावच्या मामांच्या घरातल्यांच्या संगोपणाने राजू आता मस्त बरा झाला होता. रावच्या मामीने आमच्या साठी मस्त तांबड्या रस्याचे आणि पांढऱ्या रस्याचे मटणाचे जेवण केले होते. थोडा वेळा गप्पा टप्पा मारत बसलो आणि जेवायला वाढले. मी या तांबड्या आणि पांढऱ्या रस्या बद्दल बरेचदा ऐकले होते पण आज काय ते चाखायला मिळणार होते. मनोसोक्त रस्सा हांडला आणि पुन्हा गप्पा टाकत बसलो. बराच वेळेच्या गप्पान नंतर सर्वच झोपी गेलो. 

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - आठवा दिवस (पन्हाळा ते कोल्हापूर)

२५ मे २००५, कालच्या धांगड-धिंगाण्यामुळे बराच उशीर झोपायला झाला होता आणि त्यामुळे सकाळी उठायला पण. सर्व घरची मंडळी उठून तयार झाली तरी आम्ही लोळतच पडलो होतो. रावच्या मामांने कोल्हापूरी खाक्याने जो जोरात आवाज मारला आणि सर्व खडबडून जागे झालो. पटा-पट सर्वानी प्रातविधी उरकून निघण्याच्या तयारीला लागलो. रावच्या मामाने नाष्ट्याची पण सोय केली होती. पटा-पट नाष्टा गिळून आम्ही निघालो कोल्हापुरच्या दिशेने. आज माझ्या बरोबर बाईक वर रश्मी होती. राव बंधू एका बाइक वर तर रावच्या मामे भाऊ पिट्ट्या बरोबर राजू आणि बाकी सर्व गाडीत पन्हाळा ते कोल्हापूर हे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. पण हा एक-दीड तासाचा प्रवास काय सुरेख होता. पन्हाळा सोडल्या पासून ते रावच्या मामाच्या घरा पर्यत  नॉन-स्टॉप रश्मी मराठी गाणी गात होती. मला एकही गाण्याची फर्माइशीची गरजच नव्हती. एका-पाठोपाट एक तीच मराठी गाणी गात सुटली. बाइक चालवताना पाठून मस्त मधुर मंजुळ गाणी ऐकायला मिळत होती. तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही आणि रश्मी फार सुंदर गाते यात काय वादच नाही.

तास-दीड तासाच्या सुरेल प्रवासाने आम्ही रावच्या मामाच्या घरी पोहोचलो.  थोडा वेळ आराम करून जेवण केले आणि पुन्हा आराम करायला लागलो. मस्त दुपारची झोप काढली आणि ऊन थोडे सरल्या वर ४ च्या दरम्यान तयार होऊन मी, विवेक, रश्मी, राजू, अभिजित, पिट्ट्या आणि योगेश सर्व निघालो कोल्हापूर सहाराच्या फेरफटका मारायला. सर्व प्रथम महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच असलेल्या तुळजा भवानीच्या मंदिरात पण गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघालो रंकाळ्याच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने कोल्हापुरकरांचा पाहुणचार काय असतो तो पाहिला. अभिजित रावच्या मामा आणि परिवाराने केलेल्या पाहुणचाराला नक्कीच दाद दिली पाहिजे. काल पासून त्यांनी आम्हाला कुठे आणि कसलीही कमी पडून दिली नाही. किंबहुना बर्‍याच ठिकाणी त्यांनी आम्हाला पैसे पण खर्च करायला देत नव्हते. कोल्हापूर कडे असे बोलतात "काय यार आम्हाला जरा सुद्धा पाहुणचार करायला देत नाहीत". वास्तविक भरपूर पाहुणचार करूनच मग हे कोल्हापूर कडची मंडळी असे बोलत असतात आणि यांनी आमचा केलेला पाहुणचार काय जरा नव्हता भरमसाठ होता आणि अजून बराच बाकी होता.

रंकाळ्या जवळ आलो आणि तलावाच्या बाजूलाच बराच वेळ टंगळ-मंगळ करत फिरत होतो. अंधार पडला आणि पिट्ट्या आम्हाला रंकाळ्याची प्रसिद्ध भेळ खायला घेऊन गेला. आपल्या मुंबई चौपाटीला कशी भेळ खायची पद्धत आहे तशीच आम्ही कोल्हापुरात रंकाळ्याच्या काठावर झण-झणीत कोल्हापुरी भेळ खाल्ली. इकडे पण आम्हाला पिट्ट्यानी पैसे देऊ दिले नाही. भेळ खाऊन अजून थोडा वेळ रंकाळा फिरून कोल्हापुरात फेरफटका मारत आम्हाला पिट्ट्याने एका आईस्क्रीम, फालुदा आणि ज्युस सेंटर मध्ये घेऊन गेला. जबरदस्तीने फालुदा खायला भाग पाडले. हा फालुदा ही कोल्हापुरतला जग प्रसिद्ध आहे. पिट्ट्याने आम्हाला फार आग्रह करून का होईना पण प्रेमाने कोल्हापूर दर्शन करावले होते. कसला मावळ आहे पिट्ट्या वास्तविक आम्ही त्याचे कोण, तरी पण भावंडासारखे त्याने आमच्या वर प्रेम लावले होते.

रात्री परत घरी आलो तर आमच्या साठी निराळ्या मेजवानीचा प्लान होता. पण आजच्या एकंदर खादाडी मुळे आम्ही आता फार काही खायला नको असे सांगितले. म्हणून आजचा मेजवानीचा प्लान उद्यावर गेला आणि राजूची पण तब्बेत बरी नव्हती, त्याला आता ताप आला होता. राजुला गोळ्या देऊन झोपावले आणि आम्ही सर्व थोडा वेळ गप्पा-गोष्टी करून झोपी गेलो.