8.2.10

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - शेवटची मोर्चे बांधणी

आता शेवटचे काही आठवडेच राहिले होते. मला माझ्या बाईकचे पहिले १००० किलो मीटर पूर्ण  करायचे  होते म्हणून आणि बाईक ट्रीपचा सराव म्हणून मी सारखा पाठी लागलो होतो. पण ते काही शक्य झाले नाही. मी, अभिजीत आणि रोहन तयार होतो सराव ट्रीपसाठी, पण नेहमी प्रमाणे सर्वांना जमेनास झाल. शेवटी मी वाडयाला जायचं ठरवल कारण मला बाईकच रनिंग पूर्ण करायचं होत. पण मला अभिजीत बोलला कि आपण ठाण्याला गडकरी जवळ भेटूया, कारण अभिजीतला आमच्याशी ट्रीप संदर्भात भरपूर गप्पा मारायच्या होत्या. येत्या रविवार पाहून अभिजीत-मानली, रोहन-शमिका, शोबित, मी आणि शेवटी उशिरा ऐश्वर्या गडकरीला भेटलो. गरम-गरम भजी, वडा-उसळ आणि चहा बरोबर आम्ही भरपूर चर्चा केल्या. वास्तविक आम्ही सर्व भरपूर मस्ती करत होतो, अभिजीत-मानली, रोहन-शमिका आणि ऐश्वर्या माझी टेर खेचत होते कारण मधल्या कालावधीत माझ  लग्न  ठरल होत. या सर्वात एक किस्सा सांगायचा राहिला, माझा लग्न १२ डिसेंबरला ठरल आणि दुसर्याच दिवशी मी अभिजीतला संध्याकाळी नाक्यावरून फोन केला, कि मला काही या ट्रीपला येता येणार नाही. कारण ऑगस्ट मध्ये लेह ट्रीपसाठी १५ दिवस सुट्टी आणि डिसेंबर मध्ये पुन्हा १५ दिवस मला ऑफिस मधून सुट्टी मिळणार नाही. पाहिलतर अभिजीत माझ्या लग्नाच ऐकून तीन ताड उडाला, मग तू ऑफिस मध्ये बोलून आणि वगैरे वगैरे पर्याय चालू झाले कारण अभिजीतला विमानाच तिकीट आणि वगैरे बरीच कामे करावी लागणार होती. त्याने सर्वांसाठी बरेचदा हे केले होत. पण मी त्याला सांगितल कि २ दिवस थांब. थोड्या वेळानी मला ऐश्वर्याचा फोन आला, ती तर वेडीच झाली होती आणि मग ती नेहमी प्रमाणे जशी लाडात येऊन, मला समजावत हट्ट करू लागली.शेवटी तिनेच मला एक छानसा पर्याय दिला, कि मी लग्नाबद्दल ऑफिस मध्ये सांगू नको आणि ट्रीप नंतर  सांग कि माझ लग्न आता ठरला, मग त्यांना तुला सुट्टी द्यावीच लागेल रे. "एच. आर." मध्ये काम करत असल्याचा फायदा आणि तिला हे सर्व फार छान जमत. शेवटी हा पर्याय फार छान वाटला आणि मी लेह ट्रीपसाठी सज्ज झालो. अभिजीतला सांगितल कि काही करु नकोस मी येत आहे.

गडकरी वरून मी घोडबंदर मार्गे घरी गेलो आणि मग त्या आठवड्यात मुदामून दादरला जा, इकडे जा चालूच होत. अशा  प्रकारे मी बाईकची पहिली सर्विसिंग करून सिद्धेश बरोबर वाड्याला पण जाऊन आलो, कारण बाईक ट्रेन मध्ये लोड करायच्या आत मला दूसरी पण सर्विसिंग करायची होती. त्याच आठवड्यात मी अभिजीत राव कडून कॅमेराच लागणार समान, सिद्धेश कडून लागणार समान घेऊन आलो. थोड्याफार गोष्टी मला विकत आणायच्या होत्या ते मी सर्वच याच आठवड्यात केल. दरम्यान अभिजीतने मला बांद्रा टर्मिनला जाऊन बाईक्स लोड करण्याबद्दल सर्व माहिती काढण्यास सांगितली होती. बरेच दिवस मला बांद्रा टर्मिनला जायला जमत नव्हत. एके दिवशी मी ऑफिस वरून बांद्रा टर्मिनला जाऊन बाईक्स लोड करण्याबद्दल सर्व माहिती काढून आणली. या कालावधीत आम्हा सर्वांच जवळ जवळ दररोज फोन किंवा ई-मेल वरून बोलन  होत होते. बांद्रा टर्मिनलच्या लोडर कडून मिळालेल्या माहिती नुसार आम्हाला बाईक्स २ ऑगस्टला द्यायच्या होत्या. आता शेवटचा आठवडा राहिला होता बाईक लोड करायला. अजून पर्येंत आम्ही सर्व पूर्ण टीम भेटलो नव्हतो आणि आता सर्वाना बरोबर सराव शक्य होईल असे काही वाटत नव्हते. अभिजीतने तर आशाच सोडली होती, तो तर फार निराश झाला होता सर्वांच्या पाठी लागून लागून. पण अभिजीतला ट्रीपला जाण्यापूर्वी सर्वांशी बरच काही बोलायच होत, सर्वांची तिकीट आणि डॉक्युमेंट्स द्यायचे होते. माझे अभिजीतशी या दरम्यान दिवसातून एकदा तरी बोलन होत होते. मग येत्या रविवारी (ट्रीपला जाण्याआधीचा एक रविवार) आम्ही सर्वांनी भेटायच ठरवल, माझ्या मते सेन्ट्रल व वेस्टन दोघांसाठी  म्हणून मी दादर सुचवल आणि अभिजीत ठाणे म्हणत होता. पण दोन्ही ठिकाणी बसून बोलण्यसारखी जागा नाही मिळाली म्हणून, ऐश्वर्याच्या सुचवण्यावरून आम्ही बदलापूरला त्यांच्या शाळेत भेटायच ठरल (तिला हि तेच हव होत कारण सुट्टीच्या दिवशी फार लांब यायची इच्छा नव्हती). त्याच दिवशी आम्हाला बाईक्स पण बांद्रा टर्मिनल येथे लोडर कडे सोडायच्या होत्या म्हणून सर्व बाईक्स तयार करण्यास  सांगितल्या आणि रविवारी बदलापूरला भेटण्याचे ठरले.

माझ्या बाईकचे, दुसऱ्या सर्विसिंगचे किलो मीटर पूर्ण झालेही नव्हते. पण काय करणार इंगीन फ्री होण्यासाठी आणि ट्रीपसाठी व्यवस्थित बाईक हवी म्हणून, मी विनंती करून बाईक सर्विसिंग करून घेतली. रविवारी आम्ही पहिले सर्वांनी ठाण्याला भेटून, बाईक्स स्टेशन जवळ उभ्या करून मग ट्रेनने बदलापूरला जायचे ठरले. कारण अजूनही काही लोक अनोळखी होते एकमेकांसाठी म्हणून ट्रेन मध्ये ओळख आणि चर्चा व्हावी हा अभिजीतचे उद्देश होता. मी, अमेय म्हात्रे, कुलदीप आणि शोबित सोडल्यास सर्व सेन्ट्रलचे होते. शोबितने माझ्या बरोबर येण्याच काही धाडस दाखवल नाही, कारण मी त्याला एकदा बरोबर यायच म्हणून स्टेशन वर ३ तास उभा करून घरी झोपून राहिलो होतो. यावेळेला त्याने मात्र काही हिंमत केली नाही आणि ट्रेनने ठाण्यला गेला. अमेय म्हात्रे आणि कुलदीपची मला घोडबंदरच्या टोल नाक्याजवळ भेटून पुढे आम्ही एकत्र ठाण्याला पोहचलो. स्टेशनला बाईक्स लावून आम्ही ट्रेनने बदलापूरला गेलो. ट्रेन मध्ये बऱ्याच गप्पा, चर्चा आणि ओळख झाली. मी साधना आणि दादाला "आशिष" (रोहनचा मोठा भाऊ) यांना पहिल्यांदाच भेटलो. शाळेत पोहचल्यावर कळाले कि अजून ऐश्वर्याच (नेहमी प्रमाणे आळशी) आली नाही आहे. पण आमची फार छान सोय केली होती. बऱ्याच वेळाने ऐश्वर्या आली मग अभिजीतने सर्वांना लागणारे डॉक्युमेंट्स दिले आणि भरपूर चर्चा केल्या. ऐश्वर्याच्या ओळखीचे एक गृहस्त जे लेहला बाईकने जाऊन आले होते  त्यांना हि तिने बोलावले होते. त्यांनी त्यांचे काही अनुभव आणि लेह्ची छायाचित्रे दाखविली. त्यांनी आम्हाला भरपूर टिप्स पण दिल्या,  उदाहरणार्थ ड्रायफ्रुट्स घेऊन जाणे वगैरे वगैरे. ऐश्वर्याच्या आईने आमच्या करिता छान जेवणाची सोय केली होती, मस्त पंगतीत बसून जेवण केले. जेवता जेवता आम्ही  ऐश्वर्याला मजबूत पिडत होते आणि मस्ती चालली होती. सर्व जण ट्रेनने पुन्हा ठाण्याला गेले, मला आणि अमेय म्हात्रेला मात्र आदित्य (ऐश्वर्याचा भाऊ) पुण्याला असल्यामुळे त्याची बाईक घेऊन जायच होत. पूनम, मी, अमेय म्हात्रे आणि ऐश्वर्या तिच्या गाडीने अंबरनाथला गेलो. गाडी मध्ये आमची फार मस्ती चालली  होती, पूनमने एकाला "शिकरण पोळी" ची उपमा दिलेली मला अजूनही आठवते. पूनमला सोडायला घराकडे गेलो तर तिने चहाचा फार आग्रह केला, घरी गेल्यावर तिच्या बाबांनी आमची वरातच काढली. पूनम, अमेय म्हात्रे आणि कुलदीप ट्रीपच्या एक दिवस आधी जम्मूला जाऊन वैष्णव देवीला जाणार होते, हे तिने बाबांना घरी काही सविस्तर सांगितले नव्हते आणि आम्ही दोघे त्यांच्या तावडी मस्त सापडलो होतो. अभिजीतने सर्वांना सर्वाची सविस्तर माहिती आणि डॉक्युमेंट्स दिले होते म्हणून पूनमच्या बाबांना आम्ही सांभाळू   शकलो, ते तर अक्षरश: कागद आणि पेन घेऊनच आमच्या पुढे बसले होते. मग ऐश्वर्याच्या घरून बाईक आणि बाईकचे कागदपत्र घेऊन मी आणि अमेय म्हात्रे ठाण्याला निघालो.

या सर्वामध्ये बराच वेळ गेला, सर्व जण  आमची वाट पाहत होते. आप-आपल्या बाईक घेऊन आम्ही सर्व  ठाण्याहून बांद्रा टर्मिनला जाण्यास निघालो. मला रस्ता माहित होता म्हणून अभिजीतने मला पुढे राहण्यास सांगितले, आरशातून मागे पाहिल्यावर एका मागून एक ओळीने सर्व बाईक दिसत होत्या, मी उजवी किंवा  डावीकडचा सिग्नल दिला कि आरशात सर्व चमकणारे सिग्नल पाहून लेहचा आभास होत होता. वास्तविक  आमचा मजबूत सराव नसून सुद्धा हा ताळमेळ पाहून फार बर वाटल. फार छान ताळमेळाने आम्ही बांद्रा टर्मिनला पोहचलो. अभिने ठाण्याहून निघताना लोडरला फोन केला होता. पोहचताच लोडरने सर्व बाईक्सचे कागद पत्र आणि पैसे घेतले व तो पार्सल ऑफिस मध्ये गेला. त्याच्या पंटरने फटा-फट आरशे काढले आणि बाईक्स पार्सल ऑफिस जवळ ने हून आम्हाला पेट्रोल काढण्यास सांगितले. पेट्रोल काढून झाल्यावर त्यांनी  बाईक्स पुठ्ठे आणि गोणपाटाने बांधायला सुरवात केली. थोड्या वेळानी लोडर सर्व रिसीट्स घेऊन आला आणि प्रत्येक बाईकचे अजून ८०० रुपये दिले तर सर्व बाईक्स वेळेत जम्मूला पोहचतील. नाही तर रेल्वे पोलीस आणि पार्सल ऑफिसर "बाईक मे पेट्रोल अभी भी है" आणि "ये बराबर नही है वो बराबर नही" करून बाईक्स बाजूला काढतील आणि ट्रेन मध्ये बाईक्स लोड करून देणार नाहीत असे सांगू लागला. आम्हाला २ बाईक्स ७ ऑगस्टला आणि उरलेल्या ३ बाईक्स ८ ऑगस्टला कुठल्याहि परीस्थीतीत जम्मूला पाहिजे होत्या,  इतक्यात एक रेल्वे पोलीसवाला तेथे आला आणि "बाईक्स मे का सारा पेट्रोल निकालो और बाईक्स इधर नही पॅकिंग करना" वगैरे वगैरे बोलू लागला. आणि लोडर पण "देखा देखा कैसे तकलीफ देते हे ये लोग" असे बोलू लागला. रेल्वे पोलीस, पार्सल ऑफिस आणि लोडर यांची मिली भगत असून पैसे खाण्याचे हे काम आहे हे आम्हाला कळले. पैसे देण्यापलीकडे आम्हाला काही गत्यंतर नव्हते आणि पैसे देताच लोडरने काढलेले पेट्रोल "डाल दो अभी बाईक मे, अब आपका बाईक कोई भी नही रोकेगा" असे सांगितले. त्या रेल्वे पोलीसवाल्याच्या पुढ्यातच आम्ही एक-एक लिटर पेट्रोल बाईक्स मध्ये परत टाकले, वरून तो पोलीसवाला म्हणाला "करो अभी पॅकिंग करो इधर". अशा प्रकारे आम्ही बाईक्स लोडर कडे देऊन, बांद्रा टर्मिनलच्या कॅन्टीन मध्येच खाउन आप-आपल्या घरी गेलो.

नंतर २ दिवसातच आमच्या ५ हि बाईक्स ट्रेन मध्ये लोड केल्या म्हणून लोडरने सांगितले. आता शेवटचे काही दिवसच राहिले होते, बाईक्स तर गेल्या मुख्य जबाबदारी संपली होती. सर्व जण आता आप-आपले समान बांधणीसाठी सज्ज झाले होतो. मी, अभि आणि सर्व फोन किंवा मेल द्वारे एक-मेकांच्या संपर्कात होतोच. शेवटची सर्व तयारी करता-करता ट्रीप आधीचा दिवस कसा आला हे मला कळलच नाही. ऑफिस मधून घरी आल्यावर मी सर्व समान बांधून सज्ज झालो आणि आराम करीत बसलो असता लेहच्या उत्साहात मी गुंगून गेलो, माझ ५-६ वर्षान पूर्वीच स्वप्न पूर्ण होणार होत. मग मी दिपाली आणि शोबितला फोन करून सर्व चर्चा केल्या. त्यापूर्वी अभिजीतने मला फोन करून सांगितल होते कि वेळेत ऊठ नाही तर फ्लाईट जाईल. दीपालीने पण मला हेच सांगितल होत, वेळेत ऊठ रे बाबा. कारण या सर्वांना माझ्या झोपेचा किस्सा माहित होता. मी लेह ट्रीपच्या आनंदात  झोपी  गेलो.

No comments:

Post a Comment