2.9.15

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - पाचवा दिवस (मालवण आणि जवळ पास)

०९ जून २०१०, कालच्या माझ्या आणि रावच्या मच-मची मुळे आम्ही बरेच उशिरा झोपलो होतो. त्यामुळे आज आम्ही दोघेच सर्वात उशिरा उठलो. बाकी सर्व ९-१०च्या दरम्यान उठले. पण मी आणि राव आरामात ११-११.३०च्या दरम्यान उठलो आणि आता आम्ही दोघेच मस्त रेंगाळत बसलो होतो. आज आमचे तसे जास्त फिरायचे काही ठरले नव्हते. फक्त मालवण (सिंधुदुर्ग) किल्ला, मालवण मधले जयंत साळगावकरांचे सोन्याच्या गणपतीचे मंदिर आणि मग तारकर्ली. या आजच्या भटकंती साठी सुद्धा आम्ही बरेच उशिरा उठलो होतो. पण आता कालच्या मच-मची मुळे आज माझा फार काय मूड नव्हता कोणाला धावपळ करायला लावायला. त्यातून सर्वात महत्वाचे म्हणजे आज रावची पण जरा तब्येत बरी नव्हती. रावने आधीच सांगितले की आज जवळ पासच्या भटकंतीला तो येणार नाही. कालचा थकवा सर्वांचा आज बाहेर पडत होता.

मग काय ज्यांना आज जे करायचे आहे ते त्यांनी करून घ्या असे ठरले. मी मात्र कोणी येवो किंवा नको येवो मी ठरल्या प्रमाणे सर्व पाहणार होतो. माझ्या पाठो-पाठ मग अक्षता पण तयार झाली आणि मग हळू-हळू राजू, राव व सर्वच तयार झाले. मग आता जर सर्वांनी जायचे तर मग आता सर्वांना लगेच तयार व्हायला मी सांगितले. बाकी सर्व तयार होई पर्येंत मी व प्रशांत मालवण मार्केट मध्ये पुढे गेलो. मागाहून सर्व तयार होऊन मार्केट मध्ये आम्हाला भेटले. रावला बरे वाटत नव्हते म्हणून तो घरीच आराम करत राहिला. मला काजू घ्यायचे होते ते आम्ही मार्केट मध्ये असलेल्या झांटे यांच्या दुकानात जाऊन घेतले. मग सर्व मिळून मालवण मधली फेमस वडा उसळ आणि मिसळ खायला दयानंद हॉटेल मध्ये घुसलो. मस्त गरम-गरम वडा उसळ आणि मिसळ बरोबर बऱ्याच गप्पा-टप्पा चालू होत्या. पोट पूजा उरकून आम्ही मार्केट मध्ये एक फेर-फटका मारला आणि मालवण किल्ला पाहाण्या बद्दल चौकशी करायला गेलो. मालवण बंदर गाठले आणि आमच्या साठी एक धक्कादायक बातमी कळली. ३१ मे नंतर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे घेऊन जाणाऱ्या बोटी बंद झाल्या आहेत. सरकारी नियमा नुसार या बोटी बंद होतात. यामुळे आता आम्हाला हा किल्ला पाहायला मिळणार नाही हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागले. किल्ला तर आतून पाहायला मिळणार नाही म्हणून आम्ही बंदरावरूनच किल्ल्याची आणि बंदराच्या परिसरातली फोटोग्राफी करून घेतली. वास्तविक आमच्या या सागरी किल्ले भाग दुसऱ्या ट्रीपचा हा सर्वात महत्वाचा किल्ला होता. किंबहुना संपूर्ण सागरी किल्ल्यातला हा किल्ला महत्वाचा आहे. हा किल्ला पहिल्या शिवाय सागरी किल्ले ट्रीप संपन्न होऊच शकत नाही. पण काय करणार आम्हाला हे हि वास्तव स्वीकारावे लागत होते.




थोडा वेळ मालवण बंदरावरच टंगळ-मंगळ करून मग प्रशांतच्या घरी आलो. आता पुढे काय याचा विचार करायला लागलो. आमच्या यादीतले सर्वात महत्वाचे ठिकाण निघून गेले आणि राहिले होते तारकर्ली व साळगावकर यांचे सुवर्ण गणेश मंदिर. गणपतीचे मंदिर प्रशांतच्या घरा पासून जवळच होते. तारकर्ली परिसर मालवण पासून अंदाजे ७-८ किलोमीटर वर आहे. प्रशांत आणि हेमंतच्या मते तारकर्ली परिसरात पण आता काय पाहायला मिळणार नाही. जसे किल्ल्याला जाणार्‍या बोटी ३१ मे नंतर बंद होतात त्याप्रमाणे तारकर्लीच्या पण बऱ्याच गोष्टी बंद असण्याची शक्यता असू शकते. मग राव, हेमंत आणि आमच्यात एक मत झाले. तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहायला पुढे परत मालवणात येऊ असे ठरले. शिवाय प्रशांतचे घर मालवणात आहेच परत कधीही ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन येऊ शकतो. अश्या पद्धतीने आम्ही आमच्या मनाचे सांत्वन करून घेतले. मग आता उरलेल्या अर्ध दिवस करायचे काय? प्रशांतच्या घरा जवळच चेवला बीच आहे तिकडे जाऊन मस्ती करू असे ठरले आणि संध्याकाळी साळगावकरांच्या गणपती मंदिराला पण जाऊ.

अजून बऱ्याच जणांच्या अंघोळ बाकी होत्या. उन्मेश, प्रशांत, हेमंत आणि राजू चेवला बीच वरून आल्यावर मग आंघोळ करणार होते. मला बीच फार काय आवडत नाही म्हणून मी बीच वर न जाण्याची इच्छा दर्शवली आणि ती मान्य पण झाली. पण माझ्या न जाण्या मुळे अक्षातला बीच वर जाण्याच्या मूड असून सुद्धा नाही जाता आले. मी अक्षातला बोललो की तुला जर जायचे असेल तर मग मी येईन मात्र मी पाण्यात नाही उतरणार. मग ती मला बोलली पाण्यात नाही जायचे तर मग बीच वर कसली मज्जा, जाऊदे मग आपण घरीच बसू. या मुळे मी, अक्षता आणि राव घरीच बसलो आराम करत.


राजू, उण्मेष, प्रशांत आणि  हेमंत बीच वरुन येई पर्येंत आम्ही आमच्या आंघोळ्या आटोपल्या. मागाहून मग ते सर्व जण आल्यावर त्यांनी हि त्यांच्या आंघोळ्या उरकून घेतल्या. आज अभिजित रावला जेवणाचा पण मूड नव्हता.  गेल्या २ दिवसांच्या पळ-पळी मुळे रावची तब्येत जरा जास्तच खालावली होती आणि त्या मुळे आज अभिजित पूर्ण पणे आराम करणार असे ठरले. आम्ही सर्व परत अतिथि बांबू हॉटेल मध्ये जेवायला गेलो. आज मात्र मी काही तरी नवीन चव पाहायची म्हणून मोहोरी मटण ताट सांगितले आणि प्रत्येकाने आप-आपली ऑर्डर सांगितली. आज आमचे मस्त आरामात जेवण चालले होते. दररोजच्या धावपळी तून आज आमचे मस्त रिलॅक्स चालले होते. मोहोरी मटण आणि चिकन व माश्याची मेजवानी हांडली आणि परत घरी येऊन आराम करत बसलो. थोडा वेळ गप्पा-टप्पा   चालल्या आणि मग दीड-दोन तासांची सर्वांनी पथारी पसरली.

उठून सर्व फ्रेश झालो आणि ठरल्या प्रमाणे जयंत साळगावकर यांच्या मालवणातला सोन्याचा गणपतीचे मंदिर पाहायला निघायच्या तयारीला लागलो. आता पण राव घरीच आराम करणार होता, तुम्ही गणपती बघून या असे त्याने सांगितले. प्रशांत व हेमंत ने तर हा गणपती कैकदा पाहिला आहे त्यामुळे तेही येणार नव्हते. मग काय मी-अक्षता आणि राजू-उंमेंश असे चौघेच गणपती पाहायला गेलो. प्रशांतच्या घरा पासून बऱ्या पैकी जवळच मंदिर आहे. रस्त्यात येणार्‍या जाणाऱ्यांना मंदिराच्या रस्ता विचारत आम्ही मंदिरा पाशी पोहोचलो. बाईक मंदिराच्या आवारातच लावल्या आणि घुसलो दर्शनाला. मस्त मंदिर आहे ते आणि गणपतीची मूर्ती पण. फारच मस्त वाटत होते. मी त्यांना विचारले की फोटो काढू शकतो का त्यानी सांगितले हा. मग काय मी सुटलोच, मस्त गणपतीच्या मूर्तीचे फोटो कडून घेतले आणि आलो बाहेर. थोडा वेळ तिकडेच मूर्ती कडे न्याहाळत बसलो मन भरून सोन्याच्या गणपतीचे रूप न्याहाळून घेतले आणि आलो परत प्रशांतच्या घरी.

उद्या आमचा, पुढे गोव्या कडे जायचा प्लान होता आणि प्रशांत व हेमंतची पण परत मुंबईला जायची एस.टीची तिकिटे होती. सर्वांनी मस्त २ दिवस प्रशांतच्या घरी पथारी पसरली होती आणि आता त्या सर्व सामानाची बांधा- बांद करायची होती. प्रशांत व हेमंतची एस. टी उद्या संध्याकाळी कुडाळ वरुन होती, म्हणून आम्ही त्यांना तुम्ही आमच्या बरोबरच चला आणि आम्ही तुम्हाला कुडाळला सोडून मग वेंगुर्ल्याला जातो असे सांगितले. जेणेकरून त्यांना पण निवतीचा किल्ला फिरायला मिळेल. पण प्रशांत व हेमंत काही या पर्यायाला तयार नव्हते. सर्वांनी त्यांना थोडे-थोडे करून समजावून पहिले पण ते काही केल्या ऐकेना. शेवटी मग सकाळी उठून आम्ही आमच्या मार्गाला लागणार आणि ते दुपारी कुडाळसाठी निघणार असे ठरले. प्रशांत व हेमंत आम्ही मालवणात येणार  म्हणून त्या वेळेला आमच्यासाठी आले आणि आमच्या बरोबर मज्जा करायला होते हेच आमच्या सर्वांसाठी फार लागून राहीले होते. आम्हाला सुरवातीला असे वाटले होते कि ते एक दिवस आमच्या बरोबर फिरतील. पण असे काही झाली नाही ते तर सर्वच वेळ आमच्या बरोबर होते.

सर्व उद्याची निघायची कामे केली आणि नेहमी प्रमाणे ठरलेल्या हॉटेल अतिथि बांबू मध्ये जेवायला गेलो. सर्व मस्त गप्पा-टप्पा टाकत जेवण चालले होते. आता मात्र सर्वांचा थोडासा मूड खालावलेला होता. कारण गेले २-३ दिवस आम्ही सर्वांनी मिळून फार मस्ती आणि मज्जा केली होती. आता उद्या आम्ही विभागलो जाणार होतो. जेवण उरकले आणि घरी येऊन परत गप्पा टाकत बसलो आणि मग झोपी गेलो.

No comments:

Post a Comment